फिरुनी जन्मेन मी...

            नुकताच आशाताईंचा 90वा वाढदिवस झाला, त्यानिमित्त्याने दुबईत मोठा सोहळा आयोजित करण्यांत आला होता. हा प्रवास तसा खडतर, संघर्षमय आणि दु:खाने भरलेला तरी हसमुख चेहरा आणि खळीदार हास्याने मात करुन इतरांसमोर त्या आदर्शवतच राहिल्या. दिदी आणि ताईंमधला फरक कटाक्षाने जाणवण्याइतपत आणि सर्वार्थाने सगळ्यांनी परस्पर तुलना करुनही पुरुन ऊरणारा हा आवाज असाच चिरतरुण राहो आणि त्यांचे हास्यही तसेच कायम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आपण सगळेजण करुया.  

             त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग आला मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सन 2021 वर्षासाठीचा “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार प्रदान करण्यांत आला तेव्हा. तशीच आणि तीच प्रतिमा गेले कित्येक वर्षे आम्ही सर्वांनी जपून ठेवलिय त्याचेच पुन्हा नव्याने दर्शन झाले. उभे राहून गाणे असो, मिस्किल उत्तरे देणे असो किंवा सुदेश भोसलेबरोबरची उडती गाणी म्हणणे असो. (चित्रपट: खेल खेल मे, गाणे: एक मै, एक तू) किती वर्णन करु? परमेश्वराची पण कमाल वाटते, एकाच घरात एवढे चार “गाते-गळे” (गान कोकिळा, कोहिनूर) आणि काय ऊपमा सुचतात का बघा) कसे काय देऊ शकतो? ईश्वरदत्त प्रतिभा, आईवडिलांची पुण्याई आणि त्यावर घेतलेली मेहनत हेच त्याचे उत्तर असावे. “आशा” नांव ठेवण्यांत काही तेव्हा हेतू होता की माहित नाही पण त्यांच्या गाण्याने मात्र अनेकांना “जगण्याची” आशा निर्माण केली हेही तेवढेच खरे म्हणता येइल. आज आमची तिसरी आणि माझी मुलगी चौथी पिढीसुदधा त्यांच्या गाण्याच्या प्रेमात आहे हे वेगळे सांगायला नकोच. एवढे कशाला मुलीसुद्धा कायम रात्री झोपतांना आणि गाडी चालविताना त्यांची गाणी ऐकतात (अमेरिकेतसुद्धा) हे बघून ऐकून बरे वाटले. (मीपण मुलीच्या वयात तेच करत होते)  

           इथे मला तुलना करायची नसून वेगळेपण दाखवायचे आहे. अमिताभच्या भाषेत सांगायचे झाले तर एक स्वत: प्रकाश बनणारी तर दुसरी दुस-यांना प्रकाश दाखविणारी ( EVEREADY च्या जाहिरातीतले हे वाक्य) दोघांनी आपापल्या गाण्यातून, वर्तनातून आणि दर्शनातून कायम समाजासमोर आदर्शच ठेवलेला आहे. वादळ येऊच नये म्हणून दारे-खिडक्या बंद करुन बसणारे तर दुसरीकडे मी कोणत्याही वादळाला समर्थपणे तोंड देणारी. एक देवघरातली समई तर दुसरी लखलखती वीज / भडकती ज्वाला पण सर्वसामान्य जीवनात आणि संगितात दोन्ही तेवढेच महत्वाचे असते. दोन्हींचे अस्तित्व वेगळे असले तरी मानवी जीवनात तितकेच दोन्ही आवश्यक असते. सगळे रस (श्रंगार, करुणा, माया, एकटेपणा, भावना, भक्ती, चंचलता) त्यांच्या गाण्यातून पाझरत असतात. त्यांच्या आव्हानांची यादी केली तर एक स्वतंत्र ग्रंथ होईल. सन 2013 मध्ये “माई”या चित्रपटातून त्यांनी अभिनयसुद्धा केलेला आहे. एक पार्श्वगायिका, सुगरण गृहिणी, आई, उद्योजिका आणि अभिनेत्री म्हणून त्यांच्या करियरचा आलेख तर चढता आहेच परंतु आयुष्याच्या मार्गावर दैवाने टाकलेले ऊलटे फासे परतवण्यांतही त्या निपूण आहेत. 

               आशांजींचे गाणे एक मेजवानी असते, अभिनेत्रींनाही लाजवेल अशा भावना त्यात ओतलेल्या असतात. त्या त्या अभिनेत्रीच्या स्वभावानुसार, परिस्थीतीनुसार गाण्याचा स्वभावही बदलणे हे कसे जमते ते त्यांचे त्यांनाच माहिती. मधुबाला, मुमताज, हेलन, बिंदु, हेमामालिनी, झीनत अमान, रेखा यांचे करियर त्यांच्या गाण्याने जास्त बहरले असे म्हणावे लागेल.  एकाच वेळी त्या “दम मारो दम” म्हणून शकतात तर दुसरीकडे  त्या “मेरा कुछ सामान” सारखी गझल गाऊ शकतात? तरुण आहे रात्र अजुनी...  तर दुसरीकडे लिंबोणीच्या झाडाखाली... म्हणू शकतात. गझल, लावणी, भावगीत आणि मुजरा, कॅबरेडान्सरला साजेशी, योडलिंग्ज (जे फक्त किशोर कुमार आणि आर.डी.बर्मनच करत होते ) असे अनेक प्रकार त्यांनी लिलया हाताळलेत. विशेषत: कोकणी गाणी, इंग्रजी वादक, इंग्रजी कलाकार, इंग्रजी व इतर भाषीक गाणीसुद्धा त्यांनी तेवढ्याच तन्मयतेने गायलेली आहेत. लाईव्ह ओर्केस्ट्रामध्ये आशाताईंची गाणी आणि त्यांच्यासारखे गाण्याचे सादरीकरणकेले जात नाही किंवा सहसा म्हटली जात नाहीत. एकमेव आवृत्तीसारखी “प्रती आशा” अशी अजुन जन्माला आलीच नाही. त्यांच्या आवाजाला म्हणून तर “(versatile) चतुरस्त्र”असा आवाज/गळा म्हणतात. किती भाषा, किती live shows किती परिक्षणे, पुरस्कार, मुलाखती याची तर गणतीच करता येणार नाही. आशाताईंना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार Bengal Film Journalists' Association Awards  पुरस्कार, अठरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारासह नऊ फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी विक्रमी सात फिल्मफेअर पुरस्कार, दोन ग्रॅमी नामांकनां व्यतिरिक्त सन 2000 मध्ये, त्यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण, देशाचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 2011 मध्ये भोसले यांना संगीत इतिहासातील सर्वात रेकॉर्ड केलेले कलाकार म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2021 वर्षासाठीचा “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार प्रदान करण्यांत आला आहे.  आशा भोसले यांच्या कार्यामध्ये चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजन, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली आणि रवींद्र संगीत यांचा समावेश आहे. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी 20 हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.  आशा भोसलेच्यां कारकिर्दीत बारा हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.  हिंदीत जेवढी आहेत तेवढीच मराठीतलीही अनेक गाणी माझी आवडती आहेत त्यातलेच एक,” एका तरी जन्मेन मी..फिरुन जन्मेन मी..”किती अर्थपूर्ण आणि भावनाप्रधान आहे हे गाणे!  प्रत्येक स्त्रिची व्यथा त्या गाण्यातुन  सांगताहेत असे वाटते. खरेच आहे ते, अनेक जन्म घ्यावे लागतील स्त्रीची व्यथा समजून घ्यायला!

          साहिर लुधियानवयी ते आताच्या ए. आर. रहमान पर्यंतचे सर्व संगीतकारांबरोबर तर मराठीत बाबुजी, यशवंत देव ते आताच्या सलिल कुलकर्णी सारखेच वागणारी “आशा” बघूनच अनेक गाणी तयार केली जातात असे वाटते. “जब छाये मेरा जादु..” या त्यांच्याच गाण्यातून व्यक्त झालेले वर्णन अजुनही उपभोगत आहोत याचा आपणा सर्वांना आनंदच आहे. खंत याचीच वाटते की, दुसरी आशा होणार नाही, तसा वारसा चालविणारे कोणी नाही. थोडीफार कॉपी केली जाते पण मुळ आवाजाची मजा येत नाही. हे आमचे श्रोत्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आम्ही आणि एकुण 3 पिढ्या त्यांच्या गाण्याने समृद्ध झाल्या आणि पुढेही करत राहतील हीच आमची श्रद्धा आहे.


 

Comments

  1. So nicely written. Geetatai

    ReplyDelete
  2. Excellent write up 👌👌

    ReplyDelete
  3. Dhanyawad 🙏but name?

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन केले आहे आशा ताईं बदधल, बक अप....पूनम

    ReplyDelete
  5. खूप खूप छान लेखन👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेखन 👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव