विनोदवीरांचा सहभाग

          विनोद हा खरे तर जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वातावरण खेळीमेळीचे करण्यासाठी किंवा काहीजणांना उपजतच खुसखुशीत बोलण्याची सवय असते. पार्टी,मित्र-मंडळीत विनोद सांगण्यासाठी विशेष आग्रह केला जातो. हल्लीचा स्टॅंड-अप कॉमेडी हा त्यातलाच एक प्रकार. चित्रपट,नाटक दुरदर्शन किंवा पुर्वीचे आकाशवाणीवर सुद्धा विनोदी मालिका “संसार-टेकाडे भावोजी” किंवा मध्यंतरी “चला हवा येऊ द्या,हास्यजत्रा,हिंदीतले आधे-अधुरे,नुक्कड हे सगळे कार्यक्रम किंवा सई परांजपेचे सिनेमे,बासु चटर्जींचे हलकेफुलके असे असायचे. मनोरंजनाबरोबरच काहीतरी संदेश देणेसुद्धा ह्या निमित्त्याने करता येते. साहित्यात तर विनोदी साहित्य,कविता आणि साहित्यिक हे खुप प्रसिद्ध होतात. साहित्यिकांची नावे खुप आहेत तेवढीच कलाकार मंडळीसुद्धा आहेत. नुकतेच असरानी आणि सतीश शहा यांचे निधन झाले त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.

          नुकत्याच एका कॉन्फ्ररन्समध्ये “शोले” मधिल जेलरचा असरानी यानी केलेला प्रसंग़ाला पहिला क्रमांक मिळाला. शोलेच्या यशात हा प्रसंग, सुरमाभुपाळी( जगदीप) तर धर्मेंद्रचा टाकीवरचा प्रसंग किंवा बडबडी हेमामालीनी असे अनेक विनोदी घटनांमुळे जास्त आकर्षक झाला असावा असे माझे प्रामाणिक मत आहे कारण मुख्य कथा तशी गंभीर,मारामारी आणि गब्बरच्या दहशतीमुळे लोकांच्या मनावर ताण यायला नको याची पुरेपुर काळजी चित्रपटात घेण्यात आलेली आहे. विनोदी कलाकार प्रेक्षकांचे हसवुन मनोरंजन करते. असरानींचा नैसर्गिक अभिनय,उत्फुर्त आणि डोळे फिरवण्याची कला वादातीत होती. त्यातच  विनोदि सहाय्यक अभिनेता, जाहिरात व दिग्दर्शनही त्यांचे उल्लेखनीय होते. 50 वर्षाची चित्रपट कारकीर्द, एकुण 350 चित्रपट, त्यांना शेवटपर्यंत (उत्साह वयाच्या 84 व्या वर्षीसुद्धा) कार्यरत ठेवत होता हे विशेष.

           आम्ही मेहमुद, पेंटल,असरानी, केश्तो मुखर्जी,देवेन वर्मा,विजु खोटे,जगदीप,उत्पल दत्त,ओम प्रकाश जॉनी लिव्हर यांचे चित्रपटातील काम बघतच मोठे झालो. त्यात कुठेही व्यंग, टिंगल किंवा भाषा कधीच आगाऊ किंवा अतिरंजीत वाटत नसे. आता मात्र काहीही,कसेही,कशावरही बोलले जाते. तसेच विनोदाची-राणी म्हणुन जिचा उल्लेख व्हायचा ती उमादेवी उर्फ “टुनटुन” मला भारी आवडायची. मराठीत उल्लेख करायचा झाल्यास नुकताच अशोक सराफ यांना 75 वर्षानिमित्त गौरवण्यात आले. त्याआधी दादा कोंडके, शरद तळवलकर, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, मच्छींद्र कांबळी असे अनेक विनोदी कलाकारांचे वर्चस्व होते आणि आहे. विनोदी नायिका म्हणुन हिंदीत दिप्ती नवल,अर्चना पुरणसिंग,अरुणा इराणी, बिंदु, शुभा खोटे तर मराठीत रंजना, निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर,किशोरी शहाणे/विज यांचे बरेच योगदान आहे. स्वत: न हसता दुस-यांना हसविणे तसे सोपे काम नाही. लॉरेल हार्डी,चार्ली चॅपलिन यांचे मुक चित्रपट अजुनही वारंवार पहावेसे वाटतात त्यातच त्यांचे यश दिसुन येते. त्यातला निरागसपणा आणि सहज घडणा-या घटना (थोडा मुर्खपणा/वेंधळेपणा) दाखविणे हे मुख्य काम तोंडावर हसु न आणता करणे खरेच कठिण काम आहे. तरी या कलाकराना म्हणावे तेवढे महत्व दिले जात नाही याचे कधी कधी वाईट वाटते.

            दुसरे कलाकार सतीश शहा.“ये जो है जिंदगी”,स्वरुप संपत, शफी इनामदारमुळे पहावेसे वाटायचे. परेश रावल,अमोल पालेकर हे देखील विनोदी व्यक्तिरेखा साकारत असतात. एकुण चित्रपटांचा विचार केल्यास कदाचित 30-ते-40% सहभाग विनोदी चित्रपटांचा असावा. नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात काहितरी हिरवळ/ हलकेफुलके पाहणे हे आवश्यक असते. तसेच दुरदर्शनवरही पुर्वी “गजरा” सारख्या कलाकृती पहायला मनापासुन आवडायच्या. रेडिओवरही “पुन्हा प्रपंच“ही मालिका अगदी सकाळी 8.00 वाजता लागायची पण ती ऐकल्याशिवाय चैंन पडत नसे. त्यातली सर्व पात्रे सगळ्यांनाच खुप आवडायची. खरे तर त्यांचे चेहरे किंवा काही दिसायचे नाही पण तरी आनंद (ऐकिव)मात्र खुप व्हायचा. सर्वसामान्य लोकांना श्रमपरिहार, विरंगुळा,एक बदल म्हणुन वेगळे हवेच असते. “चलती का नाम गाडी” पासुन सुरु झालेली ही हास्यपरंपरा “हेराफेरी, गोलमालपर्यंतची अशीच पुढे चालु राहावी आणि विनोदी कलाकारांनाही मुख्य प्रवाहात आणावे ही आशा व अपेक्षा.      



           

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव