मी का लिहीते? मला का लिहावेसे वाटते?

 हा प्रश्न अनेकांना पडतो तसा मलाही कधीतरी पडतोच. का बरे मी लिहीत आहे, विशेषकरुन अशा काळात जेव्हा मराठी वाचनाची गोडीच लोकांना नाही. जे मोजकेच वाचतात त्यांना वेळ किंवा वाचायचा उत्साह राहिलेला नाही. त्यातुन मला काय मिळते? पुर्वीसारखे पानेच्या पाने वाया जात नाहीत पण वेळ आणि मेंदू कुठेतरी शिणतोच ना! गेल्या 10-12 वर्षापासुन सातत्याने काही ना काही मी सारखी लिहीत असते. कधी वर्तमानपत्रात ,मासिकात,पाक्षिकात किंवा नैमत्तिक/प्रासंगिक स्वरुपाचे. त्याला कोणी निबंध तर कोणी ललित लेखन असे म्हणतात. 2020 नंतर ख-या अर्थाने माझे सामाजिक माध्यमावर नियमित साप्ताहिक ब्लॉगवर लेखन सुरु झाले. त्यावर येणा-या प्रतिक्रिया, अभिप्राय आणि किती जणांनी वाचलंय याची संख्या बघुन हळूहळू लिहिण्यास प्रोत्साहन मिळत गेले. त्यातुनच लेखांचे पुस्तक काढावे असे सुचविल्यामुळे इ-बुक पहिले, दुसरे आणि आता तिसरेसुद्धा सलग छापुन झाले. एकच पुस्तक तेवढे प्रत्यक्ष हातात वाचण्यासाठीचे प्रसिद्ध/ प्रकाशित केले.

हे लेखन आणि पुस्तके मला महत्वाची वाटतात कारण कदाचीत माझ्यानंतर ही स्मरणात राह्तील ! लेख- निर्मीतीचा आनंद हा काही शब्दांत वर्णन करता येत नाही. मी अगदी ज्वलंत विषय निवडते असेही नाही पण जे काही वाटते, ते लिहुन व्यक्त करावे आणि इतरांनाही त्यात सामील करुन घ्यावे एवढाच माफक हेतू असतो. विनोदी किंवा खुसखुशीत लिहणे मात्र मला जमत नाही कारण विषय तसे सगळे गंभीरच असतात. प्रतिभा वगैरे माझ्याकडे नसेल मात्र माझी कुवत, अनुभव लक्षात घेता थोडीफार देणगी मला ईश्वरांनी दिली असावी असे वाटते. असे म्हणतात कि,ज्याला बोलता येत नाही त्यांना लिहीणे चांगले जमते. माझ्याबाबतीत कदाचित तसेच झाले असावे. पटकन बोलणे, हजर-जबाबीपणा किंवा “अरे ला कारे करणे” किंवा माझे बरोबर असुनही मला ते पटवुन न देता येणे (भिडस्त स्वभावामुळे व शेंडेफळ असल्यामुळे असेल) या त्रुटिंवर कदाचित लेखनामुळे मात करता येत असावी. माहित नाही पण इतर अनेक कलांपेक्षा हे लेखन जमते खरे! कधी कधी बक्षीस मिळाले,कोणी कौतुक केले कि, लिहिल्याचे समाधान/सार्थक झाल्यासारखे वाटते.
ज्यांना लिखाण व वाचनाचे वावडे असते त्यांना कदाचीत ही“नसती उठाठेव” किंवा रिकामपणचा उद्योग वाटण्याची शक्यता आहे. एखादा छंद किती आनंद, समाधान देऊ शकतो हे ज्याचे त्यालाच माहित. त्यासाठीचे संदर्भ तपासणे, अवांतर वाचन, शब्दमांडणी अशी रचना करावी लागते. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत ना, विपरित अर्थ तर जाणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. हे सगळे केल्यावर ते पोस्ट केल्याशिवाय चैंन पडत नाही हे मात्र खरे. काही वाचकांचे मात्र मला नवल वाटते त्यांना काहीच, कधीच आवडत नसावे का?असा मला प्रश्न पडतो. सावधगिरी म्हटले तर ते बोलतात अगदी मनमोकळे मात्र अभिप्राय द्यायला मागे. ”व्यक्ती तितक्या प्रकृती” एवढेच म्हणायला लागेल. जसे काहिजण सगळ्याच पोस्टवर काही ना काही कमेंटस करित असतात तर काहीजण नकारात्मक विश्लेषण करीत असतात. हे वाचणे हाही एक मोठा विरंगुळा असतो.
अवतीभोवती अनेक घटना घडत असतात तर कधी लोक असे का वागतात? याचा उलगडा होत नाही. काही असामान्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात. कधी आपण प्रवासात अनेक अनुभव घेत असतो. कार्यालय, परिसर आणि खाजगी आयुष्यात अनेक दैनंदिन बाबी आपण लक्षातही घेत नाहीत. याचे सुक्ष्म निरीक्षण करुन त्यात आपला स्वत:चा दृष्टीकोण घालुन त्याचे लेखन इतरांसमोर करणे ही कार्यपद्धती वाटते तेवढी सोपी नाही. तरीही काहीजण उत्साहाने हे सतत करीतच असतात. पुर्वी“तलवार कि लेखणी श्रेष्ठ?”असे वाद-विवाद व्हायचे. कित्येक राजे-महाराजे,साम्राज्ये बोरुच्या लिखाणावर टिकली, लयास गेली किंवा तारुन गेली. स्वातंत्र्याची जाणीव अनेक देशभक्तांनी सर्व-सामान्य जनतेच्या मनात रुजविली ते या लेखणीच्याच सहाय्याने. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारितेवरच जास्त भिस्त असावी असे मानले जाते. काही लेखन हसत हसत विचार करणारे असते तर काही लेखन बारिक चिमटा तर काढला पण समजला नाही असे असते. काही लिखाणात जबरदस्त ताकद असते ज्यामुळे जनमत तयार होण्यास मदत होते. काही छोट्या छोट्या जाहिराती बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. वर्तमानपत्रे, संपादकीय पुर्वीचे दिवाळीअंके त्यासाठीच महत्वाची वाटायची.
मराठीत भाषेवर मर्यादा येतात असे काहिजणांचे मत असते. तसे तर प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते पण ते डावलुन योग्य मतिथार्थ वाचकांपर्यंत पोहोचविणे , मुख्य म्हणजे ते लिहिलेले वाचावेसे वाटले पाहिजे. तसेच काही लेखन सरकार, जनता यांचे प्रतिनिधित्व करित असते. प्रामाणिक आणि नि:पक्षपातीपणाने हे काम करणे अपेक्षित असते. ते किती होते हा वादाचा किंवा संशोधनाचा मुद्दा असु शकतो. शिवाय हे लेखन काहिवेळा पुरावा म्हणुनही सादर होत असतो त्यामुळे जबाबदारिने लिहीणे हिही एक सामाजिक तसेच तात्वीक जबाबदारी म्हणावयास हरकत नाही.
मराठीत वाचायला काही जणांना जमत नाही, आवड नाही, सवड नाही अशी अनेक कारणे यामागे सांगता येतील. मातृभाषा ही लेखनासाठी कधीही उत्तम पर्याय असते. जगातल्या अनेक संस्कृत्या,साहित्य हे त्या त्या समाजाचा आरसा असतो. त्यांतर तुम्हाला जे आवडते ते लिहिणे हा एक छंद,व्यवसाय किंवा हल्ली ज्याला धंदेवाईक (content writing/संहिता) स्वरुपही म्हणता येईल. गद्य वा पद्य लेखन हा लेखकाचा श्वास असतो.गप्प बसवत नाही आणि बोलताही येत नाही तेव्हा तो एक प्रकारे स्वत:ला व्यक्त करित असतो. स्वत:बरोबरच इतरांनाही सजग करित असतो. लेखनाचा हा जन्मसिद्ध हक्क (कायद्याच्या नियमात बसणारे,सामाजिक भान ठेवुन ) कसा,कुठे आणि केव्हा बजवावा? व्यक्त व्हायचे कि नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. वाचन हे मन समृद्ध करित असते त्यामुळे वाचकांनीही जरूर वेळ काढावा असे वाटते. काही जुने संदर्भ मिळविण्यासाठी ऐतिहासिक लेखन महत्वाचे ठरते. पुढच्या पिढिसाठी मार्गदर्शक ठरु शकते. “कागद बोलतो”अशी एक म्हण आहे, काही बाबतीत हे खरेही ठरु शकते. माहिती व तंत्राज्ञान हे लिहुनच समजु शकते. कुठेतरी त्याची माहिती प्रसिद्ध झाल्यावरच आपल्याला त्याचे महत्व कळते. हल्ली सामाजिक माध्यमे एवढी सक्रिय असुन हे एक चांगले व्यासपीठ नक्किच इतरांना (चांगल्या गोष्टींसाठी) दिशादर्शक ठरु शकते.
बाय  द वे, लेखनामुळे मला एक नवीन ओळख प्राप्त झालेली असुन अनेक नव-नवीन ओळखी वाढत आहेत व कौतुकाचा वर्षाव होत आहे हे सांगायचे राहिलेच.

               


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव