घी देखा लेकिन बडगा नही देखा
पेपरमध्ये किंवा आपल्या अवती-भोवती अनेकवेळा दिवाळखोर किंवा कर्ज-बाजारी (insolvent) हे शब्द आपण ब-याचवेळा ऐकतो किंवा आपल्या कानावर पडतात. आपण त्यात कधी खोलात जाऊन विचार करीत नाही. एकतर आपले स्वत:चेच एवढे व्याप असतात. दुसरे म्हणजे आपल्याला काय करायचे? मला त्रास होत नाही ना! मग जाऊ दे हा त्रयस्थ दृष्टिकोण. सन 1995 नंतरची प्रकरणे आठवा. हर्षद मेहता, क-हाड बॅंक घोटाळा किंवा शेरेकर प्रकरण असु दे. ज्यांना याची झळ लागली असेल त्यांना नक्कीच आठवत असेल.
दिवाळी जवळ आली म्हणून हा विषय घेतला
की काय असा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो, थोड्या प्रमाणात खरेही आहे. पुर्वी एक
म्हण होती, “ ऋण काढून सण साजरा
करु नये” असे मोठी मंडळी
वारंवार सांगायची सुद्धा! आमच्या आधीची पिढी कर्ज घेण्याच्या विरुद्ध असायची. आंथरूण
पाहून पाय पसरणे. कर्ज घ्यायला वेळ लागत नाही, नंतर फेडायला मात्र आयुष्य, पैसा आणि
वेळ महत्वाचा निघून जातो. मुलीचे लग्न, घर/जमीन घेणे, शिक्षण आणि नोकरीसाठी ब-याचवेळा
कर्ज काढावे लागते. त्यात पुर्वी “दिवाळी हा सण मोठा,
आनंदा नाही तोटा” अशी अवस्था असायची. त्या हेतुनेच मग कंपन्या दिवाळीला कामगारांना बोनस द्यायच्या. सरकारी कार्यालयातसुद्धा
बोनस मिळायचा आता सण अग्रिम मिळतो मग त्यातून खरेदी होऊन जायची. अंगण-वाडी सेविकांना
“भाऊबीज भेट” म्हणून काही रक्कम
अजूनही दिली जाते. थोडक्यात “पुढे होणारी दिवाळखोरी” टाळावी म्हणून आणि
कर्ज घेण्याचे प्रसंग टळावे. आता तर काय मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशीन, व्यवसाय सुरू
करण्यासाठी दुकानदार,बॅंका, वित्तीय संस्था विविध माध्यमातून सुलभ हप्त्यांवर कर्ज
देतात मग लोक सहज कर्ज उपलब्ध होते म्हणून कर्ज घेऊन सण साजरा करायला लागतात.
शेतक-याचीच नाहीतर आणखीन कोणाची आत्महत्या असू दे, त्याची 90% कारणे ही घेतलेले न फेडता येणारे कर्ज
/ मिळत नसलेले काम याची जाणीव झाल्यामुळे असतात. तरी हा विषय आपण गंभीरतेने घेत नाही
याला काय म्हणावे. नुकतेच प्रकाशात असलेले “चंद्रकांत देसाई’
प्रकरण असू दे, नाहीतर काही सिने-जगतातील अभिनेते
किंवा दिग्दर्शक असू दे. यामागे अत्यंत टोकाची भुमिका घ्यायला हे कर्ज भाग पडते. वित्तीय
संस्था, बॅंका, सावकार आणि आताची वेगवेगळी कार्डस (डेबिट/क्रेडिट) ग्राहकांना कसे गळ्यात
मारायचे हे बरोब्बर माहित असते म्हणुन ते असे ग्राहक शोधतच असतात. तरुण आणि श्रीमंत
मुले कमी कष्टात स्वप्नपुर्तीची आस बाळगून असतात ते या आमिषाला बळी पडतात.
दिवाळखोर म्हणजे कर्ज फेडता येत नाही म्हणून
कोर्टाच्या आदेशानुसार दिवाळखोरी जाहिर होते. “उत्पन्नापेक्षा कर्जाची रक्कम
वाढत जाणे” सुरवातीच्या काळात
हप्ता भरायला काही वाटत नाही. नंतर उत्पन्नाची वाढ अनुमानानुसार झाली नाही किंवा इतर
काही अचानक उद्भवलेले खर्च किंवा जबाबदा-यांमुळे कर्जाचे हप्ते वाढत जातात किंवा कर्ज
फेडणे शक्य होत नाही. काहीजण बेरकी असतात त्यामुळे
ते टेंशन घेत नाहीत तर काहीजण लोक- लाजेस्तव जगापासून तोंड लपवतात आणि निराश होऊन जगाचा
निरोप घेतात. काहीजण निर्लज्जपणे स्वत:ला “दिवाळखोर” म्हणून जाहीर करतात.
ही दिवाळखोरी जशी व्यवसायात असते तशीच सर्वसामान्य माणसालाही भेडसावत असते. कारणे वेगवेगळी असली तरी कर्जफेडीतून अनेकदा यातून
बाहेर पडणे महत्वाचे असते.
नुकताच आलेला करोनाच्या काळात नोकरी जाणे,
व्यवसाय बंद होणे या कारणामूळे ब-याच जणांचे पैशाचे गणितच बिघडून गेले. खाजगी नोकरीवाले,
धंदेवाईक असू दे नाहीतर व्यावसाईक, हातावर तोंड असणारे तर त्यांचे हाल किती झाले असतील
त्याची कल्पना न केलेलीच बरी. या दिवाळखोरीला त्या व्यक्ती नव्हे तर परिस्थिती जबाबदार
होती पण अन्य स्वत:हून ओढवून घेतलेल्या अनावश्यक कर्जासाठी ती व्यक्ती जबाबदार
असतात! ती व्यक्ती, तिचे कुटूंबीय, आर्थिक नियोजन आणि शासनाचे/ कंपन्यांचे/ बॅंकाचे
आर्थिक नियम व कायदे, अवास्तव व्याज आकारणी, फसवणूक करण्याची वृत्ती, कर्जावर पुन्हा
कर्ज घेणे( आधीचे फेडण्यासाठी), पैसा कमविण्याचे सोपे/अघोरी ऊपाय. जसे की, रमी, रग्बी,
रेस, सट्टा किंवा जुगार, काही दिवसात करोडपती होण्याचे स्वप्न पाहून आमिषांना भुलून
पैसे गमावणारे यात कसे गुंडाळले जातो तेही कळत नाही.
दुसरी एक आध्यात्मिक किंवा मानसिक “दिवाळखोरी” जी वयपरत्वे किंवा
कोणी दुखावले की प्रत्येकाच्या मनात दाटून येते. मी एवढे वर्षे सगळ्यांचे केले आता
मला कोणी विचारत नाही किंवा त्याची जाणीव ठेवत नाही. मी एवढे सगळ्यांना सांभाळून घेतले
आता मला होत नाही तर मला कोणी सांभाळुन घेत नाही. नात्यांचा आलेला दुरावा किंवा अकाली आलेले जवळील नातेवाईकांचे मृत्यू हेही काही जणांना त्रासदायक होते. आलेला एकटेपणा,
हा खरे तर काळाचा महिमा म्हणून किंवा गरज म्हणुन सोडून देणे एवढेच आपल्या हातात असते.
तरी काहीजण स्वत:ला यातच गुंतवून ठेवतात आणि हळुहळू निराश होत जातात. कालांतराने परिस्थिती
दुर्बळ माणसांना ताब्यात घेतात आणि ती माणसे एकप्रकारे भ्रमिष्ट होऊन एका क्षणी मृत्यूला
जवळ करतात. आपल्याला अध्यात्म वारंवार हेच
सांगत असते “ नको गुंतूस, ही
सर्व मोह- माया आहे,” आज ना उद्या हे सर्व इथेच सोडून जायचे आहे” आणि महत्वाचे म्हणजे आपल्यापेक्षा अन्य जणांना किती
तरी पटीत दु:खे आहेत. त्यांच्या दु:खाचा विचार जरी केला तरी आपली दु:खे कमी वाटतील.
अशी हजारो उदाहरणे आहेत की, अत्यंत वाईटातील वाईट प्रसंग अनुभवलेला पण स्व-प्रयत्नाने
आणि कष्टाने पुढे जाऊन गमावलेल्यापेक्षा कित्येक पटीत ऐश्वर्य आणि किर्ती परत मिळवतात
आणि समाजमान्य होतो हे पाहून जगण्यास उभारी येते. उदा. घ्यायचे तर अमिताभ बच्चन, यांचे देता येईल.
हे सर्व माहित असूनही आत्महत्या होतातच, शेवटी ऐकला तर तो माणूस कसला!
आपले पुर्वज
म्हणूनच “अंथरुण पाहून पाय
पसरा” असे सांगायचे ते उगीच नाही. आता काहीजण म्हणतात की
चादर मोठी करा, पण ते नेहमीच शक्य नसते ना!
परदेशात तर 90% लोक कर्जबाजारी असतात असा एक अहवाल सांगतो. कर्ज दिलेल्या बॅंकांदेखील
दिवाळखोर झाल्यास ठेवीदार बुडतात. कंपनी दिवाळखोरित गेली तर कंपनीतील भागधारक आणि कामगार
धोक्यात जातात. त्यांनी घेतलेले घर कर्ज, जमिन कर्ज, वाहन कर्ज फेडणे अशक्य होते. अशी
ही दिवाळखोरी (दिर्घकालिन) कुणालाच आणि केव्हाही
योग्य नसतेच. त्यातून बाहेर पडणे किंवा इतरांनाही मदतीला घेणे हेच योग्य ठरते मात्र
“ आत्महत्या “ हा त्यातुन बाहेर
पडण्याचा मार्ग नसावा इतकेच. हो, असे जर कोणी
आसपास असतील तर त्यांनाही मदतीचा हात द्या. मला नेहमी असेच वाटते की “ घी देखा लेकिन बडगा
नही देखा” त्याचे हे परिणाम
असावेत.

अतिशय वास्तवदर्शी लिखाण !
ReplyDeleteDhanyawad Madam 🙏👍
ReplyDelete