जल पर्यटन-एक साहस व कुतूहल
धाकट्या मुलीचे अमेरीकेत नॉर्थ केरॉलिना येथे ” पदवीदान समारंभ” झाल्यावर “साजरा करणे” मंगता है ना! आधीच मोठ्या मुलीने त्याची व्यवस्था करुन ठेवली होती. अमेरीकेत फ्लोरिडाला 5 दिवस क्रुझचे बुकींग. 6 मेला नॉर्थ केरॉलिनातून फ्लोरिडाला विमानाने निघालो. तेथून ओर्लांडो विमानतळावरून 1 तासाच्या प्रवास करून क्रूझसाठी रवाना झालो. जेव्हा मुलीने हे सांगितले तेव्हा “ मी कशी येणार, मला पाण्यापासून भीती आहे ना” ( पायाळू असल्यामुळे), असे म्हटल्यावर तिचे उत्तर ऐकून हसावे की रडावे तेच कळेना! भारतात तुला धोका असेल, परदेशात नसावा, बघुया काय होते ते! एकीकडे भीती तर दुसरीकडे कुतुहल असे माझी दुविधा मन:स्थिती होऊन मी जरा तणावातच होते. देवाचे नाव घेऊन “Allure of Sea” या 17 मजली बोटीत चढले, बघू पुढचे पुढे म्हणून!
6 मे. 2024 रोजी तारखेला दुपारी 2.00 वाजता
“Allure of Sea”
या बोटीत प्रवासाचे सर्व सोपस्कार करुन आम्ही सर्वजण 7 व्या मजल्यावरील
आरक्षित केलेल्या खोली क्रमांक 7151 येथे स्थानापन्न झालो. या बोटीवर बुकींग केल्यामूळे तिथले बहुतांश खाणे-पिणे,
खेळ, कार्यक्रम सगळ्या सोयी-सवलती अमर्यादित प्रमाणात उपलब्ध होत्या हे विशेष. याव्यतिरिक्त वैयक्तिक खरेदी, खेळ
आणि वेगळे काही करावयाचे करवयाचे असल्यास त्याचे मात्र पैसे द्यावयाचे होते. त्यात
वृद्ध, मुले (छोटी) यांसाठीपण वेगळी व्यवस्था होती. जसे की, ज्यांना चालण्या फिरण्याचा
त्रास त्यांना व्हील-चेअर, मदतनीस, फिरायला
सगळीकडे सोय (उतरणीसाठीचा स्लॅब) उपलब्ध होती. त्यांचे प्रमाणपण जास्त होते. सर्व वयांचे जगातून विविध भागातून आलेले रंगबेरंगी
लोक दिसत होते. प्रवासाच्या सुरुवात बोटीत एक हॉटेलमध्ये पिझ्झा खाऊन आणि शित पेय पिऊन सुरुवात झाली. सर्व
काही (शीत पेय, खाणे) अमर्यादित होते. विमानातल्याप्रमाणेच
आपत्कालीन नियम, सुरक्षा आणि व्यवस्थेबाबत
मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर आम्ही सर्व जहाज फिरुन बघितले. “Allure
of The Sea” ही
प्रचंड 17 मजली आणि 50,000 क्षमता असलेले महाकाय जहाज /बोट बघून मी/ आम्ही थक्कच झालो.
एका प्रचंड इमारतीचा फील येत होता. 4 दिवसांत
देखील संपुर्णपणे बोट आतून बाहेरुन पाहणे शक्यच
नव्हते, तरी मुख्य मुख्य भाग शक्यतो आम्ही बघितले. खरेदी मात्र काहीही केली नाही. बरीच
आकर्षक दुकाने व त्यांचे “सेल”
व “ सवलती” सुद्धा जाहीर केलेल्या होत्या. साधा रम केक
किंवा रम आणायचे हेसुद्धा आम्हाला कुणालाच सुचले नाही. एवढी महाकाय
बोट सामान, प्रवासी आणि दुकान, पोहण्याचे तलाव, मैदानासकट ॲटलांटीक
महासागरात फिरत असूनही जराशीही हलत नव्हती. प्रथम बोटीतुन समूद्रातला सुर्यास्त पाहिला
आणि दुस-या दिवशीचा कार्यक्रम ऐकून आम्ही संध्याकाळी थोडेफार फिरुन लवकर झोपलो.
दुस-या दिवशी सकाळी डेक वर गेलो तर
बहामा बेट दिसू लागले. “बहामा
शहर” हे एका वेस्ट इंडीज “पॅराडाईज”
बेटावर वसवलेले आहे. येथे एकूण 750 लहान मोठी बेटे आहेत. तिथे सकाळी 10.00 वाजता पोहोचलो. सकाळचा विविध देशातील(
आशियाई, अमेरिकन, कोन्टिनेंटल आणि चायनीज ) पदार्थांनी युक्त असा अमर्यादित नाश्ता
करुन आम्ही तयार होऊन बोटीच्या बाहेर पडलो.
मुलींनी एक सिटी बस बुक केली होती. त्या बसने
तिथेच “बहामा”
शहरात फिरलो. आम्ही एकुण 3
बेटे बघितली. ओर्लान्दो हा बोटिचा धक्का आणि पॅराडाइज, तेथील सचिवालयची इमारत,
ब्रिटिश कालीन अनेक इमारती, मैदाने, रम केक बनवायची फॅक्टरी आणि महत्वाची स्थळे दाखवून
आम्हाला पुन्हा समुद्र-किना-यावर आणून सोडले. तिकडे समुद्राचे वैशिष्ट म्हणजे निळे, हिरवी झाक असलेले स्वच्छ पाणी,पांढरी
वाळू आणि अथांग पण शांत समुद्र. अगदी लाटासुद्धा शांतपणे जात-येत होत्या. नाहीतर आमचा
कारवारचा समुद्राची धीर-गंभीर गाज ऐकण्यासारखी असते. एखादा तपस्वी माणूस ध्यान करतांना
जसा आवाज येत असेल तसा! संध्याकाळी त्यांचे विवीध कार्यक्रम, सुर्यास्त, जेवण, फिरणे,
पोहणे आणि खाण्या-पिण्याची रेलचेलेचा आस्वाद घेत आम्ही बोटीत परतलो. आणि “Allure
of Sea” पुन्हा दुस-या दिवशीच्या कार्यक्रमासाठी बाहेर पडली.
बोटीच्या प्रवासात प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी थिम होती त्यानुसार कपडे परिधान करून
विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
तिस-या दिवशी एका “Allure
of Sea” च्या
“कोको-के” या खाजगी
बेटावर पाण्यात उतरायचे होते. एक छोटे बेट त्यावर सर्व मनोरंजनासाठी साधने. छोटे समुद्र
किनारे त्यात छाती एवढ्या पाण्यात फिरायचे. सुरक्षा व्यवस्था चोख, वॉटर पार्क सारखे
मोठे खेळ. एकूण धमालच धमाल. मुलीने समुद्रातील प्रवासाठी एक छोटी बोट बुक केली होती.
ते आम्हाला समुद्रात आत घेऊन गेले. समुद्र निळा, हिरवा, पारदर्शी, तळ दिसणारा. काही
अंतरावर जाऊन आम्ही त्या समूद्रात उतरलो. सोबत तराफा होता, त्या निळ्या आणि हिरव्या
पाण्याच्या समुद्रात आम्ही मनसोक्त पोहलो. एक तासाने बोटीने आणखी पुढे गेलो. तीथे खोल पाण्यात
स्नोर्कलींग म्हणजे खोल पाण्यातील तळ, रंगीबेरंगे मासे बघयचे होते. सर्व जण लाइफ जॅकेट
आणि डोळ्याला गोगल्स, माश्याच्या शेपटी सारखे रबरी बूट आणि तोंडात घट्ट धरून ठेवण्यासाठी एक लांब नळी असलेले
नळकांडे दिले. हा पेहराव करून दोन्ही मुली आणि आमचे “हे”
यांनी समुद्राच्या तळात बुडी मारली. तेथील प्रवाळ, विविध रंगाचे मासे पाहिली. खरी धमाल
या तिघांनी केली, मी मात्र लांबूनच त्या सगळ्यांना
बघत होते, फोटो व्हिडिओ काढत होते. दुपारी 2 पासून ते 5 पर्यंत जवळपास 3 तास हा कार्यक्रम
चालू होता. त्याआधी समुद्रावर पोहणे, चालणे, उन्हात छत्रीखाली आराम करणे, खाणे-पिणे
चालूच होते. त्यात काहीही कमतरता आम्ही सोडत नसतो. सगळे मस्त मजा करीत होते, अगदी लहानांपासून
ते मोठ्यांपर्यंत. संध्याकाळी बोटीवर परत आल्यावर सुर्यास्त, खाणे-पिणे झाल्यावर (
6.30 ते 8.30 पर्यंत) एक जल-सर्कस कम कवायती पहिल्यांदाच आम्ही बघितल्या, खुप छान वाटले
बघायला. तसेच काही लाइव्ह कार्यक्रमपण होते. रॉक क्लाइंबिंग, स्कीइंग, खेळामध्ये बास्केटबोल,
टेबल-टेनिस, गोल्फचे मैदानपण होते. सोबत मंद संगीत साथीला, ज्यांना नृत्य करायचे तेही
ते करु शकत होते.
चोथ्या दिवशी मात्र पोहणे, सकाळी
सेंट्रल पार्कमध्ये फेरफटका, चेस खेळला. मुलींनी सगळ्या पाण्यातल्या ॲक्टिविटिजचा पुरेपुर
आस्वाद घेतला. दोन्ही मुली आणि “हे”
एका दोरीच्या आधारे बोटीतील एका उंच जागेवरून दुसरीकडे तरंगत गेले. सकाळी न चुकता सुर्योदय
आणि सुर्यास्त संध्याकाळी पाहणे हा एक नित्यक्रमच होता. उरलेल्या वेळात डेकवर खुर्चीत
बसुन समुद्राकडे पाहत बसणे ( हातात ग्लास घेऊन शित पेय पित बसणे) हा माझा आवडता कार्यक्रम होताच. वेगवेगळ्या स्वरुपात
समुद्राचे निरिक्षण त्यानिमीत्याने झाले, माझी पाण्याबद्दलची भीती थोडीफार कमी झाली.
रात्री पाऊस पडून गेला हे आम्हाला सकाळीच कळले. एवढी मोठी बोट पाण्यावर तरंगत होती
पण अजिबात पोटातले पाणीसुद्धा हलत नव्हते. झोपल्यावरसुद्धा बोट हलत असल्याचे अजिबात
जाणवत नव्हते. पॅराडाइज, कोको-के आणि नाशुज
असे 3 बेटांवरचा प्रवास एकंदर आम्ही केला. एथुन आता पुन्हा परतीचा प्रवास रात्रभर होता.
सकाळी धक्क्यावर पोहोचुन नास्ता करुन त्यांच्या सगळे सोपस्कार आटोपुन पुन्हा प्लॉरीडावरून
मुलीकडे परतायचे होते. 10 मेला हे सगळे झाल्यावर
फ्लोरिडाला जंगल सफारीत थोडेफार फिरुन, जेऊन आम्ही विमानाने संध्याकाळी निघालो,11 तारखेला
पहाटे 1.00 वाजता सॅन फ्रॅन्सिस्को आणि घरी 2.00 वाजता पोहोचलो.
( 6 ते 9 मे,2024 ) असे एकुण हे चार
दिवस मंतरलेले तसेच साहसी आणि उत्साहवर्ध्क होते. संपुर्ण श्रेय अर्थात मुलींनाच कारण
आयोजन त्यांचेच आणि प्रायोजकसुद्धा त्या दोघीच होत्या. उल्लेखनीय गोष्टी म्हणजे बोटीवरचे
विविध खेळाचे, खाण्या-पीण्याचे आणि प्रत्येक क्षणाचे व्यवस्थित नियोजन, खाण्या-पिण्यातली
विवीधता. साधारणपणे 100-200 जेवणाचे प्रकार तसेच बुफे किंवा बसुन जागेवर हवे असल्यास
तसे. कुणाचा वाढदिवस असल्यास वेगळे सेलिब्रेशन. लहान मुलांना बसण्यासाठी वेगळी सोय.
नास्तासुद्धा वेगवेगळा आणि सौजन्यपुर्ण वागणुक. सगळे झाल्यावर व्यवस्था कशी आहे, जेवण
आवडले ना, काही सुधारणा अपेक्षित आहेत का? असे प्रेमळपणे तिथले मॅनेजर मुद्दाम विचारायला
यायचे. तिथे काही बोटीवर काम करणारे भारतीय भेटले त्यातील काही मराठी होते. त्यांनी
आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि चांगली सेवा दिली. वास्तविक गेल्या 50 वर्षातली
त्यांची बेटावरची प्रगती पाहुन थक्क व्हायला होते. 6 महिने बोटिवर आणि 6 महिने जमीनीवरचा
त्यांचा प्रवास तसा कंटाळवाणाच होत असावा. तरी कुठेही कोणी त्रासलेले, कंटाळलेले असे
दिसत नव्हते. उलट उत्साहाने फोटो काढणे, स्वागतपर बोलणे, कार्यक्रमात भाग घेण्यासाठी
बोलावणे असे एकसारखे चालुच असायचे. जे भाग घेत नव्हते ते दुस-यांना चीअर-अप करायला
अगदी तयार असायचे. एकाने तर आम्ही चौघे एकत्र बघून आणि आमचे पोशाख बघुन छान दिसताय
म्हणून दाद दिली. तसेच एकमेकांना जागा देणे, रस्ता देणे, लिफ्टमध्ये सुद्धा सौजन्य
ओतप्रोत भरलेले दिसुन यायचे. कुठेही गोंधळ,गर्दी, गडबड असे आढळले नाही. ठरलेल्या वेळी
एवढ्या सगळ्यांचे व्यवस्थापन करणे ( अंदाजे 5000 माणसे ), त्यांचे राहणे, खाणे पिणे,
मनोरंजन, खेळ, नृत्य, कॅसिनो, योगा, वाद्य, ऑर्केष्ट्रा, अनेक तरण तलाव, झकुझी बाथ
आणि इतर अनेक सोयी-सुविधा. दिलेल्या प्रत्येक पैशाची किंमत तिथे वसुल झाली. आयुष्यात
कधी न वाटलेले आणि अनुभवलेले क्षण आम्हाला लाभले.
दिमाखदार पदवीदान समारंभ, मुला-मुलिंनी मिळून पालकांना दिलेली फेअरवेल पार्टी (पदवी प्राप्त आणि कृतज्ञता म्हणून), क्रुज़वरचे वास्तव्य हे खुपच आल्हाद-दायक तसेच अविस्मरणीय होते. दोन्ही मुली परदेशात शिकून (द्विपदवीधर) स्वत:च्या पायावर उभ्या आहेत, आणखीन “ यापेक्षा काय सुख वेगळे हवे! परमेश्वरी कृपा, मुलींची मेहनत, सहकार्य आणि आम्ही दोघे पालखीचे भोयी (पुर्वंजांचे संस्कार आणि परिस्थीतीतुन मार्ग शोधणारे) या सुखाने भरुन पावलो. अशी ही आमची यावेळची अमेरिका-वारी सुफल- संपुर्ण होउन 19 तारखेला सकाळी 5.00 वाजता आम्ही दोघे घरी मुंबईत परतलो.

खूप छान. मस्त माहिती दिली आहेस माधवी.अजून हा प्रवासाचा योग आला नाही.
ReplyDeleteDhanyawad Geetatai!
ReplyDeleteTo yog Lavkarach येवो!🙏