बकेट लिस्ट ( सुप्त इच्छा) ची पुर्तता
हजारो ख्वाईषे लेकर जी रहे थे हम !
एक भी पुरी नही हुई, युही निकल
पडे हम !!
असे कुणी लिहिले आठवत नाही पण काही
लोकांच्या बाबतीतले वास्तव आहे. हा शेर प्रत्येकाच्या
आयुष्याची कहाणी सांगून जातो तसेच विचार करायलाही भाग पाडतो. जीवन संपते पण आपल्या आशा-आकांक्षांचा
अंत होईलच असे नाही. लहानपणीच्या गोष्टीतल्या
आजीसारखी कमी-अधिक परिस्थिती आपल्या सर्वांचीच असते. गोष्टीतल्या आजीला वेळोवेळी न्यायला
“यम” (मृत्यू) येत असतो
पण प्रत्येक-वेळी काही ना काही कारण सांगून यमराजाला आजी परतावून लावीत असते. शेवटी
एक दिवस कंटाळून आजीला “यम” घेऊनच जातो. त्यावेळी
प्रश्न पडायचा “खरेच असे होते का?” किंवा असा चॉईस असतो का मरणाला? आता त्याचा संदर्भ आठवतो आणि
हसायला येते. खरे तर “जीवनेच्छा” ( जीवन जगण्याची इच्छा) माणसाला
कोणत्याही परिस्थीतीत मार्ग काढायला भाग पाडते. मग ती सुप्त असो अगर जागृत इच्छा असो.
परमेश्वरानेसुद्धा सर्व प्राणीमात्रांना हेच वरदान देऊन पाठविलेले असते. काहीजण त्याचा
सदुपयोग करुन “जीवन याना कळले हो” असे म्हणावेसे वाटते
तर काहीवेळा “जीव जात नाही” म्हणून जगावे लागते
अशी परिस्थिती असते एवढाच फरक असतो.
नुकतेच एका वर्षात 2 वेळा अमेरिकेला मुलींकडे
जाण्याचा योग आला. तिथल्या काही पालक-मंडळींना भेटण्याचा योग आला. सेवानिवृत्त होउन
आराम करायच्या वयात परदेश प्रवास, नातवंडांना सांभाळणे काहीजण आनंदाने करीत होते तर
नाईलाजाने. (इथे भारतात काही बदल नाही या विचारसरणीत) एकतर जमवून घ्या, वेगळे राहा
नाहीतर शेवट वृद्धाश्रमात आहेच. अशावेळी आई-वडिलांना काय हवे नेमके? याचा विचार होतो
का? की या इच्छासुद्धा लादल्या जातात? नाहीतर “नटसम्राट”किंवा
“बागबान” सारखी अवस्थाही झेलणारे काहीजण असतातच की! या वयात कुठे “बकेट लिष्ट “ची आठवण
कोण ठेवणार?
शाळेत साधारणपणे पहिला आला किंवा 10 वी 12 वी
नंतर हमखास
विचारला जाणारा प्रश्न असतो “ तु मोठेपणी कोण होणार?” तो त्याच्या कल्पनेतले
किंवा काहीतरी मनाला येईल ते उत्तर देतो. काहीजण मात्र जे बोलतात ते करुन दाखवतात तर
काहीजण नाईलाजाने मार्ग बदलून दुस-या मार्गाने यशस्वी होउन दाखवितात, मनात मात्र हा
सल असतो. सुधा मुर्ती सारखे काहीजण लहानपणी “ माझी मोठी लायब्ररी
असावी” हे स्वप्न बघतात
आणि ते प्रत्यक्षात आणून इतरांनाही त्याचा फायदा करुन देतात. काहीजण न बोलता करुन दाखवितात
तर काहीजण नुसते ऊसासे सोडत असतात. असे म्हणतात की, तुमची इच्छा मनापासूनची असेल तर
तिला अक्खे जग ती इच्छा पुर्ण करण्यासाठी मदत करते.
एकदा असेच एका मानसोपचार तज्ञांकडे मैत्रीणीसोबत
गेले होते. सगळे प्रश्न विचारुन झाल्यावर त्यांनी एक साधा प्रश्न विचारला “ तुम्हाला कोण व्हायचे
होते? आता तिचे वय 60 च्या आसपास असावे, आम्हाला एकदम आश्चर्य वाटले. तिने काहीतरी
उत्तर दिले आणि याचा आता काय संबंध असे विचारल्यावर डॉक्टर म्हणाले. तुम्ही अजुनही
ते विसरला नाहित जे तुम्हाला व्हायचे होते. म्हणजे बघा एवढ्या वर्षानंतरसुद्धा तिच्या
मनात ही इच्छा अपुर्ण राहिली होती. त्या नंतर तिने खरेच ती इच्छा मेहनत घेऊन पुर्ण
करुन दाखविले आणि आता ती एक समाधानी आणि समृध्द जीवन जगत आहे. सर्वसामान्यपणे आपल्या
काही इच्छा असतात हेही बहुतेकजण कालपरत्वे
विसरुन जातात. (विशेषत: महिला) मग त्या पुरी करणे तर दुरचीच गोष्ट. एकमात्र आहे, मनात
आणले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या सुप्त इच्छा पुरी करण्याचा प्रयत्न यशस्वी
होऊ शकतो. माधुरी दिक्षीतचा “बकेट-लिष्ट” हा सिनेमा हेच तर
सांगतो. यासाठी लागणारी इतरांची साथही तेवढीच महत्वाची असते.
कधी कधी अनपेक्षितपणे या सुप्त इच्छा
दुस-यांकडुन पुर्ण होतात याचा अनुभव आम्ही नुकताच घेतला. मागच्या वर्षी “ नायगरा धबधबा” ची भेट ( यांची)
तर माझी “ क्रुझ” चा प्रवास यावर्षी
मुलींनी घडवून आणली. मुळात आम्ही कधीच अमेरिकेचे स्वप्न पाहिले नव्हते. मुली अमेरिकेत शिकायला गेल्या तरी आम्हाला अमेरिकेत
जाऊ असे वाटत नव्हते. तो योगायोग मुलींनी घडवून आणला आणि आमच्या दोघांची इच्छा पुर्णही
झाली जी आमच्या ध्यानी-मनीही नव्हती, असेही होते कधी-कधी. वास्तविक कोणती गोष्ट कुणाला
कधी द्यायची याची सुद्धा “बकेट लिष्ट” मला वाटते परमेश्वराकडे
असावी. त्याच्या मर्जीशिवाय “पान” ही हलत नाही म्हणणारे
आपण अचानक कुठून कुठे पोहोचतो ? याचे नवलच वाटते कधी कधी.
बकेट लिष्ट प्रत्येकाचीच असावी आणि त्यासाठी प्रयत्नही करावेत.
त्याव्यतिरिक्त परमेश्वराने आपल्याला जास्तीचे काय दिले याचाही विचार व्हावा. एकदा
असेच मुलीला समजावताना मी म्हटले वयाच्या 25 व्या वर्षी “आय-फोन” मिळेल अशी अपेक्षा
तरी केली होतीस का? तेही अमेरिकेत जाऊन नोकरी लागायच्या आधीच. बघ, केवढे परमेश्वराचे
प्रेम आहे तुझ्यावर, कारण आम्ही तर देऊ शकलो नसतो तुला. तेव्हा त्याचे आभार मान आणि
आणखीन जास्त प्रयत्न करुन तो फोन बाळगण्याची पात्रता सिद्ध करुन दाखव.
तुम्ही काय म्हणताय? बघा यादी आहे की
करायचीय? नसेल केली तर करा आणि ती पुर्ण होण्यासाठीचे प्रयत्न करा. “All The Best”. हो, यादीव्यतिरीक्त काही जास्त किंवा वेगळे मिळाल्यास
(ज्याची तुम्ही कल्पनापण केली नव्हती) तेव्हा देवाचे आभार मानायला विसरु नका. हो त्यालाही
कर्तव्य-पुर्तीचे समाधान मिळणार असतेच ना! तुम्हाला काय वाटते? कळवा जरूर हं!

Comments
Post a Comment