जय हो विज्ञान !
नुकताच “28 फेब्रुवारी” नेहमीप्रमाणे रोजी “विज्ञान दिन” साजरा झाला. आम्ही दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी त्यामुळे विज्ञानाचे कायम कुतूहल आणि निर्माण होणारी जिज्ञासा शांत बसू देत नाही. मुलींनी अभियांत्रीकीला प्रवेश घेतल्यामुळे तर विज्ञानाची जिज्ञासा जास्तच वाढत गेली. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत,- त्यातल्या सगळ्याच शाखा समजून घेणे कठिण आहे परंतु दैंनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमीच आपला संबंध विज्ञानाशी येतोच फक्त आपण लक्षपुर्वक त्याचा विचार करता येत नाही एवढेच. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालत असल्यामूळे सर्वसामान्य जनतेला त्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि त्याचा वापर जिवनात होतो..
असंख्य प्रयत्न, प्रचंड मेहनत, शोध,
निरिक्षण आणि निष्कर्ष याबाबत कुणालाही सोयरसुतक नसते. जेव्हा त्याचे फळ दृष्टीस पडते
तेव्हा खरे तर तो त्यांना चमत्कार वाटतो. उदा, द्यायचे तर आताचे मोबाइल, नळाला पाणी
येणे, गरम होणे, वाशिंग मशिन किंवा अगदी टयुब्लाइटचे देखील देता येईल.
“थेअरीपेक्षा प्रॅक्टिकलला
अधिक महत्व” देणारी विज्ञानविषयक
विचारधारा मानवी जीवन आणि त्यावर आधारीत समस्या यावर नेहमीच कार्यरत असते. हे संशोधन
अव्याहत चालू असते. कितीवेळा अपयश येते,नवीन समस्या तयार होतात त्यावर मात करण्याचा
प्रयत्न केला जातो. स्वयंपाकघरात आणि प्राचीन काळातसुद्धा विज्ञान अस्तित्वात होते
याचा आपण निरनिराळ्या धर्मग्रंथात उल्लेख आढळून येतो. काही पौराणिक कथेत आणि परंपरेत
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा प्रत्यय देत असतात. उदा. घ्यायचे झाले तर गड, किल्ले,
त्यातील जलसंधारण व्यवस्था, वेरुळ- अजिंठा लेणी, प्राचिन देवळे त्यांची स्थापत्यकला,
ताजमहल म्हणा किंवा जुन्या पवन चक्क्या. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आणि आपले
ऋषी-मुनी,संत-महंत, समाज-सुधारक हे त्यांच्या काळातील विज्ञानाचे प्रसारकच होते. फक्त
त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माची जोड, चालीरिती-परंपरा, देवाची भिती अश्या
वेगवेगळ्या स्वरुपात होती. शास्त्र मग ते कोणतेही असो त्याला नियम, अपवाद, अनुमान आणि
प्रयोगशीलता अपेक्षित असते. यामागे शेवटी मानव कल्याण हाच मूळ पाया असतो.
पौराणिक संदर्भ हवे असल्यास तुकोबांना
न्यायला आलेले पुष्पक विमान, रामायणातील समूद्रावरील सेतु, महाभारतातील मयसभा किंवा
ज्ञानेश्वरी, दासबोधातील पृथ्वीबाबत व सुर्याबाबत केलेल विधान घ्या म्हणजेच विज्ञान
तेव्हाही होते, आताही आहे आणि उद्याही असणार आहे फक्त व्याप्ती त्याची वाढतच आहे. ताजे
उदाहरण “एआय” चे घ्या. एकेकाळी
हाताने सर्व हिशोब करणारे आपण आता कॅलक्युटरशिवाय पान हलत नाही. ग्रामीण महिला किवा
व्यापारी अजुनही तरबेज असतात हिशोबात, कोणत्याही आकडेवारीशिवाय (तोंडी). भारतीय मूळातच
हुशार आणि प्रखर बुद्धिमत्ता प्राप्त असल्यामुळे जेवढी आवड किंवा शोध जगभरात लागतात
त्याचे लगेच पडसाद सगळीकडे उमटतात. अगदी सुई पडली तरी त्याचा आवाज सगळीकडे होतो असे
म्हणतात. जमीनीवर पडलेली सुई देखील उपग्रहावरून
शोधून काढणे शक्य झालेले आहे. (अतिशयोक्ती वाटली तरी खरी वस्तुस्थिती आहे ही).
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस
आव्हानात्मक होत चालले आहे. दुसरा एक विचार करण्याचा मुद्दा हा आहे की, आपण पुर्णपणे
विज्ञानावर जर अवलंबुन राहीलो तर एक प्रकारची उदासीनता, आळस आणि नवीन बुद्धीला चालना
देणारे विचार आपल्या डोक्यात येणारच नाहीत. विज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटेही
असतात. त्यावर आपण कशी मात करणार? उदा. द्यायचे झाले तर हल्ली पंखा, वातानुकिलीत यंत्रे,
संगणक, मोबाइल, टि.व्ही. चे एवढे अवलंबित्व वाढले की, एखादा दिवस, तास, मिनिट जरी बंद
असेल तर आपण अस्वस्थ होतो. त्यावर काय उपाय आहे? गॅस नसेल तर जेवण कसे बनवणार? गाड्या
नसतील तर आपण चालत जाणार का? इंटरनेट नसेल तर जगाचा संपर्क तुटेल का? सामाजिक माध्यमावर
जे येते तेच योग्य गृहीत धरायला लागलो तर खरे आयुष्य जगणे आपण सोडून देणार का?
निसर्गातसुद्धा विज्ञान आहे आपण याचा
कधी वापर करतो का? समजुन घेतो का? यंत्रच जर सगळी कामे करायला लागली तर मानवी हस्तक्षेप,
भावनात्मक बांधणी तसेच आपली विचारसरणीवर होणारा प्रभाव टाळता येईल का? शेवटी यंत्राला
आज्ञा द्यायला तरी मानव लागणारच ना. अमेरिकेत मुलींच्या कॉलेजच्या ग्रंथालयातील रोबोट बघुन आश्चर्य वाटले.
मशिनमध्ये कपडे, भांडी धुतली जातातच. त्यात होणारा खर्च, स्वच्छता आणि यांत्रिकता लक्षात
घेतल्यास हाताने धुतलेले बरे वाटतात आणि कमी खर्च, व्यायाम आणि स्वत:चे कपडे धुणे/
भांडी घासणे यातली आत्मियता, स्वयंपुर्णता लक्षात कोणी घेते का? ज्यांना परवडत नाही
ते घेणार नाहीत असे तुम्ही म्हणाल पण आज ही कमीत कमी जीवनावश्यक गरज बनत चालली आहे.
आपण आता यंत्रावर अवलंबित्व वाढलेले आहे. पुढे ते नसले तर काम थांबते. आपण शासकीय कार्यालयात
सर्वर बंद आहे काम थांबले आहे असे अनेकवेळा ऐकतो. याचा अर्थ आपण यंत्रांचा गुलाम झाले
की काय. तर्से यंत्र वापरासाठी त्यासाठी आणखीन
कमवा, कसेही कमवा, यशाचे मापदंड बदलत चाललेत. यांत्रिकीकरणाचे प्रतिबींब मानवी मनावर होत आहेत. पैशाने “सगळे विकत घ्या फक्त
आई-वडिल सोडून”
अशी मानसिकता बनत चालली आहे.
विज्ञान आणि अध्यात्म हा एक वादाचा
मुद्दा असु शकतो. “आल्फ्रेड नोबेलचे” उदाहरण याबाबत सांग़ता
येईल. डायनामाइटचा- स्फोटक पदार्थांचा निर्माता
म्हणुन याची ओळख नंतर नोबेल पारितोषिक प्रायोजक कसा बनला हे वाचले तर तुम्हाला कळेल
किंवा ज्या मोबाइलचा निर्माता सा-या जगाला वेड लावणारे उत्पादन करतो तो स्वत: आपल्या
मुलांना आणि स्वत: देखिल मोबाइलपासून लांबच राहतो याला काय म्हणावे? हॉटेल मालक जे सगळ्यांना जेऊ घालतात ते स्वत: मात्र
कायम घरचेच अन्न खातात/घरीच जेवतात. पाश्चिमात्य कायम यंत्राच्या सान्निध्यात राहतात
तेच शनिवार, रविवार कुटूंब आणि निसर्गाच्या सान्निध्यात का घालवतात? याचा विचार होतो
का कधी? जंक फुड खाण्याचे तोटे टाळण्यासाठी कायम कच्चे किंवा पथ्य, व्यायाम आणि स्वयंशासित
कामे का करता याचा कोणी विचार करतात का? अध्यात्म काय सांगते “उपभोग घ्या पण नियंत्रीत
प्रमाणात” नाहीतर “अति तेथे माती” होणारच.
विज्ञान आपल्याला “ज्ञानी आणि भोगी
व्हा” म्हणून शिकवते तर
त्यावर उपाय/नियंत्रण करुन “आत्मज्ञानी कसे व्हा” हे अध्यात्म शिकविते.
त्यामुळे कोणताही वैज्ञानिक कधीच अतिरेक करणार नाही पण सामान्य माणसाला मात्र हे नियंत्रण
ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी दोन्हीची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. नाहीतर अमर्याद
स्वातंत्र्य हे जसे अपेक्षित नाही तसेच अमर्याद विज्ञानही अपेक्षित नाही हेही कळणे
आवश्यक आहे. हे संस्कार होणे आणि ते करणे ही आजची गरज आहे? त्यासाठीच प्रत्येकाने वैज्ञानिक
दृष्तिकोन बाळगून समतोल वाटचाल करणे गरजेचे आहे. समतोल राखणे केव्हाही चांगलेच. त्यातही
नैसर्गिक गोष्टींवर भर देणे /विज्ञानावर मात करणे आणि स्वत्व टिकविणे हे महत्वाचे नाही
का? तुम्हाला काय वाटते?

खूप सुंदर लिहिल आहेस माधवी. गीताताई
ReplyDeleteDhanyawad Geetatai!
DeleteTu nehami protsahan detes tyamule लिहावेसे वाटते.