हेल्थ चेक-अप ते वेल्थ चेक-अप महत्वाचे!

 

            नुकतेच आम्ही दोघेही सेवानिवृत्त झालो त्यामुळे आरोग्य आणि संपत्तीकडे लक्ष द्यावयास हवे असे वाटते. स्वत:बरोबरच इतरांनाही लाभ व्हावा या हेतुने नेहमीच माझे लिखाण असते. या प्रवासात अनेक गोष्टी,सिनेमा,नाटकांतुन आणि समाजमाध्यमांवरसुद्धा हे विषय नेहमीच चघळले जातात. बहुतांश घरात अशी दिसुन येते कि, मुलेमुली एकतर परदेशात असतात. इथे असले तरी एकत्र राहतील असे नाही. त्यामुळे प्रत्येक घरात एक किंवा दोन म्हातारी माणसे आढळतातच. आमच्यानंतर आमच्या संपत्तिचे पुढे काय? हा एक मोठा प्रश्न भेडसावत असतो. त्यात परदेशात राहणारी मुले तर अजिबात इकडच्या संपत्तीत उत्सुक असतात. तुम्ही ठरवा,तुम्हाला काय योग्य वाटते ते असा सावध पवित्रा घेणारेही मुले असतात. अशा वेळी प्रश्न पडतो कि, एवढे सगळे आपण जमा केले ते कोणासाठी? आम्ही असेपर्यंतच त्याचा उपयोग नंतर माहीत नाही काय होणार?

              जीवनविम्यासारखे “जिंदगीके साथ भी और जिंदगीके बादभी”असे प्रकार/गुंतवणुकीत खुप कमी असतात. आरोग्य व्यवस्थित ठेवणे हे तर आपल्या हातात आहे पण संपत्तीची विल्हेवाट कशी आणि कोण लावणार? आपापसांत वाईटपणा नको म्हणुन शक्यतो नातेवाईक,मित्रमंडळी सहसा या भानगडित पडत नाहीत. त्याऐवजी “इच्छापत्र” बनविणे,एखादी डायरीत सगळे लिहुन ठेवणे आणि त्याची कल्पना मुलांना देऊन त्याचे दस्ताऐवज बनविणे हे सगळ्यात योग्य आणि सोयीस्कर ठरु शकते.

अर्थात तुम्ही म्हणाल, कुठे एवढी संपत्ती आहे माझी? जी काही आहे ती कष्टाने स्वअर्जित असल्यामुळे नक्किच प्रत्येकाला महत्वाची असते. आपल्यानंतर ती कवडीमोलात जाण्याऐवजी त्याचे गरजुंना आपल्या हयातीतच वाटप केले तर! हल्ली अशा ब-याच संस्था आहेत ज्या हे काम विना-मोबदला करीत असतात. कपडे,भांडी,वस्तू,पुस्तके, पुराणकालीन( पिढीजात ठेवलेल्या) वस्तू त्या त्या संग्रहालयात दिल्यास नक्किच त्याचा योग्य उपयोग होईल.  

               त्यासाठी मुळात आपली किती गरज आहे ते ठरवावे लागेल. मी अशा काही व्यक्ती बघितल्या आहेत,ज्यांनी आपल्या हयातीतच आलेले पैसे ( सेवानिवृत्तीनंतर मिळालेले/ जमा असलेले) आपापल्या नातेवाईकांत वाटुन आपले ओझे कमी केले आहे. घर,पैसा,बचतही आपोआप मुलांना बाय डिफॉल्ट मिळणारच असते. त्यामुळे मला असे वाटते कि, वेळीच आपण शहाणे झालेले बरे! त्यासाठी स्वत: आधी शक्यतो फ़िट ॲड फाईन राहणे आवश्यक आहे. माझ्यानंतर काय ? हा प्रश्न डोक्यात घेऊन मी आत्तापासुन आनंदी राहणे का सोडुन देऊ? हेही लक्षात घेतले पाहिजे. संपत्तीचे अंदाजे मुल्यांकन ( बाजारभाव) करुन घेतल्यास जास्त बरे. मुलांना नको असल्यास नातु सज्ञान होईपर्यंत किंवा आई-वडिलांना जेव्हा वाटेल तेव्हा हे संपत्तीचे वाटप कधी व्हावे याचाही (हयात/हयातीनंतर/कालावधी) उल्लेख स्पष्ट असावा.कधी कधी आपल्या आधीच्या पिढीचा मला हेवा वाटतो “थोडक्यात मजा”हे तत्व त्यांनी अंमलात आणले आणि जास्तीचा ह्व्यास धरला नाही. आमच्या पिढीनेपण हव्यास धरला नाही पण तयार होत गेले आणि आज एवढे काय आणि कसे केले? याचा विचार करायची पाळी  आली.

              एकदा का आपल्या जबाबदा-या संपल्या कि, (त्या कधी संपल्या हे ठरविणे) शक्यतो आपण थोडेसे अलिप्त राहणे जमले पाहिजे. तब्येत  चांग़ली असेपर्यंत देश, परदेश फिरुन घेणे. अगदिच शक्य नसेल तर जवळपास तरी फिरत राहणे,देव-दरदर्शन,मित्र-मंडळींबरोबर संपर्क ठेवणे, आपल्या अस्तित्वाची मुलांनाही जाणिव करून देणे हेही तेवढेच महत्वाचे असते. मजेत जगणे,वेळच्यावेळी डॉक्टरकडे जाणे, औषधे घेणे आणि तब्येत सांभाळणे. जेणेकरून पुढे होणारा वाद टाळता येऊ शकतो. मुले,मुली,विश्वासू नातेवाईक,डॉक्टर, वकिल यांच्या उपस्थितीत केल्यास कोणास शंकेस वाव नको. ब-याच वेळा अशा काही घटना घडतात,बहुधा वडिलोपार्जीत संपत्ती ( घर,शेत,जमिन आणि बाग) परस्पर व्यवहार करुन नावे वगळली जातात/किंवा वारसच नाहीत असे जाहीर केले जाते. अशा वेळी कोर्ट-कचेरीचा वेळ, खर्च कोण करणार, संबंधात बिघाड निर्माण होईल म्हणुन शक्यतो कोणी पुढे येत नाही, हेही शक्यतो टाळले पाहिजे.संपत्तीत वाटा“नको”असल्यास तसे मुलांनी/सुनेनी, मुलिंनी, जावयांनी देखील नमुद करुन ठेवावे.

              तरी आता ब-यापैकी पालक सावध/सजग झालेत. मुलामुलिंचे नावे जोडणे, हिस्से करणे वगैरे याबाबत जागरुकता निर्माण झालेली आहे. गावात,खेड्यात अजुनही वर्षोनवर्षे काही खटले प्रलंबित असतात ते याच कारणांमुळे. कधी कधी तर मला वाटते जर कोणी अचल संपत्ती ठराविक वर्षे न वापरल्यास शासनानेही लक्ष घालणे आवश्यक आहे. अन्यथा ब-याच अशा वास्तु पडुन जातात पण ती जागा वापरता येत नाही ना तिथे काही बांधता येत नाही. खाजगी मालमत्तेबाबतचे नियमात सुधारणा होण्याची ही गरज सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे.विशेषत: विधवा,अविवाहित,अज्ञान वारस,पाल्य-विरहित/विना-वारस संपत्तीचे अधिकार थोडे तरी बदलले पाहिजेत. भलेही एखादी संस्था, विश्वस्त नेमण्याची गरज असल्यास तसेही करावयास हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?  

 






               

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव