तिसरी अमेरिकन वारि-पर्व-2-(11-3-25 ते 10-4-25)
धाकट्या लेकिने (भाड्याची गाडी घेऊन) फ्लोरिडा आणि मोठ्या लेकिने ऑस्टीन्मध्ये स्वत: गाडी चालवुन सगळीकडे फिरविले. त्यांची गाडीची स्पीड आणि गाणी लावणे, गप्पा मारणे, जोक्स सांगणे, मध्येच मला एखादी माहीती सांगणे चालुच असायचे. या प्रवासात अनेक नवीन गाणी (मराठी/हिंदी) ऐकायला मिळाली. त्यांची गाण्याची निवड चांगली आहे असे दिसुन आले. हो, धाकटिने गिटार घेऊन माझी वादन-परंपरा/आवड चालू ठेवलेली बघुन बरे वाटले.( वाजविण्यासाठी वेळ कधी काढणार माहित नाही.)टेक्सासला मराठी माणुस शोधुनही सापडणार नाही. तिच्या राहणयाच्या संकुलात आणि कंपनीतसुद्धा कोणीच नाहीत म्हणे. घरासमोरच पोहण्याचा तलाव असल्यामुळे सगळे मुले-मुली, सहकुटुंब, सह-परिवार ऊन पडले की त्याचा आस्वाद घ्यायला बहुधा सुट्टी असली कि यायचे पण एकही त्यात भारतीय दिसला नाही. इथे फार कमी आणि ठराविक भागातच उत्तर-भारतीय आणि दक्षिण-भारतीय राहतात असे कळले. जास्त मेक्सिकन, अमेरिकन आणि आफ्रिकन लोक आहेत. खरे पाहता मेक्सिको पुर्वी अमेरिकेतच होते,कालांतराने वेगळे झाले. त्यांचा ठसा, इमारतींवर, खाण्या-पिण्यावर आणि भाषेंवर अजुनही दिसतो. त्यांची संस्कृती, पेहराव आणि बोलणे वेगळे लक्षात येते. 😂
मोठ्या लेकीकडे 18-3-25 ला परत मी विमानाने एकटी प्रवास (3 तास) करुन आले. न्यायला मुलगी आली होती. इकडचे रुटिन पुन्हा सुरु झाले. तसे जावईबापु घरी असल्यामुळे चहा-नास्ता, जेवण सोबत व्हायचे. इतर वेळी मात्र माझे वाचन, लिखाण, टि.व्ही, सकाळी मुलीला ऑफिसच्या बसपर्यंत पोचविणे व तिथुन चालत परत येणे असे चालू होते. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे, समुद्रकिनारे, बाग, झकुझी आणि बाजारात जाणे असे चालुच होते. कधी पाऊस तर कधी कडक उन तर कधी थंडी अशा वातावरणात स्वत:ला ॲडजस्ट करुन नोकरी, घर सांभाळणे, स्वच्छता, आईला फिरायला नेणे, एकटे वाटु नये म्हणुन मुद्दाम टि.व्ही. घेतला. फोनवर, घरुन काम करणे, बाजारहाट, स्वयंपाक( मोठ्या प्रमाणात-परत परत वेळ जायला नको) आता तर त्यात जावई-कम-मुलाचीही भर पडलेली आहे. त्याची मुलीला साथ देण्याची धडपड, गाडीने नेणे-आणणे/पोहोचविणे, वेळ असल्यावर घरातील अनेक छोटी-मोठी कामे स्वत:हुन करणे अशा अनेक गोष्टी बघुन मन भरुन आले. खरे तर संघर्ष हा प्रत्येकालाच प्रत्येक टप्प्यांवर करावा लागतोच पण परदेशात हा जास्त जाणवतो. त्यालाही पुरुन उरलेला वेळ मित्र-मैत्रिणी,नातेवाइकांसोबतचे संबंध टिकविणे, एकमेकांना वेळ देणे. कधीही मी दमले/दमलो असे न म्हणता तेवढ्याच उत्साहाने कार्यालयातुन आल्यावर “आज कसा गेला दिवस?” हे विचारणे बघुन मला आश्चर्य कम कौतुक वाटायचे.
मोठ्या मुलिकडे ब-याच वेळा पाऊस असायचा त्यामुळे
जास्त बाहेर फिरता आले नाही. माझेही ब-यापैकी वाचन (कादंबरी, दिवाळी-अंक आणि एक कथा-संग्रह)
झाले. योगा (सकाळ-संध्याकाळ), उन्हात फिरणे आणि मनोरंजन असे एकुण माहेरपण जोरात चालु
होते. मध्येमध्ये स्वयंपाक आणि दोघांबरोबर झकुजी, फिरायला जाणे हे चालुच होते. गुढी-पाडव्याला गुढी उभारुन,मुलिने साडी नेसुन शास्त्रोक्त पद्धतीने
साजरा करुन देवळात जाऊन आलो. संध्याकाळी घरी नातेवाईकपण जेवायला आले होते. नवीन घराचे
(पुतण्याच्या) उद्घाटनही त्यानिमीत्त्याने झाले. लेकीने नवीन वर्षात “ श्रीभगवदगीता “वाचण्याचा नियम केला
बघुन बरे वाटले तेही मराठीतुन. दुपारी जेवताना आणि सकाळी चहा घेताना जावयाबरोबर गप्पा
व्हायच्या त्या बघुन लेकिने चिडवून झाले. आता थोड्याच दिवसात एक कार्यक्रम टि.व्हि.वर
येईल,”चहा विथ चिन्मय” ( “कॉफी विथ करण”च्या धर्तीवर). तसेही “जावयाचे जास्त लाड करते”
अशी लाडिक तक्रार तिच्या सासुकडे करुन झाली. मी तिला म्हटले,”तुझेही लाड सासरी झालेच
कि! (ऑक्टोबरमध्ये पुण्याला गेली होतीस तेव्हा ). तरी 10 आणि 35 दिवस यामध्ये फरक आहे
ना! असेही नव-याला चिडवुन झाले.
सॅनफ्रॅन्सिस्को
इथे ट्रामने प्रवास करुन रोलर-कोष्टरचा मस्त अनुभव घेतला. तसेच शेतकरी आपापले वस्तु
कसे विकतात त्याचे प्रात्यक्षिकही बघायला मिळाले. तिथे “ चायना मार्केट” बघायला मिळाले.
आपल्या क्रोफर्ड मार्केटसारखे मात्र दुकानात बार्गेन नाही करता येत हे विशेष. तसेच
एक भली “मोठी कढई”घेतली. टुलिप फुलांचे प्रदर्षन होते पण त्यासाठी भरपुर रांग होती.
वेळ होणार म्हणुन गेलो नाही. वातावरणातील बदलामुळे इथे 2 दा घड्याळाची वेळ बदलावी लागते
हे विशेष. एक तास पुढे किंवा मागे, प्रत्येक राज्यात घड्याळ/वेळ वेगळी असते. आपल्याकडे
मात्र असे काही नाही ते बरे आहे. अशा लहरी निसर्गाच्या अनुकूल राहणे, तसे बदल करणे,
नातेवाईक, मित्र-मंडळींचा सहवास, आईला सोबत नेणे, नोकरी (घरुन किंवा प्रत्यक्ष जाऊन)
सांभाळुन अनेक गोष्टींचा समतोल सांभाळत नेहमी ॲक्टिव्ह कसे राहु शकतात? हे एक आश्चर्यच
आहे. रात्री जेवण झाल्यावर विरंगुळा म्हणुन बुद्धिबळ,पत्ते व संगणकावर खेळ खेळणे हे
सक्तीचे असल्यामुळे झोप छान व लवकर लागायची.
आता थोडे माझे वैयक्तिक निरिक्षण,यावेळी एकटी असल्यामुळे
निवांतपणा खुप मिळाला. नवीन प्रकार- वेल्वेट टाको, भोभा,टाकोबेल,फ्रेन्च फ्राइज आणि
इतर अनेक पदार्थ चाखुन बघितले. सेवानिवृत्तीनंतर काय करायचे? हा एक मोठा न सुटणारा
गुंता सोडवायचा प्रयत्न चालु आहे. वेळ काय “ नुसते बसुन किंवा उभे राहुनही जातो”असे
म्हणतात, त्याला काही अर्थ नसतो. मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे हे शेवटपर्यंत कळलेच
नाही तर काय उपयोग? नाही म्हणायला योगा, चालणे, गाणी ऐकणे, अध्यात्म, लेखन,वाचन,कॅसिओ-वादन
आणि मनोरंजन सोबत आहेच वेळ जायला. एवढे 40 वर्षे काम केलेस ना, “आता थोडा आराम कर“
इति कन्या उवाच. काहीतरी नवीन संकल्प नवीन वर्षात अजुन झालेला नाही, प्रवासही चालु
आहेत. जेव्हा 2 मुली झाल्या तेव्हा दोन्ही मुलिच का? असे म्हणणा-यांना मला नेहमी सांगावेसे
वाटायचे कि, जावई म्हणुन मला 2 मुले मिळणारच आहेत ना, ते चांगले मिळाले कि झाले आणि
चांगलेच मिळणार हा विश्वासही आहे. त्यातला “मोठा मुलगा चांगला ( मुलिला सांभाळुन घेणारा
) मिळाला” याबद्दल देवाचे आभारच मानावयास हवे.
घरी आता परत जायचे वेध लागले होते. एकुण परदेशी वास्तव्य, प्रवास, विश्रांती आणि मुली-जावयासोबत (2-3 राज्यात ) घालविलेला 2 महिन्याचा काळ कसा गेला ते कळलेच नाही. येताना कसे होणार? (एकटी असल्यामुळे) वाटत होते ते जाताना“गर्मीमुळे कसे होणार? या चिंतेने व आत्मविश्वासाने (एकटी विमान-प्रवास करु शकते) 9 एप्रिलला संध्याकाळी 8.30 वाजता विमानात बसले आणि 11 तारखेला पहाटे 1.45 वाजता मुंबईला पोहचले. अशा रितीने तुम्हां सर्वांच्या सदिच्छा, आशिर्वाद,नव-याच्या, लेकिंच्याआणि जावयाच्या सहकार्यांमुळे व देवाच्या कृपेने तिसरी वारी सफळ संपुर्ण (विनासायास) पार पडली.
Comments
Post a Comment