पर्यावरण आणि आपण

           पर्यावरण म्हणजे रे काय भाऊ?  असे प्रश्न विचारणारेही काहीजण नक्कीच असतील. पृथ्वी,- आप, तेज, वायु आणि जल याने बनलेले असते ते पर्यावरण. ज्या निसर्गतत्वाने माणूस घडविला जातो तेच हे पर्यावरण होय. तरीही आपण विकासाच्या नावावर स्वार्थासाठी पर्यावरण हे विसरतो ह्याला काय म्हणावे? निसर्गचक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी माणुस आणि इतर सजिव हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. माणुस हा सर्वात बुद्धिमान आणि मन असलेला प्राणी समजतात पण आज तो आपल्याच जन्मदात्यावर उलटतोय असे म्हणावे लागेल. हजारो वर्षाची निसर्गाने केलेली संचित संपत्ती जसे की पाणी वेगवेगळी साधने लावून काही काळात विचार न करता बेदरकारपणे संपवतो. एकतर स्वत:पुरतेच बघणे पुढच्या पिढीचा विचार न करणे हे पुढील पिढ्यांसाठी मोठे दुर्दैव होणार असे आता खेदाने म्हणावेसे वाटतेय. अधिकाअधिकच्या मागे लागुन आपण मिडास राजासारखे तर होणार नाहीत ना ही भिती दिवसेंदिवस भेडसावित आहे सगळ्यांनाच.

         साधी गोष्ट गावी विहीर बांधावी की नाही? हा प्रश्न मध्ये उद्भवला होता. आमचा याला विरोध कारण आधीच तिथे 3 विहिरी होत्या. सगळेचजण खोदायला लागले तर पाणी कुठे मिळणार एवढे? शिवाय नुसती विहीर खणून होत नाही, नंतर पंप लावणार, कष्ट नसल्यामूळे आवश्यकतेपेक्षा जास्त सहज पाण्याचा ऊपसा होणार. एक वेळ अशी येणार, सगळे जमीनीतील पाणी जे जमा होण्यासाठी वर्ष लागत होते ते लवकरच संपणार. जे पाण्याचे तेच खनिजांचे आणि तेलाचे.  ते पुन्हा कसे निर्माण करणार आपण? विज्ञानाने हे शक्य आहे का? निसर्गनिर्मित जे आहे ते संपवायचे कि ते वाढवून त्याची कार्यक्षमता वाढवायची हा खरा कळीचा मुद्दा आहे. आज माझे काम होतेय ना, उद्याचे उद्दया बघू, हा संकुचित विचार मानवाला पुढे एक दिवस पश्चाताप करायला लावणार हे नक्कीच.

       शहर, गाव, खेडे विकासाच्या नावाखाली ओस पडत चालले आहे. ट्रेनसाठी बोगदा पाहिजे, डोंगर पोकळ करा, बांधकामासाठी माती पाहिजे, डोंगर फोडा, नदीची वाळू ऊपसा, रस्ता रुंद करायचाय, वाटेतली झाडे तोडा. इमारती 50-60 मजली उभ्या वाढतायत पण त्यांना मिळणारे पाणी, वीज आणि शुद्ध हवा किती दिवस पुरणार? त्याने खरेच विकास होतो का? का सिमेंटचे डोंगर, धूळीचे साम्राज्य आणि प्रदूषण याचा प्रत्यक्ष होणार फायदा काय? याचा लेखा-जोखा मांडायची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. नाही तर पुढची पिढी जे परदेशात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढतेय तेही एक कारण म्हणावे लागेल. परदेशात निसर्गाच्या सोबत घरे बांधली जातात. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जातात. गार्डन तयार करतात. नामशेष होणा-या प्राणी आणि वनस्पतींचे काळजीपुर्वक जतन केले जाते  पण तशी बुध्दी इथे अजून आलेली नाही.  मग आधीची पिढी आणि जे आहेत त्यांनी काय करायचे? निदान आता तरी निसर्ग-संवर्धन आणि प्रदूषण दुर करणेबाबत गंभीर पाऊल प्रत्येकाने उचलणे आवश्यक आहे असे वाटते. एकीकडे मंगळावर जाण्याची तयारी आपण करतोय, पृथ्वीची अवस्था तरी आपण निट ठेवतोय का?

      पुर्वीची जीवनशैली आताची जीवनशैली यात एकदम जमीन अस्मानाचा फरक आहे. भौतिक प्रगतीच्या दृष्टिने आपण खुप पुढे गेलो असे जरी वाटत असले तरी मानसिक समाधान, आरोग्य  आणि स्थैर्य नको का? बरे, एवढी संपत्ती निर्माण करुन त्याचा उपभोग घ्यायला माणूस (पिढी) सक्षम तर पाहिजे. भेसळयुक्त खाणे, पिणे आणि आयुष्याकडे बघण्याचा बेफिकीरपणा यामुळे आरोग्य कितपत सक्षम आहे याबद्दलही आपण साशंकच आहोत. परदेशातली स्वच्छता आपल्याला आवडते पण इथे किती त्याबद्दल जागरुक आहोत आपण? साधे थुंकणे, कचरा टाकणे, झाडे लावणे, पाणी जपुन वापरणे अशा छोट्या छोट्या गोष्टींतुन आपण हे निसर्गभान (पर्यावरण) जपले पाहिजे.

        निसर्ग कोपला की काय अनर्थ होतो हे आपण वारंवार अनुभवत असतो. त्सुनामी, करोना, 26 जुलै, भुकंप/पाऊस, वादळ असे आनाठायी संकटे मानवाने आपणच ओढवून घेतलेली असतात. नदीचे प्रवाह वळविणे, बुजविणे, समुद्रावर भर घालणे, समुद्रावर पुल/रस्ता बांधणे हे आपण कुठेतरी निसर्गावर आक्रमण करीत आहोत असे नाही का वाटत ? तुम्ही म्हणाल, अहो मग विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग काय? आपण एवढे शोध लावले त्याचा उपयोग नको व्हायला? नक्कीच, प्रगतीसाठी आपण विज्ञानाचा फायदा घेतो पण त्यामुळे नैसर्गिक क्षमता कमी झाली असे होता कामा नये. जिथे मानवी मर्यादा आहेत तिथे नक्कीच आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे पण त्यावर मर्यादा आखावयास हव्यात. साधे उदाहरण देते, मेट्रोसाठी /ब्रिज तयार करण्यासाठी भयानक वृक्षतोड होत आहे, नाईलाज म्हटले तरी तेवढेच तुम्ही दुसरीकडे वाढवणे अपेक्षित आहे. नाहीतर हा जो तोटा झालाय तो भरुन कसा काढणार? नुकसान झाल्यावर भरपाई पाहिजे म्हणून सगळेजण गळे काढत असतात. नुकसान होउ नये म्हणून कितीजणांनी आणि काय प्रयत्न केले ? हा प्रश्न जेव्हा माणुस स्वत:च स्वत:ला विचारेल तेव्हा ख-या अर्थाने माणुस प्रगत झाला असे म्हणता येईल.

       स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्वैराचार जसा अपेक्षित नाही तसेच प्रगती झाली म्हणजे दुसरीकडे अधोगती केलीच पाहिजे असेही नाही. तेव्हा माणसा, आता तरी ख-या अर्थाने भानावर ये. आपले रक्षण आपणच करावयास हवे. जेव्हा विरोध करायचा असेल तेव्हा एकजुटीने केला तरच तो फलदायी ठरतो. जसे अधिकार माहित आहेत त्यासाठी तुम्ही लढा देण्यास सिद्ध होता, तसेच कर्तव्यासाठीही तत्पर राहा.

          देश आपणच बनवत असतो, त्यातील राहणीमान, संस्कृती आणि पर्यावरणच खरे मानवाचे तारणहार असतात. तेव्हा निसर्गाप्रती कृतज्ञ राहुन शक्यतो त्याच्याविरुद्ध जाऊ नको हाच इशारा प्रत्येकाने  काळजीपुर्वक समजुन घेतला पाहिजे. काहीजण प्रयत्न करत आहेत पण सर्वांची साथ असणे महत्वाचे. मुख्य म्हणजे सर्वांना हे भान असणे महत्वाचे. आपण सण साजरे करतो, डीजे वाजवतो. मजा करतो पण त्यानिमित्त किती नुकसान करतो याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? नसेल तर एकदा जाऊन बघा, चौपाटी, उद्याने, जंगल, डोंगर, द-या, शेती यांची काय अवस्था आहे ? याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटते? त्यामूळे आता या प्रगतीचा पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे मला वाटते. निसर्ग -हास होऊ नये यासाठी आतापासुन  प्रयत्न केले की पुढील पिढ़ी सुरक्षित राहील.

                     बघा, विचार करा आणि अंमलात आणा,भविष्य सुरक्षित आखा.





Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव