आपल्या समाजातील वाढती व्यसनाधीनता

            व्यसन लागण्याची अनेक कारणापैकी ताण-तणाव, मजा मस्ती,संगतीचा परिणाम किंवा दुसरे काहीही न करता आल्यामुळे निराशेतुन बाहेर पडण्यासाठी अशी सांगता येतील. तसेचवातावरण,उपलब्धता व नियंत्रणाचा अभाव असेही म्हणता येईल. यासाठी कधी कधी सामाजिक स्तर किंवा दिखावाही कारणीभुत असु शकतो. काळानुरुप ही व्यसने बदलत असतात. सध्याचे “मोबाईल,आंतर्जाल,सामाजिक व कृत्रिम बुध्दिमत्तेबाबत” वेडाबाबत असेच म्हणावे लागेल. हे एक प्रकारचे व्यसनच लहानपणापासुन मुलांना लागतेय असे कधी कधी दिसुन येते. कमी-अधिक प्रमाणात वाहवत जाणे होत असल्यामुळे त्यावर ती व्यक्ती स्वत:च नियंत्रण करु शकत नाही. आताची सामाजिक  माध्यमे,मोबाईल,चाट-जीपिटी, एआय मात्र तरुणांना स्वत:चे अंगभुत कौशल्य विसरायला लावेल कि काय? अशी एक अनामिक भिती निर्माण करित आहे. आपण आपल्यावरचे नियंत्रण तर गमावुन बसणार नाही ना? अमुल्य वेळेचा दुरुपयोग तर होणार नाही ना?  याशिवाय त्याचे होणारे दुष्परिणामांचा फटका तर इतरांना बसणार ना? या विचाराने कधी कधी अस्वस्थ व्हायला होते.

            दिवसेंदिवस कमी होणा-या किंमतीमुळे मोबाईल गरजेचा विषय ठरला. जोपर्यंत हा उपयोगी संपर्काचे साधन होता तोपर्यंत काहिच त्रास नव्हता. यावर अनेक रिल्स, पैसे भरणे/काढणे, चांग़ल्या कामासाठी सामाजिक माध्यमे हाताळणे होता तोपर्यंतही याचे तोटे जाणवत नव्हते. जेव्हा हा मोबाइल लहान मुलांच्या, नको त्या वयात मुलांच्या हातात आला तेव्हा मात्र समस्या सुरू झाल्या. सरसकट मुले असतील असे नाही म्हणत मी पण जी आहेत त्यांचे मुल्यांकन केल्यास या गोष्टींचा विचार पालक,शिक्षक आणि आता सरकार यांनी जरूर करावयास हवा असे वाटते. एकीकडे आपण आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहोत तर दुसरीकडे भावी पिढी या व्यसनात अडकुन कसे चालेल? प्रगतीला मारक तर ठरणार नाही ना? तुम्ही म्हणाल,आपण दुसरीकडे पदके, खेळात प्राविण्य मिळवतोय/ हुशार मुले परदेशी कंपनीत/नासात निवडली जातातच ना! हे प्रमाण आपली लोकसंख्येचा विचार केला तर किती नगण्य आहे हे आपल्या लक्षात येईलच. याशिवाय बाकिचे मुले/माणसे काय करतात मग?

            बोगस साईट तयार करुन पैसे गोळा करणे, मुले/माणसे आत्मकेंद्रित  होत आहेत. घटस्फोट, आत्महत्या,अपघात,दुर्धर रोगांचा विचार केल्यास हे तुमच्या लक्षात येईल. जगात काय घडतेय ते कळेल पण शेजारी काय चालले आहे ते माहित नसणे, सामाजिक सहभाग शुन्य, फक्त फोटो काढणे, पोस्ट करणे, जाहिरातबाजी म्हणा किंवा प्रसिध्दी मिळविणे, कोणत्याही घटनेवर तात्काळ प्रतिक्रीया देऊन मत मांडणे, अगदी अपघात झाल्यावर/कोणी मृत झाल्यास त्याच्या दु:खापेक्षा यांचा बाईट घेणे जास्त मह्त्वाचे असे आढळते.  बातम्या एवढ्या भडक स्वरुपात दाखविल्या जातात की त्यातले गांभीर्यच निघुन जाते. फोटोसुद्धा  हल्ली एआयने काढलेले असतात त्यामुळे पुर्वी जे प्रत्यक्षदर्षी/वास्तव चित्रण असे म्हटले जायचे आणि ते खरेच कौतुकास्पद वाटायचे. बोलण्याची भाषापण सौजन्य किंवा माहितीदर्षक नसुन त्यातील यंत्रवतपणा जाणवतो. 

             सगळेच ओनलाईन मिळत असल्यामुळे वस्तू शोधणे, दर्जा तपासणे, घासाघीस करणे, ग्राहकांशी संबंध प्रस्तापित करणे, विचारांची देवघेव असे काही होतच नाही. कित्येकदा रेव्यु(review) बघुन होटेल, घर, खाणे-पिणे, फिरणे शोधले जाते. तीच गोष्ट पैसे काढणे, घालणे याबाबत, जोपर्यंत आपले पैसे गेलेत हे कळत नाही तोपर्यंत हा गुन्हेगार गुन्हा करुन फरार झालेला असतो. वैयक्तिक बोलणे,फोन करणे, भेटणे हेही शक्यतो टाळले जाते. मुलिंना फसविणे हे तर अनेक चित्रपट,मालिकांमधुन आपण बघतच असतो. पारदर्षी व्यवहार म्हणुन आपण ओनलाईन व्यवहाराला प्रोत्साहन देतो पण व्यक्तिगणिक होणारे दुष्परिणाम, समाधान आणि मिळणारी सेवा यांचे गुण्णोत्तर कसे तपासणार? तुम्ही जे रोबोटला सांगणार त्याचा आढावा घेऊन तो निष्कर्ष काढुन त्याप्रमाणे अहवाल देणार. हा कितपत खात्रीलायक आहे किंवा व्यवहार्य आहे ते शेवटी माणुसच ठरविणार ना! आर्थिक गुन्हेपण कुठे ना कुठे बघुनच योजले जातात असेही नंतर उघडकिस येते. “जग एक बाजार“ या तत्वानुसार गुन्हेगार, ग्राहक, मालक आणि बळी पडणारे यांची कुठेच सांगड घालता येत नाही. हे सगळे एका बोटाच्या क्लिकवर मिळणे शक्य झाल्यामुळे त्यावर नियंत्रण कोण व कसे ठेवणार? त्यात पालक आणि शिक्षकसुद्धा त्याचाच आधार घेतात त्यामुळे पारंपारिक शिक्षण हेही हळुहळु नष्ट होणार कि काय? याचीही कधी कधी भिती वाटते.

             या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागणार ते वेगळेच. सगळे काम संगणकावर मग हालचाल कमी, बौद्धिक खाद्य नाही. अतिनील किरणांमुळे डोळ्यांवर, मान, पाठ, कंबर यावर होणारे परिणाम. सामाजिक स्थैर्याचा, जबाबदारीचा अभाव, कामातला एकसुरिपणा आणि खेळकरपणा नसल्यामुळे मनावर होणारे परिणाम, एकमेकांवर असणारा  अविश्वास,चढाओढ, स्पर्धा आणि ताण-तणाव यामुळे येणारी निराशा. घरात दोघेच दोघे मग सांगणार कोणाला ? कोणावरही अविश्वास, निष्क्रियता यामुळे येणारा कंटाळा. असे कित्येक वर्षे निघुन गेल्यावर येणारा तोचतोचपणा.या सगळ्यातुन वेळीच बाहेर न पडल्यास होणारे अनिष्ट परिणाम आणि त्यातुन येणारे आजारपण. कमी वयात येणारे मोठे धोके असे अनेक आवाहने आताच्या पिढीसमोर आहेत. त्यातुनही ते मार्ग काढत आहेतच. पालक/शिक्षक म्हणुन आपणही त्यांना मदत करणे आणि त्यांनी घेणे हेही झाले पाहीजे.

             एकंदरीतच दिवसेंदिवस आपण भौतिक प्रगती साधतोय पण मानसिक शारीरिक वा सामाजिक प्रगतीचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. सगळीच माध्यमे वाईट आहेत असा माझा दावा नाही किंवा सगळेच व्यसनाधीन आहेत असेही मला म्हणायचे नाही. नियंत्रण आणण्यास आतापासुन सुरुवात केल्यास नक्किच  लवकर प्रगती करु शकू. व्यसन सोडविण्यापेक्षा ते लागुच नये यावर जास्त भर देण्यांत यावा. इतर अनेक पर्याय मुले, महिला, पुरुष यांच्यासमोर ठेवल्यास कदाचित ही माध्यमे हाताळणे कमी होईल. तसेच वारंवार होणारे त्याचे दुष्परिणाम यावरही लक्ष देणे गरजेचे आहे.जसे किआरोग्य समस्या, वेळ घालविणे, छंद जोपासणे,वैयक्तिक लक्ष देणे, कृतीशिलता किंवा निर्मितीक्षमतावाढीसलावणे, ठराविक वेळेतच/वयातच त्याचा वापर किंवा मर्यादित विक्री असे नियम केल्यास काही प्रमाणात हे व्यसन कमी होईल अशी आशा व्यक्त करुया.

              बाय द वे, जागरुकता, संयम आणि परिस्थिती सुधारणे शेवटी आपल्याच हातात आहे.आपण यात नाही ना याचा विचार करुन तसे सुधारुया. एक सुदृढ समाज घडविण्याचे आवाहन सगळेजण मिळुन पेलुन त्यावर उपाय शोधुया.

                                                      !!  यशस्वी भव !!     



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव