माझे -हदयस्थ गुरू

                                    जे जे आपणांसी ठावे, ते  इतरांसी सांगावे,

                                         शहाणे करुन सोडावे सकलजन

             उपरोक्त उक्तीनुसार जी जी माणसे आपल्या आयुष्यात येतात ती सगळीच एक प्रकारे आपल्याला काही चांगले-वाईट शिकवून जातात त्यामूळे ती गुरुस्थानी असतात, मग ती ग्रंथ असो, गुगल असो किंवा निसर्ग असो. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपोर्णिमा साजरी केली जाते ती गुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठीच होय.

                  आपले ऋषीमुनी,संत-परंपरा किंवा अगदी गणपती, सरस्वती यांना आद्यपुजेचा मान दिला जातो ते या दृष्टिकोनातूनच. महर्षी व्यासांपासुन किंवा त्याहून आधी राम आणि कृष्णाचेसुद्धा गुरू होतेच. हिंदू धर्मात तर गुरुचे महत्व आहेच परंतू इतर धर्मातही पोप, काझी, गुरु नानक, ग्रंथसाहीबा असे अनेक गुरू आहेत ज्यांचे श्रद्धापुर्वक त्यांचे पुजन केले जाते. पद्धत वेगळी असेल परंतु भावना सारखीच आहे.

             पुर्वीची गुरुकुल शिक्षण-पद्धत म्हणा किंवा रविंद्रनाथ टागोरांनी सुरु केलेली खुली/ झाडाखाली सुरु केलेली शिक्षण-पद्धती म्हणा, एकप्रकारे सर्वगुणसंपन्न पिढी बनविण्याचे व्रतच घेतलेले असे हे महान गुरु असावेत. ज्यांचे शिष्य पुढे जाऊन गुरुचे नाव तर प्रसिद्ध करतातच शिवाय स्वत:बरोबरच इतरांसमोर आदर्श निर्माण करतात. जसा गुरू श्रेष्ठ तसाच शिष्यही उत्तमच असला पाहिजे. अर्जुनाचा गुरू कृष्ण. गुरु तर मानसिक, शारिरीक आणि अंधारातुन प्रकाशाकडे नेणारा वाटाड्या/मार्गदर्शक असतो. भौतिक/शारिरीक उन्नती तर होतच असते कारण तिथे वैयक्तिक स्वार्थ असतो पण मानसिक आणि आत्मिक उन्नतीसाठी (जी स्वत:बरोबरच समाजासाठी आवश्यक) योग्य गुरु लाभणे महा कठीण असते.

              कोणत्याही समस्यांचे समाधान जेव्हा व्यक्तिगत पातळीवर होत नाही तेव्हाच गुरुची नितांत गरज असते. तसेच जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, देव तेथेची जाणावा हे बिरुदावली संतांचे ठायी असते ज्याद्वारे अज्ञान, गरिबी, रोगराई दूर करुन शेवटी मनाची शांती मिळविणे हेच प्रत्येकाला हवी असते. सगळे काही असूनही मन:शांती नसणारी माणसे नेहमी गुरुच्या शोधात असतात. गुरुही तेवढाच प्रामाणिक, नि:स्वार्थी आणि लोक-प्रबोधन साधणारा असावा. अन्यथा आसाराम बापुंसारखे किंवा देवळात देवाच्या नावावर जो व्यापार चालतो तो या गुरु-महिमेला काळे फसविणारा ठरतो.

                            !!  ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी नित्य रूप तुझे,

                                     मस्तक ठेवितो त्या त्या ठिकाणी, सद्गुरुचे पाय दोन्ही !!

                 दिवसाची सुरूवात किंवा रात्री झोपतांनासुद्धा कितीतरी जण मनापासून ही प्रार्थना करीत असतात, यातच सगळे काही येते. महाभारतात द्रोणाचार्य-एकलव्य, कृष्ण-अर्जुन, परशूराम-कर्ण  हे गुरू- शिष्य आहेत. स्वामी रामदासाएवढेच त्यांचे कल्याण शिष्य ही महत्वाचा आहे. पुर्वी किर्तन, प्रवचन, भाषण ज्ञान संवर्धन, चांगल्या गुणांचा प्रसार या  हेतूने केले जायचे. शिष्याच्या प्रगतीवर बारिक लक्ष ठेवणारा गुरुच असतो. भक्तासाठी (पुंडलीक)प्रसंगी विटेवर उभे राहणारा (पांडुरंग), जनाबाईचे दळण दळून देणारा, नरहरी सोनारासाठी माप बदलणारा, चांगदेवासाठी भिंत चालविणारा, अगदी आई-वडील, बहिण-भाऊसुद्धा गुरू होऊ शकतात. निवृत्तीनाथ, मुक्ताबाई-ज्ञानेश्वर अशी अनेक उदाहरणे आहेत. काहीवेळा लोकांच्या अं:तकरणात भक्ती, श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी गुरू चमत्कारही करून दाखवितात त्यातुनच वाल्याचे वाल्मीकी तयार होत असतात. सर्वसामान्य माणसांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा निर्माण करणे हेच एकमेव ध्येय प्रत्येक आध्यात्मिक गुरु बाळगीत असतो. नांव किंवा पैसा कमविणे हे कधीच कोणताच गुरू करू शकत नाही. स्वयंघोषित महागुरु तर कधीच आदर्श असू शकत नाहीत.

                   काहीजण गुरुमाऊली असा उल्लेख आपल्या गुरुचा करतात (विशेषत: संत ज्ञानेश्वर, पांडूरंग). काही ठिकाणी बहुधा गुरुचरित्रात गुरुला कासवी म्हटलंय जे ( सातत्य/दिर्घ ध्येय/दुरदृष्टी )/ लंबी रेस का घोडा( आताच्या भाषेत) या हेतुने. आई जसे बाळाचे हित साधते, लक्ष ठेवते, स्वत:पेक्षा बाळावर जास्त प्रेम करते तसेच गुरुही करीत असतो. त्याला शिष्याचा सर्वांगिण विकास हवा असतो. एक आदर्श / श्रेष्ठ व्यक्ती कशी बनेल याकडेच गुरुचे लक्ष असते. त्यासाठी ते स्वत: तर मेहनत घेतातच पण शिष्याकडून कठोर साधना करवून घेतात.  

                  राजा शिवाजीपासून आताच्या इंदिरा गांधीपर्यंतच्या सर्व व्यक्तींना गुरु होतेच. शिवाजी महाराजांना तर दादाजी कोंडदेवांबरोबरच समर्थ रामदास आणि तुकाराम हे आध्यात्मिक गुरुही लाभले होते शिवाय यशाचे श्रेय शिष्य नेहमीच गुरुला देतात.  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हा लागतोच. रमाकांत आचरेकर सर नसले तर तेंडूलकर झाला असता का? संगीत, राजकिय क्षेत्रात, कला-क्षेत्रात, सिने-चित्रपट/नाटक क्षेत्रात, योगा किंवा जेथे शारिरीक सामर्थ्य पणाला लागते अशा प्रत्येक क्षेत्रात गुरु लागतोच. काहीजण  ज्याला गॉडफादर असे म्हणतात तेही कोणतरी असतातच. ज्याचा त्याचा हा वैयक्तीक प्रश्न असला तरी नेहमी शिष्यत्व पत्करणारेही तेवढेच महत्वाचे असतात. ओबड-धोबड मातीच्या गोळ्याला आकार देणारा, जन्म-दात्यांपेक्षाही काकणभर जास्तच शिष्याची आवड/ओढ ओळखणारा, प्रसंगी कटुता पत्करणारा, कठोर मेहनत करुन घेणारा असा सर्वसमावेशक गुरु लाभणे हे खरे भाग्य!

                   माझे वैयक्तिक/आध्यात्मिक गुरु असे ठराविक नाही सांगता येणार. जे जे चांगले सांगतात मला ज्यांचाकडून काहीना काहीतरी शिकायला मिळते, ते ते मला माझे गुरु वाटतात. अध्यात्मिक वाचनाची आवड लहानपणापासुन असल्यामुळे धार्मिक ग्रंथ, संत साहित्य, मन:शक्ती, रिडर्स डायजेस्ट असे अनेक प्रकारे आणि आतासुद्धा भाषांतरित उत्साहवर्धक (मोटिवेशनल) वाचायला जास्त आवडते. जेव्हा शाळेत होते तेव्हा शाळेतले शिक्षकच महान असे वाटायचे. नंतर बेळगांवच्या कलावती आईंची भजने, बालोपासना, त्यांच्या गोष्टींचा प्रभाव वाटत असे. तेव्हाच कधीतरी माझी आई गजानन महाराजांची पोथी वाचत असे, शेगांवलाही जाणे झाले तेव्हा त्यांचे सगळे चरित्र आकर्षक वाटू लागले. एकदा साई-बाबांचे चरित्रवाचन केले आणि देवळात जाणे झाले तेव्हा तेही गुरू वाटू लागले. मध्यंतरी श्री अनिरुध्द बापुंची प्रवचने ऐकण्यांत आली तेही मला आदर्श वाटू लागले. सकाळी उठून जोयस मेयरची, श्री.श्री. रविशंकर, सदगुरु, बाबा रामदेवांची योगाबद्दलची माहीती, प्रवचने/ भाषणे/ पुस्तके/ ग्रंथवाचन, तत्वज्ञान, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाची वाटू लागतात.

                    यदा यदाही धर्मस्य…. या महाभारतातील वचनानुसार त्या त्या काळात अनेकजण सामाजिक कार्यकर्ते जसे की, धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, महर्षी रानडे, सावरकर, टिळक, आगरकर ह्यांनी सामाजीक प्रगतीसाठी शिक्षण, स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याला प्रोत्साहनच दिले तेही एकप्रकारे आयुष्यातील मार्गदर्शक म्हणजे  गुरुच म्हणता येतील. समाजाला दिशा दाखविणे, मन वळविणे आपले हित कशात आहे हे दाखवून देणे, त्यासाठी प्रसंगी तुरुंगवासही स्विकारणे, निंदा-नालस्ती पत्करणे, दगड-चिखल सहन करणे हे केवळ समाजाच्या प्रती असलेल्या काळजीनेच/जाणिवेनेच शक्य आहे. संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई, तुकाराम, संत एकनाथ, सावता माळी,  इतर प्रांतातले कबीर ( दोहे), कर्नाटक (कलावती आई) किंवा शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद सरस्वती आताचे स्वामी विज्ञानानंद, साने गुरुजी, असे अनेकजण  याच हेतुने (मार्ग वेगळे असतील) कार्य करित होते/असतात. ज्यांना पटते ते त्यांचे अनुयायी बनतात आणि तसे वागण्याचा प्रयत्न करतात. स्वत:बरोबरच इतरांनाही मार्गदर्शनासाठी घेऊन जातात हेही एक महत्वाचे काम अप्रत्यक्षरित्या अनेकजण करीत असतात. म्हणतात ना  ज्योतसे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.. अशा न्यायाने आपली भारतभुमी जरी पुर्वी बदनाम झाली होती ( साधु/बैरागी/जादु-टोणे यासाठी) तरी आज जगात आध्यात्मिक प्रगतीसाठी भारताकडेच सगळ्या जगाचे लक्ष वेधले जात आहे त्याला कारण आहे ही गुरु-शिष्य परंपरा आणि तिचे होत असलेले पिढ्यानपिढ्याचे होणारे संक्रमण!

                 तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार- वामनराव पै,  हे जरी खरे असले तरी गुण, अवगूण ओळखणारा, मार्गदर्शक, हितचिंतक, प्रसंगी सवाई शिष्य तयार करणारा गुरू कायम वंदनीयच असतो.   शैक्षणिक, आध्यात्मिक, तांत्रिक आणि आपआपल्या क्षेत्रातले तज्ञ गुरू लाभणे हे भाग्याचे लक्षण असते.      आधुनिक युगात संगणक, सामाजिक माध्यमे व गुगलमूळे गुरूचा महिमा कमी होतो की काय असे वाटते पण प्रत्यक्ष जेवढा संवाद, शंका-निरसन, विचारांचे आदान-प्रदान होते तेवढी गुगलगुरू कडून शिकण्यात मजा येत नाही. दुधाची तहान ताकावर आणि घर बसल्या ज्ञान मिळते एवढेच समाधान. गुरू-शिष्य परंपरा जी पारंपारिक पध्दतीनुसार, (पिढयांनपिढ्या शिक्षक असणारे) तीच बरी होती असे कधी कधी वाटते. हल्ली ऑनलाईन किंवा आभासी स्वरूपात शिक्षण( सर्व प्रकारचे ) रुजू होऊ लागली आहे. काही प्रमाणात आजच्या परिस्थितीत ती आवश्यकही आहे. विशेषत: जिथे शिक्षक/गुरु पोहचू शकत नाही तिथे आधुनिक तंत्रज्ञान खेडोपाडी पोचविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

                         जुन्याकाळी गुरूजी म्हटले की त्यांना खुप मान असायचा, अजुनही थोड्याफार प्रमाणात आहे. पारंपारिक किंवा अपारंपारिक कुतुहलाची/ साहसाची/ ज्ञानार्जनाची भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यासाठी कोणतेही दिव्य करायला तो मागेपुढे पहात नाही फक्त त्याची ही भूक योग्य वेळी, योग्य माणसाकडून भागविणे महत्वाचे. त्यासाठी देश, वय, भाषा आणि पैसा यांचा अडसर येऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते. इतरही अनेक अप्रत्यक्ष गुरु आपल्या मदतीला असतातच जसे की, पुस्तके, निसर्ग, परिस्थिती आणि आई-वडिल व नातेवाईक. आपण यातुन किती शिकतो ते महत्वाचे ठरते.   

                अध्यात्मिक गुरुची का आज आवश्यकता आहे? सध्याचे धावपळीचे जीवन, ढासळती कुटूंबव्यवस्था, (काहीजण ज्याला कलियुग म्हणतात जिथे देवाची भीती नसून अनाचार वाढत असतात ) भौतिक सुखाची अपरिमितता आणि गोंधळलेले मन यासाठी! स्थिर व शांत मिळण्यासाठी आणि अनैसर्गिक सुख-लोलुपता टाळण्यासाठी.  संस्काराचा/ वेळेच्या अभावी भरकटलेले मन स्थिरावणे ही एक आताची नितांत गरज आहे. हे सगळे अध्यात्मच आपल्याला शिकवू शकते. योग्य गुरु मिळाले तर ठिकच नाहीतर आपले संत-साहित्य, गीता, ज्ञानेश्वरी किंवा मोटिव्हेशनल पुस्तके वाचली तरी आपले मन शांत होऊ शकते. अन्यथा ध्यान-धारणा, योगा, शारीरिक कसरत पासून आपली मन:शांती मिळवू शकते. सुधा मुर्ती, किरण बेदी, रतन टाटा, डॉ.अब्दुल कलाम, वोरन बफेट, बिल गेटस हे आपापल्या क्षेत्रातले अनुकरणीय गुरूच ठरलेत आणि इतरांसाठी आदर्श निर्माण करीत आहेत. आध्यात्मिक गुरुशिवाय आपण मानसिक आजारी किंवा अतिशय निराशाग्रस्त बनून मिळविलेले सर्व गमविण्याच्या भितीपायी स्वत:मध्ये ताण-तणाव व इतरांनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो.

                  नुकतेच राहुल द्रविडने( क्रिकेट कोच) जास्तीचे मानधन नाकारले या बातमीने माझे लक्ष वेधले गेले. तसेही मागे मानद पदवी नाकारुन त्यांनी सगळ्यांचे मन जिंकले होतेच.( मी अभ्यास केला नाही तर मी कसा स्विकारु? हे साधे आणि सोपे तत्वज्ञान). आताच्या काळात असे नि:स्वार्थ गुरु लाभणे हेही महत्वाचे आहेच.

                                                                  !!  शुभं भवतु !!


Comments

  1. Dhanyawad 🙏nav लिहिले aste tar kalale aste!😀

    ReplyDelete
  2. छान सुंदर अध्यात्मिक गुरुची का आज आवश्यकता आहे? हे फार मुद्देसूद मांडले आवडले👌👍 CM

    ReplyDelete
  3. Dhanyawad. Apan chan प्रतिक्रिया दिलित!🙏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव