सोनेरी आवाज हरवला….. आणि मन उदास झाले….

             नकळत्या वयात रेडिओ आणि रेडिओ सिलोनचा जो संबंध सुरु झाला तो केवळ श्री. अमिन सयानी यांच्या आवाजामुळेच. एखाद्या आवाजाचे वेड लागणे म्हणजे काय ते या आवाजाने शिकवले. लहानपणीचे स्टाईल आयकोन असे म्हटले तरी हरकत नाही. त्यांचे उर्दुमिश्रीत हिंदी आणि मिष्कील बोलणे कधी एकदा ऐकतो असे व्हायचे. त्यामध्ये घरातले सर्व आबालवृध्द्द सहभागी असत. आई-वडिल, भाऊ आणि मी उर्दू भाषेची माझी आवड त्यांच्या बोलण्यातूनच निर्माण झाली असावी असे वाटते. एवढी की एकाने एकदा तसे बोलूनही दाखवले, मॅडम आपके उर्दू उच्चारण इतना सहज कैसा है? लहान वयात बोलण्याने/ऐकण्याने एवढा प्रभाव पडू शकतो हे त्यादिवशी मला कळले. तेव्हा माझी हिंदी बंबैय्या नव्हती त्यामुळे असेल, फार जुनी गोष्ट आहे ही ! ( साधारण सन 87-88 च्या दरम्यान).1993 च्या नंतर शासकीय कार्यालयात लागल्यामुळे हळुहळू शुद्ध हिंदी बोलणे कमी झाले.

              एखादा बुधवार बिनाका गीतमालानाही मिळाले ऐकायला तर अगदी चुकल्या- चुकल्या सारखे वाटायचे. कार्यक्रमाची उंची कशी वाढवायची ते ह्या माणसाने शिकवले. त्यानंतर मला वाटते हिच गोष्ट कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने सिद्ध करुन दाखवली असेल. गाण्याची लोकप्रियता, वेगळे संवाद (पायदान, बहनो और भाईयो,….) आणि मधुन मधुन आवश्यक तिथे किस्से, कधी तबस्सुमची फिरकी (इतर कार्यक्रमात) आणि शेवट फिर मिलेंग़े चा विश्वास असा एकूण प्रकार होता.  त्यातले फारसे काही कळायचे नाही पण असा आवाज आणि बोलणे आपल्याला आले पाहिजे असे मात्र अजुनही वाटते. त्यासाठी मध्ये एक वर्गही केला पण जमले नाही तो भाग वेगळा. कदाचीत तो आवाज किंवा बोलणे हा एकमेव अद्वित्तिय असावा असा असेल. मराठीत करुणा देव आणि सुधीर गाडगीळ/ प्रदीप भिडे यांनी तशी थोडी फार भरपाई केली पण त्यांच्यासारखे तेच. आज सगळ्या या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या ते त्यांच्या मृत्यूनंतर. मध्यंतरी ते फारसे प्रसिद्धीत नव्हते. संगीत कारवान आणि त्यांनी घेतलेल्या  मुलाखती काही खूप गाजल्या होत्या. काही कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पण ते करत होते. हळुहळू दुरदर्शन आल्यामुळे रेडिओचे महत्व कमी झाले. बिनाका गीतमाला हा कार्यक्रमही बंद झाला. त्यांच्या आवाजाचा उपयोग जाहिरातीत वगैरे वापरला पण दुरदर्शनला कधी बोलवावेसे वाटले नाही एवढे मात्र खरे. कालाय तस्मै नम:!

            माझ्या आधीच्या पिढीने व आम्ही हे सगळे अनुभवले असेलच.  विशेष म्हणजे जेव्हा (voice culture) आवाजाची संस्कृती हा शब्दही माहित नव्हता तेव्हा यांनी तो ख-या अर्थाने रुढ करुन दाखविला. हल्ली बरेच करियर म्हणून डबिंग कलाकार, स्वत:चे स्टुडिओ काढून व्यावसायिकरित्या आपल्या आवाजाचा उपयोग करुन घेतात. तसे त्यावेळी होत नव्हते. जाहिरातीसुद्धा मर्यादितच आणि रेडिओवरच असायच्या. टि.व्ही.वर जेव्हा प्रत्यक्ष बघण्याचे फायदे दिसायला लागल्यावर हे प्रमाण वाढत गेले. आता तर कार्यक्रम कमी/छोटा आणि जाहिराती जास्त अशी परिस्थीती बघून कंटाळा येतो कधी कधी. वयाची 90 व्या वर्षापर्यत कार्यरत राहणे आणि आवाज तोच कायम शेवटपर्यत राहणे हेही एक दैवी वरदानच म्हणावे लागेल. हा माणुस ख-या आवाजाने भारतीय चेहरा म्हणून परदेशातही प्रसिद्ध झाला आणि तरुणांना मार्गदर्शक ठरला हे काय कमी आहे का? हल्ली रेडिओ जॉकी म्हणुनसुद्धा  त्यांच्या आवाजाला एक वलय प्राप्त होत आहे.

          ज्यावेळी करमणुकीचे कोणतेही इतर साधन उपलब्ध नसताना हिरो होण्यासाठी आलेला हा मुलगा, त्याने आवाजाच्या दुनियेत एवढे जग निर्माण केले की, रेडिओमागचा आवाज हे समीकरण बनुन गेला. आज करलो दुनिया मुट्ठीमें म्हणत आपण जगभर प्रसारण करु शकतो. त्यावेळी तेवढे विज्ञान प्रगत नसुनसुद्धा हा कार्यक्रम आणि रेडिओ ख-या अर्थाने घराघरात आणि मनामनात पोहोचला. भारतात त्या काळात रेडीओवर हिंदी गाणी ऐकायला ब-याच अडचणी होत्या त्या वेळी सिलोनसारख्या देशाने त्यांच्या आवाजाची जादू ओळखून त्यांच्या आवाजाचे चीज केले पण आपण भारतीय मात्र करु शकलो नाहीत. केवळ विवीध भारतीने तेवढी ओळख करुन दिली. पुढे मात्र ते पडद्याच्या मागेच राहीले. नाही म्हणायला मुलासोबत नंतर यु टूयब वर त्यांचे अनेक संग्रहित भाग आहेत. अनेक मुलाखती आहेत पण त्यांनी कधी त्याचे वर्ग किंवा आवाज कसा कमवावा यावर कधी भाषण दिले नाही किंवा कोणी त्यांना तसा प्रश्नही विचारला नसावा. आजकाल लगेच यामागचे रहस्य काय? असा प्रश्न अगदी नवोदितांनाही विचारला जातो. अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले होते. अनेक सुत्र-संचालनाचे कार्यक्रम देशात-परदेशात करुन त्यांनी एक आदर्श निर्माण तर केलाच याशिवाय बोलावे कसे याचा एक परिपाठही घालून दिला. अशा या सोनेरी आवाजाच्या कलाकाराला मनापासून  श्रधांजली!

 

 

                           2. मन उदास झाले…. पंकज उदास (17 -05-1951 – 26-02-2024

           पंकज उदास यांचे निधनही असेच मन उदास करुन गेले. चित्रपटातील गाणी, गझल,भजन किंवा भक्तीसंगीत हे जेव्हा पडद्यावर किंवा चित्रपटात गाण्यापुरतेच मर्यादित स्वरुपात होते तेव्हा या माणसाने त्याला प्रसिध्दी प्राप्त करुन दिलेली होती. अल्बम काढून त्यांची अनेक गाणी लोकप्रिय तर आहेतच पण चिट्ठी आई है…. सारख्या गाण्याने परदेशात किंवा जवानांच्या डोळ्यात पाणी उभे केल्याशिवाय राहत नाही. 10-12 वर्षांपुर्वी एका लाईव्ह कार्यक्रमात त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. मग त्याची गाणी ऐकणे हा एक कधीतरी सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम असायचा. अगदी मुलीनाही त्यांची गाणी ऐकायला आवडायचे.

       अशा या लोकप्रिय गायकाचे निधन असेच मन उदास करुन गेले. त्यांची गाणीही तशीच अर्थपूर्ण आणि मनाचा ठाव घेणारी असत हे विशेष.  अल्बम बनविणे, पार्श्वगायन आणि कार्यक्रम असे अनेक अंगाने त्यांचे करिअर बहरले. त्यांची प्रसिध्द गाणी खुप आहेत पण माझ्या आवडीची  चिठ्ठी आई है…., चांदी जैसा रंग लिये, आणि ना कजरे की धार  ही अशी गाणी आहेत की मी कधीच विसरु शकत नाहीत.

        कालांतराने अशी माणसे जगरहाटीपासून लांब होत जातात. एकदम गेल्यावरच त्यांचे महत्व पुन्हा वाटू लागते, जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात,  ते गाणे तो काळ आणि त्या काळातील माणसे त्या सोबतचे क्षण आठवतात पुन्हा सगळे विसरुन जातात.

                                                           !! ओम शांती !!



Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
    ओम शांती 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. ॐ शांतिः | ॐ संदगती 💐🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव