मुलीकडचे माहेरपण आणि प्रेमळ सासुरवास
शिर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन्ही एकत्र कसे? हो, मी याचा अनुभव सन 2021 पासुन घेत आहे. एकदा भारतात आणि 2 वेळा अमेरिकेत. मुद्दामच लिहायला घेतला हा विषय कारण बरेचजण हे मान्य करणार नाहीत पण मुलींचा सुद्धा सासुरवास असतो बरे! माझी छोटी मुलगी जेव्हा पहिल्यांदा 2020 मध्ये सिल्वासा ( गुजरात सीमा) येथे गेली तेव्हा करोनामुळे अक्षरश: 2 वर्षे घरीच होतो.त्यानंतरही कुठे जाण्याचे धैर्य होतच नव्हते तरी हट्टाने तिने आम्हाला डिसेंबर-21 मध्ये तिकडे बोलावून (तिकीट आणि हॉटेल बुकींगसह ) घेऊनच गेली. 4 दिवसच मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम आणि सोबतीला गाडी व ती स्वत: हजर राहत होती. खरे तर नवीन शहरात आल्यामुळे आम्ही व तीही तेवढी परीचीत नव्हती पण तिच्या आग्रहापुढे मान झुकवावी लागली. आम्हालाही उत्सुकता होतीच कारण वापी (गुजरात) एवढे लांब नाही तरी याआधी कधी जाणे झाले नव्हते. थोडेफार गोव्यासारखेच वाटले. तसाही पोर्तुगीजांचा प्रभाव दिसत होताच. ग्रीन शहर म्हणुन ( प्रदुषण विरहित ) जाहीर केल्यामुळे जास्त आवडले हे ठिकाण. हवापण छान आणि लेकीचे सगळे आयोजन, बाग, समुद्रकिनारा, तिथले खाणे (गुजराती जास्त) व मसाज. तिची उत्पादन, सहकारी, कंपनी आणि हॉटेलमधील वास्तव्य एकुणच सगळी व्यवस्था छान होती आणि वास्तव्य सुखकारक होते.
मागच्या वर्षी अमेरिकेत मोठ्या
मुलीकडचे माहेरपण तब्बल 51 दिवसांचे होते त्यामुळे तर अगदी विचारुच नका. एकतर नवीन
देश,वातावरण आणि माणसे. तिकडचे नियम समजावून आणि परिस्थीतीशी सामावून घेण्यासाठी जास्त
शक्ती खर्ची पडली. फिरणे, खाणे आणि विवीध स्थळे बघण्यात महिना कधी संपला कळलाच नाही.
तिथेही छोट्या मुलीकडे 6 दिवस वास्तव्य होतेच. तेव्हाही स्वत: गाडी भाड्याने घेऊन आम्हाला
सगळीकडे फिरविणे, 7 दिवसाची टूर बुक करणे आणि
खाणे-पिणे सोयीचे कसे होईल ते बघणे हे काम दोघी इमाने-इतबारे करत होत्या. नाही खाल्ले
की, रागावूनपण घ्यावे लागायचे. मला शाकाहारी प्रकारच (बाहेरचे) आवडतात किंवा चक्क फळांचा
रस, फळे, ब्रेड आणि कुठे मिळाले तर भारतीय जेवण असेच सगळे चालू होते.
ह्यावर्षीसुद्धा पुन्हा एक महिन्यासाठी
अमेरिकेत जाण्याचा योग आला. 33 दिवस असा छोटाच सहवास लाभला. तेवढ्या कालावधीतसुद्धा
दोघांनी माहेरपण जोरात केले. फिरायला जाताना सोबत डब्बा, पाणी आणि गॉगल व टोपी आठवणीने
घ्यायला लावायच्या. सुके खाणे,फळे आणि ज्यूस तर कायम असायचेच. शिवाय आठवणीने मोइष्चाराय्झर,
डोळ्यात ड्रॉपस घालणे, गोळ्या घ्यायला लावणे हे चालूच असायचे. कधी विसरलोच तर दोघांची
काही खैर नसायची. त्यातल्या त्यात बाबांना सुट मिळायची पण मी नुकतीच आजारातुन बरी झालेली
असल्यामुळे जास्तच काळजी आणि रागावून घ्यावे लागायचे. वरुन “आजारी पडायचे नाही
मग” हेही ऐकावे लागायचे.
फिरायला जातांना त्यांना विचारुनच
कपडे घालायचे. रंगसंगती (दोघे आणि कधी चौघे) साधारण जुळणारीच पाहिजे. ह्यावेळी क्रुझ
आणि मागच्यावेळी टुरवर गेलेलो तेव्हा तिकडे केव्हा, कधी काय घालायचे याचे सेट करुनच
नेले/दिले होते. जे कपडे नव्हते ते विकतसुध्दा आणुन दिले. एकदम लहान बाळांसारखे वाटत
होते. नशीब पट्टी /फणीने मारले वगैरे नाही. आवडले नाही तर फुगुन बसणे, धुसफुस चालू
असायचे. “एवढे कसे कळत नाहीचा” भाव डोळ्यात चक्क
दिसायचा. कित्येकदा आम्हाला त्यांच्यापुढे शरणागती पत्करावी लागायची.
प्रवासात असताना विशेषकरुन
नियम जास्त कडक असायचे, घरी थोडे शिथील. तरी फिरायला आम्ही दोघेच जायचो तेव्हा परत
परत सांगून जायची. तिथे एकतर गाड्या वेगात असतात त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागते. तरीही
यांना कायम काळजी असायचीच. पहिल्याच दिवशी आम्ही हरवलो तेव्हा तिने फोन करुन नुसते
हैराण केले. नंतर सरळ घ्यायलाच आली. तेव्हाही रागावून घेतलेच. सोबत फोन घ्यायला काय
होते? हा नेहमीचा प्रश्न. फिरायला जाताना आम्ही दोघे कधीही एकच फोन नेतो. उन्हाचा आणि
गरमीचा ते खुप धसका घेतात. इथुन गेल्यानंतर आम्हाला तिकडचे वातावरण आल्हाददायक वाटते
तर त्यांना उन्हाळा वाटतो. मग ते सनस्क्रिन लावा, डोळ्यांवर पट्टी बांधा हे सगळे उद्योग
करावे लागतात. तिकडचे खाणे कसे असते ते खाल्ल्याशिवाय कसे कळणार? हा एक मोठा प्रश्न
असतो. थोडी चव बघितली तरी मला समजते पण त्यांना ते पटतच नाही. “सगळे खा” म्हणुन आग्रह नाहीतर
रुसणे/ रागावणे चालू.
अशा या माहेरपणात आनंदही आणि
प्रेमळ सासुरवासही असतो. त्यांनी नेल्याशिवाय कुठे जाता येत नाही. मला खाणे/स्वयंपाक
जास्त करु देत नाहीत. किचनमध्ये काय सारखी असते म्हणुन कायम मला बाहेर काढतात. एवढी
32 वर्षे किचनमध्ये काढलेली मी कंटाळुन जाते. चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. मुलीकडे
आराम करायचा हा एकच धोषा चालू असतो. 4 प्रकार करुन घालूया म्हटले तर अजिबात काही जास्तीचे
करायला देत नाहीत. त्यांचे नखरे अजुनही चालुच असतात. गोड नको, तेलकट तुप नको…इत्यादी.

खूप छान वाटलं वाचून. गीताताई
ReplyDeleteDhanyawad Geetatai🙏
Delete