अमेरीकन वारीचे फलीत
अमेरीकेची सर्वकष 51 दिवसांची वारी संपली, आता पुढे काय? आम्हा शासकीय कर्मचा-यांना सवय असते. प्रत्येक आठवड्याचा, महिन्याचा आणि वर्षाचा लेखाजोखा ( ABSTRACT) मांडायचा! सवयीनुसार आपण या वारीत काय काय अनुभवले, पाहिले आणि न बघताही काय अनुभवले त्यातून काय नित्कर्ष काय काढले ते आता पाहूया.
वारी चालत केली जाते आम्ही विमानाने/बोटीने/गाडीने केली. वारी सर्व माया-पाश सोडून परमेश्वर डोळ्यासमोर करून कष्ट करून करावयाची असते. या उलट आमची वारी दिर्घ काळ लांब ठेवलेले माया पाश जोडण्यासाठी मुलींना भेटाण्यासाठी गेलो होतो. प्रवास विमानाचा असला तरी प्रवासाची पुर्व तयारी आणि दिर्घ प्रवास कष्टप्रद होता पण जाणवला नाही. मुलगी अमेरिकेत गेल्यावर 4.5 वर्षांनी जाण्याचा योग आला नव्हता पण अचानक ह्या वर्षी अचानक आला. परदेशातील दिर्घ प्रवासाबाबतची धास्ती आणि खाणे-पिणे, हवा याच्याशी जुळूवून घेणे याचा अंदाज घ्यायचा होता. शिवाय नंतरचे कोणी बघितले, आता मुली बोलावतात तेव्हाच जाणे महत्वाचे असते. 16-17 तास ताशी 9000 कि.मि.च्या गतीचा प्रवास अगदी ढगावर तरंगत करणे हा एक अविस्मरणिय अनुभव गाठीशी जमा झाला. “आज मै ऊपर, आसमान निचे “ गाणे का म्हणतात / लिहितात त्याचा अनुभवही घेतला. (गाण्याचा संदर्भ कदाचित वेगळा असेल) श्रीमंताचा देश असतो तरी कसा ही उत्सुकता शमविणे आणि आपण कुठे गरीब आहोत याचा विचार करायचा होता. विदेशाचे आकर्षण आम्हाला दोघांनाही नाही, अजून भारतच बघायचा राहिलेला आहे. मुलींनी जाण्याचा निर्णयाला आम्हा दोघांचाही थोडा विरोध होताच परंतु तो दोघींनी मोडून काढला ही गोष्ट वेगळी. वारी अंती अजुनही आमचे मत बदललेले नसून हेच सांग़णे राहील. कधीही शिकून, कमवून, परत या, इथे तुमचे स्वागतच असेल. त्या किती त्याचा गांभिर्याने विचार करतील ते येणारा काळच ठरवेल.
अमेरीकेत वारी 48 दिवस होती. तेथे
गेल्यावर अफाट विमानाने, मुलीच्या गाडीने,
अनेक प्रकारच्या सायकल रिक्क्शा, बस आणि प्रवासी बसने फिरणे झाले. सॅनफ्रेन्सिको,
गोल्डन गेट, अनेक समुद्र किनारे आणि बोटीतून फिरणे, डोंगर माथे, बर्फ सुंदर जगप्रसिध्द
कॉलेजेस ज्यात हॉवर्ड, सॅन्डफॉर्ड, बर्कले यांचा समावेश होता. अनेक मोठी देवळे, निसर्ग सौंदर्य युक्त स्थळे, उत्तूंग
इमारती, नायगरा धबधबे, जापनिस, बॉटनिकल, रोझ गार्डनस, म्युझीयम्स, मॉल्स, संसद भवन,
राष्ट्रपती भवन आणि स्वातंत्र्यवीरांचे व पुर्व राष्ट्राध्यक्षांचे पुतळे याचे वर्णन
आधीच्या भागात नमुद केलेले आहेत. स्वच्छता, शिस्त आणि स्वातंत्र्य. या तीन गोष्टी तिथे विपुल
प्रमाणात आहेत. आपली मुले (उच्च-शिक्षणासाठी
गेलेली) आकर्षित होतात. शिवाय शिक्षणाचे कौतुक आणि मिळणारे आर्थिक फायदे. भलेही शिक्षण
महाग आहे पण निदान मिळते तरी, इथे तेही होत नाही आणि जिथे होते तिथे काही कारणांमुळे
अन्याय होतो. ( समान संधी चा अभाव, असुविधा, अनुत्सुक शैक्षणिक वातावरण) नेमके हेच
त्यांना तिथे मिळते आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळतो. फिरायला, अद्भुत गोष्टी,
अवाढव्यता यावर जास्त भर दिला जातो. जगात अमेरीका देशाची प्रगती कशी झाली. त्याचे परिणाम
काय आहेत. सामाजिक सुरक्षा काय आहे. व्यक्तीगत स्वातंत्र म्हणजे काय, कायदे स्व:ताहून
आवडीने पाळणे, जीवनात हस्तक्षेप नसणे म्हणजे काय, परदेशस्थ नातेवाईकांचे प्रेम अनुभवणे, परदेशातील मुलांचे आपआपसात असणारे सहकार्य हे अमेरिकन वारीत समजले.
अमेरिकेतील वारीत सॅनफ्रेन्सिको, नॉर्थ कॅरोलिना,
न्युयार्क, वॉशिंग्नटन, नायगरा आणि बॉस्टन येथील वातावरण हे आरोग्यदायी, सुंदर आणि सुखद होते.
यापैकी दोन्ही मुलींकडील सॅनफ्रेन्सिको, नॉर्थ कॅरोलिना येथील वातावरण कायम सुखद आणि
आरोग्यदायी असते. दोन्ही मुलीच्या ठिकाणी शिक्षण उच्च दर्जाचे, शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या ग्रथांलय, खेळ विषयक दिलेल्या सुविधा उच्च दर्जाचे
आहेत. शिक्षणासाठी मुलांना चांगल्या सोई उपलब्ध करुन दिल्या जातात त्यांना बसने जाण्यासाठी
कॉलेजच्या बसेस व इतर बसेस निशुल्क होत्या. मुलांना पुरेश्या पैशा अभावी खाण्या पिण्यासाठी आबाळ होऊ नये म्हणून किफायतशीर
तर कधी निशुल्क साधनसामूग्री देत होते. मुलांच्या शिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी
अत्यंत बारकाईने नियोजन केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास दोन मुलीच्या दोन्ही कॉलेजात
ग्रंथालयासाठी प्रत्येकी दोन इमारती आहे. तेथे नियोजन करून एकत्र अभ्यास करणे, स्वतंत्र
अभ्यास करणे, कॉन्फरन्स करणे याबाबतच्या सोई दिलेल्या आहेत. उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था
आहे. या ग्रंथालयात कोणी कितीही वेळ झाला तरी अभ्यास करु शकतात. आमच्या अमेरिके वारीच्या
काळात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थांना शिक्षण करीत असताना इंटर्नशिपच्या आणि पुढे
नौकरीच्या संधी अमेरिकेत आहेत असे दिसले. मुले
बचत करून, डॉलर वाचवून, नौकरीच्या जागेवर खाणे-पिणे
करून चार-पाच जण एकत्र राहून सामायिक कामे वाटून घेऊन डॉलर आणि वेळ वाचवितात या बद्दल
त्यांचे करावे तेवढे कौतूक करावे लागेल. अमेरिकेतील नौकरीत काही दिवस “वर्क फ़्रॉम
होम” असतात त्यामूळे त्यांना घरी राहून ऑफिसची कामे करण्याची संधी मिळते. अमेरिकेत आम्ही जेथे होतो तेथे भारतात मिळणा-या
सर्व पदार्थ, कपडे, आवश्यक साहित्य मुबलक प्रमाणात डॉलर मध्ये उपलब्ध असतात. त्यामूळे खाण्याचे पदार्थ अमेरिकेत घेऊन जाणे योग्य
होत नाही असे वाटते. अमेरिकेत रस्त्यावर कोणी दिसत नाहीत. रस्ते मोठे, प्रशस्त आहेत
त्यावरून गाडी वेगात चालवावी लागते. सर्व गाडीचालक स्वत:हून रस्ते विषयक नियम पाळतात.
माझ्या मुलींनी प्रवासात हॉन कधीही वाजवला नाही. तिथे रस्ता ओलांडायचा असेल तर क्रोसींग
वरील असलेले एक बटन दाबावे लागते. तिथे वाटसरूंना रस्ता ओलांडतांना गाडीचालक गाडी थांबवून
वाटसरूंना रस्ता ओलांडे पर्यंत थांबतात. वाटसरुंना
प्रथम वाट देणे यास वाहतूक नियमात प्राधान्य आहे. आणि प्रत्येक वाहनचालक ते मनापासून
पाळतात. रस्ते स्वच्छ आणि सुशोभित आहेत तथापि अमेरिकेत सार्वजनिक वहातूक व्यवस्था परिणामकारक
नाही. त्या अभावि तेथे विद्यार्थांना विभागून
कार भाड्याने घेणे आणि नौकरी करणा-यांना चार चाकी विकत घ्यावी लागते. अमेरिका विकसित देश असल्याने त्यांनी ऐतिहासिक स्थळे,
म्युझीयम्स आधुनिक करून निगा राखली आहेत. माझा
भारतातील दिर्घकाळ असणारा खोकला जणू काही येथे विरूनच गेला. इथे घाम येत नाही. दोन्ही मुलींनी एवढे प्रेमाने केले जेवढ़े आम्ही
आमच्या आई-वडीलांचे देखील केले नव्हते असे वाटू लागले. त्यांनी आमची आरोग्याची, प्रवासाची,
खाण्या-पिण्याची काळजी घेतली त्यासाठी त्यानी कोणतीही कसर सोडली नाही. मोठ्या मुलीचे
भावाच्या मुलांचे आणि इतर काही ऑफीस आणि कामाचे
स्थळ देखील उच्च दर्जाचे आहे. हे बघून समाधान वाटले. बाहेरुन आलेले विद्यार्थीच उच्च शिक्षण घेतात आणि
त्यांच्या (स्थानिक) हाताखाली काम करतात. मोठ्या मुलीच्या जवळ माझ्या बहीणीचा मुलगा
आणि दिराचा मुलगा रहातो. त्यांचे आपआपसात प्रेम आहे. त्यामूळे मूलींचे जगणे सुसह्य
झालेले आहे आणि आम्हाला दिलासा आहे. या प्रेमळ नातेवाईकांनी मुलींना मोठी मदत केलेली
आहे आणि पालकांची उणीव भासू दिलेली नाही. छोट्या मुलीकडील तिच्या सोबत रहाणारी मुली
आणि सोबतचे सुध्दा एकोप्याने रहातात त्यामूळे तेथील परस्पर सांमजस्यने जगणे सुसह्य
केलेले आहे असे दिसले. किती तरी वेळा अमेरीकन
माणसांनी आम्हाला ग्रुप फोटो काढण्यासाठी स्व:ताहून मदत केली. मॉर्निंग वॉकला जाताना
समोरील माणूस अभिवादन करतो. अमेरिकेतील मिळणारा
नारळ आपल्या नारळाच्या 3 पटींनी मोठा (बिन शेंडीचा), कांदा पण आपल्या कांद्याच्या
4 पटीने मोठा, लिबू पण तसाच, बटाटा पण वेगळा त्याची आणि येथील चव वेगळी, चेरी अत्यंत
गोड होती. तेथे सुध्दा शेतकरी बाजार भरतो. (Farmer Market). कलींगड तर सालीपर्यंत लाल
आणि गोडीचे. भारतात अमेरिकेतील कांदा, कलिंगड, केळी, लिंबू, नारळाची लागवड भारतात योग्य
ठिकाणी केल्यास देशात यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल यात काही शंका नाही. आता
टॉमेटोचे भाव बघता आपण अमेरीकेत तर नाही ना असे वाटते.
आमच्या अमेरिकेतील दौ-याचे फलित म्हणजे आम्हाला भारतात बसून मुले काय करीत असतील,
परदेशात कसे वागत असतील. कोणी फसवणार नाही ना? काय वेळेवर खात पित असतील का? ऑफिसमध्ये
जास्त काम असतील का? स्व:ताची कामे करणे, ऑफिस आणि घरातील कामे करणे, मदतीला कोणी नाही
असे बरेच प्रश्न होते. तथापि वास्तव्यात तेथे गेलेली मुले सर्व व्यवस्थित करतात आणि
आपण इथे समजतो तसे तिथे एवढे काळजीचे कारण नाही असे लक्षात आले. अमेरिकेतील वास्तव्यात
मुले मोठी झालेली असून सर्व जबाबदा-या समर्थपणे घेऊ शकतात असे लक्षात आले. मुले सुरक्षेबाबत
फार जागरूक असतात आणि अनावश्यक ठिकाणी जात नाहित. अमेरिकेत गेल्यावर आपली पालकाची भूमिका
संपत आल्याचे जाणवले.( जरी ती शेवटपर्यंत संपत नसली तरी)
आता अमेरिकेतील खुपणा-या बाबी थोड्या
बघू. भारतीय मानसिकता असणा-या तिथे वस्तूंचे डॉलर मधील भाव आणि येथील रुपयाची तुलना.
साधी पाण्याची छोटी बाटली पण किंमत रु.240 फक्त. त्यामूळे तेथे मिळणारी प्रत्येक गोष्ट
मग ती कपडे, चॉकलेट, फळे, भाजी, ख़ाऊ भारतीय रुपयाची तुलना करताना अवाढव्य वाटते आणि
जीव मेताकूटीस येतो. तसेच सार्वजनिक स्थळावर विकतचे महागडे पार्कीग यात बराच पैसा जातो.
बाहेरील विकत आणून खाणे, जेवायला बाहेर जाणे,
विकेंड साजरा करणे. तिथे गेल्यावर काही मुलेपण तशीच वागण्याचा प्रयत्न करतात. खाणे-पिणे,राहणे,
त्यांची संस्कृती, स्वातंत्र्य आणि मिळणारे आर्थिक फायदे, मोठे पगाराचे आकडे. जसे देशाचा
आकार, देशाची लोकसंख्या, मिळणारे साधन सामुग्रीची उपलब्धता आणि त्याचा वापर. उदा. जी
गोष्ट आपल्याकडे मुबलक मिळते ती त्यांच्याकडे मर्यादित स्वरुपात आहे. पाणी, वीज, कोळसा,
रोजचा भाजीपाला, दुध, मासे आणि काम करणारे कामगार. म्हणून टेक्नोलॉजी असलेले भारतीय
टॅलेंट त्यांच्याकडे काम करुन त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभारच लावतो. कृषि पदार्थ
बाहेरुन येतात. तिथे चीन, जपान, भारत, मेक्सिको
आणि आशियातून बरेच उच्च शिक्षीत लोक नौकरी आणि कामधंद्यासाठी येतात. साधे पिण्याचे
पाणी दुर्मिळ आहे त्याऐवजी मशीनमध्ये बर्फ मिळेल, शितपेये पाण्याच्या बाटलीच्या तुलनेत
स्वस्त आहेत. मला इंग्लंडच्या राणीची आठवण झाली. “भाकरी परवडत नसेल तर ब्रेड खा” म्हणणारी.
सगळीकडे नुसते ब्रेडचेच प्रकार, दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. साधा भात/ चपाती/ भाकरी तर दुर्मिळच. तीच गोष्ट मिळणा-या
भाज्या वेगळ्याच असतात (कापलेल्या, रेडी टु ईट वगेरे. अगदी निरफणस ( जो केवळ कोकणात विशिष्ट महिन्यात मिळतो)
तो सुद्धा तिथे सर्वकाळ उपलब्ध होता. पण एवढ्या
महाग की घ्याव्याशाच वाटत नाही. बरोबर आहे
म्हणा,”डॉलर आणि रुपयात तुलनाच होऊ शकत नाही. ब-याचशा गोष्टी मशीनवर अवलंबून आहेत.
वोशिंग मशिन, डिश वॉशर वातानुकुलित यंत्र, हिटर, शॉवर, स्मोक डिटेक्टर, वॅक्युम क्लीनर.
सार्वजनिक वहातूक व्यवस्था आणि ट्रेन जास्त नाही त्यामूळे गाडी हाताशी असेल तरच बाहेर पडू शकतो.
सगळे काही रेडिमेड मिळते तर घरी का
बनवायचे? अगदी चपाती, फुलका, पराठेसुद्धा. एकदा घेऊन यायचे, फ्रिजमध्ये जमा करायचे,
पाहिजे तसे पुरवायचे आणि जपून ठेवायचे. त्यातही (ऑफिसमध्ये जेवण मिळत असेल तर) घरी
सहसा कोणी जेवण बनवत नाही. आता जेवण म्हणजे सामन आणा, स्वच्छ आणि कापाकापी करा शिजवा
आणि भांडी धूवून परत ठेवा त्यापेक्षा रेडीमेड खाणे परवडते आणि सोईचे ठरते. सुट्टीच्या
दिवशी इतर कामे एवढी असतात की, पुन्हा घरी जेवण बनवणे शक्य होत नाही. सगळे काही मिळते
फक्त आई-वडिल सोडून! हो, रोज 1-1 तास ड्रायविंग करुन दमून जातात मग कधी बनवणार आणि
कधी खाणार? उद्याची चिंता नाही मग आजच सगळा उपभोग घ्या. दर शनिवार, रविवार कुठेतरी
फिरणे, लांब जाणे, मजा करणे. एकुण काटकसर हा प्रकार माहितच नाही. फक्त शिकणारी मुले
तेवढी आपल्या उत्पन्नानुसार काटकसर करतात. नोकरीपण जास्त करत नाहीत फार तर 50 पर्यंत,नंतर
आराम करतात नाहीतर स्वत:चा धंदा/व्यवसाय सुरु करतात. धाडसी वृत्तीमुळे कोणतीही जोखीम
घ्यायला तयार असतात. माणुस दिसतच नाही एकतर गाडीत असतो नाहीतर घरात. एवढा पझेसिव असतो
की, कुत्रे आणि मांजर सांभाळतील,त्यांना जीव
लावतील पण बाजुच्या घरात जाऊन शेजा-यांशी बोलणेसुद्धा टाळणार. निसर्गप्रेमी आणि कुटुंबवत्सलता
काही ठिकाणी दिसून येते.
वेगवेगळे खाण्याचे प्रकार,चायनीज, इंडियन,मेक्सिकन,
थाय असे असतात.फक्त पैसा आणि आवड असायला हवी. भिती या गोष्टीची वाटते कि, एवढे मोकळे
वातावरणात मुले, मुली वाढतात ( किमान 2 वर्षे) पुढे लग्नानंतरसुद्धा तेवढीच स्पेस एकमेकांना
देतील का? त्यांचा उद्देश फक्त पैसा, प्रगती आणि त्यातुन समाधान व शांती मिळेल का?
काही वर्षांनी याचा पश्चाताप तर नाही ना होणार? एकदा एकटेपण स्विकारले की, समुहात जाणे
कठिण वाटते. असे आम्हाला गावी थोडे दिवस आवडते पण नेहमीसाठी नको वाटते. “मुंबईचा माणुस
कुठेही ॲड्जस्ट होतो” असे म्हणतात पण सगळेच तसे नसतात. भावना, प्रेम, आपुलकी या सगळीकडे
मिळतीलच असे नाही ना! एवढा मोठा देश संपुर्ण बघणे शक्य नाही, एक झलकच खुप काही शिकवुन
गेली. विशेषत: उत्साही ज्येष्ठ मंडळी.(आमच्या एका बाटॅनिकल गार्डनमध्ये एक 75 वर्षाची
आजी विस्तृत आणि उस्फुर्तपणे माहिती देत होती,हातवारे करुन अगदी) ज्येष्ठ मंड्ळींना
जास्त आदर केला जातो. त्यांना सामाजिक सुरक्षेच्या
अनेक सुविधा असतात. त्यांना रहाण्यासाठी वेगळ्या कॉलनी बनविलेल्या पाहिल्या. ते एकटे
राहतात पण एकदम छान आणि व्यवस्थित,स्वत:ला सांभाळून! देशाबद्दल प्रचंड अभिमान असणारी, इतिहासावर प्रेम
करणारी अशी माणसे बघितली की बरे वाटते.
मुलांना स्वातंत्र्य आणि लहानपणापासुन बिनधास्त,स्वयंपुर्ण बनविले जाते. स्त्रिया
अगदी बिकिनीमध्ये असल्या तरी कोणी ढुंकूनही बघणार नाहीत. तान्हया बाळाला बाबासुद्धा
तेवढ्याच जबाबदारीने फिरवित असतो. स्वयंपाकघरात पुरुषसुद्धा जेवण बनवितात. अगदी तिच्या
आवडीचे, मुलांना आवडणारे, नास्तासुद्धा न कंटाळता बनवित असतात. अमेरीकेत घरात एकटे
राहू नये म्हणून घरी मांजर, कुत्राचे पालन पोषण पोटच्या मुलासारखे करतात. त्याचीही
तेवढीच काळजी घेतली जाते. ऑफिसमध्ये, कामामध्ये समानता अधोरेखित केलेली दिसून येते
तरी देखील काही ठिकाणी छुपा भेदभावसुद्धा आढळतो. तरी आपली मानसिकता आणि त्यांचा रुक्षपणा
कुठेतरी दोघांमध्ये फरक करायला लावतो. आपली भाजी-भाकरीच, नीतीमत्ता, संस्कार शेवटी
आपल्यालाच प्रिय वाटायला लागतात. भलेही देश माझा गरीब असेल पण माणुसकी सोडणार नाही.
आपलेपणाने जग जिंकेल, दुस-यांसाठी जीव देईल.
एकूण काय तर, मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी
अमेरिका योग्य वाटते. तेथील अनेक गोष्टी त्यांना आवडतात, भुरळ पाडतात. आमचे वास्तव्य
आणि अमेरिका पहाणे हे मुलींमूळे आल्हाददायक झाले. जे आयुष्यात एकदा बघायला पाहिजे ते
पाहून घेतले. मुली अमेरिकेत राहू शकतात हा विश्वास आला मात्र आपल्यासाठी मात्र थोड्या
दिवसांसाठी अमेरिका (मजा करायला किंवा फिरायला म्हणुन) ठिक आहे.स्वप्नात जास्त रमणेही
धोकादायक ठरु शकते. लांबूनच या स्वप्न-नगरीला “सलाम” असे म्हणावेसे वाटते.

सुंदर लेख 👌👌👌
ReplyDeleteDhanyawad & suswagatham!
DeletePl. Write your name🙏👍
सुंदर समालोचन👌या अनुभवाचं आयुष्यात
ReplyDeleteपुढे काय बदल करू शकतो तेही भारतात याचाही विचार करता येईल cm
Dhanyawad & suswagatham!
Deleteनक्कीच! यावर विचार व्हावा अ से वाटते 🙏👍
Sundar lekh aahe
ReplyDeleteDhanyawad & suswagatham!🙏👍
DeleteNav lihile tar कलेल!