मागे वळून पाहताना... ( 2024 चा आढावा )

 

          नवीन वर्षे सुरू झाले कि, मागच्या वर्षीचा आढावा घेणे हे नेहमी प्रमाणे ठरलेले असते. कार्यालयीन काही सवयी जाता जात नाहित त्याचा परिणाम. तरी बरे आता सेवापुर्ती होउनही 3 महिने झाले. मागच्या वर्षीचे आजारपण या वर्षीच्या जानेवारीपर्यंत चालुच होते. याचा एक फायदा झाला की, दोन्ही मुली तातडीने सेवा करायला, घर बदलायला, सामान लावून द्यायला अमेरिकेहून धावत-पळत आल्या आणि 12-20 दिवसानी परत गेल्यासुद्धा.  नवीन घरात बरेच पाहुणे येत होते मला बघायला, भेटायला आणि नवीन घर बघायला, तेवढाच विरंगुळा असायचा. आरामासाठी सोबत न्यायची पण मुलींची तयारी होती पण एवढा 22-24 तासाचा विमान-प्रवास “सध्या नको” म्हणून जरा बरी झाल्यावर येण्याचे आश्वासन,” आरामच कर नाहीतर “सरळ स्वेच्छा-निवृती घे बघू” असेही सुचवून झाले दोघींनी आणि इतरांनीसुद्धा.

              दुस-या मुलीचे द्वितीय पदवीदान समारंभासाठी तसेही जायचे होतेच. लग्नाची बोलणी, पसंती आणि एकूणच “होकार” मिळेपर्यंत तसे काही दिवस ताण-तणावातच गेले. अमेरिकन वारी एप्रिल-मे महिन्यात झाली त्याचे वर्णन मागे दिलेच आहे. तिथे जाऊन मुलगा बघणे, बोलणी वगैरे सगळे यथासांग पार पडल्यावर जुलै-मध्ये रजिस्टर पदधतीने अमेरिकेतच मुलीचे लग्न झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणपती माझ्याकडे असल्यामुळे त्याची तयारी आणि माझ्या सप्टेंबर मधल्या सेवानिवृत्तीचे वेध लागले. सेवापुर्तीचा आनंदही घेतला. हाही एक प्रसंग एक डोळा हसत होता आणि दुसरा डोळा रडत होता. कदाचित देवाने यासाठीच दोन डोळे दिले असावेत. कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन साहेबांच्या हातून होणे हाही एक रोमांचक अनुभव होता.

            लेक-जावई दिवाळीला येणार म्हणुन सगळी गडबड सुरु होती. इथेही जावई पहिल्यांदाच येणार म्हणुन उत्सुकता तर सगळे व्यवस्थित होणार ना म्हणून थोडी चिंता. तरी बरे जावई 4-5 दिवसच राहिला. ऑक्टोंबर-शेवट येऊन मुलीला गावी कुलदेवतेला जायचे होते त्यामुळे तिकडे एक आठवडा गेला. मुलीच्या लग्नाचा स्वागत-समारंभ पुणे येथे असल्यामुळे थोडी धावपळ झाली. त्यानंतर आवरा-आवरी, दोघांचे अमेरिकेला परत जाणे, पाहुणे-रावळे, माझी अध्यात्मिक वारी यात नोव्हेंबर-डिसेंबर महिना कसा गेला ते कळलेसुद्धा नाही. दिवस भराभर जातात असे कधी कधी वाटते. एवढी नोकरीची 37 2/3 वर्षे आणि लग्नाची 32 वर्षे कशी गेली ते कळलेच नाही.

              वर्षेअखेर आढावा घ्यायचा झाल्यास आवडत्या  मावशीचे ( वय वर्षे-89)  निधन ही वाईट घटना आणि मुलीचे लग्न त्याच महिन्यात असे झाले त्यामुळे एक डोळा हसत होता तर दुसरा डोळा रडत होता असे म्हणावे लागेल. यावर्षी एक लक्षात आले की, योग्य वेळ आल्याशिवाय आपण  कितीही प्रयत्न केले तरी यश येतच नाही. उशिरा का होईना पण 2-3 चांग़ल्या घटना घडल्या हे महत्वाचे. तसेही काही चांगले, वाईट घटनांनीच आयुष्य घडते ना प्रत्येकाचे!  आपला संयम आणि विश्वास मात्र डळमळीत होता कामा नये,एवढे खरे. परमेश्वराचेही आभार ज्याने हे वर्षभर त्याची कृपा आम्हां सगळ्यांवरच होती, अशीच कृपा पुढेही असणार आहे याची मला खात्री आहे. सगळ्यांचे आशिर्वाद, हितचिंतकाचेही योगदान असतेच या सर्वामागे. त्याचबरोबर नवीन माणसे, त्यांचे अनुभव आणि स्वभावाचे दर्शन घडते तेही आवश्यकच असते.

               तुमचे कसे गेले हे वर्षे? असा लेखा-जोखा तुम्हीसुद्धा मांडता का? नक्कीच तुम्हाला जाणवेल की,वाईट एकच घटना असेल तर 3-4 चांगल्या घटना असतील मग आपणच आपली पाठ नको का थोपटायला? थोडेसे मागे वळून बघितल्यावर लक्षात येते की, अग्ली डक्लीनचा ( सावळी,बुटकी आणि अबोल ) प्रवास तसा सोप्पा नव्हता. अनेक अडचणीवर मात,स्वकियांचे कधी सहकार्य तर कधी विरोध, मुलींची मस्ती व उच्च शिक्षण,सास-यांचा सहवास, एक सिंगल रुम ते आता 2 बेडरुम हॉल,किचनचा प्रवास करायला एवढी 32 वर्षे संसार आणि नोकरीची 37 2/3 वर्षे कशी गेली ते कळलेच नाही.

               एकुण 75 वर्षे वयाची मर्यादा लक्षात घेता अर्ध्यापेक्षा जास्त वय उलटुन गेलेले आहे दोघांचेही. दुसरी इनिंग सुरु झालेली आहे. जबाबदा-या तशा संपत नाहित तरी “संपल्या” अशा म्हणायला हरकत नाही. स्वत:   इतरांचा विचार करण्यांतं मला काय पाहिजे ते तपासायचे राहूनच गेले. आता यापुढचा वेळ सगळा “बोनस”समजून वागावयास हवे. उत्तरायण सुरू झाले की परतीचे वेध लागतात असे म्हणतात.  फिरणे, वाचन, लेखन, वादन आणि कमीत कमी त्रास घेणे असा विचार आहे. बघू कसे काय जमते ते!  थोडक्यात आहे ते सांभाळायचे आणि नवीन धडपड काही करायची नाही एवढे मात्र नक्की. 4 वेळा (2 बाळंतपणे आणि 2 जीवघेण्या आजारातून) वाचविलेले आयुष्य कशासाठी? परमेश्वरी योजना काय असावी? हे आपल्याला कळते तर!

                 “2025 साठी तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन! धन्यवाद, आभारी आहे.”



Comments

  1. Replies
    1. Dhanyawad,nav lihile tar bare hoil 👍🙏

      Delete
  2. सुंदर लेख

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad,nav lihile tar!👍🙏

      Delete
  3. खूप छान आढावा घेतला आहेस
    तू माधवी.लेख खूप आवडला.
    --गीताताई

    ReplyDelete
  4. Dhanyawad Geetatai 🙏👍
    Tuze protsahanmule lihavese vatate!💗

    ReplyDelete
  5. Madhavi kase ga tu itke chhan lihites.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव