माखनचोर
नुकताच दहीकाला झाला त्यानिमित्त्याने एक गोष्ट वाचनात आली. पैसे मिळविण्यासाठी गौळीणी मथुरेतले सगळे दुध, दही, लोणी विक्रीसाठी घेऊन जायच्या. त्यामूळे घरातल्या मुलांची आबाळ होत असे. मुलांनी हे पदार्थ खाऊ नये म्हणून घरात उंचावर ठेवले जायचे. या दुग्धजन्य पदार्थावर मुलांचा पहिला हक्क म्हणुन कृष्णाला ते योग्य वाटले नाही. त्याने सगळ्या मुलांना गोळा करुन एकावर एक थर रचून दुध, दही, लोणी पळवून मुलांना खाण्याचा हक्क मिळवून दिला. कृष्णाने समान ध्येय असल्यावर एकत्र येऊन एक दिलाने काम केल्यास कसे यशस्वी होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले. किती छान ना! एका अर्थी हे पुण्याचे आणि समानता आणण्याचे काम म्हणू शकतो आपण. लहान वयात धारिष्ट दाखवून हे काम मोठ्या माणसांना दाखविले.
असे अनेक “माखनचोर” आपल्याभोवती अनेक रुपाने आणि अनेक स्वरुपात वावरत असतात. कर-आकारणी, बॅंका, विमा आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंचे विक्रेते. जास्त काही उत्पन्न दिसले की, (उत्पन्न, बचत किंवा खरेदी शक्ती) ते कसे आपल्याकडे किंवा दुसरीकडे वळवायचे याचाच नेहमी विचार करीत असतात. पैसा हे साध्य आणि साधन दोन्ही आहे. “ज्याच्याकडे पैसा आहे तो गरीब तर ज्याच्याकडे पैसा नाही तो श्रीमंत” असे म्हणावे लागेल. वाक्य उलट झाले असे वाटेल तुम्हाला पण तसे नाही.
बुध्दी, कला, कौशल्य आणि सेवा कशामुळे विकत घेता येतात? तुम्ही म्हणाल “पैसा” मग हे ज्याच्याकडे आहे तो गरीब की श्रीमंत? हल्ली माणूस सोडून काहीही मोफत मिळत नाही फक्त त्याचे मुल्य कसे आणि कोणी ठरवायचे हा कळीचा मुद्दा होऊ शकेल. मुलांचे मुलभुत हक्कांवर आपण किती लक्ष देतो हेही त्यानिमित्त्याने लक्षात घेतले पाहीजे. शिक्षण, आरोग्य आणि आई-वडिलांचे प्रेम यावर जरी प्रामाणिक प्रयत्न केले तरी बरेच काही साध्य होईल असे वाटते. त्यांच्या चौकस बुद्दीला आणि नाविन्यपुर्ण कल्पनांना आपण चालना दिल्यास पुढे खूप काही नवीन शोध लागण्यास, त्याच्याबरोबरच इतरांचीही प्रगती होऊ शकेल फक्त त्यांचा कल, आवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
आपण मात्र आज गोकूळाष्टमी (हंडी) सणाचा “इव्हेंट” करुन मोठे थर, आर्थिक लाभ, जाहिरात प्रसिद्धी आणि अनेक गोविंदांचा जीव पणाला लागतोय. आजचा काळ वेगळा आहे. या वर्षी पाण्याचा तुटवडा आहे. पाण्याचे फुगे मारण्याने काही जणांना इजा संभवते. मुलींना त्रासाचे होते. काही लोकप्रतिनिधी खाजगी उद्योगाकडून पैसे गोळा करून मोठे थर लावतात आणि स्व:ताची प्रसिध्दी करुन घेतात. विशेषत: मराठी मूले मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन डीजे लावून वेडावाकडा डान्स करतात त्यात उन्मादाचा भाग असून कृष्ण भक्ती किंवा समाज कार्याचा लवशेष नसतो. अशा प्रकारामूळे अनेक ठिकाणी रस्ते जाम, मुलींना फिरणे अशक्य आणि वेळेचा अपयव्य असा होतो. असेच प्रकार येणारा गणेश चतूर्थी, दिवाळी आणि इतर सणात देखील होतो. आज अशा खेळांना शासनमान्यता मिळते हे आणखी दुख:दायक आहे. आज भारताने चंद्रावर अवकाशयान उतरवले आहे, सुर्यावर आपले अवकाशयान चाललेले आहे. भालाफेक आणि बुध्दीबळाच्या खेळात आपण पुढे जात आहोत. त्याचवेळी मराठी मुले फक्त दादा भाई साहेबांचे टी-शर्ट घालून ढोल ताश्यात नऊ थराचा विक्रम मोडत आहे. शिवाय दुखापतीमूळे ज्यांची मुले/मुली गमावतात किंवा जखमी होतात त्यांचे तर आयुष्यभराचे नुकसान होते ते वेगळेच. कृष्णाने हे जर बघितले तर त्यालासुद्धा याचा पश्चाताप होईल आणि हाती सुदर्शन घेतील 100 अपराध भरायच्या अगोदर. यात आयोजकच पावती फाडून आणि न फाडून नेते मंडळीच्या आशिर्वादाने सण त्यांच्या परीने सिध्दीस नेतात. पैश्यांची मोठी उलाढाल होते. कुठला माणूस स्वताच्या खिश्यात हात घालून हंडीचे पैसे भरेल सांगा पाहू. हे लोक विविध संधी साधून लोणी पळवतात त्यातील काही अंशत: भाग सणांच्या रुपाने खर्च करतात आणि पुढील काळासाठी मतांची बेगमी करतात. सामान्य जनता त्यात भरडते. त्यापेक्षा प्रातिनिधीक स्वरुपाची छोटी हंडी बांधुन तोच पैसा बाळ-गोपाळांच्या शैक्षणिक कल्याणासाठी किंवा एखाद्या आश्रमात योग्य कारणासाठी वापरल्यास ख-या अर्थाने “दही-हंडी” साजरी केल्याचे समाधान सगळ्यांनाच मिळेल.
याच “माखनचोराने” गीतेसारखे अगाध तत्वज्ञान सगळ्या जगासमोर मांडून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे. आपण किती आणि कसे अंमलात आणतो हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्येक समस्येवर उपाय असतो फक्त तो आपण शोधणे आवश्यक आहे. धन, नशीब कमवायच्या नादात “फळाची अपेक्षा न करता कर्म करित राहा” हे आपण विसरुनच जातो. ज्याच्यावर मुख्य आपले आयुष्य अवलंबून आहे त्याप्रमाणे आपण वागले पाहीजे. निदान तसा निर्धार जरी आज केला तरी सणाचे औचित्य साधल्याचे समाधान लाभेल.

An eye opening article! I enjoyed!
ReplyDeleteThank you Madhuri Tai 🙏👍
Delete