शिवकालीन रण-रागिणी-भाग-2- “महाराणी येसुबाई”
मागच्या भागात आपण जीजाबाई भोसले (शिवाजीची राजमाता) यांच्याबद्दल माहीती आणि त्यांची ओळख करुन घेतली. या भागात आपण दुस-या महाराणी(पहिल्या सोयराबाई भोसले) येसुबाई यांची माहीती आणि ओळख करुन घेऊया. अनंत लिबिले लिखीत कादंबरी “ महाराणी येसुबाई “ नुकतीच वाचनात आली. इतिहासातील अनेक व्यक्ति अनभिज्ञच असतात. तरी आता चित्रपट, दुरदर्शन मालिका आणि सामाजिक माध्यमावरील व्हिडिओ, लेखनावरुन थोडया आठवणी जगविल्या जातात हे महत्वाचे. शिवकालीन रणरागीणी या विषयावरुनच त्यांचे महत्व अधोरेखित होते याशिवाय स्वत: संभाजीराजेंनी ज्यांचेबद्दल “ श्री सखी राज्ञी जयती “ असे गौरवाद्गार काढले होते त्या “कशा” होत्या हे कुतुहल होतेच कादंबरी वाचताना. थोडेसे आपल्यालाही कळावे म्हणुन हा लेखनप्रपंच.
शृंगारपुर
येथे 1658 साली जन्मलेली पिलाजीराजे शिर्केंची “राजस” अगदी वयाच्या 5 व्या वर्षीच शिवाजीराजेंच्या
दृष्टीने “भावी सुन” म्हणुन हेरली गेली होती. वास्तविक पिलाजीराव शिर्के पुर्वी मोगल
दरबारी सरदार असताना त्यांचे मन वळवुन त्यांना स्वराज्यात घेण्यातला दुरदर्शीपणा नंतर
राजेंना भावी सुन रणरागिणी म्हणुन होण्यात झाला. अशी ही “राजस” नंतर येसुबाई भोसले
म्हणुन सासरी आल्यावर पुर्णपणे जिजाबाईंच्या आणि शिवाजीराजेंच्या तालमीत आपोआप घडत
गेली आणि एक आदर्श सुन,पत्नी,माता आणि महाराणी म्हणुन प्रसिद्ध झाली.
लहान असतानाच नवरा जीवंत असुनही “विधवा” म्हणुन जगणे.(आग्र्याहुन सुटका झाल्यानंतर शिवाजीराजांनीच “तशी” अफवा पसरविली होती-शंभुचे निधन). घरात जीजाबाई व पुतळाबाईंना पाचडला पाठविणे, सोयराबाईंचा असहकार व होणारी अन्यायकारक वागणुक अशा अनेक घटना प्रसंगावधान राखुन त्यांनी खंबीरपणा दाखविला. माहेरचा दुस्वास आणि स्वराज्यातल्या “छाव्या”ला सांभाळणे, त्यांच्या राग व अन्यायाला विरोध यावर अंकुष ठेवणे, अन्यायाची चीड योग्यवेळी दाखविणे, राज्याची “कुलमुखत्यार” म्हणुन शिक्के कट्यार सांभाळणे, महाराणी म्हणुन शिवाजीराजेंच्या निधनानंतर अंतर्गत बंडाळी मोडुन स्वराज्याला धोका न पोहोचु देणे अशा अनेक आघाड्या एकाच वेळी सांभाळणे सोपे नव्हते. हे आव्हान त्यांनी एक हाती सांभाळले. आई-विना पोर म्हणुन संभाजींची काळजी व ते मोघलांना जाऊन मिळाल्यानंतरचे बिथरलेले अष्टप्रधान आणि त्यांना सावरायला होणारी एकट्या सरसेनापती हंबीररावांची मदत घेऊन राजकारण व सैंन्याचे मनोधैर्य कुठेही खचता कामा नये यासाठी घेतलेले कष्ट याची मोजदादच करता येणार नाही. प्रत्यक्ष मोघलांना तोंड देणे शक्य नसल्यामुळे स्वराज्याचा “वारस” सुरक्षित हलवुन स्वत: त्यासाठी कैद पत्करुन संभाव्य धोका टाळणे.
याशिवाय दीर,अज्ञान/लहान व भोळे रामराजे, ताराराणी(जाऊबाई) व स्वत:ची मुले शाहु व भवानी (भावी स्वराज्याचे वारस म्हणुन) त्यांच्यावर संस्कार तसेच राजकारणाचे धडे देणे, सल्ला मसलत करणे, संभाजीराजे कायम मोहिमेवर असताना राज्यकारभार सांभाळणे, स्वराज्य आणि रयतेसाठी सर्वस्वाचा त्याग करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष युद्धात भाग नाही घेतला तरी करुन दाखविल्या. औरंगजेबाच्या कैदेत ऐन उमेदिची 29 वर्षे काढल्यानंतर सुटका होउन साता-याला स्वगृही परतणे. स्वत:चे वैयक्तिक दु:ख बाजुला ठेऊन स्वराज्यासाठी लढा देणारी ही रणरागीणी वयाच्या 72 व्या वर्षी निधन पावली. आपण मात्र दुर्दैवी त्यांची जन्म-मृत्यूची नोंद नाही ठेऊ शकलो. अशा या रणरागिणी, त्यागमुर्ती व मातृदेवता “महाराणी येसुबाई”ना शतश: नमन.
Comments
Post a Comment