चित्र पताका-2025

         

                     मे महिन्यात एक  आंतरराष्ट्रिय मराठी चित्रपट महोत्सव“चित्र पताका-20025” या नावाने बघण्याचा/अनुभवण्याचा योग आला. पुर्वी अशा महोत्सवाचे कार्यालयामार्फत पासेस मिळत असल्यामुळे असे महोत्सव बघणे हा एक सुंदर अनुभव असतो. या महोत्सवात अगदी सलग 64 चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. नक्किच कौतुकास्पद होते आणि मराठी चित्रपटाचा उद्धार करण्यासाठी उचललेले हे पाऊल सगळ्यांनाच उत्साहवर्धक आणि प्रोत्साहनात्मक ठरो ही आशा. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आता तरी लोक मराठीकडे वळावेत. वेगवेगळे विषय, त्याचे नियोजन, प्रसिद्धी, परिसंवाद आणि चर्चासत्रे व सर्व-सामान्य मराठी कलाकाराची होणारी धडपड यासाठी हे सगळेच छान आकर्षक वाटले. नवीन युवक वेगवेगळी जोखीम घेण्यास उत्सुक आहेत हेही येणा-या प्रेक्षकवर्गातुन आणि विद्यार्थ्यांकडे/युवकांकडे बघुन दिसत होते.

            पहिला मुकपट आणि मग बोलपट/भारतात आणणारे (परदेशात जाऊन त्याचे प्रसिक्षण घेणारा)चित्रपट बनविणारा एक मराठी माणुसच होता हे सगळेचजण विसरतात. दादासाहेब फाळके,प्रयत्नांनी अयोध्येचा राजा, राजा हरिशचंद्र, शेजारी, कुंकू, वहिनिच्या बांगड्या,पिंजरा आणि इतर अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते. नंतरच्या काळातही अनेक विनोदी चित्रपट (मोरुची मावशी,गंमतजंमत, मुंबैईचा जावई, मुंबईचा फौजदार)समस्याप्रधान चित्रपट “माहेरची साडी, पुढचे पाऊल”असे सांगता येतील. गेल्या दहा वर्षात संगीत प्रधान,वैयक्तिक असे अनेक चित्रपट गाजले. (कट्यार काळजात घुसली,बालगंधर्व,लोकमान्य टिळक,वसंतराव देशपांडे,पु.ल.देशपांडे, मी काशीनाथ घाणेकर”) वर्षाला किमान 25 चित्रपट तरी बनत असतील पण ते येतात कधी आणि जातात कधी हेसुद्धा कळत नाही. आता ओटीटीवर जेव्हा बघितले जातात तेव्हा कळतात.

                शासनाची मदत तर दिली जातेच मग चित्रपटाचा बोलबाला का होत नाही? प्रसिद्धीत,गाजावाजा करण्यात आपण कुठे कमी पडतो याचा नक्की विचार व्हावयास हवा. जिथे दक्षिणीय,हिंदी चित्रपट कोटीकोटीची उड्डाणे करतो तिथे एखादाच “सैराट” सारखा ही रक्कम गोळा करु शकतो. मध्यंतरी एका प्रसिद्ध कलाकाराची मुलाखत ऐकली. (वय वर्षे फक्त-75) माझ्यासाठी म्हणुन विनोदी भुमिका लिहिल्याच जात नाही असे त्यांनी सांगितले. लेखक,दिग्दर्षेक आणि कलाकारही  मराठी मिळत नाहित असे एका दिग्दर्षकानी सांगितले. आहेत ते खुपच भाव खातात आणि त्यांच्या अटी शर्ती पाळल्या जात नाहीत अशाही तक्रारी ऐकल्या जातात. हे भाषेचे दुर्दैव कि आपली मराठीबद्दलची अनास्था? याला कारणेही अनेक आहेत. थिएटर मिळत नाही,प्रेक्षक येत नाहीत,हवा तेवढा फायदा होत नाही त्यामुळे निर्माते मिळत नाहित. मराठी नाटके मात्र छान चालतात हेही एक आश्चर्यच म्हणावयास हवे. तिथे नव-नवीन प्रयोग करायला मिळतात म्हणुन असेल कदाचीत.

              मोठे बॅनरस मिळत नाहीत,हवी तशी जाहिरातबाजी होत नाही. हे दृष्य केवळ शहरातच दिसुन येते,गावात अजुनही प्रेक्षक येतात बघायला. आता गावेही बदलायला लागलीत. त्याला कारण सामाजिक माध्यमे, आंतरजाल आणि लोकांना जर घरी बसुन आरामात बघायला मिळतात तर कोण जाऊन 300-400 रुपये खर्च करणार? मध्यंतरी “छावा” बद्दल असाच वाद झाला होता. मराठीत कोणी करायला तयार नाही म्हणुन हिंदीत केला असे त्या दिग्दर्षकांनीच एका मुलाखतीत सांगितले. दुसरा एक मुद्दा “बाईपण भारी देवा” असे चित्रपट तुफान चालतात,का? अजुनही स्त्रिया “अबला” या भुमिकेतुन बाहेर पडायला तयार नाहीत का? एकीकडे स्मिता तळवलकर, सई परांजपे सारख्या दिगदर्षनात पाय घट्ट रोउन असतात तर दुसरीकडे स्त्रियांभोवतीच फिरणारा मराठी चित्रपट. दुसरे विषय नाहित का? मालिकासुद्धा सासु,सुना,मुली एवढ्याच गोलात फिरतात. हिंदी मालीका बघा” एअर होस्टेस,उड्डान,हम पंछी एक डालके”असे काहीतरी नवीन विषय शोधा मग सापडतील. रहस्य,विज्ञान,साहसी महिला,वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रसिद्ध महिला यांच्यावर का चित्रपट काढले जात नाहीत. पुरुष प्रेक्षक का येत नाहीत मराठी चित्रपटासाठी? त्यांना इंग्रजी,हिंदी अगदी तमिळ तेलगुसुद्धा चालतील पण मराठी नको. मराठी चित्रपट अमागास किंवा दर्जेदार बनत नाहीत असे काहीजण म्हणतात. मराठी शाळा तर हळुहळू बंद पडत आहेत. शिकणार, बोलणार, बघणार सगळे इंग्रजी मग मराठीची आपुलकी वाटणार कशी?  आपणच आपले नुकसान करुन घेतले आहे.

            एक म्हण आहे,”पिकते तिथे विकत नाही.”तसे परदेशात याचे महत्व कळते पण इथे नाही. आता युवकांनीच मनावर घेऊन हे मराठीवरचे अरिष्ट टाळले पाहिजे. ज्या ज्या शाळा बंद होत आहेत त्यांना शासन जशी मदत करते तसे पालकांनीही मदत केली पाहीजे. मर्यादित ध्येय न ठेवता सगळीकडे इतर राज्यातही सर्वदुर मराठी चित्रपट पोहोचेल अशी व्यवस्था उभी केली पाहीजे. बघा मग कसे छान छान चित्रपट बघायला मिळतील अशी आशा करुया. खरे तर आशयघन आणि वैचारिक चित्रपट बनावयास हवेत. चित्रपताका नेहमीच सगळिकडे दिमाखाने“फडकत राहो”अशी प्रार्थना करुया.

 


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव