निकाल आणि परिणाम
मे, जुन महिन्यात सर्वसाधारणपणे सर्व शैक्षणिक
निकाल जाहिर होतात. स्पर्धा-परिक्षेबाबतही बहुधा हाच कालावधी असतो. नाहीतरी वर्षभर
कोणत्या ना कोणत्या परिक्षा, निवडणूका चालूच असतात. कुणी यशस्वी होतो आणि कुणी नाही.
परत प्रयत्न करणारे, क्षेत्र बदलणारे आणि आता काहीच मार्ग दिसत नाही असे समजून जीवाचे
बरे-वाईट करुन घेणारेही असतात. ही गोष्ट केवळ पालक-पाल्य आणि शैक्षणिक क्षेत्रापुरता
मर्यादित न राहता याचे अनेक परिणाम आजु-बाजूला आपण बघत असतो. एवढ्या टोकाचा विचार करणे
हे कितपत योग्य आहे किंवा त्यामागची अनेक कारणे असू शकतात. याव्यतिरिक्त राजकीय क्षेत्राचाही
यावेळी निकाल लागले होते मग त्यांनी कोणी असा अघोरी विचार केलेला दिसतो का हो? तुम्ही
म्हणाल, ते मोठे / प्रगल्भ असतात त्यांना या निकालामुळे काहीच फरक पडत नाही. जर एक
करियर म्हणून राजकारणाचा विचार केल्यास आव्हाने अनेक असतात. राजकीय नेते या सगळ्याला
पुरून उरतात. मग सामान्य मुलेच/ माणसेच का हरतात/ शरणागती पत्करतात याचाही विचार झाला
पाहीजे असे मला वाटते.
इंग्रजांनी
आपल्याला नोकरी (पांढरी कॉलर वाली) उत्तम अशी सवय लावलेली ती आपण अद्यापही विसरायला
तयार नाही. त्यात सरकारी / खाजगी असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. काही नोक-या प्रतिष्ठेच्या
तर काही मेहनतच करायला लावणा-या असतात. काही कालावधीत इंजिनियर्स, सी.ए. बॅंकेत तर
डॉक्टर्स, एम.बी.ए. अशा व्यावसायिक क्षेत्राचेही आकर्षण बरेच असते. सगळेच इथे गेले
तर उरलेली क्षेत्रे काही कमी नाहीत. हे सांगायला आणि पटायला अनेक करियर-मार्गदर्शन,
मेळावे आणि कंपन्यासुद्धा भाग घेत असतात. तरी दरवर्षी मुले निराश होऊन आत्महत्या करीतच
असतात. एक मोठा वर्ग यात सामील असतो बहुधा मध्यम-वर्गीय किंवा उच्च-मध्यमवर्ग म्हणा
किंवा अगदी ज्यांना काहीच करणे शक्य नसेल असे. खरेच आत्मघाताने प्रश्न सुटतात की नवीन तयार होतात याचा कुणी विचार
करेल का?
एकतर अवाजवी शैक्षणिक खर्च, पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि मुलांना सगळे आयते
मिळण्याची लागलेली सवय. यामुळे विध्यार्थी हा विद्यार्थी न राहता “ एक मशिन आहे की
काय?” हवे ते मिळवून देणारा असे कधी कधी वाटते. मुलांकडून अपेक्षा करणार नाहीतर कोणाकडून?
असेही म्हणणारे पालक एकीकडे तर दुसरीकडे त्याने काय करावे हे त्यानेच ठरवावे, आम्ही
काय सांगणार? असेही असतात. अशावेळी काय योग्य/अयोग्य
हेच ठरविता ज्यांना येत नाही ते विद्यार्थी खचून जातात. पालक खरे तर अत्यंत समजुतदारपणे
यातून मार्ग काढू शकतात पण त्यांचाही आधार नाकारणारे असतात. आम्हाला तुमची गरज नाही आम्ही आमचे बघू. मित्र-मैत्रिणी
मिळून जे ठरवितात तेच खरे असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेच सारखा विचार नाही ना करु शकत! आपले हित-अहीत समजण्याएवढे त्यांचे विचार नक्कीच
मोठे/ परिपक्व झालेले नसतात.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम असाही व्हायला लागलेला दिसून येतो की, “मुलाला /
मुलीला जन्म देण्याची भानगडच नको” अशीही मानसिकता वाढीस लागत आहे. करियर, नोकरी, घरी
वेळ देणे हे काही सोपे काम नाही. एकाला प्राधान्य दिले तर दुसरीकडे दुर्लक्ष होऊ शकते
किंवा वेळेचे नियोजन जमत नाही ते असे अघोरी मार्ग निवडतात. या आधीची पिढी हे सगळे करीतच होती ना! तेव्हा एवढी
स्पर्धा नव्हती, पैशाला महत्व दिले जात नव्हते, घरात माणसे होती असे तुम्ही म्हणाल.
तेव्हाही समस्या होत्याच फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. दोघे किंवा चौघे
समजुतदारपणे एकमेकांना सांभाळून मार्ग काढायचे. समस्या सगळीकडे असणार पण त्या सोडविण्यातच
तर खरे यश असते. ही एक सामाजिक समस्या म्हणून समजली तर सगळ्यांनीच सोडविण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. आई-वडिल, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि शासन यांनी मनावर घेतले तर
काहीच कठीण नाही.
दृष्टिकोण बदलणे, कोणतेही काम कमी न समजणे, नोकरीला अवाजवी महत्व न देणे, एकदा
अयशस्वी झाला म्हणजे सगळे संपले असे न मानता पुन्हा जोराने प्रयत्न करण्यास कोणताच
कमीपणा न वाटणे, शिक्षणपद्धतीत सुधारणा करणे. वैयक्तिक कौशल्य-विकासावर भर देणे, कोणतेही क्षेत्र
कमी न समजता त्यात आपण कसे नाविन्य आणू शकतो याचा विचार करणे, मानसिकता बदलणे (सगळ्यांचीच),
लहानपणापासुन वैयक्तिक कामे, स्वत:ची कामे स्वत: करणे यावर भर देणे, शिक्षण घेणे हा
अधिकार असला तरी त्यानंतर कर्तव्यही पार पाडायची असतात याचे सामाजिक भान शिकविणे, शैक्षणिक
दर्जा केवळ गुणांवर न समजून त्याला त्यात समजले किती यावर भर देणे. नाहीतर “पुढचे पाठ
आणि मागचे सपाट” अशी गत होता कामा नये. परदेशी शिक्षणाचा आग्रह/भर कमी करणे अशा अनेक
उपाय योजून (समांतर) मुलांना यातून हसत-खेळत कसा मार्ग शोधता येईल यावर भर देणे.
परिणामांची अवाजवी चिंता टाळणे शक्य झाल्यास बरेचसे उपाय करता येतील. तुम्हाला
काय वाटते? एकदाच मिळालेल्या आयुष्याचे सोने करायचे की माती हा सर्वस्वी वैयक्तीक प्रश्न
असला तरी त्याचे परिणाम इतरांवरही होत असतात याचेही भान असणे महत्वाचे असते. तेच लहानपणापासून
मनावर बिंबवणे अत्यावश्यक असते. पालकांनी मुलांचा तेजोभंग न करणे, सारखे टोचून न बोलणे,
मग कोणत्याही निकालाची भिती कधी वाटणार नाही कुणालाच. बाय द वे, आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जाहीर
झालेल्याच आहेत, पुन्हा चक्र चाकूच राहणार. तुम्हाला काय वाटते?

Comments
Post a Comment