शापित पांडव/ कौंतेय/ सूर्यपुत्र?

              अमेरिकेत असताना इकडे निघायच्या अगदी 8दिवस आधी माझ्या हातात“मुत्युंजय”हि कादंबरी आली आणि मला अगदी वाचल्याशिवाय राहवेना. मी शाळेत असल्यापासुन या कादंबरीच्या प्रेमातच आहे. दरवर्षी बेळगावला गेले कि,याचे वाचन हे एक नित्य कर्म असे. तेव्हापासुन अनेकवेळा वाचुनही प्रत्येकवेळी तेवढीच उत्सुकता असायची. मुलीनेपण कॉलेजमध्ये असताना ही कादंबरी वाचली होती. लेकिला खरे तर “छावा”आणायला सांगितले होते,तिला मिळाली नाही,त्याऐवजी तिने ही कादंबरी आणली. मग काय माझे रात्रंदिवस हे वाचन सुरू झाले,जुने दिवस आठवले आणि वाचनात अगदी रमुन गेले.

              “कोहम”(मी कोण आहे) या एका प्रश्नाने कायम चिंतेत असलेला आपला हा दुर्दैवी नायक कायम सुर्यपुत्राऐवजी जेव्हा जेव्हा “सुतपुत्र”म्हणुन हिणवला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटते. जन्मजात मिळालेली कवचकुंडले आणि जन्म-रहस्य अशावेळी कळते तेव्हा कळुनही काही उपयोग होणार नसतो. आपण उच्च कुळातील असुनहि केवळ दुर्दैव/नाईलाज म्हणा किंवा समाजहित लक्षात घेऊन मौन बाळगणारा हा खरा पुत्र शोभतो. मित्राला“साथ देण्याचे”वचन शेवटपर्यंत पाळणारा, (मित्र स्वार्थी हेतुने मैत्री करित असला तरी),जन्मदात्या आईपेक्षा सांभाळणारी आई “श्रेष्ठ”असते हे सिद्ध करणारा, भाऊ,पती आणि पिता म्हणुन सर्वच नाती समरसुन जगणारा, सर्वश्रेष्ठ धनुर्धर,नियमाने वागणारा योद्धा अशी अनेक वर्णने कर्णाला लागू होतील.

               विरुद्ध पक्षात असुनही योग्य सल्ला मित्राला देणारा, सत्य कळल्यावरसुद्धा पक्ष-न बदलणारा हा एक उत्तम राजकारणी तर अत्यंत पराक्रमी केवळ शिक्षणासाठी खोटे बोलणे आणि एका स्त्रीविषयक अपशब्द उच्चारल्या बद्दल होणारी शिक्षा भयंकर होती असे वाटुन जाते.  ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे नायकाशी संबंधीत असलेली सर्व पात्रे, त्यांची बाजुही स्वतंत्रपणे मांडण्यात लेखकाला मिळालेले यश. प्रत्येकाची बाजु आणि त्या व्यक्तीचे कर्णाशी असलेले नाते आणि दृष्टिकोन सखोलपणे मांडणे हेही एक कौशल्यच म्हणावे लागेल. 1979 साली केवळ 30 रुपये किंमत असलेली 600 पानांची ही कादंबरी मनात अनेक प्रश्न तर निर्माण करतेच पण वाचकाला समृद्धदेखिल करते. महाभारत  केवळ एक खंडकाव्य नसुन जगण्यासाठी लागणारा आदर्ष वस्तुपाठ ठरावा. प्रत्येक आनुषंगिक पात्रांचा परिचय यातुन घडतो.”भारत म्हणजे महाभारत” अशी ही ओळख काहिजण सांगतात.

             आज एवढ्या वर्षानंतर देखील ही कादंबरी उत्तम लिखाण, अलंकारीक भाषा आणि वास्तव- दर्षी चित्रण करणारी आहे असे म्हणता येईल. कर्ण, कुंती,कृष्ण,शोण,दुर्योधन आणि  वृषाली अशी 6 पात्रे आपापली योग्य भुमिका मांडुन त्यांचे संवाद,वर्तन आणि मन अंतर्मुख करायला भाग पाडते. खरे तर पी.एच.डी.(संशोधन) करावी अशी हि कादंबरी आहे. नैसर्गीक  प्रतिकांशी साधर्म्य सांग़ुन कसे वागले पाहीजे ते छान समजावते. “to be or not be”च्या भ्रमात वावरणारे इतर पात्रे हे समाजाचे द्योतक उभारणारे, भाव-भावना, समाजमन, प्रेम-गरिबी,सत्ता-राजकारण,स्वार्थ,युद्धजन्य परिस्थिती, भावनांचा होणारा कोंडमारा,सामान्य माणुस म्हणुन वागणे आणि एक राजा म्हणुन तेवढेच संयमाने वागणे हेही एक आव्हान या सगळ्या पात्रांनी नीट समजावुन सांग़ितले आहे.

           महाभारतातील माझी एक आवडती व्यक्तीरेखा म्हणुन मला“कर्ण”पहिल्याच वाचनात आवडला होता आणि नंतर जेव्हा जेव्हा इतर कादंब-या वाचल्या (राधेय,कौंतेय आणि कर्णायन) तसतसा जास्तच आवडु लागला. खरे तर“शापित पांडव/कौंतेय” म्हणणे जास्त योग्य वाटते. केवळ जन्मावरुन जात ठरुन त्याच्या हुशारीला, कर्तत्वाला काहिच वाव दिला जात नाही. अशा परिस्थीतीत एखादा नैराश्याने ग्रासुन गेला असता. प्रचंड  ध्येय बाळगुन शेवटी नाईलाज म्हणुन शिक्षणासाठी खोटे बोलणारा “कर्ण” आजही कुठे कुठे आढळतील. काहिजणांसाठी अजुनही शिक्षण दुरापास्तच आहे. जात-परंपरा, या नावाखाली अनेक बळी आजही जात आहेत. स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आजचे नेतृत्व बघितले कि, कर्णाची आठवण येते. मला तर कधी कधी वाटते “महाभारत”वाचन सक्तीचे करावे. त्यातुन किमान एक धडा निदान राजकारण्यांनी तरी जरूर घ्यावा.

         अनेक म्हणी,”कणकनीती” समजावणारी ही कादंबरी अभ्यासाला लावली तर किती बरे होईल? “मराठी वाचन”जिथे दुरापास्त तेव्हा एवढी मोठी कादंबरी कोण वाचणार? हाही एक प्रश्नच आहे. याशिवाय कर्णाच्या संपर्कात आलेले विदुर,संजयकाका,अश्वात्थामा प्रसंगी त्याला मार्गदर्शन करित असतात. गंगा माता आणि सुर्याला गुरु समजुन एकलव्यासारखे तळमळिने शिक्षण घेणारा कर्ण नंतर “दानशुर”म्हणुन प्रसिद्ध झाला तरी मरताना शेवटचे दान करणेही न सोडणारा,स्वत:चे कवच-कुंडले दान केल्यानंतर काय होणार स्वत:चे? याचा तसुभरही विचार न करणारा, अशा अनेक अंगानी कर्ण अभ्यासावा तेवढा कमीच आहे. “मृत्यूवरही” विजय मिळवणारा असा हा दानशुर कर्ण सगळ्यांनाच जीवाला चटका लावुन जातो. जेव्हा मिळेल तेव्हा ही कादंबरी नक्कि वाचावी असे मला वाटते. आज तिसरी पिढी ही कादंबरी वाचत आहे, त्यासाठी शिवाजी सावंत यांचेही आभार मानावे लागतील. असे कालातीत साहित्य मराठीत उपलब्ध आहे हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव