सायकल
एकेकाळी सगळ्यांचीच “सायकल” ही जीवाभावाची सखी होती. शिकणारे, व्यावसायिक किंवा धंदेवाईक असू दे नाहीतर “स्टेटस सिंबल” म्हणून भारिची ( गीयर1/2/3) अशी काहीतरी घेऊन फिरणारे असू देत. समृद्धीचे तसेच प्रवासाचे एक स्वस्त आणि मस्त 1-2 व्यक्तींचे आणि छोटी मुले यांचा उत्तम साधन आहे/होते असे आता म्हणावे लागेल. हळूहळू स्कुटर, चारचाकीने हिची जागा कधी घेतली ते कळलेच नाही. अजुनही सायकलचा वापर काही प्रमाणात शहरात आणि विषेशत: गावात जास्त दिसून येतो. अचानक आठवण होण्याचे कारण म्हणजे नुकतीच केलेली अमेरिकेची वारी. परदेशांत आता सायकलचे महत्व अधोरेखित झालेले असून त्यांना प्रोत्साहन म्हणून वेगळे रस्ते आखले जातात. त्यांच्या स्पर्धा भरविल्या जातात. वाढत्या पेट्रोलच्या भावामुळे, टोल खर्चामूळे, प्रदूषणाला आळा, व्यायाम यामूळे तर सायकल, इलेक्ट्रीक सायकल आता गरजेचेच झालेले आहे. जवळपास ठिकाणी जायला, ट्रेकींग, वा टोल फ्री, मुलांना आरोग्यदायी म्हणून नक्कीच हे साधन लोकप्रिय होत आहे.
सन 1878 मध्ये किरकपॲट्रिक मॅकमिलन (Kirkpatrick Macmillan) यांना सायकल शोधाचे श्रेय जाते. तदनंतर जेम्स जोह्नस्टोन (James Johnston) यांनी पॅडलवाली सायकल तयार केली. आज सायकल गीअर्स असलेल्या आणि इलेक्ट्रीक बॅटरी असलेल्या आहेत. तुम्हाला गंमत वाटेल पण पुर्वी शासकीय नौकरीत “सायकल अग्रिम” कार्यालयातून मिळायचा, जो आता चार-चाकीसाठी मिळतो. परकीय चलन बचत, प्रदुषण नियंत्रण, आरोग्यदायी, कमीतकमी देखभाल आणि रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून आता आपले सरकारही (चीन, जपान आणि इतर देश यांनी आधीच केलेला आहे.) विचार करू लागले आहे. पुर्वीच्या काळात सिनेमात देखील सायकलवरुन जोडीने फिरणे दाखवायचे. डबल सिट/ ट्रिपल सिट फिरणे हे एक थ्रील वाटायचे तरुणांना! सायकलच्या मागे कॅरियर किंवा पुढे बास्केट लावले की सामान किंवा छोटी बाळांची ने-आण देखील सोयीचे व्हायचे. सायकलवाल्या बाबा किंवा भाऊंना मागे घट्ट पकडून फिरायची (भीती वाटत असली तरी) मजा काही औरच असायची. मुली विशेषत: सायकल चालवायलापण शिकायच्या. यामूळे कॉलेज, कार्यालय किंवा इतर ठिकाणी जाणे सोयीचे व्हायचे. या संदर्भात एक मुन्शी प्रेमचंदचा धडा होता, “नवीन सायकल” घेतली म्हणून नायक मंदिरात पेढे ठेवायला जात असतो, येईपर्यंत त्याची बाहेर ठेवलेली सायकल चोरीला जाते. लहान असताना माझ्या मुलीची सायकल चोरीला गेली म्हणून मुलीने मोठ्ठे भोकाड पसरले होते त्याची आठवण या निमित्त्याने झाली. हो, सायकल लॉक केली नाहीतर चोरीला जाण्याचा धोका असतो. आता तर विजेवर चालणा-या, वेगवेगळ्या स्वरुपात हिरो होंडापासून वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवनवीन सायकल बाजारात आणलेल्या आहेत.
सायकलवर नाव लिहिणे, साखळी, लॉक, घंटी, दिवा अशा अनेक जास्तीच्या वस्तूपण आणाव्या लागायच्या. आधी भाड्याची सायकल घेऊन, शिकून मग नवीन आणणे हा एक रोमांचकारी अनुभव असे. बहुतेक 10 वी किंवा 12 वी झाल्यावर (चांगले मार्कस मिळाले तर-हे एक प्रलोभन असे) सायकल मिळायची. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत सायकल शिकणे, चालविणे हा एक सुट्टीतील अविभाज्य घटक होता. भाचे, नातवंडे, मुले-मुली यांना सायकल शिकविणे, त्यांची भीती घालविणे हा एक धडा सुट्टीत मिळायचा. हे कधी कधी आलटून पालटूनपण चालायचे कारण सायकल एकच किंवा भाड्याची असल्यामुळे सायकल अनेक जणात विभागून चालवायला लागायची. अजुनही पेपरवाला, इस्त्रीवाला, भाजीवाला, दुधवाला, डबेवाला यांना व्यवसायासाठी सायकलच सोयीची पडते.
बान्द्रा स्टेशन ते कुर्ला किंवा मध्ये कुठेही मुक्कामी पोहोचण्यासाठी निळ्या रंगाच्या युलु ( yulu) या भाड्याच्या सायकली सुरु झाल्या असून रिक्शा आणि बसमूळे कार्यालयास होणारा विलंब टाळता येऊ शकेल. मध्यंतरी पेपरमध्ये एक बातमी आली होती.“मुलींना सायकल वाटप” म्हणून. नक्कीच शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून उपयुक्त योजना होती. खरंच किती बहूऊपयोगी, बहुगुणी आणि सर्वसामान्यांचे हित जपणारी ही सायकल अल्पावधितच गरजेची बनून जाते ना! चार-चाकीमुळे जागा, पैसा, अपघाताचे प्रमाण लक्षात घेता एक अत्यावश्यक बाब (निदान गरिबांसाठी तरी) झालेली आहे. उंच-सखल, खडबडीत रस्त्यावर किंवा जास्त लांब जावयाचे असल्यास जरा गैरसोय होते पण तशावेळी इलेक्ट्रीक सायकलचा पर्याय असतातच, बस, ट्रेन, भाड्याची कार किंवा टेम्पो वगैरे. निसर्गरम्य परिसरात सायकलवरुन फेरफटका मारणे यासारखे दुसरे सुख नाही शिवाय -हदय , पोट आणि हाता-पायांना आरोग्य जपण्यास मदत करतेच की! गो ग्रीनच्या संज्ञेत सायकलचा वापर करून अख्खी पृथ्वी वाचवत आहोत याची जाणिव मोठी आहे.
सायकल सारखेच स्केटीग, रोलरब्लेडस, स्केटबोर्डस सुरक्षित रस्त्यांवर आणि सोसायटी आवारात चालविल्या जातात. काही वर्षांपुर्वी ½ तास मुलींची सायकल चालविणे हा माझा आवडता छंद होता. मुलींना शिकविताना मीही शिकले आणि एक प्रसन्न आणि हवेवर स्वार होण्याचा अनुभव घेतला. नाइलाजाने काही वर्षांने हा छंद सोडावा लागला. आता खुप वर्षे झाल्यामुळे सायकलवर बसायला भिती वाटते आणि धीर होत नाही पुन्हा अनुभव घेण्याचा. दुसरे कोणी चालविताना बघून मात्र त्यांचा हेवा वाटतो. बघुया पुन्हा कधी योग जुळून येतो ते! (सेवा-निवृत्तिनंतर कदाचित) हो, ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की, येत असेल तर जरुर चालवा, बघा किती छान वाटेल ते! तरुणांनाही आवाहन करते की, त्यांनी शक्यतो सायकल वापरावी. चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) घाला/बांधा. सायकल चालविणे मनावर घ्या, सगळ्यांचे आरोग्य आपल्या हातात नक्कीच राहिल!
बाय द वे, संसार एक सायकल आहे त्याचे दोन चक्र ही पती आणि पत्नी आहेत. सायकलचे हॅंन्डल वळवून आपण इच्छित ठिकाणी जाऊ शकतो आणि ब्रेक हा मनाचा आहे. ज्याचा ब्रेक उत्तम तो आयुष्यात यशस्वी होतो.

Comments
Post a Comment