हम कामयाब होंगे एक दिन….

 

                    शाळेत असतांना हे गाणे बहुधा म्हटले जायचे तेव्हा एवढे कळत नव्हते पण प्रत्यक्ष जीवनात आता कधी तो “दिन” यायचा याची वाट बघत बघत जायची वेळ येते पण तो दिन काही उगवत नाही. असे ब-याच जणांच्या बाबतीत होते त्यामुळे समस्या उद्भवतात. कधी पारंपारीक,सामाजिक,आर्थिक,राजकिय तर कधी वैयक्तिक स्वरुपाच्या समस्यांमुळे माणसे नेहमी काळजीत/ प्रयत्नात तर कधी निराशेत जातात. या एका आशेवर जगणारी काही माणसे शेवटी प्रयत्न करुन थकतात तेव्हा एकतर प्रयत्न करणेच सोडुन देतात तर काहीजण वहिवाट सोडुन दुस-या अंगाने प्रयत्न करुन यशस्वी होतात तेव्हा खरेच त्यांचे कौतुक वाटते. संस्कार, शिक्षक,पालक व परिस्थीतीमुळे माणुस घडत असतो तर शिक्षण, व्यवहार, तारतम्यामुळे व्यक्ती प्रगल्भ होत जाते.

            कार्यालयीन काम,वैयक्तिक वा खाजगी काम असो आपण अनेक निर्णय घेत असतो.  अंमलबजावणी करतो पण हवे तसे परिणाम मात्र होत नाहित तेव्हाही कधी अपयशी/हतबल वाटायला लागते. निष्कर्ष किंवा फळे मिळतील याची अपेक्षा असतेच पण नेहमीच वा लगेच मिळतील याची शाश्वती नसते. त्यावेळी स्वत:च स्वत:ला असा दिलासा द्यावा लागतो किंवा सकारात्मक विचार मनात आणावा लागतो. त्या एका दिवसाची वाट किती बघायची याला काही बंधन नसते वा कोणाकडे काही तक्रार करायचीही सोय नसते. राजकारण,आर्थिक स्थैर्य आणि यश बहुधा असेच वाट पहाणारे असते पण तो एक दिवस उगवल्यावर मात्र “अजी सोनियाचा दिनु….”अशी आपली अवस्था होते. स्वप्नपुर्तीचा हा आनंद गगनात मावेनासा होतो आणि एक वेगळाच स्वत:बद्दलचा विश्वास मनात तयार होतो. जसे अनेक प्रयत्नानंतर परिक्षेत उत्तीर्ण होणे, दुर्मिळ संधी मिळणे, तोडीस तोड स्पर्धकाला मागे टाकणे, सत्तारुढ होणे,अनेक वाद विवादानंतर संपत्ती प्राप्त होणे, न होणा-या गोष्टी अचानक होणे,बकेट लिस्टमधील गोष्टींची पुर्तता अशा अनेक गोष्टी सांगता येतील. व्यक्ती तेवढ्या अपेक्षा याप्रमाणे विभिन्न अशा असु शकतात.

               व्यावहारिक पातळिवर या वाट बघण्याची कधी कधी किंमत चुकवावी लागते.  हम होंगे…या एकाच आशेवर विश्वास ठेऊन संयम बाळगावा लागतो. सृष्टीतले चमत्कार,संशोधन म्हणा किंवा नवनवीन कल्पना येण्यामागेसुद्धा हाच सिद्धांत मनात प्रत्येकजण बाळगत असतो. कित्येकदा तर एकाने पाहिलेले स्वप्न कधीकधी पिढ्यानपिढ्या पुर्ण होत नसते. तसेच उदयोगपती,व्यावसायिक किंवा सामाजिक स्तरावर काम करणारे कार्यकर्ते हाच हेतू बाळगुन असतात. हा एक “दिन” यशाचा कधी वैयक्तिक, सामाजिक, जागतिक तर कधी आध्यात्मिक पातळीवरही असु शकतो. यशाची खात्री बाळगणारे स्वत:बरोबरच इतरांचीही प्रगती करीत असतात. त्यांचा आदर्ष ते स्वत: समाजापुढे,जगापुढे एक विश्वास निर्माण करतो.

                अध्यात्मिक दृष्टिने विचार केल्यास दिव्यत्व प्राप्त होणे, मनावर ताबा मिळविणे, संयम बाळगणे, यशाने लगेच हुरळुन न जाता तटस्थपणे इतरांचाही सहभाग मान्य करणे, नैसर्गिक मर्यादेचे तत्व स्विकारणे, अशा अनेक गोष्टी आढळतील. हे गीत ज्याने लिहिले त्याने मोठ्या आशेने हे गीत लिहिले असावे,आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याचा उपयोग आपल्या जीवनात आपण करु शकतो यातच त्या कवीचेही यश नाही का? गिरिजा कुमार माथुरने 20 व्या शतकात इंग्रजी गाण्याचा केलेला भावानुवाद(I WILL OVERVOME SOMEDAY) किती जणांना जगायला/लढायला/स्फुर्ती देत असेल ना! देशभक्ती, प्रार्थना आणि प्रेरणा देणारे हे गाणे एकदम मनाला दिलासा तर देतेच तसेच शक्तिही देते.

             हाच एक दिन गुन्हेगाराला शिक्षा देतो तर कृष्णाला शिशुपालाला मारण्यासाठी कारणीभुत ठरतो वेगळ्या अर्थाने. 100 गुन्हे केले तरी चालणार नाही कधी ना कधी तो “अडकणारच” हा विश्वासही पोलिसांना त्याला पकडायला, शिक्षा द्यायलाही भाग पाडतो. तसेच आजारपण, दु:ख आणि अपयश पचवायलाही भाग पाडतो. हा “एक दिन” निसर्गात,व्यवहारात आणि सर्वसामान्य जगण्यात प्रत्येकाने स्विकारल्यास नक्किच कवीची भावना,हेतु आणि सामर्थ्याचा आपण सगळे अनुभव घेऊ शकतो त्यावर विश्वास,श्रध्दा आणि सकारात्मकता मात्र हवी. मुख्य म्हणजे स्वत:वर,आपल्या कार्यावर,जगण्यावर शतदा “प्रेम करावे” मग बघा कसा चमत्कार होतो ते आणि प्र्त्येकाचे आयुष्य उजळुन निघावे हे या दिवाळीच्या निमित्त्याने पुन्हा एकदा नक्की आशा करुया/प्रयत्न करुया.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव