मेंदुचा पासवर्ड ( तिळा तिळा दार उघड)

 

               डॉ.श्रीम.श्रुती पेंडसे यांचे वसंत व्याख्यानमालेतील "मेंदुचा पासवर्ड" हा विषय हा रेच विचार प्रवर्तक वाटला म्हणुन तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला त्यासाठीचा हा लेखन प्रपंच.

              लहानपणी ऐकलेली "अलिबाबा आणि चाळिस चोर" ची गोष्ट तुम्हाला आठवतच असेल. तसेच काहिसे आपले आपल्या मेंदुबाबत होत असते. गोष्टींमधला अलिबाबा अत्यंत मेहनती, मर्जिनाची साथ आणि कासिमचा वेंधळेपणा हा तेव्हा कळत नव्हता पण आता कळतो. त्या गुहेप्रमाणेच आपला मेंदू, असंख्य नुरोन्स, पेशी, रक्त यांनी बनलेला मेंदु एक "रहस्यमय" गुहाच म्हणावी लागेल. या मेंदुमुळेच माणुस इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. मेंदुचे आकलन व स्मरण, निरिक्षण शक्ती, वर्गिकरण आणि निष्कर्ष/अनुमान काढण्याची क्षमता व पुर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा शिस्तीचा "सुरक्षारक्षक"असे वर्णन करावे लागेल. डोक्यावरचे घट्ट आवरण,केस आणि अभेद्य त्वचा एवढे संरक्षण त्याला लाभलेले असते त्यावरुन याची कल्पना आपल्याला येऊ शकते. वयाच्या 35 वर्षांपर्यंत मेंदुची वाढ होते असे म्हणतात. गर्भधारणेनंतर साधारण 3-4 आठवड्यांनी होणारा मेंदु आकार घेऊ लागतो. मज्जासंस्थेचे जोडणी, कौशल्ये कधी कधी जन्मत:च तर कधी जन्मानंतर विकसित होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण महाभारतातील अभिमन्युचे देता येईल. तसेच काही अत्यंत हुशार बालके लहान वयातच मोठी कामगिरी करतात ती देखिल या मेंदुच्या जोरावरच.

                 साधारण अक्रोड सारखा दिसणारा आणि आतुन अत्यंत कोषरुपी व्यवस्था असलेला (मधमाशीचे पोळे आतुन कसे असते तसा) हा मेंदु अत्यंत गुंतागुंतीचा तसेच नाजुक व 2 विभागात काम करीत असतो. छोटा व मोठा मेंदू ( डावा/उजवा )असे त्याचे कामाचे वाटप असते. जशी ही वाढ अपेक्षित दोन्ही बाजुची असली तरी थोडे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे तशी त्या व्यक्तीची ठेवण/विचारसरणी, कौशल्ये आणि बुद्धीमत्ता विकसित होत असते. दिवसाला साधारण 60000 विचार/ आदेश मनात येत असतात असे म्हणतात. त्यातले काही पुन्हा पुन्हा,काही अगदीच नकोसे तर काही चांगले असे असतात. ही क्षमता आपण फक्त 30%च वापरतो असे म्हणतात, पुर्ण वापरली तर काय चमत्कार होतील ते सांगता येतील. त्यातुनच नवीन शोध,निर्मीती आणि स्वत:चा तसेच इतरांचाही विकास साधता येतो.

                 आताच्या डिजिटल युगात "पासवर्ड" हा परवलीचा शब्द हा वारंवार ऐकिवात येतो,त्याशिवाय आपले व्यवहार पुर्णच होत नाहित. ब्रेन पासवर्ड ही बायोमेट्रिक प्रमाणीकरण पद्धत आहे, जी व्यक्तीच्या अनोख्या मेंदूच्या तरंगांचे पॅटर्न पासवर्ड म्हणून वापरून उपकरणे अनलॉक करण्यासाठी किंवा प्रणालींमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरली जाते. सारांशात, ब्रेन पासवर्ड म्हणजे एक जैविक ओळखपत्र जे एखाद्या व्यक्तीच्या मस्तिष्काच्या क्रियाकलापांच्या खास वैशिष्ट्यांचा वापर करून त्यांच्या ओळखीची पुष्टी करते आणि संरक्षित प्रणाली किंवा उपकरणांमध्ये प्रवेश मिळवून देते. तसेच काहिसे मेंदुच्या बाबतीत होत असते. ही गुहा उघडण्यासाठी चित्रे,संज्ञा,शब्द,उच्चार,काही वक्तव्ये, मंत्र,स्तोत्र किंवा जप हे जे पुर्वी लहानपणी शिकविले जायचे ते यासाठीच. शुभ बोल ना-या..., वास्तु तथास्तु म्हणते असे पुर्वी म्हाणायचे हे त्यातुनच तयार होते.त्यातुन स्मरण आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर शक्य होते. कधीतरी वाचलेले, ऐकलेले,बघितलेले नंतर केव्हातरी आठवते अगदी म्हातारपणी देखील ही किमयाच नव्हे का! चांगले संस्कार,आठवणी,ओळखी हे कायम आपल्या मेंदुत साठवले जाते  मात्र त्यासाठी त्याला वारंवार आदेश द्यावे लागतात. वाईटाचा निचरा करावा लागतो. त्या  आठवणी विसरुन त्याजागी चांगले सतत खाद्य पुरवावे लागते. रिकामा न्हावी--,किंवा“खाली मस्तिष्क--सैतानका घर” असे जे म्हणतात ते यासाठीच. मेंदुला कायम सतत चांगले विचार,वर्तन आणि कृतीचा संदेश/आदेश द्यावा लागतो. नाहितर तो स्वत: च काहितरी निष्कर्ष काढुन त्यामुळे निर्णय घेऊन मोकळा होतो.

                    जसे लहानपणी ज्या गोष्टीं/माणसे/वस्तुंबद्दल बागुलबुवा ( भयगंड) मनात तयार होत असतो तो नंतर कित्येक वर्षे त्याच्या मनात घोळत असतो. त्याविरुद्ध  तो कायम नकारात्मकच विचार करित असतो. अध्यात्म्यातदेखिल मनाला अनन्यसाधारण महत्व देण्यांत आलेले आहे. गोंधळलेला अर्जुन जसा कृष्णाचा सल्ला घेतो तसा हा मेंदु इतर अवयवांसाठी कृष्णच असतो. योग्य ठिकाणी योग्य बुद्धी वापरायला हा कार्यक्षम मेंदुच मदत करित असतो. आपण फक्त त्याला शहाण्या मुलासारखे सारखे चुचकारणे, वठणीवर आणणे,सतत कार्यरत राहणे,सकारात्माक विचार करुन त्याला सहकार्य करणे एवढेच करु शकतो. तोच हा पासवर्ड जीवन यशस्वी होण्याचा आणि समृद्ध होण्याचा. तुम्हाला काय वाटते?

                   



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव