तिसरी अमेरिकन वारी -पर्व-1 (11/2/2025 ते 10/03/2025)
(येलो ॲड सोलो वारी) (YOLO & SOLO TRIP)
कंसातले नामकरण मोठ्या मुलीने या वारीचे वर्णन केले तेव्हा आधी कळलेच नाही. त्याचे उत्तर तिने असे दिले, “यु लव्ह युवर लाईफ आणि सिन्गल/सेल्फ ट्रिप.”(जे एका मोटार कंपनीचे लोगो होता.)याला आता काय म्हणावे हे मला सुचले नाही. ही वारी तशी योगायोगानेच आणि सर्वार्थाने वेगळी अशीच होती. एकतर दोन्ही वेळा पतीदेव बरोबर होते आणि काहीतरी कारण होते यावेळी मात्र मी एकटीच यांच्याशिवाय दोन महिने राहणार होते. याआधी कधी 2 दिवसपण भारतात एकट्याने प्रवास केला नव्हता आणि राहिलेदेखिल नव्हते. दुसरे म्हणजे कार्यालयीन जबाबदारीतुन मुक्त झाले असल्यामुळे कार्यालयाची परवानगी आणि रजा मंजुरी हे प्रकार नव्हते.
थोडी चिंता, भिती आणि उत्सुकता या तिन्ही मिश्रीत भावनेने मी 11.2.25 रोजी प्रवासास सुरुवात केली. “प्रथम ग्रासे मक्षिका पात:” या उक्तीनुसार विमान चक्क 5 तास उशीरा सुटले. त्यादरम्यान ब-याच गंमती-जमती झाल्या त्या सांगत नाही, आधीच लेख खुप मोठा झालाय. सलग 2023, 2024 आणि 2025 अशी ही तिसरी वारी. एक वेगळे राज्य बघायला मिळणार, मोठ्या लेकीचा सुरु झालेला संसार बघायचीही उत्सुकता होतीच कारण लग्नाला जाता आले नव्हते. तसेच शेंडेफळाचा प्रकट-दिन ही या महिन्यात असतो तोही साजरा करायचा होताच.(गद्धेपंचविशी साजरी दोघांचीही करता आली नव्हती. ) शिवाय “एकटिने प्रवास तु करच” हे दोन्ही मुलींचे आणि नवरोजीचे आवाहन पेलायचे होतेच. सेवानिवृत्तीनंतरचा हा पहिलाच एकटेपणा जरा स्वत:कडे बघायलाही वेळ मिळणार होता. मुलिची नविन नोकरी, त्यांची आमंत्रणे आणि सुयोग्य हवामान हे मुद्देही प्रवास करताना विचारात घ्यावेच लागतात.
मोठ्या मुलिकडे 11/4( 5 आठवडे आणि धाकटीकडे 3 आठवडे) असा कार्यक्रम आखलेला होता. त्यानुसार 2 आठवडे आधी कॅलिफोर्निया(नेवार्क) 24 तारखेपर्यंत नेवार्कला होते. त्यात नेमका “गजानन महाराज प्रकट दिन”महोत्सव आणि त्यानिमित्त होणारे लेकिचे ढोल-वादन पहावयास मिळाले. तसेच एक सांग़ितिक कार्यक्रम आणि वाद्यसंगीताची मैफलीचा अस्वाद घेता आला. मराठी गाणी, गायला अवघड असणारी गाणी ज्या सहजतेने त्यांनी वाद्यावर वाजवुन दाखविले त्यांचे खरेच कौतुक वाटले. शिवाय एका पुरुषाने अंगाई गीत गाऊन सुखद धक्काच दिला. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन, मराठी भाषा दिनाचे औचित्य आणि संगीतावरिल प्रेम असा त्रिवेणी योग जमुन मला मात्र मेजवानीच मिळाली तिही परदेशात. इथे एक सांगावेसे वाटते, वडिल गेल्यापासुन शास्त्रिय संगीत मैफल( 2014 पासुन )कोणतीच ऐकली नव्हती. यावेळी मात्र लेकिने मुद्दाम आधीच विचारुन तिकिट काढुन ठेवले होते. प्रकर्षाने त्यांची आठवण आली आणि मुलिंनेही माझी आवड लक्षात ठेवण्याचे कौतुक वाटले. तसेच मध्ये-मध्ये समुद्रकिनारे, तलाव, मंदिराच्या नैमत्तिक भेटी याही चालुच होत्या. 16 तारखेला संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती देवळात गेले असताना तेथे कुंभ-मेळ्याच्या पाण्याने गणपतीला अभिषेक करुन आम्हाला ते पाणी तिर्थ म्हणुन प्यावयास मिळाले. ज्या कुंभंमेळ्याला आम्हाला या वारिमुळे जाता आले नाही त्या योगायोगाचे आश्चर्य वाटले. पुन्हा 25 तारखेला एकटिने दुसरा 3 तासाचा विमान प्रवास (एस.एफ़. ते ओष्टिन) करुन धाकट्या मुलिकडे गेले. दुस-या दिवशी मोठी मुलगीसुद्धा सकाळी आली ते आम्हा दोघांना घेऊन फिरण्याचे कार्यक्रम ठरवुनच. इथे आणखिन एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रवासात एका प्रसिद्ध उद्योगाला आतुन भेट देता आली. ओस्टिन (टेक्सास) येथील “टेस्ला”कंपनी जिथे मुलगी काम करते ती कंपनी आतुन आम्हाला बघायला मिळाली. तसे कामानिमित्त अनेक कंपन्या/उद्योग मुंबईत आणि दुस-या राज्यातलेसुद्धा बघण्याचा योग आला होता. हा उद्योग परदेशी माणसांचा आणि मुली काम करतात म्हणुन जास्त कौतुकाने बघितली जाते. तशीच पहिलयांदा“ॲपल”कंपनीचे आवार बघितल्यावर ही भावना होती. परिसर,स्वच्छता आणि त्यांची प्रोसेसींगची माहीती देण्याची पद्धत खरेच वाखाणणीय असते ज्यामुळे सगळी माहिती आमच्या सारख्यांनासुद्धा कळते. पुर्णपणे अद्ययावत व स्वयंचलित, रोबोटिक्सद्वारे संचालीत अशी हि बहुराष्ट्रिय विद्युत कार बनवणारी कंपनी जगात नामांकित समजली जाते.
दुस-या दिवशी टेक्सासराज्याची राजधानी ओस्टीन असल्यामुळे तेथील मंत्रालय, विधानसभा आणि सुप्रिम कोर्ट बघायला मिळाले. (जे इथे नवरोजी स्वत: काम करित असुनहि कधी बघायला मिळाले नाही, कदाचित इथे तसे दाखवता येत नसावे ). तसेच नंतर 2 दिवस हयुस्टन येथिल “नासा” स्पेससेंटरची अर्धा दिवसीय भेट खुप महत्वाची होती. ज्यामध्ये अनेकांची अंतराळात उडण्याची स्वप्ने साकार होतात. (कल्पना चावला ,सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर) ट्रेनिंग सेंटरची गाईड टुर आणि वेगवेगळे शोज तसेच ॲक्टिव्हिटीज ब-याच होत्या. कागदाचे रोकेट बनविणे,प्लॅस्टिक मटेरियलपासुन स्पेस शटल बनविणे, थ्रीडी शोज असे अनेक विवीध माहितीपुर्ण आयोजन होते. त्यानंतर प्राणीसंग्रहालय, सिटी पार्क आणि कोलॅरेडो नदितुन बोटितुन सैर करित (सॅनॲटोनिया) शहराचा रम्य परिसर न्याहाळणे असे अनेक कार्यक्रम होते. शिवरात्रीनिमित्त उत्सवासाठी देवळात जाता आले. मोठ्या मुलीला रजा नसल्यामुळे तेवढ्या सहा दिवसात जेवढे होईल तेव्हढेच बघणे झाले. येथे अजुन एक नैसर्गिक आश्चर्य बघायला मिळाले ते म्हणजे “हिडन वंडर्स”अर्थात जमिनिखाली असणा-या “लोंबत्या (झुंबर) गुहा”ज्या 2000 वर्षांपासुन अस्तित्वात होत्या पण यांना त्या 50 वर्षांपुर्वी आढळल्या आणि त्यांनी त्यांचे अगदी योग्य संवर्धन करुन लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध केल्या. चुनखडीमध्ये अल्कली पाणी मिसळल्यामुळे जे द्रावण तयार होते ते हळुहळु खाली गळुन त्याचे विविध आकार तयार होतात हे ह्या गुहेमध्ये बघायला मिळते. गुहेत वायु-विजन, सरकता जिना, गाइड आणि प्रकाश-योजना आणि थंडी( वातावरण) नियंत्रित करणे हे सगळे आलेच. याचे वर्णन करताच येत नाही त्या प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणार नाही. आतापर्यंतच्या गुहा जमिन पातळीवर किंवा वर बघितल्या होत्या पण या गुहा 20 फुट खाली आणि एकमेकांना आतुन जोडलेल्या अशा होत्या. “डिस्कवरी आणि साहसी टुर” असे वर्णन याचे करता येईल. काहिजणांना त्रास झाला, मला अजिबात झाला नाही हे विशेष.
मुलीला 3 दिवस सुट्टी व 4 दिवस (12 तास काम) यामुळे केवळ या 3 दिवसातच हे फिरणे,बघणे व्हायचे. मोठी मुलगी नंतर परत गेली, मध्ये थोडा आराम होता. नंतर परत फ्लोरिडासाठी 2 तासाचा विमान प्रवास (ओष्टिन ते ओर्लॅडो) असा धाकट्या लेकिबरोबर केला. तिथे समुद्र-किनारे-सुर्योदय आणि सुर्यास्त व समुद्रातुन बोटिने बेटाची सैर केली. तसेही फ्लोरिडा अती-श्रीमंत व्यक्तींचे निवासस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे. हया बेटावर राहणारे व्यक्ती स्वत:च्या बोटिनेच प्रवास करतात. अभिनेते, बोक्सर, फुटबालपटु, प्रसिद्ध गायक-गायिका अशा अनेक अती-श्रीमंत व्यक्ती (ज्यांना हे सगळे परवडेल अशाच व्यक्ती तिथे राहतात). त्यांची घरेपण किती आलीशान असतात ना. इथे समुद्र-किनारे फार आवडतात लोकांना त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या सोयीही दिलेल्या असतात. आरामात खुर्चीत बसणे, झोपणे,लोळणे, ऊन खाणे( टॅनिंग़) खेळ खेळणे हे सगळे अगदी उत्साहात त्यांचे चालु असते. भर दुपारीसुद्धा तेवढीच गर्दी असते विशेष म्हणजे ऊन तेवढे जाणवत नाही. आम्ही गेलो तो सिझन (गुलाबी थंडी) छान होता,वारेही खुप होते. नंतर त्यांचा उन्हाळा (भयानक गर्मी ) सुरु होतो म्हणे.
फ्लोरिडामध्ये “सुसर( एलिगटर) फार्मिंग” हा एक विलक्षण थरारक कार्यक्रम होता. येथे सुसरी खुप असतात हे ऐकुन माहित होते. त्याचे संवर्धन करुन लोकांना दाखविणे, त्यांचे खाणे, त्यांच्या पिल्लांना अंगा-खांद्यावर घेऊन खेळवणे आणि त्यासाठी मुद्दाम एका एअर-बोटने सफारी आयोजित करणे तसेच त्याची माहिती व निसर्ग-चक्रातली आवश्यकता अशा अनेक नवीन गोष्टींमुळे त्या सुसरीं खरोख्ररिच प्रेक्षणीय वाटल्या. जगात फक्त अमेरिका आणि चीन या दोन देशातच आढळानारा हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या मुळे त्याचे संवर्धन कसे करावे हा एक रोमांचक अनुभव घेता आला. आधी मी नकोच म्हटले होते पण ऐकेल तर ती मुलगी कसली? एवढी म्हणतेय तर बघु म्हणुन मी पण नाईलाजाने तयार झाली पण बरे झाले एक नवीन काहीतरी आणि त्यांचे प्राण्याबद्दलची जागरुकता अनुभवता आली. येताना मेट्रो ट्रेनने 3 तास प्रवास करुन विमानाने घरी परतलो.
नंतरचे 8 दिवस घरी, बाजार, मंदिर आणि भटकणे (स्थानिक) चालुच होते. मुलिच्या बिझी शेडयुलमधुन वेळ काढुन तिने सगळे दाखविले. हो,वाढदिवस आम्ही हयुष्टनला बाहेरच तिच्या आवडीचे खाणे खाऊन प्रवासात साजरा केला. तसेही तुम्ही दोघी आलात हेच मोठे “वाढदिवसाची गिफ्ट” आहे असे म्हणुन झाले. मुली लगेच जबाबदारीने वागायला लागतात त्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. एकुण 22 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. नवीन जागा,गाडीत समोर बसुन प्रवास(बाकिच्या वेळी मोठी मुलगी नाहितर नवरा असतात),मुलिची नविन नोकरी, खाणे/डबा बनविणे अशा अनेक गोष्टी सहज मॅनेज करतात ते बघुन कधी आश्चर्य तर कधी कौतुक वाटते. नंतरचे 22 दिवस राहण्यासाठी मोठ्या मुलिकडे परत आले. उर्वरित वारिचा वृतांत आपण दुस-या पर्वात बघु.
ता.क. यावेळी एडिटर महाशय आणि लॅपटोप सोबत नसल्यामुळे अमेरिकेहुन आलयावर 2 महिन्याने उशीरा हा लेख.
Comments
Post a Comment