जीभेवरील शब्द
नुकतीच एक गोष्ट वाचनात आली,” जीभेवरील शब्द” कथेचा सारांश असा होता की, कथेचा नायक एक “बांगडी विक्रेता” असतो आणि बांगड्याचे ओझे एका गाढवीवर लादून गावोगावी फिरत असतो. रस्त्यातून चालतांना तो आपल्या गाढवीबरोबर बोलताना कायम “राणी-बेटी” म्हणुन संवाद साधत असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटत असते की, हा काय असा बोलतो आणि का बोलतो? न राहवून एकजण त्याला धीर करून एक दिवस विचारतो की गाढवीस “राणी-बेटी” अशी का हाक मारतो. तर त्याचे बांगडी विक्रेत्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे. माझ्या धंद्याशी संबंध नेहमी बायका/मुलींशी येतो, चुकून जरी माझ्या तोंडून अपशब्द आल्यास माझा धंदा बुडू शकतो शिवाय माझ्या जीभेला तशी चांगली सवय लागणे महत्वाचे जेणेकरुन कधीही माझ्याकडून कोणाचाही अपमान होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. खरेच किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
काहीजणांच्या तोंडात कायम शिव्याच असतात किंवा तर काहीजण कायम अरे-तुरेच्या
भाषेतच बोलतात. जरा काही मनाविरुद्ध झाल्यास अगदी स्वत:चे शिक्षण, वय, दर्जा विसरुन
खालच्या पातळीवर उतरतात. ते बघून कधी कधी त्यांची किंव करावी की तसेच त्यांचे संस्कार
असतात असा प्रश्न पडतो. आजुबाजूचे वातावरण, संगत आणि संस्कार हे लहानपणापासूनच बोलण्याचा
दर्जा ठरवित असतो. असे म्हणतात की, बोलण्यावरुन माणसाची पारख होत असते. नम्र भाषा सगळ्यांनाच
आवडते. बेरकी स्वभावाची माणसे परिस्थीतीप्रमाणे आवश्यक तेथे बोली सुधारतात किंवा बिघडवितात.
काहीजण कार्यालयात एक बोलतात तर घरी अगदी पातळी सोडून बोलतात. कामवाल्या बायकांशी,
नोकरांशी किंवा हाताखालची माणसांशी कायम तुच्छतेने बोलतात जसे काही यांचे देणेच बाकी
आहे. माणुसकीच्या नात्याने तरी निदान गोड/व्यवस्थित बोलायला काय पैसे पडतात का? काम
असले की, अगदी गोड बोलणारे आणि काम झाले की, पुन्हा “परत
येरे माझ्या मागल्या” सुरु. काय
म्हणावे अशा लोकांना!
काहीजण अगदीच नाटकी बोलत असतात त्यामुळे
त्यांचा मनात नक्की काय हेतू आहे ते कधी कळतच नाही. काहीजण टिकात्मकच किंवा कायम दुस-यांची
टिंगलच करित असतात. अशावेळी समोरच्याचा विचारच केला जात नाही का? या ऊलट कायम कौतूकच
करणारेही असतात. अगदी तोंडभरुन / मनापासून बोलतात की त्यांनी बोलतच राहावे असे वाटते.
नकारार्थी बोलणा-या माणसांचा तर मला कायम राग येतो. अरे, कधीतरी “चांगले
बोल” असे मला त्याला सांगावेसे वाटते. सरकारी/सार्वजनिक
सेवेत कार्यरत असल्यामुळे कामानिमित्त अनेकांशी बोलण्याचा संबंध येतो तेव्हा हे बोलणे
अगदीच व्यावहारीक असते तर कधी माहीतीपुर्ण असते. तेव्हाही अनेक माणसे केवळ बोलण्यावरुन
लक्षात राहतात ते केवळ त्यांच्या मृदु आणि व्यवस्थित बोलण्यामुळेच. मोठी माणसे, (वयाने,
मानाने, दर्जाने) जेव्हा अगदी प्रेमाने बोलतात
तेव्हा किती छान वाटते याचा अनुभव तुम्हीही घेतच असाल कधीतरी, मग आपल्याला का जमणार
नाही?
एकूणच काय तर गोड बोलण्याने “मातीही
विकली जाते तर न बोलण्याने सोनेही विकले जात नाही”
अशी जी म्हण आहे ती खरीच आहे. दोन शब्द चांगले बोलले तर आपल्यालाच बरे वाटते. जगायचे
तर आहेच, जीवनप्रवास तर चालूच असतो निदान गोड/नीट बोलून कुणाची मने तरी दुखवू नयेत
असे मला नेहमी वाटत असते. हल्ली सामाजिक माध्यमावर जो तो ऊठतो आणि कोणत्याही विषयावर
बोलत सुटतो तेव्हाही सामाजिक भान आणि कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना याचे
भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी हे संस्कार
आपणच आपल्या मुलांवर/पाल्यांवर करीत असतो त्यासाठी आपण आधी नेमके आणि योग्य तेच बोलणे
शिकले पाहिजे. नाहीतर घोळ घालून बोलणारे, तिरक्स बोलणे, टोमणे मारणे, एकमेकांची उणी-दुणी
काढणे हेही प्रकार सर्वत्र चालूच असतात. विशेषत: सामुदायिकरित्या जेव्हा एकत्र जमतो
तेव्हा ही बोलण्याची इमेज साधक/बाधक ठरु श्कते तेव्हा वेळीच सावध व्हा आणि जीभेवर संयम
ठेवा. तलवारीच्या घाव बरा होतो पण जिभेचे बोलणे कायमस्वरूपी बरे होत नाही. तेव्हा जे
दोन शब्द बोलाल ते चांगले/ मनोधैर्य वाढविणारे असावेत. अन्यथा बोलला नाहीतरी चालेल.
ब-याच वेळा “मौनं सर्वत्र
साधनम” असे म्हणतात
ते खरेही आहे. आता लोक मोबाईलवर तासंतास बोलत रहातात आणि नेहमीची कामे राहून जातात. आता एवढेच
सांगणे की “नको
ते बोलू नका” एवढीच अपेक्षा.

Comments
Post a Comment