तंत्रज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्तेने भ्रष्टाचारावर उपाय सापडेल का?
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुध्दिमत्ता प्रगतीमुळे आज खरेदी-विक्री, आर्थिक व्यवहार, यांत्रिक कामे, पैसे देणे, घेणे/काढणे,वअर्जांची छाननी,परिक्षा, निकाल, प्रवास तिकिटे, पास, आरक्षण, मतमोजणी कमी वेळात करणे शक्य झालेले आहे. किचकट आणि गुंतागुंतीची कामे जसे कीमोठमोठ्या सर्जरी, आरोग्य तपासणीची साधने, शेती आणि संरक्षण हेही सोपे झालेले आहे. थोडक्यात, दिवसेंदिवस जीवनातील प्रत्येक क्षेत्र हे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुध्दीमत्तेने व्यापले जात आहे. तंत्रज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्तेने भ्रष्टाचारावर उपाय सापडेल का? या विषयावर काही जाणून घेण्यापुर्वी भ्रष्टाचार म्हणजे काय त्याची व्याप्ती काय तो कशासाठी होतो आणि त्याचे दुष्परिणाम काय ते प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे.त्यानंतर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुध्दीमत्ता नेमके काय आहे. त्याचा भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे पहाणे उचित होईल. भ्रष्टाचार हा अनादी कालापासून चालत आलेला आहे. भ्रष्टाचार हा जगातील सर्व काने-कोपरे व्यापून आहे. तो प्रगत- अप्रगत देश असा भेद करीत नाही. तो सर्व क्षेत्रामध्ये कमी- अधिक प्रमाणात आहे. भ्रष्टाचार हा आर्थिक, नैतिक आणि मानसिक अशा अनेक प्रकारचा असतो. भ्रष्टाचार हा सरकारी आणि बिनसरकारी असतो. भ्रष्टाचारात एक गट जो काही आर्थिक वा अन्य लाभ स्विकारतो असा वर्ग आणि जो तो देतो असा दुसरा अशा दोन्ही वर्गांचा समावेश असतो. यात देणा-या म्हणजे दुस-या वर्गाने लाभ दिला नाही तर भ्रष्टाचार होणार नाही असा सरळ अर्थ आहे. दुसरा वर्ग़ हा लोभापोटी, वेळ वाचविण्यासाठी तर काही वेळा पहिल्या वर्गाच्या दबावाला बळी पडून, लवकर लाभ/फायदा घेण्यासाठी / दंड/ शिक्षेपासून वाचण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करतो. ओळख दाखवून कामे करणे हा ही एक भ्रष्टाचार आहे.
समाजात सर्वसाधारणपणे जो भ्रष्टाचार करत नाही तो मागे रहातो. हाल अपेष्टा सहन करतो असे चित्र दिसते. समाजात भ्रष्टाचारी लोकांचे लवकर भले होते. त्यांची कामे होतात असा समज होऊ घातलेला आहे ते समाजाच्या दिर्घ हितासाठी घातक आहे. भ्रष्टाचारास बढावा देणे हे राष्ट्र, समाज हिताच्या आणि दिन-दुबळे ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही आणि ओळख नाही अशासाठी घातक आहे. भ्रष्टाचारामूळे असमान संधी आणि समाजात विषमता निर्माण होऊन योग्य हुषार आणि प्रविण व्यक्तींना संधी न मिळाल्यामूळे प्रामाणिकपणावरचा विश्वास उडतो, निराशा उद्भवते, त्याचे सामाजिक दुष्परिणाम मोठे होते. अशा विविध प्रकारच्या भ्रष्टाचारामूळे बहुसंख्य लोक त्रासलेले आणि ग्रासलेले आहेत. त्यांची आर्थिक लूट होत आहे. आता तर लाच देऊनही कामे होत नाहीत एवढा भ्रष्टाचार बोकाळला आहे. याने त्रस्त होऊन लाखो अशांत लोकांनी क्रांती करुन भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करून भारतीय समाजास त्वरीत दिलासा देणे आवश्यक झाले आहे, भारतीय समाजात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नवीन उपाययोजना होत आहेत. भ्रष्टाचार हा मनुष्य प्राणी लोभामुळे करतो. त्याचाच आधार घेऊन तंत्रज्ञानाने साकारलेल्या योग्य सुरक्षित कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधाराने मनुष्याने केलेल्या नानाविध भ्रष्टाचारास योग्य प्रकारे आळा घालता येऊ शकेल.
मानवाला जिथे विशेष बुद्धीची गरज पडते, तेच काम जर संगणक प्रणाली करू लागली तर त्याला 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (artificial intelligence, AI) असे म्हणता येईल. अनेक आर्थिक व्यवहारातून गडबड (fraud) शोधणे, त्याला उत्तम बुद्धिमत्ता लागते. हीच कामे आता अशा संगणक प्रणाली सहज करू लागल्या आहेत. संगणक प्रणाली मागे अनेक गणितीय संकल्पनांचा व तंत्रांचा, जसे की शक्याशक्यता, आकडेवारी, गणितीय ठोकताळे इत्यादीचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली तयार करण्यासाठी past data( मागील आकडेवारी/ घटनांची) नितांत आवश्यकता असते. संगणकात माहिती अंक स्वरुपात रूपांतरित केल्यावरच कृत्रिम आणि यांत्रिक बुद्धिमत्ता काम करू शकते. भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी एक नि:पक्ष यंत्रणा ज्याला चेहरा-मोहरा नाही. आलेल्या अर्जावर सेंकदाच्या भागाचा समावेश करून त्यानुसार प्राथम्यक्रम देऊन त्या अर्जाची छाननी करणार, अर्जाची छाननी माहितीजालात अन्यत्र उपलब्ध माहिती तपासून (उदा. आधार, पॅनची माहिती तपासून) त्याची नोंद घेऊन खोट्या किंवा बेनामी अर्जास आळा घालणार आणि सर्व माहितीची विनाविलंब तपासणी करून नि:पक्षपातीपणे निकाल देणार अशा व्यवस्था प्रणालीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्तेनेकमीतकमी मानवी हस्तक्षेप किंवा विनामानवी हस्तक्षेपद्वारे पारदर्शकता येऊन अत्यंत कमी वेळात अचुक आणि निरक्षेप निर्णय घेणे शक्य होते. करोडोची माहिती एका चिपमध्ये रहाते. तंत्रज्ञान आणि कृत्रीम बुध्दीमत्तेमध्ये“मानवी भावना” नसल्याने भ्रष्टाचारास वाव नसतो आणि योग्य कार्यक्रमामूळे कमी वेळेत बिनचूक निरपेक्ष काम होऊ शकते. या तंत्रज्ञानामूळे मोठ्या प्रमाणात एक सारख्या बहूउपयोगी दोष विरहित वस्तूंची निर्मिती होते.
या तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामूळे कीचकट गणिती सुत्र, आरोग्य, शेती, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठा आमुलाग्र बदल घडवू शकतात. जागतिकीकरण आणि परस्पर स्पर्धा आणि जगाबरोबर चालावयाचे असल्यास तंत्रज्ञान आता अपरिहार्यपणे स्विकारावेच लागणार आहे. तंत्रज्ञान हे शारीरिक कष्ट वाचतात आणि मानवी मर्यादा ओलांडून निर्णय घेऊ शकतात. अनेक मानवी जिवास असाध्य बाबी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज होतात. याचा फायदा हा मानवाची जिवनशैली सुसह्य करण्यासोबत गुन्हेगारांना वचक आणि भ्रष्टाचारास आळा घालणे शक्य होणार आहे. त्याचे उदाहरण आयकर फेसलेस प्रणाली जी भरलेले विवरणपत्र तपासून आदेश काढू शकते, आधार सीडींग येथे दिसून आलेली आहे. शैक्षणीक योजनांत आधार सिडींग केल्यामूळे बोगस मुलांचे नोंदणीकरण वाचून शासनाचे हजारो कोटी रुपये वाचलेले आहे. अनेक आर्थिक फसवणूक टाळणे शक्य झालेली आहे. थोडक्यात तंत्रज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्तेने भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणात निश्चित आळा घालू शकतो. नाहीतर हजारो कोटी रुपयांचे तंत्रज्ञान योग्य वापराविना पडून रहातील आणि भ्रष्टाचा-यांचे अधिक फावेल. एका कंपनीची, देशाची कुटूंबाची माहिती नको त्या हातात पडली तर किती अनर्थ होवू शकेल याची कल्पना करता येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान जसे सोईचे आहे तसे मोठे आणि गंभीर गैरव्यवहार होऊ शकतात याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
दुसरी महत्वाची आवश्यक बाब म्हणजे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापरासाठी अधिनियम आणि चांगल्या विचारांच्या तज्ञ व्यक्तीचा वरदहस्त ठेवणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर कुठे व्हावा आणि कुठे नाही याबद्दल अधिनियम तयार होत आहेत. कृत्रिंम बुध्दीमत्तेवर वाईट लोकांचा कब्जा झाला तर भ्रष्टाचार “बरा” अशी वेळ येऊ शकते याची जाणिव ठेवली पाहिजे. कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intellingence) म्हटले तर वरदान नाहीतर शाप ठरू शकेल याचे भान राखले गेले पाहिजे. भस्मासूर राक्षसाची गोष्ट आपल्याला माहितच आहे. त्याला दिलेल्या एका वरामूळे त्याच्या नियंत्रकास आणि जनतेस सैरावैरा पळावे लागले. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कृत्रीम बुध्दीमत्ता हे एक शक्तिशाली साधन असू शकते पण उपाय नाही पण ती एक दुधारी तलवार आहे. निसर्ग नियमानुसार अशांत लोक कृत्रीम बुध्दीमत्ता यंत्रणेस तोड म्हणून नाशक कृत्रीम बुध्दीमत्ता तयार करतील. यामूळे होणारा भ्रष्टाचार हा अत्यंत टोकाच्या हुशारीने केलेला असल्याने दोषी शोधता येणार नाही किंवा नियंत्रण विहीन कृत्रीम बुध्दीमत्ता ही स्वत:च कार्यक्रमात बदल करून समाज जीवन ताब्यात घेईल. हे पाहिले तर “अगोदरचेच चांगले होते” अशी परिस्थिती होऊ शकेल.
या परिस्थितीत, लाच देणा-याने कठोर होऊन लाच दिलीच नाही आणि तक्रार केली तर भ्रष्टाचार होणार नाही आणि त्यास आळा बसेल. तसेच मानवात निकोप जीवनशैली निर्माण होण्यासाठी कठोर प्रशासक, कठोर कायदे, त्वरीत शिक्षा आणि भ्रष्टाचार आणि अनुचित गोष्टीस विरोध करणा-या समाज निर्मितीची आवश्यकता आहे. मनुष्यातील सद्सद् विवेकबुध्दीला बळ देणे, प्राथमिक शिक्षणात भ्रष्टाचा-यांमुळे होणारे नुकसान, प्रामाणिकपणा, देशभक्ती, कर्तव्यास बांधिलकी, पारदर्शकतेचे महत्व आणि भ्रष्टाचा-याबद्दल चीड या बाबी शिकविणे आवश्यक राहील. पुर्वी चोर, दरोडेखोर हे प्रत्यक्ष दिसायचे त्यामुळे त्यांना शोधणे शक्य होते. आता मात्र हा शत्रू छुपा असून आपल्याच खिशात, बॅंकेत आणि घरगुती/खाजगी काही सिक्रेटस (ओ.टी.पी.,पासवर्ड) ज्याला हल्ली आपण डिजीटल अरेस्ट (ऑनलाइन फ्रॉड) अशा अनेक समस्यांनी ग्रासले जाणार आहोत. त्यामुळे जसे आधुनिक तंत्रज्ञान फयद्याचे असते तसेच काही तोटेही आपल्याला भोगावे लागतात. शेवटी तंत्रज्ञान वापरणारा हा महत्वाचा असतो. तो जर प्रामाणिक आणि संभाव्य धोके जाणून वागणारा असेल तर कुठेही धोका होणार नाही. असे नको व्हायला की ए.आय.च्या वापरावर बंदी घालायची पाळी यावी. मा.पंतप्राधानांनाही यात दखल घ्यावी लागली यावरुनच याचे गांभीर्य लक्षात यावयास हवे. सगळ्यांनीच जागरुक राहावयास हवे ते यासाठीच. तुम्हाला काय वाटते?

Comments
Post a Comment