महिला गडदर्शन-भाग-2 ( 8-11-25 ते 14-11-2025) (दक्षिण दिग्विजय-2025-ते मंतरलेले 7 दिवस)


        पहिल्या भागात आपण पुणे येथिल 2 किल्ले सिंहगड आणि पुरंदरगडाबाबतची 2 दिवस सहलीचा वृतांत बघितला होता. आता या भागात आपण दुस-या राज्यात तामिळनाडु येथिल 3 किल्ले,मंदिरे आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या भेटिचा तपशील पाहणार आहोत. हे गडदर्शन आमचे कार्यालयातील शिवजयंती उत्सव समितीमार्फत दरवर्षी आयोजित केले जाते. महिलांचा विशेष प्रतिसाद या सहलीला मिळतो, यावेळि तर 137 महिला आणि 4 पुरुष ( टुर चालक- बकेट लिस्ट यांची)सोबत होते. माझा पहिलाच ( दिर्घ प्रवास) अनुभव असल्यामुळे जराशी भिती,उत्सुकता,गड दर्शन आणि सांघिक प्रवासाचा अनुभव/कौतुक बघायचे होते.चला तर मग माझ्याबरोबर प्रवासाला. 

        दि.811-25 रोजी 12.45 वाजता चेन्नई एक्सप्रेसने छ.शि.ट.हुन सर्व महिला,पुरुष सगळ्यांच्या ( इतर समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या शुभेच्छासह) प्रवासाला सुरुवात झाली. काहिजण ब-याच दिवसांनी/वर्षांनी भेटल्यामुळे तो आनंद मनभर पसरलेला दिसुन आला. सगळे काही स्थिरस्तावर झाल्यावर दुपारचे जेवण आपणच/स्वत: आणायचे असल्यामुळे एकेका वेगवेगळ्या पदार्थाचा देवाणघेवाण,आस्वाद घेत, हसतखेळत जेवण उरकले. त्यानंतर काहिजण सुस्तावले तर काहिजण पत्ते खेळणे, हाउजी, मेंदी लावणे, गाण्याच्या भेंड्या खेळण्यात रमले. काही महिला पुणे,सोलापुर येथुनही चढल्या त्यांना भेटण्यात,विचारपुस करण्यांत कधी वेळ गेला ते कळलेच नाही. 8 वाजता सोलापुरला आयोजकामार्फत जेवण मिळाले. ते खाऊन पुन्हा गप्पा,गाणी आणि आराम करुन सगळेजण 11.00 वाजता झोपले.

       दि.9-11-25 रोजी सकाळी 8.00 वाजता रेणुगुंठा येथे नास्ता,चहा,कॉफीचा आस्वाद घेतला त्यासाठी सगळेजण 7.00 वाजताच ऊठुन तयार झाले होते. 9.00 वाजता तिरुमत्ती येथे सगळेजण उतरलो. स्टेशनबाहेर 4 गाड्या उभ्याच होत्या,पुढिल प्रवासासाठी निघायला. सामान, यादीनुसार त्या त्या गाडीत सगळ्या चढल्या आणि 1 तासाच्या प्रावासानंतर हॉटेलवर 10.30 ला पोहोचलो. 12 वाजेपर्यंत फ्रेश होऊन 12.30 ते 1.30 पर्यंत जेवण करुन 2.00 वाजता आम्ही वेलोर किल्ल्याकडे रवाना झालो. तेथे आमच्यातल्याच एका भगिनीने( इतिहास संशोधक आणि शिक्षक) किल्ल्यांचा सविस्तर वृतांत, महत्व विशद केले त्यामुळे किल्ला कसा पाहायचा हे कळले. जवळच असलेल्या जलकांडेश्वर मंदिरास भेट दिली. हे सगळे झाल्यावर तिथुन थोडे लांब असलेले सुवर्णमंदिराच्या भेटीस निघालो. 7 वाजता तेथे पोहोचलो तेव्हा भली मोठी रांग बघुन आश्चर्य वाटले. तरिही 1 तासात संपुर्ण मंदिर परिसर, बाग आणि तेथील शिस्त बघुन खरेच कौतुक वाटले. किती किलो चांदी आणि सोने वापरुन सगळे मुर्ती आणि मंदिर बनविले आहे तेही आजुबाजुला,तळ्यावर ( उभे आहे असे वाटते) पाण्याच्या पार्श्वभुमीवर अत्यंत देखण्या मुर्ती आणि कलाकुसर बघण्यासारखी होती. या दिवशी भगवा किंवा केशरी ड्रेस कोड व पांढरी टोपी असल्यामुळे सगळीकडे आमचीच माणसे उठुन दिसत होती. त्याबद्दल काहिजणांना स्थानिकांना आश्चर्य,कुतुहल व कौतुकही वाटत होते. 9.30 वाजता हॉटेलवर पोहोचुन जेवण घेतले आणि 11.0 वाजता सगळेजण झोपी गेले.

         दि. 10-11-25 रोजी सकाळी 8 वाजता फ्रेश हौउन हॉटेल सोडतांना नास्ता करुन बाहेर पडलो. किल्ले जिंजीसाठी “बकेट लिस्ट”ने दिलेले जांभळ्या रंगाचे कुर्ते,पांढरे लेगिन आणि पांढरी ओढणी असा ड्रेस कोड ठरविलेला होता त्यामुळे सगळीकडे छान जांभळे (गोकर्णाची फुले )रानच दिसत होते. जिंजिच्या किल्ल्याचे महत्व तर अनन्यसाधारण माहितच होते.( छत्रपती राजारामांना सुरक्षित ठेवणारा म्हणुन) आजुबाजुचा किल्ले परिसर, पाण्याची तटबंदी आणि 1500 पाय-या असलेला हा किल्ला चढायला मात्र मिळाला नाही. (दुरुस्ती चालु असल्यामुळे) तरीही खालुनच हा किल्ला किती मजबुत आणि रम्य बांधलेल्याची कल्पना येत होती. 2.00 वाजता दुपारी जेवण झाल्यावर तंजावरसाठी रवाना झालो. 1 तासाच्या अंतरावर बृहडेश्वर (युनेस्को दर्जाप्राप्त)मंदिराला भेट दिली. भव्य परिसर,कमालीची शांतता आणि दगडी कोरिव काम तसेच शिलालेख हे या मंदिराचे वैशिष्ट्य खुप छान वाटले. त्यानंतर रात्री तंजावर येथील हॉटेलवर 8.30 ला पोहोचलो. 10.30 पर्यंत जेऊन 11.00 वाजता झोपी गेलो.

       दि. 11-11-25 रोजी सकाळी 8.00 वाजता नास्ता करुन हॉटेल सोडले आणि तंजावर पॅलेस, सरस्वती ग्रंथालय, आर्ट गॅलरी, मुज़ियम यांना भेट दिली. या दिवशी व्यंकोजी भोसले यांचे 16 वे वंशज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विचार ऐकले. हा ऐतिहासिक क्षण जपुन ठेवावा असाच होता. त्यांनीही प्रकृती बरी नसुनही सकाळी प्रवास करुन आल्याचा कोणताही बाऊ न करता आमची भेट घेतली याचा आम्हालाही अभिमान वाटला. या ग्रंथालयात मोडी भाषेत सर्व इतिहास लिहिलेला जपुन ठेवलेला आहे गरज आहे ती भाषांतरीत करुन डिजिटलाइज करुन जगाला दाखविण्याची. पॅलेसची डागडुजी चालु असल्यामुळे पुर्णपणे बघता आला नाही. येथेही एका बृहडेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.सगळी देवळे मोठी,भव्य आणि दगडी स्वरुपात असुनही परकिय आक्रमणापासुन जतन केलेली आहेत. जेवण व इतर परिसर बघुन 4.00 वाजता पॉंडेचरीसाठी रवाना झालो.रात्री 8.00 वाजता पॉंडेचरी येथील“व्हीला”टाइप हॉटेलमध्ये वास्तव्य केले. गावची पार्श्वभुमी आणि आजुबाजुला जंगल असल्यामुळे एकदम गावी आल्यासारखे फ्रेश वाटले.    

         दि.12-11-25 रोजी सकाळी 8.00 वाजता नास्ता करुन पॉंडेचरी येथील ॲरो व्हील व ध्यानमंदिरासाठी निघालो. तेथे 30 मिनिटे चालुन “व्यु पॉंइंट” येथे पोहोचलो. तिथुन लांबवर पसरलेले अरविंदबाबुंचे ध्यानधारणा केंद्र दुरुनच बघितले. तेथे 8 दिवस आधी आरक्षण करावे लागते असे कळले. त्याकाळातले ध्यानाचे महत्व आणि आध्यात्मिक महत्व जाणून एका परदेशी महिलेने( मदर) घेतलेला पुढाकार खरेच कौतुकास्पद आहे. तसेच त्यांचे समाधीस्थळ दुपारी बघितले. तेथेच एक गणपतीचे मनाकुला येथील मंदिर, फ्रेंच वसाहत आणि समुद्रकिनारे यासाठी 2.00 वाजता जेवण झाल्यावर वेळ देण्यात आला होता. वेगवेगळ्या ग्रुपने वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन,खरेदी करुन सगळेजण 7.00 वाजता हॉटेलवर निघालो. 8.30 वाजता जेवण करुन निरोप-समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्यांचे मनोगत,आभार प्रदर्षन, ज्येष्ठ महिलांचे योगदान आणि एकुणच सगळ्यांचे सहकार्य व हौशी कलावंतांनी केलेले कला- प्रदर्षन( नाच-गाणी) याने सहलीची सांगता झाली.

         दि.13-11-25 रोजी सकाळी 10.00 वाजता नाष्ता करुन, सामानासकट महाबलीपुरम येथील कृष्णमंदिरात जाण्यासाठी निघालो. तेथील लोण्याचा गोळा, पाण्याचे दगडी पंप, गुहा,कोरिव शिल्पाचे आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे हा गोळा कित्येक शतके तसाच एका छोट्याशा अग्रावर स्थिर उभा आहे जिथे माणुस सरळ उभा राहु शकत नाही याचेवर बरेच तर्क-वितर्क चालवुन झाले पण अजुनही यामागचे कारण समजले नाही. इंजिनिअरिंग कलेचे महात्म्य आपल्या पुर्वजांना किती होते तेही यावेळि दिसुन आले. 2.00 वाजता जेवण करुन साधारण 2 तास प्रवास करुन 5.30 वाजता चेन्नई रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. गाडी 6.25 ची होती. तेवढ्या वेळात स्टेशनवरच काही जणांनी खरेदी केली. गाडी वेळेवर सुटुन रेणुगंठा स्टेशनवर 8.00 वाजता जेवण आले. सगळेजण दमले होते त्यामुळे लवकरच झोपले.

          दि.14-11-25 रोजी सकाळी 8.00 वाजता सोलापुर आले तेथे नाष्ता मिळाला तोपर्यंत सगळे फ्रेश होउन तयार झाले होते काहिजण येथे उतरणार होते त्यांना निरोप देतांना ब-याचजणींचे डोळे पाणावले होते. काहिजण गहिवरले होते एकत्र 7 दिवस सोबत असल्यामुळे नकळतच एक भावबंध निर्माण झाला होता. कार्यालयात कामापुरतेच बोलणे तेही हल्ली वेळ मिळत नसल्यामुळे होत नाही. असा मोकळा श्वास आणि आल्हाददायक वातावरण यामुळेही थोडे मन टवटवीत झाले होते सगळ्यांचे.

          12.00 वाजता पुणे येथे काहिजणी उतरल्या,तेथुनच जेवण मिळाले. उरलेले सगळेजण 2 वाजेपर्यंत सुस्तावले मग थोडे खेळ, गाणी,गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. 3.00 ठाणे येथुन निघुन मी घरी 4.00 वाजता घरी पोहोचले. वेगवेगळ्या वेळी पोहोचले तरी सगळ्यांना पोहोचल्याचा मेसेज करणे अनिवार्य होते. शेवटची महिला घरी पोहोचेपर्यंत समितीचे पदाधिकारी,आयोजक आणि संबंधित महिला सतर्क आणि संपर्कात असतात. त्यानंतरच सहलीची ख-या अर्थाने सांगता होते.   

          अशा या मंतरलेल्या 6 रात्री आणि 7 दिवसांच्या सहलिचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे सांग़ता येतील.

1)     प्रचंड संख्येने आलेल्या महिला नागपुर, नांदेड, लातुर,बीड,औरंगाबाद सोलापुर,पुणे येथुन काही तरुण महिलांनी आपल्या मुलाबाळांची व्यवस्था दुसरीकडे देखिल करुन आल्या होत्या.

2)     दोन अंध भगिनी,10-भगिनी 70 च्या आसपास, 20 भगिनी 60 च्या आसपास उरलेले सगळे 20-30-40-50 च्या आसपास होत्या. कोणत्याही अडचणीविना सहज सगळे शक्य झाले.

3)     ड्रेस कोडमुळे एकात्मता आणि एकसारखेपणा दिसुन येतो जो शाळा,कॉलेजमध्ये काही ठिकाणी जपला जातो. एक ओळख निर्माण करते. तसेच सरकारी कर्मचारी असल्यामुळे कोणतेही तोकडे कपडे घालु नये असा अलिखीत नियम असतोच. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थीत कपडे परिधान केले होते. साडीपासुन ते गाऊनपर्यंत विवीधता होती. रेल्वे प्रवासात मात्र जिन्स,टॉप घातले होते.

4)     दक्षिणेतली अवाढव्य मंदिरे, विस्तीर्ण परिसर,स्वच्छता आणि कमालिची शांतता,फुलांची सजावट हे प्रामुख्याने आकर्षण असते. सोबतच किल्ले हे ऐतिहासिक वारसा जपणारे आणि आम्ही त्यावर पदस्पर्ष करुन एकप्रकारे धन्यच झालो तेही परराज्यात.

5)     श्रीमंती( सुवर्ण मंदिर-अमृतसरच्या धर्तीवर बांधलेले) बुद्धी आणि मेहनत करण्याची तामिळ लोकांची वृत्ती आढळुन आली. तसेच एका हॉटेलमध्ये तर आमची हळद-कुंकू लावुन, गुलाबपाणी शिंपडुन आरती केली गेली. स्त्रीयांचा मान/स्वागत कसे करावे हेही दिसुन आले. मातृसत्ताक पद्धतीचा प्रभाव अवतीभोवती दिसुन आला. महिलाच जास्त कामावर दिसुन येत होत्या.

6)     एक भगिनी इतिहास तज्ञ आणि शिक्षक असल्यामुळे आमच्या ऐतिहासिक ज्ञानात तर भर पडलिच पण किल्ले कसे बघावे याचेहि ज्ञान मिळाले. काही अनुषंगिक गोष्टीही सांगितल्या ताईंनी.

7)     “बकेट लिस्ट“ नावाप्रमाणेच आमचे एकत्र फिरायचे स्वप्न साकारायला मदत करणारे,प्रोत्साहन तसेच सगळ्या महिला असल्यामुळे योग्य ती खबरदारीही त्यांच्याकडुन घेण्यात येत होती.

8)     सर्व महिला एकमेकांना सांभाळुन घेत होत्या, अडीअडचणीला उपयोगी पडत होत्या त्यामुळे नकळतच वाटुन खाणे, एकमेकांची काळजी घेणे,मन मोकळे करणे या गोष्टी घडत होत्या, जे इतरांसाठी मार्गदर्षक ठरत होते.

9)     जेवण,नाष्ता,चहा-कॉफी आणि हॉटेल वास्तव्याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती.

10)  असंख्य रिल्स,फोटो आणि ओडिओ/व्हिडिओची कला अनेक जणींनी दाखवली. मिमिक्री,चेष्टा-मस्करी, भाषण,सत्कार वगैरे अनेक गोष्टी साध्य झाल्या.

11)  विज्ञानाचा चमत्कार,पुर्वजांची दुरदृष्टी, मजबुत बांधकाम, कोरिव लेणी,गुहा आणि आध्यत्मिक सेंटर अशी महिलांची मानसिक,शारीरिक आध्यात्मिक बैठक बसविण्याची योजना यशस्वी झाली.

12)  या सर्व खटाटोप करण्यासाठी लागलेले परिश्रम, अभ्यास आणि इतर पुरुष मंडळींचा(पदाधिकारी)

यांचे कौतुक तसेच अभिमान वाटला. तसेच “शिवप्रेमी”हा समान धागा एकत्र आणण्यास कारणीभुत ठरला हे महत्वाचे. इतर वेळी कार्यालयीन रुक्ष कामातुन तेवढाच दिलासा मिळावा हा हेतुही सफल-संपुर्ण झाला. या प्रेरणेने दरवर्षी वैयक्तिक तसेच कार्यालयीन जीवनात/ कामातही हुरुप आणणे शक्य होते.

                   यासाठीच अशा सहली वारंवार आयोजीत केल्यास(पालक,बालक आणि ज्येष्ठानी) संस्कृती, देव,देश,इतिहास व धर्माची ओळख पटुन अभिमान वाटु शकेल. ह्याचा विचार नक्किच सगळ्यांनी करावा ही अपेक्षा.

                                                 !! शुभास्ते पंथाना:!!















Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव