धर्म, राजकारण आणि उद्योग/क्रिकेट

           नुकतेच चेतन भगत लिखित Three mistakes in my life हे अनुवादित पुस्तक वाचण्यांत आले.  गत आयुष्यांत केलेल्या चुकांबद्दल एवढी प्रांजळ कबूली क्वचितच कोणी देत असेल. तरुण पिढीला आकर्षित करुन आणि वाचकाला खिळवून ठेवणारी तसेच सध्याच्या वास्तवावर प्रत्यक्षपणे भाष्य करणारी एक परखड कादंबरी असेच वर्णन या पुस्तकाचे करावे लागेल. म्हणूनच यासंदर्भात मलाही लिहावेसे वाटले क्रिकेट वगळून!

                    वरील तिन्ही विषयांवर लिहावे तेवढे थोडेच आहे.  हे विषय सामाजिक माध्यमांवर तर वारंवार चघळता येऊ शकेल इतपत त्याची जाण प्रत्येकाला असते. त्यावरुन जनमतही आजमावता येते. अप्रत्यक्षपणे मतपरिवर्तन, अवलंबून राहणे किंवा त्याच्यावर किती अवलंबून राहायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. धर्म, राजकारण आणि उद्योग/क्रिकेट पैकी धर्म, राजकारण आणि क्रिकेट हे विषय भारतीय मनात सर्वत्र व्यापून राहिलेले म्हटले तर जिव्हाळ्याचे आणि म्हटले तर दंगलीचेही कारण ठरणारे. या तिन्ही विषयात समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण मुरलेले.  उपरोक्त तिघांची योग्य सांग़ड घातल्यास समाज, देश आणि जगाची नक्कीच प्रगती हौऊ शकेल.

               धर्म म्हणजे नुसता हिंदु धर्माबद्दल मला बोलायचे नाही. माणुसकी, नैसर्गिक आणि नैतिक जबाबदारी स्विकारणारा प्रत्येकजण धार्मिकअसे म्हणावयास हरकत नाही. कोणताही धर्म हा दुस-यावर वर्चस्व गाजविणे किंवा मीच श्रेष्ठ असे म्हणत नाही. उच्च-नीच हा भेदभाव करीत नाही. अमर्यादित असे काहीच नसते, ना सत्ता, ना संपत्ती, ना कट्टरता. उलट शांती, समाधान आणि समान संधी देणारा खरा तो धर्म असे म्हणावे लागेल. ही शिकवण जशी मदरशातून दिली जाते तसेच सर्व धर्मीयांनी लहान वयातच प्रत्येकाला दिली पाहिजे जेणेकरुन पुढे जाऊन अतिरेकी विचार, संघर्ष आणि जातियवादाला तोंडच फुटणार नाही असे मला वाटते. राष्ट्रधर्माला प्राधान्य दिल्यास अनेक समस्या सुटू शकतील. देश्भक्ती ही फक्त एक/दोन दिवसापुरती मर्यादित नसून कोणतेही कृत्य देशाच्या ऐक्यास, स्वतंत्रतेस, हानीस जबाबदार नसावे अशी खात्री/काळजी प्रत्येकाने घ्यावे.

           राजकारण हे तर प्रगती, उन्नती साधायचे उत्तम साधन आहे. हे एक प्रकारचे समाजकारण समजून वागल्यास काहीच अशक्य नाही. स्वत:पेक्षा समाज, देश आणि तळागाळातल्यांचे भवितव्य साकारणारे  हे एक प्रभावी माध्यम आहे. गरिबी हटाव किंवा अच्छे दिन या नुसत्या घोषणाच राहतात. साम्यवाद, भांडवलशाही किंवा लोकशाही स्विकारणे हे केवळ या हेतूनेच केले जाते. अन्यथा स्वहिताला प्राधान्य देत राहिल्यास लोकमत कधीही विरोधात जाऊ शकेल आणि केवळ सत्ताधा-यांना विरोध एवढेच धोरण ठेवल्यास नक्कीच एक दिवस जनता जागा दाखवू शकते हे लक्षात घेऊनच कामे केली पाहिजेत. दिर्घकालीन विचार करुन निर्णय घेतल्यास येणा-या पिढीचाही विकास होऊ शकेल असेच धोरण आखणे ही काळाची गरज आहे. 5 वर्षेच तर सत्तेत काम करावयाचे आहे मग ते कसेही करू असा संकुचीत विचार एक दिवस आपल्याच भावी पिढीचे नुकसान करतो हे लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एकालाच संधी न देता समान संधी आणि हक्क व कर्तव्याची जाणिव इथेसुध्दा खूप काही बदल घडवून आणू शकते.

             उद्योग हे खाजगी असावेत की सार्वजनिक किंवा संयुक्त हा एक वादाचा मुद्दा असू शकतो. जर स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्यानंतरही आपण सरकारचीच जबाबदारी असे समजून कोणतेही आव्हान पेलण्यास नकार दिल्यास प्रगती होणार कशी? याउलट जिथे सरकार/शासन कमी पडते तिथे आपणहून सामाजिक जबाबदारी समजून प्रत्येकाने विचार केल्यास काही कठिण नाही. तसेच केवळ विरोध करायचा म्हणून प्रत्येक ठिकाणी विरोध न करता त्यावर उपाय सुचविल्यास आणि अंमलात आणल्यास कित्येक समस्या आपोआप कमी होतील हे नक्की! ठराविक समाजाचीच ही जबाबदारी न समजता प्रत्येकाने असा प्रयत्न तरी केला पाहिजे.

             जगात क्रिकेट काही ठराविक देश खेळतात. क्रिकेट मध्ये 11 खेळाडू, स्टेडीअम, टिव्हीवर करोडो प्रेक्षक बघतात. जाहिरातदारांकडून, प्रायोजकाकडून, प्रेक्षकांकडून करोडो रुपयांच्या उलाढाल होते.    क्रिकेटबद्दल एवढे महत्व का देतात बाकी अन्य वैयक्तिक खेळाकडे दुर्लक्ष, बेजबाबदारपणा आणि याला मात्र सगळ्या सोयी-सुविधा हे कुठेतरी थांबले पाहिजे असे वाटते. इतर अनेक खेळ आपल्याला, देशाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात. इकडे आता मुलांनी, पालकांनी आणि पर्यायाने शासनानेही लक्ष दिले पाहिजे. नाहीतर एवढी मोठी लोकसंख्या आणि ऑलंपिकमध्ये  मेडल मात्र हातावर मोजण्याएवढे ही तफावत किती वर्षे चालणार? त्यासाठी एक करता येऊ शकेल, क्रिकेट्चा पैसा अन्य  वैयक्तिक  खेळाकडे वळवून प्रशिक्षण,प्रोत्साहन आणि जबाबदारी निश्चीत करणे, राष्ट्रभावना विकसीत करणे आणि अन्य खेळात लक्ष देऊन नियोजन करून खेळाडू विकसित करणे लक्ष देणे अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात जर मनावर घेतले तर.

             तुम्हाला या सगळ्या कवी-कल्पना वाटतील पण कुठुनतरी सुरुवात तर झाली पाहिजे. प्रत्येकास दुस-याने करावे असे प्रत्येकाला वाटते त्यापेक्षा आपण सगळे मिळून करू ही भावना वाढीस लागली पाहिजे. त्यासाठी एकीचे बळ, हक्काची जाणिव, ज्ञान आणि कौशल्याचा विकास झाला पाहिजे. मुख्य म्हणजे सामान्य माणुस किती दिवस सामान्य राहणार? कधीतरी त्याने आणि समाजानेही त्याचा सहभाग नोंदविला पाहिजे. असामान्य लोक सामान्य लोकातून तर घडतात. निदान प्रगती नाही करु शकत तर प्रगतीमध्ये अडथळा न आणणे हे तरी आपण नक्कीच करु शकतो, प्रोत्साहन तरी देऊ शकतो. आज ओलींपिक जेव्हा भरते तेव्हा बरेच काही घडत असते चांगले वाईट. त्यासाठी लागणारा पैसा, संधी आणि उत्तेजन कितीजण देतात याचाही विचार झाला पाहिजे.

               शेवटी धर्म, राजकारण, क्रिकेट आणि उद्योग हे हातात हात घालूनच चालत असतात. त्याचा अर्थ असा होत नाही की, धर्माचे राजकारण करुन सत्ता बळकावयाची आणि सगळे उद्योग ताब्यात घेऊन तिथेही वर्चस्व गाजवायचे आणि मग bright politics च्या ऐवजी dirty politics  म्हणून हिणवायचे किंवा तसे वागायचे. ही जबाबदारी सर्वांचीच आहे असे समजून वागल्यास काहीही कठीण नाही फक्त मनावर घेतले पाहिजे. उद्योग उभारणीमूळे अनेकांना नौकरी आणि संसार चालू रहातात अनेक उप उद्योगांना बळ मिळते  यामूळे उद्योग उभारणीस प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव