सुरक्षा कवच
“जिंदगी साथ भी..जिंदगी के बाद भी.”हम है हमेशा! अशा अनेक जाहिराती बघुनच तुम्ही मोठे झाले असाल ना? एकेकाळी जीवनविम्याला पर्याय नव्हता. मराठी अभिनेत्री या जाहिरातीत असल्यामुळे जास्त जवळीकीची वाटायची. आता अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. वेगवेगळ्या योजना येत असतात. तुलनात्मक फायदे/तोटे लक्षात घेऊन प्रत्येकाने “जीवनवीमा” घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे. असे कळते कि,एकुण लोकसंखेच्या फक्त 10%लोकच वीमाधारक आहेत. म्हणजेच अजुनही म्हणावी तेवढी जागरुकता दिसुन येत नाही. तसेही कंपन्या आपापल्या कर्मचारी/अधिका-यांची विमा काढतच असते. नोकरी सोडल्यानंतर कधी ही रक्कम मिळते तर बहुधा मिळत नाही. अपघात कर्तव्य बजावत असताना झाल्यासच काही ठिकाणी लगेच मिळतो. त्यासाठी सरकारने विमाधारकांना प्राधान्य तत्वावर उपचार मिळावेत यासाठी दवाखानेपण निर्माण करुन कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत.
श्रीमंत माणसांपासुन
गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी हप्ता आणि आयुष्य यांचे मुल्यांकन करुन त्याप्रमाणे
आपले आयुष्य सुरक्षित करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. तुम्ही म्हणाल जिथे रोजचे
खाणे/पिण्याची भ्रांत आहे तिथे कुठे ही सुरक्षितता. सध्या अशी परिस्थिती आहे
कि,माणुसच सगळ्यांत स्वस्त झालेला आहे. कोणी रस्त्यावर झोपल्या ठिकाणी चिरडले
जातात. हायवेवर हिट ॲड रन केसेस होतात. रोगराईपण जेवढे उपाय तेवढे वेगवेगळ्या
स्वरुपात येऊन आयुष्या पणाला लागते. करोनाचा अनुभव आपण 4 वर्षांपुर्वी घेतलेलाच
आहे. तेव्हापासुन तरी माणसाने आयुर्विम्याबद्दल जागरुक व्हावयास हवे.
आयुर्वीमा म्हणजे हयात असेपर्यंत ठराविक कालावधीपर्यंत
ठराविक रक्कम भरुन आपले ,कुटूंबाचे आयुष्य सुरक्षित करणे. ही रक्कम नंतर मुलांचे
शिक्षण, लग्नासाठी घर घेण्यासाठी उपयोग हौऊ शकते. याशिवाय ही पोलिसी तारण ठेवुन
कर्जही घेता येते. ही रक्कम मिळतांना आपली स्वत:ची रक्कम अधिक व्याज अधिक बोनस अशी
एकुण मोठी रक्कम एकत्रितरित्या मिळते. काही कारणाने निधन झाल्यास हि रक्कम त्वरित
दिली जाते. यासाठी प्रामाणिकपणे त्या कालावधीपर्यंत हप्ते भरणे सक्तीचे असते. न
भरल्यास ती पोलीसी एकतर रद्द होते किंवा तेवढीच रक्कम मिळते जेवढी भरलेली असते.
विम्याबद्दल एक गैरसमज आहे मी एकदम फिट ॲड फाईन आहे मला विम्याची गरज नाही किंवा विमा
काढला कि,माणुस लवकर मरतो.काय म्हणावे याला? मरण काय आपल्या हातात आहे का? होणारे
मानसिक,आर्थिक नुकसान भरुन काढणे जर शक्य असेल तर नक्किच प्रयत्न करावा असे मला
वाटते.
यासाठी लागणारी ठराविक रकमेची खात्री,वैद्यकिय
तपासणी आणि पेपर वर्क,पद्धती याबाबत बरेच जण उदास असतात. तसेच तो माणुस गेल्यानंतर
कोण हे सगळे करणार? हाही एक मोठा प्रश्न असतो. एका माणसाचे मात्र मला नेहमी कौतुक
वाटते. त्याने एकदा असे सांगितले की,जिथे निधन होते तिथे तो मुद्दाम जाऊन सगळी
विम्याबाबत चौकशी करुन त्यांना सगळे फायदे मिळवुन देतो. स्वत: तो एजंटपण आहे मात्र
ही एक सामाजिक जबाबदारी समजुन हे काम तो स्वेच्छेने करतो. खरेच,मला त्याचे खुप
कौतुक वाटले. तो नेहमी म्हणतो”निधन झाले की, दुखवटा पाळायला सगळेजण येतात मात्र
अशी (अप्रत्यक्ष रित्या) आर्थिक मदत
करायला कोणी तयार नसते. त्यामानाने सरकारी खात्यात ही मदत त्या खात्याकडुन आणि
त्याच्या सहका-यांकडुन आपणहुन दिली जाते. त्याबद्दलही मला नेहमी अभिमान वाटतो.
विम्याचे अनेक प्रकार आहेत. अपघात,संपत्ती,वाहन, प्रवास तो कधी सामुदायिक तर कधी खाजगी/वैयक्तिक असतो. पिकविमा, कलेचा (लता मंगेशकर-गळ्याचा), चित्रकार-चित्राचा, हल्ली गणपती मिरवणुंकित गणपतीचा/दागिन्यांचा (5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस) असा तात्पुरता विमाही काढता येतो. हजार,लाख आणि करोडोंचा विमा काढुन आपण बिनधास्त राहु शकतो. तो कालावधी संपला कि, मात्र कोणतीही रक्कम परत मिळत नाही, जसा वैद्यकिय विमा. आजारी नाही पडलात तर तेवढी रक्कम वाया जाते म्हणुनही काहीजण काढत नाहीत. त्याऐवजी थोडी जरी रक्कम बोनस किंवा इतर कारणाने परत दिल्यास कदाचित लोक तयार होतील. जसे वाहन धारकाला हेल्मेट घालणे सक्तीचे असते. त्यामुळे अपघात होत नाहित असे नाही पण झाला तरी त्याच्या डोक्याला मार लागत नाही. ठराविक वयानंतर ( साधारण 25 नंतर) तसेच वैयक्तिक आयुर्विमा व वैद्यकिय विमाही सक्तीचा झाला पाहिजे. मुले-मुलीही आपल्या आई-वडिलांना त्यांचा विमा काढुन अशी मदत करु शकतात. वय वर्षे 18 ते 60/65 पर्यंत केव्हाही असा विमा काढता येतो. आता तर त्यात नातवंडांचीही सोय केलेली आहे. कमाल आहे ना, फक्त आर्थिक सुरक्षितता हा दृष्टिकोन न ठेवता सामाजिक सुरक्षाही लक्षात घेतली गेली आहे. कंपन्यांचाही यात फायदाच असतो पण असु दे ना स्वार्थाबरोबर परमार्थहि होतो ना!
कधी कधी हे सुरक्षाकवच( विमा पोलिसी) मारेकरी ठरतो हेही विसरायला नको. अर्थात ही श्रीमंतांच्या बाबतीत जास्त शक्यता असते. ती व्यक्ती मेली की, तो लाभ मिळण्यासाठी अनेक अघोरी उपाय योजले जातात. अर्थात सगळेच यशस्वी होतात असे नाही कारण “नैसर्गिक निधन” ही प्रामुख्याने अट असते त्यामुळे कधी कधी नुकसानही होते. काही आजार पोलीसी घेतांना लपविले आणि नंतर उघडकिला आले तरी विम्याची रक्कम मिळत नाही. कमावती व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या कुटूंबाचा एकदम आर्थिक आधारच कोसळतो तेव्हा “थोडी आर्थिक मदत व्हावी” या हेतुने हि रक्कम त्याच्या वारसांना (पत्नीला/पतीला) मिळते ज्यामुळे ते ताठ मानेने जगु शकतील. काही प्रमाणात आर्थिक समस्या सोडविण्यास मदत व्हावी. तेवढीच आपली त्यानिमित्त्याने बचतही होते व तेच पैसे इतरांनाही उपयोगी पडतात. अप्रत्यक्षरित्या आपण एकप्रकारे दुस-यांना मदत व स्वत:च्या खर्चावर संयम/नियंत्रण राखित असतो.
अध्यात्म्यात स्त्रोत्र वाचणे, नामजप करणे, देवाची पुजा अर्चा करणे, सामुदायिक प्रार्थना
करणे हे एक प्रकारे वाईट शक्तींपासुन बचावासाठीच योजिले आहेत. याला अध्यात्मिक/मानसिक सुरक्षाकवच
असे म्हणावयास हरकत नाही.अशावेळी दुस-यांची
शिस्त तुम्ही का नाही अंमलात आणत? ठराविक दिवशी/वेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच.
अशी एकत्रित उर्जा जास्त शक्तीवर्धक असते. मंदिर, मस्जिद, चर्च, अग्यारी, गुरुद्वारा
त्यासाठीच असतात. घरी एकट्याने प्रार्थना करण्यापेक्षा एकत्रित येऊन करणे जास्त परिणामकारक
ठरते. आता
तुम्ही किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबुन आहे. एक मात्र नक्की आत्मविश्वास वाढतो आणि “सर्व काही तो सांभाळतो” असे समजुन बिनधास्त कोणतीही जबाबदारी घ्यायला माणुस मोकळा असतो. कर्णाला जन्मजात कुंड्ले
होती पण ती राहिली का शेवटपर्यंत? कवच-कुंडले असेपर्यंत तरी कर्ण अजिंक्य होता एवढे
नक्की. याचा अर्थ असा नाही कि, कवच-कुंडले घातली म्हणजे काही अघटीत घडणारच नाही,असे
नाही मात्र त्यातुन सावरण्यांस स्वत:ला व इतरांनाही मदत होईल. ताण-विरहित जगणे सोपे
जाईल. आपल्यानंतर आपल्या कुटूंबाचा विचारही यात केला जातो हे महत्वाचे.
पोलिसी
काढल्यानंतर घरी कुटूंबाला सांगणे, लिहुन ठेवणे, सुरक्षित ठेवणे, तसेच त्याचे महत्व
पटवुन सांगणे हेही तेवढेच महत्वाचे. याशिवाय विम्याचे हप्ते भरण्याची जबाबदारीही घेतली
पाहिजे. अप्रत्यक्षरित्या आपणही कुणाचे तरी भले करीत असतो, तसेच आपलेही कधीतरी चांगलेच होणार असते. असा सकारात्मक
विचार करुन जर पोलिसी काढली तर नक्किच “एकमेकां सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ” असे नाही
का होणार? बघा, अजुनही विचार करा. पोलिसी काढली नसेल तर लगेच काढा. कोणाकडुन, कशी,केव्हा
काढायची यासाठी एजंट नक्किच मार्गदर्शन करतात. हल्ली आंतर्जालामुळे तुलनात्मक अभ्यास
करुन निर्णय घेणे सोपे होते. एक म्हण आठवत असेलच तुम्हाला, “गाजराची पुंगी वाजली तर
वाजली नाहितर कापुन खाल्ली”. तुम्ही फक्त तुमचे बजेट,कालावधी आणि शेवटपर्यंत पैसे भरायची
तयारी ठेवुन त्याचा लाभ नक्किच घ्यावा ही विनंती.

Comments
Post a Comment