सुख टोचतेय का?

 

           सुखाचा शोध हे कथासंग्रह (श्री. एंगडे लिखीत) वाचनात आले. त्यात त्यांनी त्यांच्या अनेक कथांतुन सुखाचा शोध कसा आपणच घेतला पाहिजे याची अनेक उदाहरणे देऊन समर्पक कथा लिहिलेल्या आहेत. प्रत्येक माणुस यासाठीच तर धावत असतो. कधी सुख मृगजळासारखे फसवे ठरते तर कधी हुलकावणी देत असते. एकुण काय मी आता सुखी आहे असे म्हणणारा किंवा सुखी माणसाचा सदरा घातलेली माणसे विरळाच असतील. काही जणांना तर सुख कशात आहेत हेच कळत नसते.  काही माणसे मात्र हे वेळिच ओळखतात आणि त्या दिशेने प्रयत्न करुन यशस्वी होऊन दाखवितात.

             सचिन तेंडुलकर-क्रिकेट, माधुरी दिक्षीत-अभिनय व नृत्य, तर आशा भोसले-गायन व अभिनय आणि व्यवसायातुन आपले सुख शोधत असतात. सुखाची व्याप्ती कधी क्षणिक तर कधी कायमचे हवे असते. व्याख्याही व्यक्तीपरत्वे बदलत असते किंबहुना एकाचे सुख ते दुस-याचे दु:खही असु शकते. भौतिक,आध्यात्मिक, आर्थिक आणि पारमार्थीक असे साधारण प्रकार असावेत. प्रत्येकजण यासाठीच धडपडत असतो अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत! स्थैर्य, शांती,समाधान, आनंद हेही सुखाचे निकष असु शकतात. त्यासाठी लागणारी जिद्द,मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न एखाद्याला सुख मिळवुन देते तर तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्रास घेणारे कधी कधी अयशस्वी होतात.  आपल्या नशीबातच नाही किंवा जे मिळाले तेही काही कमी नाही अशी स्वत:ची समजूत करुन घेतात.

            याउलट सुखाच्या राशीवर लोळणारे काहीतरी कमीचेच रडगाणे गाऊन मी कसा/कशी दु:खी आहे असेही भासवित असतात. काहिजण सगळे काही असुनही नसल्यासारखे भाव दाखवित असतात. पैसा,घर, बचत,संपत्ती) अशी सर्वसाधारण सुखाची कल्पना प्रत्येकजण करीत असतो. तर काहिजण मुले चांग़ली निघाली हीच आपली संपत्ती हे मानत असतो. काहिजणांना सुख बोचते कसे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच आलेली एका उद्योगपतीच्या मुलाची कथा. वडिलांच्या कित्येक कोटीच्या संपत्तीवर पाणी सोडुन हिमालयात गेलेला मुलगा (आताच्या काळात विरळाच) तेही परदेशातला. अतीसुखसुद्धा माणसाला कधी झोप लागु देत नाही. हे सुख नाहिसे होणार नाही ना? या चिंतेने. म्हणुनच मन:शक्तीचेशिर्षक सुख टिकण्यास, मन:शांती मिळवा असे आहे. खरेच स्वामी विज्ञानानंदांचे काही प्रयोग या दिशेने यशस्वी होतांना दिसत आहेत.

             गेल्या 25 वर्षात तसा ब-यापैकी लोकांच्या भौतिक परिस्थीतीत सुधारणा झालेली दिसुन येत आहे. मानसिक आणि शारीरीक मात्र सुख नष्ट होत चालले आहे. त्यामुळे अनेक वैद्य, आजारपण आणि अशांती असे अनेकजण दु:खाच्या रांगेत उभे राहत आहेत. स्वास्थ्य हे सगळ्यात महत्वाचे हे आता काहीजणांना पटु लागलेले आहे. फार मोठी किंमत सुखाची मोजावी लागते हेही लक्षात यायला लागलेले आहे. थोडक्यात मजा हेही काहीजणांना उमगू लागलेले आहे. तसेही अती तेथे माती हा नैसर्गीक नियमच आहे. समतोल संयम आणि प्रामाणिकपणा जेवढा जास्त तेवढी सुख टिकण्याची शक्यता अधिक हेही आता कळुन चुकलेले आहे लोकांना. इथे अर्थशास्त्राप्रमाणे प्राधान्य ठरवुन वेळिच सावध होणे हेही नसे थोडके!अध्यात्म्यातसुद्धा हेच सांगण्यात येते            

                   सुख कशात आणि कसे मिळवायचे हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपल्या सुखामुळे दुस-यांचे नुकसान होणार नाही ना हेही बघणे तेवढेच महत्वाचे. तसेच सुखाचा अतिरेक न होता संयमाने उपभोगणे . नाना पाटेकरांच्या भाषेत ओंजळित मावेल एवढेच ठेवायचे,उरलेले वाया जाण्याच्या आत इतरांना वाटुन टाकायचे, मग ते ज्ञान असो, संपत्ती असो किंवा पैसा. आपली गरज किती आहे हे ठरविणे त्यासाठी म्हत्वाचे. कमी गरजांमध्येही माणूस सुखी राहु शकतो हे आपल्याला करोनाने  दाखवून दिलेच आहे फक्त ते विसरु नये इतकेच. . तुम्हाला काय वाटते?



Comments

  1. अगदी खरंय आणि योग्य. गीताताई

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव