अभिनव भारत ही एक संकल्पना
जयोस्तूते जयोस्तुते...
वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे!
2) ने मजसी मातृभुमीला... सागरा प्राण तळमळला...
स्वा.वीर सावरकरांनी लिहिलेले, लता मंगेशकर आणि सर्व बन्धु-भगिनीने गायिलेले ही स्फुर्तीगीते शाळेत असतांना आम्ही गायचो तेव्हा ऊर अभिमानाने भरुन यायचा. आता तर मराठी शाळाच बंद होत आहेत त्यामुळे हे गाणे गात असतील की नाही माहित नाही. शाळेत मुलांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पण बोलवत नाहित हे ऐकुन आश्चर्यच वाटते. आम्हाला मात्र हे दोन दिवस अशी गाणी स्वत: म्हणुन दाखवायची एकमेव संधी मिळायची त्यामुळे खुप भारी वाटायचे. मध्यंतरी सोसायटीच्या एका कार्यक्रमात गायले तेव्हा सगळ्यांना खुप आश्चर्य वाटले होते. “कालाय तस्मै नम:”म्हणायचे अजुन काय! हे सगळे आठवायचे कारण म्हणजे नुकतीच वीर सावरकरांची 28 मे रोजी 142 वी जयंती साजरी करण्यांत आली.
वीर सावरकर हे जहाल मतवादी, हिंदुसंरक्षक, थोर साहित्यीक, कृतीशील समाजसुधारक,राजकिय सहभाग असलेले हे एकमेव स्वातंत्र्यवीर आणि महान क्रांतीकारक असे म्हणता येईल. परदेशात शस्त्रास्त्र बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन वकिल झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान येथील काळ्या-पाण्याची सजा 11 वर्षे भोगलेले, 2 वेळा जन्मठेप सुनावलेले, भारतात आल्यानंतर 27 वर्षे स्थानबद्ध असलेले स्वातंत्रोत्तर काळातसुद्धा “वादग्रस्त नेतृत्व” असे म्हणता येईल. त्यांची “माझी जन्मठेप” खंडकाव्य “कमला” आणि इतर 40 पुस्तके प्रसिद्ध आहेत. कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे, जातीभेद न मानणारे आणि देशाचे स्वत:चे लष्करी सामर्थ्य व देश हाच धर्म मानणा-या सावरकरांनी” अभिनव भारत संस्था”स्थापुन स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात केली होती. स्वत: दोन भाऊ आणि घरातील तिन्ही बायका या चळवळीच्या झंझावातात सापडल्या,पुत्राचे निधन झाले तरी त्यांनी हार मानली नव्हती. तसेच अंदमान येथिल कारागृहातील हाल सहन करुन“काव्य”लिहिणारे सावरकर अनुकरणिय आणि आताच्या काळातसुद्धा त्यांचे विचार महत्वाचे ठरतात.
सावरकर स्वत: नास्तिक असुनही कायम भेदभाव (उच्च-निच्च) आणि अहिंसेविरुद्ध होते. हिंदु धर्माची त्यांची सोपी व्याख्या होती,जो”हिंदुस्थानात जन्मला,राहतो तो हिंदु,”“जे जे देशाला हितकारक ते स्विकारा,अहितकारक असेल तर त्याला विरोध करा” म्हणुनच ते फाळणीच्या आणि अहिंसेच्या विरोधात होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रसंगी हाती शस्त्रे धरण्यास त्यांची मुळीच हरकत नव्हती. वास्तववाद स्विकारण्याबाबत ते कायम आग्रही असत. त्यामध्ये स्वदेशी, स्वसंरक्षण आणि स्वधर्म हे महत्वाचे टप्पे आहेत असे ते म्हणायचे. आज जे आपण 4 थी आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो तेव्हाच सामाजिक समानता,भ्रष्टाचार आणि असंतोषी जनता आणि शेजारी ह्या दोघांचा विचारही लक्षात घेतला पाहिजे. इतिहासातील चुका टाळुन काळानुसार सामाजिक बदल ,धार्मिक बदलाबाबतही ते आग्रही होते. रत्नागिरी येथील “मंदिर अस्पृष्यांना खुले करणे”हे त्यांनी टाकलेले महत्वाचे पाऊल ठरले. देश सगळ्यांनाच “आपला”वाटला पाहिजे त्यासाठी सर्व-धर्म समानता आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच जे“चुकून/जबरदस्तीने दुस-या धर्मात गेलेत त्यांना शुध्दीकरण करुन परत घेण्यात आले तरच त्यांना देशाबद्दल आपुलकी वाटेल. तसे त्यांनी कारागृहात कैद्यांचे मन वळविणे ,शिक्षण देऊन जागृत करणे,स्वच्छतेचे महत्व पटविणे असे अनेक प्रयोग केले होते.
“अभिनव भारत”हे त्यांचे स्वप्न (110 वर्षांपुर्वी पाहिलेले) आता थोडेफार आकार घेऊ लागले आहे पण त्यासाठी लागलेला (60 वर्षे) हा वेळ अवास्तव वाटतो. युद्धे ,लोकसंख्या आणि राजकीय अनास्था ही कारणे असली तरी आपण “कुठेतरी कमी पडत आहोत”आणि आता आपले कार्य संपले हे जाणवल्यावर सावरकरांनी आपले आयुष्य स्वत:हुन संपविण्याचा निर्णय घेऊन कष्टदायी जीवन लवकर संपविले. अशा या महान क्रांतीकारकांचे विचार आपण सगळ्यांनी आचरणात आणुन त्याप्रमाणे वागणे”हीच त्यांना खरी आदरांजली ठरू शकेल असे मला वाटते. तसेच त्यांना “हवा तेवढा आदर/ सन्मान”आपण देऊ शकलो नाही याबद्दल खेदही वाटतो.

Comments
Post a Comment