मी कोरडी/स्थितप्रज्ञ आहे का?


                                                                       

  
“तुमचे स्मितहास्य हा तुमचा लोगो आहे”असे कुठेतरी वाचले होते. अमेरिकेत गेले तेव्हा मला मुली फोटो काढतांना कायम“हस ना ग आई”असे म्हणायचे आणि मला काही खळखळुन हसता यायचे नाही. खरे तर प्रवास  मस्त, हसत खेळत चालु होता. माझे फोटो कधीच चांगले येत नाहित. मला खुष करण्यासाठी म्हणुन वेगवेगळे प्लॅन्स मुली आखत होत्या. मनाला खुप समाधान वाटत होते पण चेह-यावर काही ते दिसत नव्हते. का कुणास ठाऊक! मुलिंना, मला किंवा इतरांनाही कि हि एवढी कोरडी/निरस का असावी? भाव-भावनांचे दर्शनहिच्या चेह-यावर का दिसत नाही? दिलखुलास हसणे,  बोलणे का जमत नसावे? असे प्रश्न कायम मनात असतात. काही व्यक्ती मात्र दिसताक्षणीच प्रेमात पाडणा-या असतात हे कसे काय?

               अशा अनेक व्यक्तींना मी बघते कि,ज्या छोट्या छोट्या गोष्टींनीही खुप खुष होतात आणि त्यांचा आनंद चेह-यावरुन अगदी ओसंडुन वाहत असतो. “लहानपणी आरसा हसतो, आरसा रडतो” ही गोष्ट वाचली होती. चेहरा हाही एकप्रकारे आरसाच,मनाचे प्रतिबिंब त्यात पडत असते. वास्तविक जगाच्या दृष्टिने मी सगळ्यांत “भाग्यवान”(बहिणी,मैत्रिणी आणि इतर अनेक महिला यांच्या तुलनेत) म्हणावयास हरकत नाही. काही प्रमाणात ते सत्यही आहे मग ते चेह-यावर का दिसत नाही? कि मी दाखवत नाही?हा मलाच स्वत:लाही पडलेला प्रश्न आहे. अनेक घटना, परिस्थीती आणि संस्कार माणसाला घडवितात असे म्हणतात. एकटी/शेंडेफळ असल्यामुळे म्हणा किंवा लहान वयातच मोठी जबाबदारी घ्यायची(स्वतंत्र बाणा जोपासला गेल्यामुळे) सवय,किंवा“छोट्याशा यशाने हुरळुन जाऊ नकोस” हे मनावर सारखे बिंबवले गेले असल्यामुळे म्हणा खुषी/समाधान चेह-यावर दाखविणे मला जमत नसावे कदाचित.दुसरी गोष्ट वडिलांना लहानपणापासुन बघत आल्यामुळे हे अनुवंशिकपण असु शकते. त्यांनी “गीता” अगदीच अंमलात आणली होती,मला मात्र जमत नसावे.एवढे सगळे माहित असुनही मला काही फरक पडत नाही हे मात्र खरे. विनोद,विनोदी चित्रपट,मालिका आवडत असुनही मी हसते मात्र माफकच. माझे स्मितहास्य मात्र सगळ्यांनाच आवडते हे विशेष!

            याचा अर्थ  असा मात्र होत नाही कि मी भावनाशुन्य आहे, मला कुणाची पर्वाच नाही. अर्ध्यापेक्षा जास्त वय झाले, आता कसली सुधारणा होणार कप्पाळ! एकुण काय तर मला बघितल्यावर आनंदच होईल असे मी खात्रीने नाही सांगु शकत. मदत करणे, विचारपुस करणे, वेळ्प्रसंगी समोरच्याचे बोलणे( वाकडे का होईना) शांतपणे ऐकुन घेणे,नको तेही ऐकुन घेते पण मला उलट बोलणे जसे जमत नाही तसेच “अरेला कारे करणेही जमत नाही” हा कदाचित गुण समजायचा की अवगुण? त्यामुळे मनाला खुप त्रास होतो, ही व्यक्ती अशी कशी बोलली? बोलतांना समोरच्याला काय वाटेल? याचा विचारच करत नाहित का? भावनांचा कोंडमारा कि काय म्हणतात ते होत असावे कदाचित. ठामपणे स्वत:चे मत मांडणे जमत नाही, अश्रुंचे प्रदर्षन करायला आवडत नाही. त्यामागे एक व्यावहारिक दृष्टिकोनही असु शकतो. मला जास्त चौकशा केलेल्याही आवडत नाही कारण मी स्वत:ही कोणाच्या करित नाही. ब-याच वेळा याचा लोक गैरफायदाही घेतात. हे कळत असुनही वळत नाही हे विशेष. मुली त्यावर म्हणतात,”नाही म्हणायला ठामपणे आधी शिक.”मग सगळे आपोआप जमेल. जेव्हा संघर्षाचे दिवस होते तेव्हा एकदा एका डॉक्टरने मला सल्ला दिला होता, सहन होत नाही ना मग लिहुन काढ आणि लिहिलेले फाडुन टाक, मनात मात्र अजिबात साठवुन ठेऊ नकोस. कदाचित त्यामुळेच लेखन/वाचन आवडत असावे.

         एकदा एका मानसोपचार तज्ञाने माझ्या बाबतीत असा निष्कर्ष काढला होता कि, मला खुप शिकायचे होते पण ते जमले नाही म्हणुन ती इच्छा मारली गेली. खरेही आहे हे काही प्रमाणात पण त्याला आता किती वर्षे झाली. आता एवढी वर्षे हे कसे मनात राहु शकते?असे मनात डोकावणे कधी तरी जमले पाहीजे प्रत्येकाला. मला आता काय पाहिजे? काय होतं ते भुतकाळात जमा झाले, उद्याचा वेध घेता आला पाहिजे. वेळेचा सदुपयोग करणे आणि मनाचा थांगपत्ता शोधणे शक्य झाल्यास किती छान होईल ना! तुम्ही असा विचार करता का? शोध लागतो का असा मनाचा? हेपण एक कोडेच वाटते कधी कधी. मोनालिसाचे “गुढ हास्य” हेच तर सुचवित नसेल ना? मोठी माणसे बनण्याचा हा एक प्रवास असु शकेल का? माहित नाही. माझ्याकडे त्रयस्थपणे बघावेसे वाटले म्हणुन हा लेखन प्रपंच एवढेच.

 

                

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव