आयुष्य छान आहे ! LG (Life is Good)
नुकतेच 2023 वर्षे संपले आणि कार्यालयातील सवयीनुसार आढावा घ्यायचे मनात आले. आढावा घेण्याची सवय एवढी अंग़वळणी पडलेली आहे की, वैयक्तिक आयुष्यही त्याला अपवाद ठरत नाही. “रिकामे डोके…” या म्हणीनुसार घेतलेला हा अविचारही कुणाला वाटू शकतो. त्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणावयास हरकत नाही.
वर्षाची सुरुवात मुलीचे आजारपण आणि इतर
काही गोष्टींमुळे थोडे चिंताजनक आणि शेवटही माझ्या आजारपणातच झाला. सक्तीची विश्रांती
आणि सिंहावलोकन करायची आवड यामुळे काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बघा तुम्हीपण प्रयत्न
करुन, आणि हो, देवाचे आभार मानायलाही विसरु नका. त्यातुनच आपण काही तरी शिकत जातो आणि
संकटाला तोंड देण्याचे धैर्य वाढीस लागते हेही नसे थोडके!
मार्चमध्ये 3 वर्षे रखडलेला व्हिसा मिळाल्यामुळे
आम्ही लगेच जुनमध्ये अमेरिकेला 2 महिन्यासाठी जाऊ शकलो. एप्रिलमध्ये महाबळेश्वर, प्रतापगड
अशी ऐतिहासिक वारी घडली. मेमध्ये रायगडाची भेट घडली. जुन,जुलै मध्ये अमेरिकेन वारी
आणि तेथील दोन्ही मुलींकडे जाणे झाले. ऑगस्ट महिन्यात मी लिहिलेल्या निबंधाला “ शिवाजी महाराजांचे
समग्र शिक्षण” प्रोत्साहनपर बक्षिस
मिळाले होते ते प्रत्यक्षात हातात मिळाले. शिवाजी महाराजांचा प्रसादच मिळाला असे वाटले
कारण मानपत्र, कट्यार आणि तोडा अशा शिवकालीन वस्तू बक्षिस म्हणून मिळाल्या होत्या.
सप्टेंबर महिन्यात नविन घराचा ताबा घेण्याबाबत
पत्र मिळाले. जे गेले 4 वर्षे रखडलेले होते. विचार पक्का होत नव्हता कारण सेवानिवृत्ती
आणि थोडा प्रवास वाढला असता म्हणून नवीन घरात
जावे किंवा न जावे याचा निर्णय होत नव्हता पण आलो नवीन मोठ्या घरात.
आक्टोंबर महिन्यात
गिरनार, द्वारका आणि सोमनाथ अशी अध्यात्मिक वारी झाली.
नोव्हेंबर महिन्यात पुन्हा किल्ले
सिंहगड आणि पन्हाळयाची कार्यालयीन महिलांसहित गडदर्शनाचा योग आला. काय तो एकदाचा निर्णय
घेऊन नोव्हेंबर महिन्यात चावी घेऊन डिसेंबर महिना अखेर राहण्यासाठी जायचे ठरले.
“माणूस ठरवितो एक
आणि घडते दुसरेच” याप्रमाणे 16 डिसेंबरला मी नेमकी गंभीर आजारी झाले कि
तात्काळ मुली धावत आल्या. त्यातच घराचे शिफ्टिंगची जबाबदारी मुलिने मनावर घेतली आणि
मला संपुर्ण आराम दिला. एकीकडे मुलगी आल्याचा आनंद होता तर दुसरीकडे तिलाच सर्व करावे
लागल्याचे दु:खही वाटत होते. वडील होते तसे सोबतीला पण प्रवास, ताण आणि दगदग खूप झाली
तिची. नंतर दुसरीपण मुलगी धावत आली. नको नको म्हणून सांगितले तरी ऐकतात कुठे? मोठ्या
मुलीने हॉस्पीटलात सांभाळले आणि घरातील सामान आणून ठेवले, दुसरीने ते नवीन घरात आल्यावर
रीतसर लावून दिले. असा एकूण माझा मुलीसोबत
आराम झाला पण त्यां तिघांची खुप धावपळ झाली याचे वाईट वाटले. मग तु “ आजारी पडु नकोस,
काळजी घेत जा स्वत:ची स्वत:” हे मधून मधून ऐकावे लागायचे.
या सर्वातून काय काय शिकायला मिळाले
ते आता सांगते. शरीराने धोक्याची घंटा वाजविल्यामुळे काळजी घेणे सक्तीचे झाले. मुलींचा
धाक आणि प्रेमळपणाही जाणवला, त्या लवकर मोठ्या आणि जबाबदार झाल्या याची जाणीव झाली.
तेवढी समज तर त्यांच्या वयात मलाही किंवा यांनाही नसेल. परदेशात गेल्यामुळे जबाबदारीची,
तिथल्या नियोजनबध्द शिप्टिंगचा अनुभव इथे आल्यावर कामाला आला. अमेरिकेत सर्व काही स्वत:लाच
करावे लागते, अगदी सामानाचा ट्र्कसुद्धा मुलीने स्वत:च चालविला हे आम्हाला आता कळले.
जुन्या वस्तु, घर, जागेत, जुन्या सामानात जास्त रमायचे नाही. पाहिजे म्हणुन ठेवलेली
कित्येक वस्तु नंतर अगदी कच-यात टाकून देताना खुप वाईट वाटले. नवीन वस्तुसुध्दा ठेवल्या
की खराब होतात. कपडे, फर्निचर आणि जड वस्तू नेताही येत नाहीत आणि ठेवताही येत नाहीत
अशा काही वस्तूंना अक्षरश: रद्दीत घेऊन जायला आम्हाला पैसे द्यावे लागले. साफ-सफाई
कामगार,सामान नेणारे यांचे भाव आणि उणिव जाणवली. खरेदीमुळे किती महागाई असते बाजारात
ती कळली. कसे काय लोक एवढी खरेदी करतात असाही प्रश्न पडला. काटकसरीने राह्ण्यांत एवढी
32 वर्षे कशी गेली ते कळलेच नाही.
नवीन घर, नवीन माणसे, वृत्ती आणि जुन्याची
किंमत कळली. मोठ्या घरात मोठ्या मागण्या वाढत जातात हेही लक्षात आले. एवढे दिवस सुखी
होतो असे वाटायला लागले. सुख भोगायला शरीराची साथ लागते याची जाणिव झाली. आपण आजारी
पडले की सगळेच थांबते हे लक्षात आले. तरी सावरणारे हात आहेत याचाही आधार वाटला. आम्ही
आमच्या आई-वडिलांसाठी कदाचित एवढे केले नसेल तेवढे आमच्या मुलींनी आमच्यासाठी केलेले
बघून थोडे अपराधी तर थोडा अभिमान वाटला. आपण केलेले संस्कार, मुलींची तत्परता, निर्णय
घेण्याची क्षमता याचे कौतूकही वाटले तर त्यांना आपल्यामुळे त्रास झाला याचे वाईटही
वाटले.
असा एकूण आमचा लसावी/मसावी सन 2023 चा काढला, तुम्हाला कसा
वाटला?
सर्वांचे नवीन वर्ष 2024 सुखाचे
जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

मस्त! गीताताई
ReplyDeleteDhanyawad 👏 Geetatai!🙏
DeleteKhup chaan!
ReplyDeleteDhanyawad 🙏 name please!
Deleteछान आहे.
ReplyDeleteDhanyawad,name please 🙏
Delete