आध्यात्मिक वारी - भाग-3

            लागोपाठ 3 वर्षे माझी आध्यात्मिक वारी झालेली बघून माझेच मला आश्चर्य वाटले. सन 2023 मध्ये गिरनार, सोमनाथ, द्वारका, 2024 मध्ये शेगांव, माहुर, शिर्डी,  शिंगणापुर आणि आता जानेवारी-25 मध्ये अक्कलकोट, गाणगापुर, तुळजापुर आणि पंढरपूर अशी वर्षाच्या सुरवातीलाच झाल्यामूळे खूप छान वाटले. आधीच्या वारीबद्दल त्या त्यावेळी लिहीलेच आहे. त्यामुळे पुन्हा लिहीत नाही.

            कुर्ला येथील स्वामी समर्थ मठामार्फत 3 दिवसीय ही अध्यात्मिक यात्रा 5 जानेवारीला रात्री बसने सुरु झाली. माझा हा पहिलाच एकटीने आणि बसने प्रवास होता. त्यामुळे थोडी धाकधुक होती. सकाळी अक्कलकोटला पोहोचलो. तिथे भक्त-निवासमध्ये सकाळची सर्व कामे आटपून मठात गेलो. त्यानंतर 10 वाजता गाणगापुरसाठी ट्रॅक्स करुन 12 वाजता पोहोचलो. तिथे रांग खुप मोठी होती,काहीजणांनी पैसे देऊन दर्शन घेणयाचा प्रस्ताव मान्य केला. आम्ही दोघेजण मात्र एवढ्या लांब आलोच आहोत तर रांगेतूनच दर्शन घ्यावे या हेतुने रांगेत उभा राहिलो. तोपर्यंत बाकिचे सगळे जेवायला निघुन गेले होते.  आमचा नंबर लागेपर्यंत 2.20 झाले होते. (सुमारे 2 तास ). तोपर्यंत जेवणही ( प्रसादाचे) संपले असे सांगण्यात आले. आम्ही निघतच होतो तेवढ्यात एकजण येऊन म्हणाला, देवाचे नैवेद्याचे ताट आहे चालेल का? आम्हा दोघींनाही आश्चर्यच वाटले. असो देवाची इच्छा म्हणुन आम्ही दोघी एकाच ताटात जेवलो आणि थोडा प्रसाद शिल्लक ठेवला असेच कोणतरी येईल म्हणून!

            दुपारी 3.00 वाजता गाणगापुर येथील भीमा-अमरजा संगमावर जाण्यासाठी रिक्क्षा सांगितलेली होतीच. त्यात बसुन आम्ही सगळेजण संगमावर गेलो. वास्तविक 4.00 वाजता उन्हात तिथे कुठे दिवे सोडणार? असा प्रश्न पडला होता. तिकडे गेल्यावर मात्र एवढे छान प्रवाह आणि वातावरण बघुन आपोआपच दिवे घेऊन हळूच पाण्यात सोडले. तिथले मंदिर, सभोवतालचे विस्तिर्ण वृक्ष बघुन मन प्रसन्न झाले. परत आल्यावर संध्याकाळची गाणगापुर मठातली आरती 8.00 वाजता जाऊन आल्यावर 9.00 वाजता जेऊन सगळे लवकरच झोपलो. सकाळी उठून तुळजापुर, पंढरपुर आणि परत असा प्रवास होता.

            तिस-या दिवशी सकाळी 10.30 वाजता निघून 12 वाजता तुळजाभवानीच्या दर्शनाला रांग सगळ्यांनीच लावली होती. साधारण 12.30 ला लावलेली रांग बरोब्बर 3.00 वाजता आम्ही बाहेर आलो. थोडीफार खरेदी करून जेवायला 4.00 वाजता हॉटेलमध्ये पोहोचलो. येताना थोडीफार खरेदी आणि नंतर पंढरपुरला 5.00 वाजता निघालो. 6.60 ला पंढरपूरला पोहोचलो तर पार्किंगच्या समस्येमूळे शेवटी “प्रती शेगांव” येथे उतरलो. महाराजांचे दर्शन, जेवण सगळे हौऊन आम्ही पंढरपुरच्या विठ्ठलाच्या मंदिरात 9.30 वाजता रिक्षाने पोहोचलो. पुन्हा ही मोठी रांग आणि कुणीतरी 10.00 वाजता मंदिर बंद होते म्हणून सांगितले होते. तसेच आशेवर (त्याआधी नंबर लागू दे) उभे होतो. बरोबर 10.15 वाजता नंबर लागला आणि 10.30 वाजता मंदिर बंद झाले. ही एक पांडुरंगाची कृपाच म्हणावी लागेल. रात्री 11.30 वाजता मुंबईला यायला आम्ही निघालो. सकाळी 8.00 वाजता घरी पोहोचलो. अशा रितीने महाराष्ट्रातले 3 आणि कर्नाटकातील 1 असे 4 धामाची अध्यात्मिक यात्रा सफल-संपूर्ण झाली. अक्कलकोट स्वामी मठ, दादर येथील होलमध्ये 1992 ला आमचे लग्न झाले होते. तेव्हा आणि एवढ्या वर्षानी लहानपणापासूनची ( अक्कलकोट आणि तिन्ही “पुर”येथे जाण्याची) इच्छा पुर्ण झाली. देवीची साडे-तीन शक्तीपीठ पुर्ण झाले. एक टिपण आणि ग्रुपबरोबरसुद्धा यात्रेला बसने जाऊ शकते हा आत्मविश्वास मिळाला. अशा यात्रेच्या ठिकाणी काही गोष्टींचा मात्र विचार जरूर सगळ्यांनी करावा असे वाटते. त्या खाली देत आहे.

1)      रांगेची शिस्त तर असावीच पण गरोदर स्त्रिया, म्हातारे/वृद्ध, लहान मुलांसाठी एक वेगळी सोय असावी. निदान त्यांच्या अडचणी तरी समजून घ्याव्यात.

2)      गर्दीवर सगळीकडेच नियंत्रण ठेवावयास हवे. देवळाच्या बाजुला वैद्यकिय सेवा तत्पर ठेवावी.

3)      रांगेत काही आणीबाणी उद्भवल्यास किमान पाणी,बिस्किटे किंवा काहीतरी खाणे-पिण्याची सोय करावी. बाहेर पडण्यास (आणिबाणीचा) मार्ग हवा. जबाबदार जागोजागी स्वयंसेवक नेमावेत. (शेगांवसारखे )

4)      पंढरपुरला याबाबतचा किस्सा वाखाणण्यासारखा आहे. तरंगते हॉटेल्स, मोबाईल दवाखाने किंवा फिरण्याच्या सोयी माहित होत्या. इथे चक्क चहा, खाणे-पिणे गॅलरीतून (विकत सेवा, रॉडच्या सहाय्याने) स्कायवॉकच्या रांगेतल्या लोकांसाठी उपलब्ध होती. या मार्केटिंगचे कौतुक वाटले. इथेही काही आणीबाणी झाल्यास कसे खाली उतरविणार? हा प्रश्न माझ्या डोक्यात आलाच, मध्येच कुठेतरी तशी सोय हवी. खालची गर्दी कमी झाली पण वरची (तरंगती) वाढली त्याचे काय?

5)      लांबून केवळ देवाच्या दर्शनाला येणा-या भाविकांना हाताला, कमरेला धरुन बाहेर काढणारे बघून वाईट वाटले. आतमध्ये (गाभा-यात) नाही सोडले तरी चालेल पण असे अंगाला हात लावणे योग्य आहे ?  सुरक्षा कर्मचारी एवढे निर्दयी असावेत? (पंढरपुरचा अनुभव)

6)      शेवटी गोव्याला जे आता भोगावे लागते तशी अवस्था या किंवा इतर तीर्थक्षेत्रांची होऊ नये हिच परमेश्वरचरणी प्रार्थना. देवाला भेटायला “पुन्हा यावे” असेही वाटावयास हवे.

7)      भाविकांनीही काही दक्षता घ्यावयास हव्यात. ठराविक दिवशी गर्दी असते/होणार माहित असते तर तशी खबरदारी घेणे दोघांनाही बरे. (मंदिर प्रशासन आणि सरकार)

8)     सरकार, स्थानिक पुढारी, समाजसेवक यांनीही प्रत्यक्ष सहभाग दर्शवुन तसे सहकार्य करावे.

9)      शक्यतो गर्दीत भर घालू नये. देव कधीच असे म्हणणार नाही,”त्रास”करुन मला भेटायला या.”

           मंदिर-प्रशासन,सरकार आणि भाविक यांची समिती नेमून, वेळोवेळी सोयी-सुविधांचा आढावा घेऊन, भाविकांचे हीत समजून घेऊन तशा सुधारणा करण्यांत यावे ही अपेक्षा.

          बाय द वे, जशी ही आधात्मिक वारी-3 झाली,  तशीच अमेरिकेची 3 री (भौतिक) वारीही आता सुरु होतेय. हाही एक योगायोग आणि शिवाय एकटीने “परदेश प्रवास” असा दुहेरी संयोग आहे, त्यामुळे पुढील सर्व लेख अमेरिकेतुन लिहणार आहे.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव