आचार संहिता ( code of conduct)
“आदर्श आचार संहिता ही एक महत्त्वपूर्ण निवडणूक सुधारणा
आहे, जी भारताच्या लोकशाहीला मजबूत आणि निष्पक्ष बनवण्यात मदत करते. याचे प्रभावी पालन
निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांची जबाबदारी आहे. आचार संहिता निवडणूक प्रक्रियेच्या
स्वच्छतेचा, निष्पक्षतेचा आणि समान संधीचा अनुभवणारा एक आवश्यक पैलू आहे, जो भारत निवडणूक
आयोगाद्वारे लागू केला जातो. याचे नियम आणि निर्देश निवडणूक आयोग वेळोवेळी अद्ययावत
करते जेणेकरून ते अधिक प्रभावी राहू शकतील.”
निवडणुकिच्या दिवसांत याचे महत्व दिसुन येते. वर्तुणूकीचे नियम किंवा एक जबाबदार नागरिकाराचे अधिकार आणि कर्तव्य ( पुर्वी शाळेत हा एक विषय होता, आता माहित नाही) याची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. टि.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यापासुन आचार संहिता सक्तीचे असते ज्यात सर्व नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यांत आली. माझी नेमणुक सरकारी खात्यातली असल्यामुळे ब-याच गोष्टींचा संबंध येत होता. सर्व सामान्य माणसाला आणि राजकिय नेत्यांना कदाचित हे नियम जाचक वाटु शकतात. याचे उल्लंघन झाल्यास मात्र कायदेशीत कारवाई होऊ शकते हे लक्षात घातले पाहिजे.
निवडणुकीची तारीख आणि निकालाची तारिख या कालावधीत सर्वसाधारणपणे ही आचार-संहिता लागू असते. सगळ्यांची लगबग लगेच चालु होते. शासकीय निर्णंयांवरसुद्धा बंदी असल्यामुळे बराच फरक पडतो. मतदाराला आकर्षित करण्यासाठी होणा-या घोषणा, कृती आणि आश्वासनांवरसुद्धा नियंत्रण येते. निवडणुक आयोगाची बारिक नजर या दरम्यान सगळीकडे असते. निवडणुक कार्यालयाला पुर्ण अधिकार या काळात असतात. लोकशाहीतील महत्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये हे एक मार्गदर्षक तत्व म्हणुन वापरले जाते. उल्लंघन झाल्यास दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो.वास्तविक आपण जरी स्वतंत्र झालो तरी कायद्याच्या चौकटीत राहुनच वागावे लागते. नितीनियम,संस्कार हे यासाठीच (पिढीजात) महत्वाचे असतात. अन्यथा अनाचार, अनागोंदी,स्वैराचार माजु शकतो. सुदृढ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी संयम आणि चौकटिचे महत्व लहान वयातच पटविणे गरजेचे आहे.
यासाठीच आई-वडिल,शिक्षक आणि बालक या तिघांमध्ये
सुसूत्रता असणे आवश्यक आहे हे आजच्या/कालच्या शिक्षक दिनानिमित्त पुन्हा एकदा
सांगावेसे वाटते. तसेच सामाजिक संकेतांचेही पालन होणे आवश्यक आहे. जसे कि,हल्ली
वेळ नाही या सबबीखाली अनेक शोर्टकटस शोधले जातात. धार्मिक परंपरा तर मोडण्यांतच
काहिजण मोठेपणा समजतात. याचे कुठे लिखित साहित्य उपलब्ध आहे का? असेही विचारले
जाते. हे विधी-शास्त्र करुनच समाधान मिळणार का? याची शाश्वती विचारली जाते. केवळ
विरोध करणे हेच मुख्य ध्येय असल्यासारखे काहीजण ऐकुनच घ्यायला तयार नसतात. आम्ही आता
सक्षम असुन आमचे भलेबुरे आम्ही बघु शकतो असा एक आत्मविश्वास वाढत जातोय. “सोय आधी
बघा मग जमले तर करु” असाही उदार मतवाद दाखविला जातो. मुले मोठी झाल्यानंतर पालक/शिक्षकही
जबरदस्ती/आग्रह करु शकत नाहीत. विनाकारण एकमेकांना का दुखवा? हा सुरक्षित विचार
केला जातो दोघांकडुनही.
तसेही
पालक/शिक्षक आता मुलांना स्वातंत्र्य देऊन आकाश खुलेच करतात. जबाबदारी पुढच्या पिढिची
ठरते कि काय योग्य/अयोग्य ठरविण्याची. अपयश आल्यास त्यातुन बाहेर पडण्याची. दिवस-रात्र
कामात मग्न असल्यामुळे एकमेकांना वेळ देण्यापासुन ते शिक्षण,बाल-संगोपन,लग्न,नोकरी,
व्यवसाय शोधण्यांपर्यंतचे निर्णय घेतांना आवश्यक असलेली लवचिकता आणि
फायदे-तोट्याचे गणित सगळेच बघणे,समजुन घेणे एकट्याला शक्य आहे का? मग त्यासाठी
लागणारे मार्गदर्शन आणि सहभाग कोणाचा तरी लागतोच ना, सगळे स्वयंभूच असतात का? कोणीतरी
वाढविले,योग्य तेथे काटछाट केल्याशिवाय झाडे वाढतात का? योग्य वेळी कात्रीने काही
भाग कापावा लागतो, किड लागली/लागु नये किटकनाशकाचा फवारा मारावा लागतो. हे सगळे
करण्यासाठीचेच हे नियम, आचार-संहिता आणि सामाजिक संकेतांची आवश्यकता असते.
अनिर्बंध स्वातंत्र्य हे कधीच अपेक्षित नसते/नसणार. नियमांच्या चौकटीत राहुनच
स्वातंत्र्य उपभोगता येते. जाचक अटिंचा/नियमांचा नक्कीच विरोध व्हावयास हवा पण जे समाज-हितासाठी
आवश्यक आहे त्या नीतीनियमांचा आदर झालाच पाहीजे असे मला वाटते.
सार्वजनिक ठिकाणी वागणे हेही एक आवाहन असते आणि ते सगळ्यांनीच स्वेच्छेने अंग़िकारले पाहिजे. सर्व-धर्म समानता,समान संधी आणि सहिष्णुता हे आपण सगळ्यांनीच अंगिकारले पाहिजे त्यासाठी आवश्यक तेथे प्रशिक्षण (धार्मीक,आध्यात्मिक) दिले गेले पाहिजे. परदेशात शिस्त पाळणारे,कौतुक करणारे, इथे आल्यावर मात्र तिथले धडे विसरतात. स्वच्छता, दुस-यांना/ज्येष्ठांना मान देणे, न थुंकता प्रवास करणे, सार्वजनिक जागेत धुम्रपान टाळणे,कचरा न टाकणे हे सुद्धा आपण पाळत नाही,मोबाईल बंद/साइलेंटवर ठेवणे, मोबाइलवर हळु आवाजात बोलणे, हेही शिकवावे लागणार का? बघा पटते का तुम्हाला? जर पटले तर लगेच अंमलबजावणी करायला लागा हिच खरी बाप्पा चरणी प्रार्थना.
Comments
Post a Comment