गिरनार, दोन ज्योतीर्लिंगे आणि द्वारका-धामाची भेट (आध्यत्मिक वारी)
जुलैमध्ये अमेरीकनवारी संपली आणि आता लगेच 30 सप्टेंबर, 2023 ते 6 आक्टोंबर, 2023 या कालावधीत 6 दिवसांच्या सोमनाथ, गिरनार आणि द्वारका आध्यात्मिकवारीचा योग आला. याआधीची आध्यात्मिकवारी माझी लग्नाआधी 1988 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी केली होती. तेव्हा वाराणसी, हरिद्वार, ऋषीकेश, अलाहाबाद, मसुरी आणि डेहराडुन अशी होती, त्याची आठवण झाली. मध्ये बराच काळ गेला यात्रेचा योग आला नव्हता, यावेळी मात्र जायचेच असे ठरविले होते. माझ्या मैत्रिणिची मैत्रिण सौ. वृशाली प्रदिप तारे, यात्रा प्रमूख आणि श्री. समीर मुतालिक व श्री. प्रशांत कर्णिक यांच्या संयुक्त विद्यमाने “कृपासिंधु परिवार, कळवा” तर्फे सोमनाथ, गिरनार आणि द्वारका अशी “त्रिस्थळी यात्रा” आयोजीत केलेली होती. यात्रेत सहभागी 25 जण होते ज्यात, 3 डॉक्टर, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी, खाजगी व सरकारी नोकरदार तसेच 4 ज्येष्ठ नागरिक, एक तरुणी आणि बाकी सर्व मध्यमवयीन पुरुष-महिला होत्या (वय वर्षे 25 ते 75 ). आम्ही सर्वांनी या यात्रेचा सुखद अनुभव घेतला, तो तुम्हाला सांगावासा वाटला म्हणुन हा लेखनप्रपंच केलाय.
दि. 30 सप्टेंबरला सकाळी बरोबर 12 वाजता
बांद्रा स्टेशन येथे आम्ही सगळेजण जमलो. यात्रा
प्रमूखांच्या सुचना ऐकून दुपारी 1.30 ची वेरावळ एक्सप्रेसने बांद्रा टर्मीनसवरून प्रवास
सुरू होऊन दुस-या दिवशी दि. 1 ऑक्टोंबर, 2023 रोजी 19.00 तासाच्या प्रवासाने सकाळी
बरोबर सकाळी 7.10 वाजता वेरावळ स्थानकात पोहोचलो. तिथे 25 जणांसाठी प्रवासी बस वाट
पहात उभी होती. हॉटेलमध्ये ताजेतवाने होऊन, नाष्टा करुन 10.00 वाजता आम्ही बसने प्रथम
सोमनाथ येथे गेलो. वेरावळ ते सोमनाथ हे अंतर 7.8 की.मी. आहे.
सोमनाथ मंदिर गुजरात राज्याच्या सौराष्ट्र या ठिकाणी समुद्रकिनारी वसले आहे. शंकर
महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. या अतिप्राचीन मंदिराचे
अस्तित्व हे 2000 वर्षाहून अधिक मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर महादेवाचे शिवलिंग
आहे. इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी
या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे. आम्ही प्रथम सोमनाथ जवळील अहिल्यादेवी होळकरने
जिर्णोद्धार केलेल्या शंकर मंदिराचे दर्शन घेतले. नंतर सोरटी सोमनाथ ( 12 ज्योतिर्लिंगापैकि
एक) या मंदिरात गेलो. अतीप्राचीन आजुबाजूचा रमणीय परिसर आणि 12 ज्योतीर्लिंगांची प्रतीकृती
आणि माहिती बघावयास मिळाली. आरती आणि प्रसादसुद्धा मिळाला. जेवण करुन सामान घेऊन लगेच
गिरनारकडे (तलेठी) साठी बसने प्रस्थान केले. वाटेत भालका मंदीर, गोरखनाथ तीर्थ, गीता
मंदीर, बलराम मंदिर, त्रिवेणी संगम आणि कृष्ण जीवनाचा जेथे अस्त झाला तेथील श्रीकृष्ण
मंदिर (भिल्लाने बाण मारुन केलेला अंत) असे बघत बघत शेवटी 6 वाजता तलेठी, गिरनार येथे
पोहोंचलो. संध्याकाळी 7.30 वाजता आम्ही सगळेजण
भवनाथ मंदिर, लम्बे हनुमान आणि भृगी कुंड बघीतले. तदनंतर यात्रा आयोजकांनी गिरनार
शिखर “उडन खटोला” द्वारे शिखरावर
जाणारे आणि पुर्ण चालून जाणा-यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. गिरनार शिखरावर जाणा-या/चढणा-या
प्रथम पायरीचे पुजन केले. यानंतर गिरनार यात्रा 10,000 पाय-या चढणारे आणि केबल कारमार्फत
चढणारे असे दोन गट केले गेले. येताना मात्र दोन्ही गट “(उडन खटोला) केबल
कारने” खाली येणार होता.
दि. 2-10-23 रोजी पहाटे 2.15 वाजता 10,000 पाय-या चढणारे (11 जण) गिरनार चढण्यास रवाना झाले तर दुसरा गट सकाळी 7.00 वाजता रोप-वेने आणि 5000 पाय-यांचे अंतर डोलीने किंवा पायी चढणारे असे 2 गट एकत्र असे एकूण (14 जण) त्याप्रमाणे चढाईस सुरुवात केली. यात्राप्रमूखाने गिरनार चढाई करताना कुठल्या वेळेला कुठे पोहचले पाहिजे याची खडानखडा माहिती दिली त्यानुसार वेळेचे नियोजन व्यवस्थित केलेले होते. श्री. दत्तात्रेयांनी जिथे १२,००० वर्षे तप केले आहे असे अक्षय निवास्थान म्हणजे श्रीक्षेत्र श्रीगिरनार. १०,००० पायऱ्या चालून जाणे हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असले तरी तरूण दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे स्थान. अन्य व्यक्तींसाठी “उडन खटोला 5000 पायरीवर” आणि डोलीची सोय उपलब्ध आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार स्थळ ५ कि. मी. अंतरावर आहे. गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न असून विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करीत आहेत. याच ठिकाणी साक्षात श्री. दत्तात्रेयांनी कित्येक संतांना दर्शन दिले आहे. गिरनार पर्वताच्या पायथ्यांपासून चढाई करताना (तलेठीला) भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन देवळे आहेत. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची जत्रा भरते. मृगी कुंडातील सिद्धांचे स्थान हे प्रमुख आकर्षण असते. येथे अशी आख्यायिका आहे की स्वयं शिव स्नानासाठी येथे येतात. मृगी कुंडामध्ये नागा साधू स्नानास येतात, तेव्हा डुबकी मारल्यानंतर एक साधू असा असतो कि जो अंतर्धान पावतो तोच स्वयं शिव असतो. पायऱ्या चढायच्या आधी एक कमान लागते तेथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या पायऱ्या चढणे शक्य नसते त्यांच्यासाठी डोलीची सोय आहे. डोलीवाले एका व्यक्तीसाठी वजनानुसार रु.५,००० ते 8,००० रुपये घेतात.
गिरनार संपुर्ण चालत जाणा-यांना प्रथम सुमारे २०० पायऱ्यांवर डावीकडे श्री.भैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते. २२५० पायऱ्यांवर श्री.नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांची गुंफा आहे. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, अशी छोटी छोटी देवळे आहेत. बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा जिथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते ते स्थान आहे. पुढे ४,८०० पायऱ्यांवर अंबाजी टूंक येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला आहे. ५१ शक्तिपीठांपैकी हे एक शक्तीपीठ आहे. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो असा प्रत्यय प्रत्येकालाच येतो. अंबाजीमातेच्या मंदीरापर्यंत “उडन खटोला” उर्फ केबल कार येते. तेथून ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ क्षेत्र आहे. "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे" ही गोरक्षनाथांनी केलेली प्रार्थना दत्त महाराजांनी मान्य केली म्हणून हे स्थान उंच पर्वतावर आहे. आजही गुप्तरुपानी गोरक्षनाथांचा वावर आहे अशी भक्तांची धारणा आहे. बाजूलाच पाप-पुण्याची खिडकी आहे. एका बाजूने आत शिरून सरपटत बाहेर पडायचे. यातून मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. पुढच्या गुरुशिखरावर जाण्यासाठी १,५०० पायऱ्या उतराव्या लागतात. थोडे अंतर चालून गेल्यावर २ कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली. १० X १२ चौ. फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या उमटलेल्या चरण पादुका व एक श्री. दत्ताची सुबक मूर्ती आहे. एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. इथून पुढे जायचा रस्ता नसल्यामुळे ज्या वाटेने आपण आलो तेथूनच खाली उतरून कमंडलू स्थानापाशी जाता येते. गिरनार यात्रेत अनेकांना दैवी शक्तीची अनुभूती येते. आमच्या सोबत रात्री अखंड पायी जाणा-या सहका-यांना सारखे कुणीतरी सोबत आहेत आणि पुढे थांबले आहेत असे भास होत होते. एका माझ्या मैत्रीणीस नागा साधूचे दर्शन झाले.
आम्ही (उडन खटोला) रोपवेने (रू.630/-प्रति व्यक्ती जाऊन येऊन) गिरनारच्या 5000 पाय-यावर असलेल्या अंबिका
देवळाजवळ 7.43 मिनीटात पोचलो. तिथून एका दुकानातून काठी घेऊन उंच-सखल यात्रा करीत गिरनारमधिल
अखंड धुनीकडे प्रयाण केले. गिरनार यात्रा करताना काठीची गरज असते. असे म्हणतात की, ५,००० वर्षांपासून असलेली अखंड
धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी
सकाळी सुमारे 9.00 ते 9.30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते. त्या अग्नीरुपानं
साक्षात श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलू कुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६
मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात
रचून ठेवतात) आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच
श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते.
श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन होते. सकाळी 9.00 वाजता
फक्त सोमवारीच पेटणारी अखंड धुनी प्रज्वलित होताना बघून खुप छान वाटले. त्यानंतर
तिथे मिळणारा प्रसाद ( शिरा व ढोकळा) घेऊन गोरखनाथ शिखर चढायला सुरुवात केली.
अंबाजी मंदिर, गोरखनाथ शिखर आणि शेवटी दत्तात्रय पादुकांचे शिखर असे अनुक्रमे 5000
पाय-यांचे अंतर किमान 3 तासात चढलो, उतरलो व पुन्हा चढलो. वाटेत भृगू कुंड, कमंडलू
कुंड असे इतर स्थळे होतीच. विशेष म्हणजे अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत
अनवाणी न थकता/कंटाळता येणारे असंख्य भावीक बघून आश्चर्य वाटले. त्यामुळे कोणताही
त्रास न होता आम्ही सुखरुप सर्वजण 1.30-2.30
च्या दरम्यान पुन्हा खाली (उडन खटोला) केबलकारने सुखरुप परतलो. गिरनारच्या वाटेत
स्थानिक लोक सिलेंडर आणि नित्योपयोगी सामान डोक्यावर शिखर चढत होते ते पाहून मोठे
आश्चर्य वाटले. अत्यंत चांगला अनुभव घेऊन 3 वाजता जेवून 5 वाजेपर्यंत हॉटेलवर आराम
केला. संध्याकाळी पुन्हा एकदा शिवमंदिरात जाऊन “यात्रा
सुखरूप पार पाडल्याबाबत आभार मानून” थोडीफार खरेदी केली आणि घरी येऊन थकलेल्या
पायांना आराम दिला. यात्रेतील द्वारकेला न
जाणारे 9 जण दुस-या दिवशी परत मुंबईला जाणार होते. त्यांना टाटा करुन आम्ही पुढे
द्वारकेला प्रयाण करणार होतो. सदर यात्रा संयोजक आणि त्यांच्या सहका-यांनी
दिलेल्या सुचनामुळे व्यवस्थित पार पाडली.
दि.3-10-23 रोजी 11.00 वाजता ताजे-तवाने होऊन
12 वाजता जेऊन लगेच गिरनारवरून द्वारकेच्या प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासात जांबुवती
गुंफा/गुहा श्रीकृष्णाने रामायणकालीन अमर जांबूवंत वानर सेनापतीस श्रीरामाने दिलेले
युध्दाचे वचन श्रीकृष्णरुपात पुर्ण केले, जांबुवंताची मुलगी जांबुवंती प्राप्त केली
आ.णि स्वयंमतंक मण्याच्या चोरीच्या आळापासून सुटका करून घेतली जेथे हे श्रीकृष्ण आणि
जांबूवंताचे मल्लयुध्द झाले ती गुंफा पाहिली.
तदनंतर हरसिध्दि माता मंदिर आणि स्वामी-नारायण मंदिर बघत बघत संध्याकाळी 7.00
वाजे दरम्यान द्वारकेला पोहोचलो. आता जगंनियंता कृष्णाच्या भेटीची ओढ लागली होती. तथापि
त्यावेळि द्वारका मंदीर बंद झालेले होते.
गुजरात राज्यातील द्वारकाधीश मंदिर
हे हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारका शहरामधील श्रीकृष्णाचे
मंदिर आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित आहे. या मंदिराचे वय २,२००
-२,०००० वर्षे असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
दि. 4-10-23 रोजी सकाळी नाष्टा करुन आम्ही द्वारका
बेटासाठी बसने निघालो. वाटेत गोपी तलाव, रुक्मिणी मंदिर व दारुकावनम येथील नागेश्वर
ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. खाजगी बोटीने जाऊन दुपारी 12 वाजता द्वारकाधीशाचे आणि
सुदामा भेट ठिकाणाचे दर्शन घेतले. यात्रा संचालकांनी केलेल्या खाजगी बोटीच्या आरक्षणाने
बोट प्रवास सुलभ आणि सोपा झाला. बोटीत केवळ कृपासंधू परिवार असल्याने फोटोसेशन आणि
मोकळेपणाने धमाल करता आली. द्वारका-मंदिर परिसरात देवाधिदेव कृष्णमहाराजांचे
दर्शन घेऊन, कथा-कथन ऐकले. परतीच्या वाटेवर रुक्मणी मंदीरास भेट दिली. जलदान (पुर्वजांच्या
नावाने) करणे हा एक विधी तेथे वेगळा वाटला. संध्याकाळी परत द्वारकेस येऊन 6.00 वाजता
द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. द्वारकाधीश मंदीराचा आजुबाजूचा परिसर, कृष्णाच्या राण्या,
शंकराचार्यांचे दर्शन, अनिरुद्धाचे मंदिर, 7 मोक्षाचे द्वार, धार्मिक ध्वजरोहण सोहळा
प्रत्यक्ष बघणे हा एक वेगळा अनुभव होता. मंदिरावरची स्थापत्य कला तर अवर्णनीयच होती.
थोडीफार खरेदी करुन, जेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.
दि.5-10-23 रोजी सकाळी 10 वाजता नाष्टा करुन
निघायचे होते. त्याआधी आम्ही द्वारकाधीश देवळात पुन्हा एकदा धावती भेट देऊन आलो. (आमचा
लग्नाचा 32 वा वाढदिवस होता) हा एक विलक्षण योगायोग होता. रिक्शाने द्वारका स्टेशनला
11.00 वाजता पोहोचलो आणि सौराष्ट्र एक्सप्रेसने 11.45 ला बसून 16 तासाच्या प्रवास करून
6 तारखेला सकाळी 5.00 वाजता मुंबई-सेंट्रलला पोहोचलो. निघताना मन भरुन आले होते. कधी
कधी थोडासा सहवासही खुप काही शिकवून जातो. सोबत हवीहवीशी वाटणे यातच सर्व काही आले.
या वारीचे सविस्तर वर्णन न करता (जागेअभावी)
एकूण गोषवारा खालीलप्रमाणे काढता येईल. सोमनाथ, गिरनार आणि द्वारका यात्रेत 3 गिरीशिखर, 2 ज्योतिर्लिंगे, एक धाम(द्वारका),
बेट द्वारका आणि देवाधिदेव कृष्णाच्या आणि श्री शिवशंकर आणि देवी पार्वतीच्या संबधित
मंदिरे बघून पुण्याईची व थोडी कठिण यात्रा होती. श्रद्धा आणि भक्ती असेल तर सगळे काही
शक्य होते. (2 मजले चढले तरी दमणारी मी एवढ्या पाय-या चढू शकले हे खरेच वाटले नाही.)
इतरांनाही बरेच शारीरिक त्रास होते. प्रवासात 3 पिढ्या होत्या पण सगळेजण एकमेकांना
सांभाळून घेत होते. भाषेचा, जातीचा, प्रांताचा कोणताही अडसर देवाच्या/भक्तीच्या ठिकाणी
येत नाही. “कृपासिंधु परिवार,
कळवा” संस्थेच्या प्रवर्तकांनी
सोमनाथ, गिरनार आणि द्वारका येथे कोणकोणती काळजी, सुचना आणि कोणती खबरदारी घ्यायची
याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याचे अनुसरण केल्यामूळे खूप फायदा झाला. प्रवर्तकांनी
प्रत्येक स्थळाचे महात्म्य सांगितलेले होते. तसेच स्थळावर पोहोचल्यावर कोणत्या गोष्टी
पहाव्यात याचे ज्ञान दिलयामूळे वर पोचलो पण अमूक गोष्ट बघायची राहीली असे झाले नाही.
तसेच गिरनारमध्ये कोणत्या स्थळावर कधी जायचे तेही सांगितल्यामूळे योग्य वेळेत योग्य
स्थळावर पोहचलो. यात्रेत राहणे, खाणे, स्थळ-दर्शन, खरेदी, प्रवास इ.ची उत्तम सोय केलेली
होती, ही एक आदर्श व्यवस्थापनाची वारी होती. सहल/यात्रा आयोजित आम्ही करित नाही तर
“देवच करुवून घेतो” ही नम्र भावना सगळ्यांसमोर नतमस्तक व्हायला लावते.
वेळोवेळी स्थानिक माहिती देणे, कथा सांगणे आणि त्याचे महत्व कसे आहे हे न कंटाळता सांगणे
हा ताईंचा स्वभाव जास्त भावला. दादांची शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन तर उत्तमच! तिन्ही ठिकाणचे नैसर्गिक चमत्कार, विज्ञानाची कमाल
आणि स्थापत्य-शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असे म्हणावे लागेल. गिरनारच्या आजुबाजूला कोणतीही
वस्ती नाही, फक्त जंगल आहे. द्वारकेला बोटिंगशिवाय पर्याय नाही तथापि आता समुद्रावर
ब्रीज बांधला जात आहे. कदाचित पुढच्यावेळी बोटी नसतील किंवा थोड्या असतील. एकीकडे नास्तिक वाढतात म्हणून धर्माची काळजी करणारे,
दुसरीकडे तेवढ्याच ओढीने (आध्यात्मिक) अशा धार्मिक स्थळांना भेट देणा-यांची संख्या
वाढत आहे हेही चांगले लक्षण दिसले. द्वारका आणि काही देवळात विविध पुजा, पुण्य कमवा
या नावाखाली दक्षिणेची अपेक्षा दिसली. पुरोहितांचे वागणे थोडेसे आक्रमक आहे. प्रत्यक्ष
सर्व देवाधिदेव प्रेम आणि सौजन्याने ओतप्रोत भरलेले. पुरोहितांमध्ये नम्रपणा असेल तर भाविकांची संख्या
वाढेल. उडन खटोला आल्यामूळे भाविकांची संख्या वाढली आणि परिसरातील उद्योग धंद्याना
बरकत आली. उद्या द्वारकेचा समूद्र ब्रीज झाल्यावर पण हेच होणार आहे. हिंदू धर्माच्या
भल्यासाठी सर्व हिंदू भाविकांनी योग्य वेळेत एकदा भेट दिली पाहिजे अशी ठिकाणे आहेत.
गुजरातमध्ये
दही-ताक आणि शेव रेलचेल होती त्यामुळे गरमीचा त्रास झाला नाही. जेवण रु.150.00 मध्ये
अमर्यादित आणि त्यात नानाविध प्रकार व गुळ-तुप आवर्जून असते. यात्रेच्या ठिकाणी शंख,
रक्तचंदन, कुंकू, पेढे, अत्तर, उदबत्ती व शरारा
टाईप कपडे खरेदीसाठी चांगले होते. निसर्गाच्या आणि देवाच्या सानिध्यात घरचे/शरीराचे
व्याप आपण विसरून जातो. भलेही हेतू काहीही असू देत, मनाला शांती व समाधान मिळणे महत्वाचे!
एकच ध्येय समोर असते, त्यामुळे मन, शरीर एकरूप होउन जगण्याचे नवीन सामर्थ्य प्राप्त
होते. आज आम्ही 25 जण होतो, उद्या कदाचीत
250 जण असतील, अशीच ओढ वाढावी जे आता जास्त आवश्यक आहे. “प्रसाद मज द्यावा” हे भजन मला खूप आवडले. सोबत त्याची pdf प्रत जोडली
आहे.
हे सर्व लक्षात घेऊनच “ पुन्हा भेटुया” या आश्वासनासह वारीची
यशस्वी सांगता झाली. सदर वारीचे फोटो खूप असल्यामुळे त्यांची लिंन्क सोबत जोडत आहे,
ती अवश्य पाहावी. आवडल्यास नक्की एकदा तरी सोमनाथ, गिरनार, द्वारकावारीचा अनुभव घ्यावा
ही विनंती.
प्रसाद हा मज द्यावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा |
सहवास तुझाची घडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा...
ध्रु||
निशिदिनी तव मी नाम स्मरावे,
वियोग ना तव व्हावा देवा, प्रसाद
हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||१||
हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी,
जन्म मृत्यू चुकवावा देवा, प्रसाद
हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||२||
हृदय मंदिरी तुवा बैसूनी,
ज्ञानयोग शिकवावा देवा.
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद
हा मज द्यावा ||३||
आत्म सुखास्तव प्रसाद द्यावा.
विसर तुझा न पडावा देवा.
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद
हा मज द्यावा सहवास तुझाची घडवा देवा.
प्रसाद हा मज द्यावा || ४ ||









खूप छान लेख.👌🏻👌🏻
ReplyDeleteपरत सर्व यात्रा करून आल्यासारखे वाटले.🙏
Dhanyawad Yogita, tumhi sarvanchech sahakryamule shakya zale🙏👍
Deleteखूपच सुंदर वर्णन. मन तृप्त झाले. वारी करावीशी वाटतेय.
ReplyDeleteNakki kara,nav nahi lihile? Dhanyawad 🙏👍
Delete