लग्न संस्थेचे भवितव्य काय?

 🤔👫💕लग्नसंस्था म्हणजे लग्नासाठी इच्छूक स्त्री-पुरूष, दोन्ही बाजूंचे नातेवाईक / संस्था,   परस्पर सहमतीने  पती पत्नी म्हणून आयुष्यभरासाठी सुख-समाधानाने रहातात आणि पती आणि पत्नी हे दोन्ही कुटूंबातील सदस्यांसोबत  आयुष्याची वाटचाल स्नेहाने पुर्ण करतात. सुस्थीर समाज आणि नव्या पिढीच्या संवर्धनाची सुरवात करण्यासाठी लग्न संस्थेची आवश्यकता असते. लग्न संस्था ही केवळ उपवर आणि इच्छूक मुला-मुलीस एकत्र आणत नसून त्यांच्या दोन्ही कुटूंबाना एकत्र आणते.  लग्नसंस्थेने केलेला विवाह हा पती आणि पत्नीत पावित्र्य, विश्वास, प्रेम, आई-वडीलांचे संमती, भाऊ-बहीण, नातेवाईक यांच्या सहभागाने आणि सहकार्याने सुखकारक ठरतो. लग्न संस्थेचा उद्देश हा एक “स्त्री व पुरुष”हे एकमताने विधीवत लग्न करून भावी  पिढी तयार करण्यासाठीचा एक प्रकारचा परवाना देणे आणि दोन्ही घरची कुटूंबे त्यांच्या सुखदु:खात सहभागी होऊन लग्न संस्था यशस्वी करतात. विवाहाचे पुर्वी ढोबळ्मानाने असे प्रकार होते जे सर्वसंमत होते.

    1.गोत्र एक्सोगॅमी : स्वत:च्या गोत्राबाहेर विवाह करण्याची हिंदू प्रथा.

    2.प्रवरा एक्सोगामी : एकाच प्रवराचे लोक आपापसात लग्न करू शकत नाहीत.

    3.गाव एक्सोगामी : नागा, गारो आणि मुंडा इत्यादी अनेक भारतीय जमातींमध्ये आपल्या गावाबाहेर लग्न करण्याची प्रथा आहे.

    4.पिंडा एक्सोगामी : जे एकाच पिंडाचे किंवा सपिंडाचे (सामान्य पालकत्व) आहेत ते स्वत:मध्ये लग्न करू शकत नाहीत. (भावकित समजले जाते)

          या प्रकारच्या विवाहामुळे व्यक्तीला रक्ताच्या नात्यात लग्न करण्यास मनाई केली जाते जेणेकरून निरोगी आणि बुद्धिमान संतती पुढे चालू राहील

    5. सर्वसंमत( ॲरेंजड):- जे व्यवस्थित ओळखिने किंवा कुण्याच्या तरी शिफरशीवरुन ठरविले जाते.

    6. प्रेमविवाह:- एकमेकांनी स्वत:च्या आवडिनुसार आणि प्रेम आहे म्हणुन केलेला विवाह

        लग्न-संस्थेचे पारंपारिक सभासद कोणत्या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जायच्या,तर मुलाला चांगली नोकरी आहे की नाही, घरी कोण कोण आहे, तो निर्व्यसनी आहे का, घरचे कशा स्वभावाचे आहे व मुलीबद्दल इतर साध्या सोप्या गोष्टी. या गोष्टी पाहून झाल्यानंतर स्वभाव, समजूतदारपणा अशा विविध स्वभावगुणांची खातरजमा व्हायची. याच अपेक्षांवर खरी उतरलेली अनेक लग्ने आज टिकून राहीलेली दिसतात. अशी  लग्ने शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता अधिक असते कारण मुला मुलीच्या दोन्ही घरातील नातेवाईक एकमेकाशी संबधित असतात तसा काही प्रसंग संसारात आल्यास ते मुला-मुलीस काही गोष्टी सांगू शकतात. लग्न करण्यासाठी आणि पुढे टिकविण्याचे काम लग्न संस्था करते.  यात मुलीकडे लग्न, घरकामे, बाळंतपण, मुलांना शिकवणे, पुजा अर्चा करणे, मोठ्या माणसांचे ऐकणे, ऑफीस, स्वयंपाक करणे इ. कामे होती. या कामात काय करावे किंवा काय करू नये. रिती-रिवाज काय आहेत याची मोठ्या प्रमाणात मुलींना सोय व्हायची. एकाच समाजात असल्याने माहिती असायची किंवा तिला दोन्हीकडे नात्यात असल्याने त्यांच्याकडून मिळायची. मुलांना नौकरी- धंदा करणे, मुलांचा आणि मोठ्यांचा खर्च करणे  पुजा अर्चेची जबाबदारी घेणे, कुटूंबप्रमूख आणि मुख्य पालकत्वाची जबाबदारी घेणे अशी होती. अशी परिस्थिती जवळपास 15-50 वर्षापासून होती. या काळच्या पारंपारीक लग्न संस्थेत समाविष्ट असलेले वधू-वर, मुलाचे आणि मुलीचे आई-वडील, मुलाकडील आजी-आजोबा आणि जवळील नातेवाईकांचा संसार चालवयाच्या भूमिका चोख पार पाडायचे. एक महत्वाची बाब पारंपारिक लग्न संस्थेत होती ती म्हणजे स्त्रीयांना दुय्यम स्थान आणि आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव त्यामूळे ती दबून राहून स्वत:च्या  आशा आकांक्षांना तिलांजली देऊन ब-याच गोष्टी सहन करून संसार करीत होती.  “पती परमेश्वर” म्हणून संसार करणे पत्नीला मान्य होते. त्यामूळे प्रसंगी अत्याचार आणि अन्याय सहन केल्यामूळे लग्न मात्र  टिकून रहायचे तथापि लग्न संस्थेत यशस्वी लग्न म्हणून गणना व्हायची मात्र अडचणी दूर होत नव्हत्या.  

              नवीन लग्न-संस्थेतील तरुणाईतील मुले-मुली शिक्षित आहेत. मुले आणि मुली आधुनिक तंत्रज्ञानस्नेही असल्याने ते स्वत:च्या हक्काबाबत जागरूक आहेत. त्यांचा शिक्षण,कार्यालयीन कामकाज, समाजमाध्यमे यामूळे बाह्य जगाशी संपर्क येतो, आर्थिक स्वातंत्र्य, स्वतंत्र आवड-निवडी जोपासत आहेत. त्यांना कायद्याचेही पाठबळ आहे,वर-वधू निवडीबाबत स्वत:ची अशी मते आहेत. स्वत:स अनुरुप असणारा जोडीदार स्वत: निवडण्याकडे कल आहे. त्याच वेळी, पालकांकडे मुलास/मुलीस त्यांच्या शिक्षण, नौकरीस अनुरुप त्यांच्या समाजातील मर्यादित संख्येत किंवा अनुरूप असे स्थळे नसतात. अशावेळी एका चांगल्या विवाह संस्थेच्या माध्यमातून योग्य वधू-वरांचा शोध घेतला जातो. आता सदर वर-वधू एकमेकांशी संपर्क साधून,आवडी-निवडी जाणून एकमेकांना पसंद करतात किंवा स्वत:चा जोडीदार स्वत:च निवडतात आणि निवड चुकली आणि मतभेद झाले की सरळ वेगळे होतात. यामूळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यात “लिव्ह इन रिलेशनशिप” म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे प्रकार वाढलेले आहेत. मुले-मुली आज अभ्यास आणि करिअर मध्ये गुंतलेले आहेत. लग्न ही बाब आता दुय्यम होत आहे. थोड्या थोड्या  कारणाने लग्न मोडत आहेत.  आज मुलींना विनापाश मुलगा नवरा म्हणून पाहिजे असतो. वेगळा प्लॅट,वेगळा संसार करायचा असतो. मुला-मुलींना स्वत:चे विश्व असते. त्यातील जबाबदा-या स्पर्धात्मक युगात या मुलाच्या घरातील जबाबदा-यापेक्षा जास्त महत्वाच्या असतात. मुलाला देखील स्वतंत्र रहाणे आवडत असते. त्यांच्या संसारात आणि कामाच्या वेळेत इतरांची लुडबूड चालत नाहीत. त्यांना आपण आता मोठे झालेलो आहेत आमचे आम्ही “पाहून घेऊ”असा कल असतो. अशी आजुबाजूची परिस्थीती बघितली की पारंपारिक लग्नसंस्थेवरील विश्वास पुढे कायम राहील का? असा प्रश्न पडतो.

           प्रत्येक जाती-धर्मात, प्रदेशात लग्न संस्थेच्या  वेगवेगळ्या पद्धती असू शकतील पण लग्न करणे आणि टिकविणे हा लग्नसंस्थेचा प्रथम उद्देश असतो. लग्न पद्धतीत हल्ली बरेच फेरबदल होत आहेत. लग्नसंस्था आता मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. आताच्या लग्न संस्थेमधील मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढत चालले आहे. लहान वयात नवीन घरात तडजोडी शक्य होतात पण वय वाढले की, तडजोड (Adjust) करणे शक्य होत नाही. पुर्वी स्त्री जरी कमवती नसली किंवा असली तरीही आर्थिकदृष्ट्या पतींवर अवलंबून असायची. आता ती आर्थिक बाबींबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. आताच्या पिढ्या या विभक्त कुटूंब पध्दतील आहे. त्यांना कुटूंबातील मोठ्या व्यक्तींची आणि लहान मुलांची जबाबदारी नको असते. काही आजारपण यामूळे उतार वयात मुले आणि सुनांची गरज लागते पण तेथेही नवीन जोडप्यांना कामापासून फुरसत नसते तेही खरे असते त्यामूळे वाद तयार होतात. मुलांचे स्वत:चे विश्व असते, त्यांना मित्र आणि मैत्रीणी महत्वाच्या असतात. ऑफिसमध्ये पार्टीज होतात त्यात त्यांना सहभागी होणे आवडते मात्र या बाबी घरातील इतरांना खटकतात. त्यांचे म्हणणे असते की आम्ही अमूक देवळात जाऊ म्हटले तर वेळ नाही म्हणतात तर “पार्टीला बरा वेळ” मिळतो. याचे खापर सुनेवर फोडले जाते त्यामूळे कुटूंबात विसंवाद निर्माण होतो.  अभ्यास, करीअर यामूळे लग्न उशिरा होते.  मुलबाळ कधी? तसेच मुलांना सांभाळायचे कोणी आणि स्वयंपाक कोणी करायचा, बिले कोण भरायची हे ठरविताना संसारात मतभेद होत असतात. 

              जागतिकीकरणांमुळे सामाजिक बदलही होत गेले. आंतरजातीय,आंतर्देशिय आणि समलैंगिक विवाहसुद्धा कायद्याने मान्यता आहे. मुलीना कायद्याचे बळ मिळाले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जीवनशैली बदलली त्यामुळे नकळतच विवाह संस्थेचे मूळ अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वाढली. नवीन जोडप्यांना तडजोडीची आवश्यकताच भासत नाही. उच्च-शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, नौकरीचे उत्तरदायित्व  आणि अन्य जबाबदारीचे काहीसे भान नसणे किंवा अत्यंत टोकाची भुमिका घेण्याची वृत्ती वाढलीय. तसेच आधार देणारे किंवा कोणावरही अवलंबून न राहणे या वृत्तीमुळे हल्ली घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक पध्दतीने वाढत आहे. लग्न मोडण्यामागे ब-याच वेळा अपेक्षाभंग, जवळील माणसांकडून समुपदेशन होत नसणे, अनावश्यक हस्तक्षेप आणि संस्काराचा अभाव ही कारणे असू शकतात. लग्नसंस्थेचे स्वरुप कालानुरुप बदलणे अपरिहार्यच आहे मात्र  याचा अर्थ असा नाही होत नाही की, अनिर्बंध स्वातंत्र्य किंवा स्वैराचार/अनाचार निर्माण व्हावा. तेच टाळणे आणि त्यासाठी संयम सगळ्यांनी राखणे हे गरजेचे आहे.  स्त्री व पुरुषाचे नाते “ तुझे माझे जमेना,तुझ्यावाचून करमेना “ असे असते. “विवाह” हा 16 संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार मानला जातो. कुटुंबव्यवस्था टिकावी,समाजात स्थैर्य असावे आणि पर्यायाने देशाचेही भले व्हावे या सामायिक हेतूने लग्न-संस्काराचा अंतर्भाव करण्यांत आला असावा. 

             आता दुस-या टप्प्यात जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या विकास, सामाजिक बदल, शिक्षण, करीअर, कायद्याच्या पाठबळ आणि आर्थिक स्वातंत्र्यामूळे आलेली मुला-मुलींमध्ये 

 जागरुकता आलेली आहे. मुलींना संसारात समान भागिदारी हवी आहे. मुले-मुलींना पारंपारिक गोष्टीपासून स्वातंत्र्य हवे आहे. यामूळे लग्न-संस्थेचा पारंपारिक ढाचा ढासळत आहे. या ढाच्यात काही नवीन बाबी जसे की, निवडीचे स्वातंत्र्य, स्वतंत्र संसार, मुलांना जन्मास घालण्याचा हक्क, करीअर, शिक्षणास प्राधान्य देणे आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगणे या सर्वच बाबी आताच्या काळाचा विचार करता एकदम अयोग्य आहेत असे नाही. कुटूंबात स्वयंपाक करणे ही आता दोघांची जबाबदारी आहे.  वाद-विवाद नको म्हणून पालकांमध्ये स्वत:ची संपत्ती जपून मुला-मुलींचा लग्नानंतर वेगळा संसार करून देण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. “तडजोड” हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे स्विकारुन जे पुढे जात राहतात त्यांना अडचण सहसा येत नाही. नवीन मुले-मुली नव्याने काही गोष्टी सिद्ध करुन दाखवित आहेत. मुलांच्या पालकत्वाची ओढ, दोन्ही बाजूच्या आई-वडिलांचे सकारात्मकपणा आणि सामाजिक जाणीव ठेवणे, समुपदेशन करणे हेही बळकट लग्नसंस्थेसाठी आवश्यक आहे असे वाटते.               

              आताच्या काळात मुले आणि मुली जोडीदारांच्या निवडीसाठी अधिक पात्र असतात त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य असते हे मान्य केले पाहिजे. आता वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे जर टोकाचे मतभेद असतील तर एकत्र राहूनही उपयोग नसतो आणि त्यापुढे जाऊन नवीन जोडीदाराचा शोध घेऊन पुर्नविवाह करणे. आता ही बाबही हळूहळू सामान्य होत असून त्यास समाज स्विकारत आहे. सामाजिक बदल, कायदे, तंत्रज्ञानाची प्रगती त्यामूळे लग्न-संस्था मोडून पडू नये म्हणून यातील बदल स्विकारून त्यांचा समावेश लग्न-संस्थेत करणे हे सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीकोनातून आवश्यक झालेले आहे. नवीन लग्न-संस्थेतील चूकीच्या समजूती असतील तर त्या काळाच्या ओघात गळून पडतील आणि स्थित्यंतरातून नविन बाबीने युक्त अशी कालानुरुप नवीन लग्नसंस्था तयार होऊन सामाजिक स्वास्थ्य,स्थैर्य आणि शांती  कुटूंबात नांदेल असा माझा विश्वास आहे. बाय द वे, लग्न हा जरी जुगार समजला जातो ( काही प्रमाणात सत्य आहे) तरी, सध्या स्त्रियांना जिंकण्याची संधी जास्त आहे. तेव्हा याचा विचार जरूर करून विवाह उत्सूक असावे  ही अपेक्षा. 

                   


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव