जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…
जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…
मध्यंतरी एक लेख वाचनात आला, “जंगलाला
धडकी भरलेली आहे,” लेखाचा मतितार्थ
असा होता की, आता सुट्ट्या पडणार आणि वेड लागल्यासारखी माणसे निसर्गाकडे/जंगलाकडे धावत
सुटणार! त्यामूळे जंगलातील रहिवासी, प्राणी,
पक्षी, फुले, झाडे यांना त्याचा त्रास होतो. एकतर शांतता भंग पावते तर दुसरीकडे कचरा
,गोंधळ, आवाजामुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या नेहमीच्या जीवनावर त्याचा परिणाम
होतो. जसे माणूस पाहूणा म्हणून कधीतरी गेला तर बरे वाटते. सारखे कोण ना कोण येतच राहिले
तर घरातले सगळेचजण वैतागतात तसेच. काही घरात कायम ही सवय असते त्यांना काही फरक पडत
नाही म्हणा !
पुर्वी सहसा माणसे कारणाशिवाय “फिरायला”
म्हणून असे घराबाहेर पडत नसत. प्रवासाची साधनेही
नव्हती, पैसाही गाठीशी नव्हता. मला आठवते, वडील रेल्वेत आहेत म्हटले की, लोकं नेहमी
म्हणायची, “मजा आहे तुमची,
खुप फिरत असाल ना!” आम्ही मात्र
गावी (कारवार) आणि बेळगांव याशिवाय कुठेही जास्त फिरलो नाही कारण प्रवास जरी फुकट असला
तरी इतर खर्च असतातच ना. तसेही तेव्हा आवड जपणे ह्याला कुठे एवढे महत्व दिले जायचे.
वास्तविक वडीलांना फिरायला खूप आवडायचे पण घरच्या परिस्थीतीमूळे कुठे त्यांना आम्हाला
कुठे घेऊन जाता आलेच नाही. आम्हालाही काही तसे कधी वाटले नाही. वर्षातून एकदा-दोनदा
का होईना जायला मिळते तेच खुप मोठे वाटायचे.
आता मात्र तशी परिस्थीती राहिली
नाही. साधारण 1990 नंतर सगळ्यांचीच परिस्थिती बदलली. नोक-या, पगार आणि आवड यांची सांगड
घालून पर्यटनाला विशेष महत्व दिले जाऊ लागले. पर्यटनासाठी आवड आणि सवड काढणे प्रतिष्ठेचे
तर नोकरी करणा-या स्त्रियांमुळे शक्य होऊ लागले. खाजगी कंपन्यासुद्धा प्रोत्साहन देऊन,
हप्त्यावर आणि बक्षीस म्हणून काही टुर्स प्रायोजीत करायला लागल्या त्यामुळे देशात तसेच
परदेशातसुद्धा फिरणे सोयीचे व्हायला लागले. जो विमानतळ प्रवास महाग वाटायचा तिथे स्पर्धेमूळे
तर हल्ली ट्रेन आणि एस.टी., खाजगी वाहने, बस
गाडीसारखी गर्दी दिसून येते. मुले आणि बायकांना, आई-वडिलांना प्रभावीत करण्यासाठी सुद्धा
एखादी टुर मुद्दाम आयोजीत केली जाते. त्यामुळे अगदी अनवट किंवा नेहमीच्या जागी तर गावी
(नैसर्गिक प्रेम) दाखविण्यासाठी पर्यटन केले जाते. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक
सुट्टी जोडून बाहेर फिरणे एक फॅशन तर दुसरी आवड म्हणून केले जाते. त्यात उन्हाळी, दिवाळी
आणि ख्रिसमस सुट्ट्यांना तर गर्दी विचारुच नका. त्याप्रमाणात तिथेही हॉटेलमध्ये रहाण्यासाठी
आणि खाण्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारणे आणि सगळे महाग (मजेची किंमत) पुरेपुर वसुल
केली जाते.
त्याऐवजी “स्थानिक पर्यटन”
केल्यास थोडा गर्दीचा त्रास वाचू शकतो. कधीतरी आपल्याच नातेवाईक,
मित्र-मंडळीना भेट ( शक्य असल्यास) देणेही जास्त बरे असे वाटते. ज्यांना शक्य असेल
त्यांनी शक्यतो गर्दीच्या वेळी सिझनमध्ये बाहेर पडूच नये. आमच्या कार्यालयातील एक गृहस्थ
नेहमी म्हणतात, ” घरात ए.सी.
लावून छान गप्पा-गाणी, छंद जोपासले तरी तोच आनंद (गीरीस्थान /उंच हवेचे ठिकाण/ पर्यटनाचा)
घरीही मिळू शकतो. नेहमीच असे करावे असे नाही म्हणत मी पण कधीतरी असे करावे. धार्मिक
पर्यटनही खूप वाढत चालले आहे. इथे देव नाहीत
का? तिथेच कशाला गर्दीत जाऊन धक्का-बुक्की करुन काय एवढे जायची गरज? बरे, जिथे जाता
तिथे तरी शिस्त, नियम आणि स्थानिकांना त्रास होऊ नये असे तुम्ही वागता का? हाही मोठा
प्रश्न आहे. प्रतापगडावर आम्ही बघितले अगदी “मुले
मॅगी पाहिजे” म्हणून रडत
होती. शेवटी आई घेऊनच आली होती तिने कशी करायची ते करुन दिली. त्याऐवजी “एकदा
भाकरी-पिठले खाउन तर बघ”
तरी असे म्हटले असते तर ! चुलीवरचे जेवण, तिकडे
काय समस्या आहेत हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपण तरी सुखी होऊ का?
तिथेही रांगा, गर्दी आणि प्रदुषण निर्माण करणार आहोत का?अतिरीक्त ताण पडतो तो वेगळाच.
शांती,समाधान आणि आनंद मिळणार नसेल तर कुठेही
जाणे व्यर्थच ठरणार नाही का? बघा, विचार करा आणि हो, अंमलातदेखील आणा एवढीच विनंती.
बाय द वे ,अस्मादिक मात्र 10 दिवसांपुर्वीच एक महिन्यासाठी अमेरिकेत फिरायला आलेलो आहोत.

👍🏻
ReplyDeleteDhanyawad, name please 🙏
Delete👍🏻
ReplyDeleteDhanyawad,name please 🙏
Delete