सुरक्षा कवच भाग-3- विचार करा आणि श्रीमंत व्हा.

         “CONTROL OF YOUR SPENDINGS, EMOTIONS & TIME MAKES YOU RICH TO REACH”

                                                                    --Warren Buffet

            नुकतीच दिवाळी सुरु झालेली आहे. खरेदी,फराळ,सुट्टी आणि कौटुबिक,वैभवशाली असा हा सण सगळ्यांनाच आनंद देऊन जातो. पुर्वी बोनस, आगाऊ रक्कम किंवा उचल त्यानिमित्त्याने मिळायची. आताही डिव्हीडंड ,व्याज आणि वेगवेगळ्या योजना त्यासाठी आखलेल्या असतातच. ह्या अधिकच्या पैशातुन ब-याचजणांची स्वप्ने पुर्ण होतात तर काहिजणांना तात्कालीक समाधान देऊन जातात. “विचार करा आणि श्रीमंत व्हा”असे नेपोलियन हिल म्हणतो. जगण्यासाठी पैसा,आरोग्य आणि जिद्द/महत्वाकांक्षा या लागतातच. एक साधन म्हणुन पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तो मिळवण्यासाठीची धडपड तर माणसाला आयुष्यात खुप काही शिकवुन जाते.

           आपली संस्कृती भौतिकवादाला महत्व देत नसल्यामुळे आपण भारतीय पैशापेक्षा समाधानाला जास्त महत्व देतो. आताची पिढी मात्र हे सगळे ओळखुन तसे तंत्र आत्मसात करुन आणि त्यांची तशी वागणुकही असते. यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शक्ती असल्यास पैसा आपणहुन चालत येतो यावर विश्वास ठेऊनच पावले उचलावीत. अव्याहत मैत्री, सुसंवादी कौटुंबिक संबंध, व्यावसायिक भागीदारी आणि समजुतदारपणा मानसिक शांतीसाठी पैसा हे एक माध्यम असुन ते ध्येय नसावे असे जुनेजाणते लोक सांगत. “तुझे आहे तुजपाशी पण तु वाट चुकलाशी”असे ब-याच वेळा होते पण हरकत नाही जेव्हा लक्षात येईल तेव्हासुद्धा आपण ती चुक/वाट सुधारू शकतो. थोडा संयम,वेळ आणि विश्वास बाळगुन मार्ग काढणे महत्वाचे.

           त्यासाठीच सुरक्षाकवचाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे कवच मानसिक, शारिरीक,आर्थिक आणि सामाजिक स्वरुपाचे असते. ते लाभण्यासाठी लहानपणचे संस्कार, आगाऊ सुचना, प्रतिबंधित उपाय आणि कोणत्याही संकटांवर मात करण्याची जिद्द कोणत्याही युद्धात विजय मिळविण्यासाठी आवश्यक असते. हल्ली प्रत्यक्ष युद्ध क्वचित  आढळत पण अप्रत्यक्ष,छुपे आणि अघोरी उपायांनी नामोहरम करण्याचे प्रयत्न मात्र सतत होत असतात. शत्रु पण बाहेरचा नसतो तर अंतर्गत किंवा घरातलाच असतो. अशा वेळी जास्त सजगता बाळगणे आवश्यक असते. नुसते शस्त्र हातात घेतले म्हणुन होत नाही तर ते चालवायचे ज्ञान आणि भान असणे आवश्यक असते. काहीजण आपले भाग्य,नियती किंवा पुर्वसंचित म्हणुन हत्यार म्यान करतात तर काहिजण नियतीलासुद्धा हरविणारे असतात. अगदी दिव्यांग,विकलांग किंवा आधुनिकतेचे/प्रगतीचे कोणतेही साधन उपलब्ध नसतानासुद्धा यशस्वी होणारे अनेकजण आपण बघतच असतो. आपल्याला तर देवाने सदृढ शरीर,मन आणि बुद्धि दिलेली आहे,तर मग आपण मागे का? तिचा वापर करुनच श्रीमंत होऊ शकतात. एवढे भांडवल तर कोणालाही,कधीही आणि कसेही श्रीमंत बनवु शकतो फक्त प्रचंड इच्छाशक्ती आणि ताकद/जिद्द हवी.

          देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा तारुण्य यासाठीच दिलेले असते. धर्म,कर्म आणि मोक्ष ज्या अध्यात्म्याच्या पाय-या दिलेल्या आहेत त्या याच. काहीजण म्हातारपण आले म्हणजे आता सगळे संपले असे समजुन हात-पाय गाळुन बसतात किंवा मुला-मुलींवर अवलंबुन असतात. कशाला कुणावर अवलंबुन राहायचे? तुम्ही शेवटपर्यंत सक्षम राहा ना! उलट जे आजपर्यंत कमावले त्याचा उपभोग घेऊन उर्वरित पुढे सरकविणे हेच कायम ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आधी स्वत: खंबीर बनणे गरजेचे आहे त्यासाठीच हे सुरक्षारक्षक धीर देणारे ठरते. मग तो पैसा,अध्यात्मिक शांती किंवा संस्कार असोत. आता सगळे संपले असे नसुन आता तर सुरुवात झाली असे समजुन समाजासाठी थोडा वेळ, कुटूंबाला आणि स्वत:ला थोडा वेळ दिल्यास सर्व काही शक्य होईल. त्यासाठी लागणारी सकारात्मकता आणि स्वत:चा सहभाग देण्याची तयारी असणे महत्वाचे. मुले-मुली इथे असोत वा नसोत,त्यांचे लक्ष तुमच्याकडे लक्ष असो वा नसो,“हम है राही प्यारके” म्हणत उरलेले दिवस शांती,समाधानात,जीवन-युद्ध जिंकुन मोक्ष प्राप्त करणे हेच इती कर्तव्य नाही का? मुलांसमोरही आदर्श ठेवणे गरजेचे नाही का?दिवाळीच्या पाडव्यानिमीत्त्य हा संकल्प नक्कीच व्हावा.

         बाय द वे,”जिथे कमी तिथे आम्ही” हे तत्वही एकप्रकारे एकमेकांना सुरक्षाच देत असते, तुम्हाला काय वाटते?

                


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव