वाह, ताज- उस्ताद टाटा ते मनमोहन-- बाय बाय

अ)  उस्ताद झाकीर हुसेन

             लहानपणी चहाच्या जाहिरातीतील उस्ताद झाकीर हुसेन जेव्हा प्रत्यक्ष मैफलित भेटू लागले तेव्हा जास्तच आवडू लागले होते. वडीलांमुळे नकळत्या वयातसुद्धा अनेक सांगितिक मैफिली मला पाहायला/ ऐकायला मिळाल्या. त्यातल्या गाण्यांपेक्षा वादनावर माझा जास्त भर होता. अशा अनेक मैफिलीतून उस्तादांची ओळख तबल्यामुळे होत गेली. त्यांचे चेह-यावरचे भाव, बोटांचे नर्तन बघायचे की कानाने त्यांचे, तबल्याचे बोल ऐकायचे अशा संभ्रमात मी पडायचे. विशेष करुन उतार-चढाव-जुगलबंदी - (सतार, सरोद आणि संतूर बरोबरची ) मनसोक्त मनोसक्त भिजायला व्हायचे. मृदुंग, घटम आणि पाश्चिमात्य वाद्यांबरोबर ते जास्त खुलून जात. त्यांचे मृदु बोलणे, साधी राहणी आणि आकर्षक व्यक्तिमत्व खुपच आवडायचे.

         त्यांनी केलेले अनेक सांगितिक प्रयोग, फयुजन आणि वेगवेगळे बंदिशीला गेटवे ओफ इंडियानेसुद्धा दाद दिली असेल. ते वादन वातावरण अगदी भारुन टाकायचे. असा हा कलाकार  कलेशी एकदम प्रामाणिक आणि सच्चा होता. त्यांचे अनेक विडीओ क्लिप्स फेस बुकवर बघायला मिळतात. त्यांचे अनेक शिष्य देशात, परदेशात तयार करुन ते त्यांच्यामार्फत जीवंत राहणारच आहेत. हा वारसा जसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला तसेच त्यांनी त्यांचे अनेक वारसदार नक्कीच तयार केले असतील. अनेक मोठ्या कलाकारांबरोबर त्यांचे कार्यक्रम व्हायचे.

         मिळालेल्या दैवी देणगीत स्वत:ची नवीन भर घालुन एक नवीन आदर्श  तयार करणे, शास्त्रीय संगीताला जागतिक दर्जा प्राप्त करुन देणे, हल्लीच्या पिढीला फ्युजन आवडते म्हणुन वेगवेगळे वाद्यांचे एकत्रित मेळ करुन शो करणे असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सांगता येतील. नवीन कलाकारांचे कौतुक आणि इतरांचा आदर व नम्रपणे श्रोत्यांचे मनोरंजन करुन मुलांना/त्यांना प्रशिक्षीत करणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. “साझ” या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीत  निगर्शन  करुन एक नवीन क्षेत्रात प्रवेश केला. 60-65 वर्षे एकच ध्यास, श्वास बनून शिकणे, वाजविणे आणि शिकवणे  हे कठोर व्रत घेतल्यामुळे आज ते इतरांसाठी आदर्श  ठरले ना! वडिलांच्या आठवणीप्रित्यर्थ एक दिवस-रात्र  संगीत-वादन मैफल वर्षोनवर्षे आयोजित करणारा हा एकमेव सुपुत्र असावा असे वाटते.

ब) रतन टाटा-एक अनमोल रतन:-

            या वर्षातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सामाजिक दायित्व मानणारे महान उद्योगपतींचे निधन सगळ्या जगालाच मौन धरण्यास भाग पाडले असेल. जागतिक घडामोडींवर बारिक लक्ष  ठेवून सर्व-सामान्यांचे हित जपणारा, दर्जा आणि किंमत याची योग्य सांगड घालून जगापुढे पिढीजात आदर्श  ठेवणारा, दिपस्तंभा सारखा मार्गदर्शक, करोडो लोकांचा पोशिंदा,  90 वर्षांचा तरुण खरेच सगळ्यांना दु:खात लोटून गेला. त्यांचेही अनुयायी तयार झालेले असणारच. लोखंडापासून विमानापर्यंत, फोनपासुन अगदी मिठापर्यंत, वाहतुकिची साधने ते संशोधनात अग्रेसर ठरणारा टाटा उद्योगसमूह नेहमीच कौतुकास्पद ठरलाय.  दुरदृष्टी, माणसांची पारख, धोका पत्करण्याची तयारी, सढळ मदत  करण्याची वृत्ती आणि मृदू व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे “वाह, ताज” हे बिरुद दोघांनाही लागू होईल.

             कोणत्याही संकटाला तोंड द्यायला, स्वत:हून मदत  जाहीर करायला, तिही थोडी-थोडकी नव्हे, तर कोटीच्या प्रमाणात ( संभाव्य गरज लक्षात घेऊन) मग ते संकट बोम्बस्फोट असो नाहितर करोना असु दे. सर्व-सामान्य माणसांची स्वप्ने पुरी करणे, त्यांना मदत  करणे, सामाजिक संस्था उभारणे याशिवाय एवढा मोठा उद्योगसमुह चालविणे हे सोपे काम नाही. त्यात प्रामाणिक प्रयत्न, कर्मचा-यांची दखल,उत्तेजन आणि आपलेपणा निर्माण करणे हे महत्वाचे काम. “टाटा” हा शब्द उच्चारला विश्वास निर्माण होतो. त्यांचे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर पटकन उभे राहते. प्रत्यक्ष कधीच भेट झाली नसली तरी आपले वाटणारे “टाटा” असे एकमेव असतील. अशा या उद्योगपतीला सर्व-सामान्य माणसाने कधीच भारतरत्न मनाने बहाल केलेले आहे/होते, जरी शासनाने केले नसले तरीही.

क) मा. डॉ.मनमोहन सिंग़ (माजी पंतप्रधान):-

        नुकतीच डॉ.मनमोहन सिंग गेल्याची बातमी ऐकली. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 1991 पासुनची त्यांची कारकीर्द लक्षात ठेवण्यासारखीच होती. विशेषत:  आर्थिक क्षेत्राशी माझा जास्त संबंध आणि आवड असल्यामुळे असेल कदाचित. “अपघाती पंतप्रधान” असे जरी त्यांना म्हणत असले तरी त्यांनी आर.बी.आय.चे गव्हर्नेर, अर्थमंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार आणि अर्थशास्त्रातली डॉक्टरेट असलेली व्यक्ती देश कसा चालवायचा याचे आदर्ष वस्तुपाठच सगळ्यांसमोर ठेवून गेले. मृदू बोलणे, नम्र वागणे आणि कोणतेही राजकीय दबाव न मानणे, सर्व-सामान्य माणसांचा विचार करुन निर्णय घेणे असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सांग़ता येतील. 10 वर्षे पंतप्रधान असताना अनेक जागतिक स्तरांवर भारतीय मुद्रा उमटविण्यांत ते यशस्वी झाले. परदेशी विद्यापीठातली शिक्षणाचा वापर त्यांनी आपल्या देशासाठी करण्यांत आणि नवनवीन संकल्पना राबवण्यांत जसे की, जागतीकरण “जग एक बाजार”(Globalization),”रुपयांचे अवमुल्यन” असे अनेक कठोर निर्णय त्यांनी घेण्यास सरकारला मदत केली. तसेच सामन्य/मध्यमवर्गिय माणसांची स्वप्ने पुर्ण करणे हेही त्यांच्यामुळे शक्य झाले, म्हणुनच “आर्थिक सुधारणांचा शिल्पकार”असेही त्यांना मानले जाते.  देशाला अत्यंत कठीण आर्थिक परिस्थीतीतून त्यांनी धैर्याने मार्ग काढून बाहेर काढले. याबद्दल  देश आणि जनता त्यांची कायमची ऋणी राहील.

                 (Legends never dies)“महापुरुष मरत नसतात” हे वाक्य अगदी अजरामर करुन गेलेल्या या तीन्ही महापुरुषांना (क्षेत्र वेगवेगळे) आपण या वर्षात नाईलाजाने टाटा/बाय बाय केले असले तरी त्यांचे विचार, वारसा नेहमीच आमच्या मनात ते ठेवून गेलेले आहेत. त्यांनी पुढिल पीढीसमोर एक आदर्श  निर्माण केला आहे. 60-70 वर्षे त्यांनी आपल्या मनावर राज्य केलेच आहे. त्यांच्या “पावलावर पाऊल ठेवून चालणे” हिच त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली/आदरांजली ठरू शकेल.

           एकूण या वर्षाचा शेवटही या लेखानेच करीत आहे. या वर्षाला “टाटा,बाय बाय” करुन तुम्हा सर्वांना “नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.”



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव