अलविदा- जट,यमला,पगला दिवाना
चित्रपटात ब-याच वेळा पंजाबी मुलगा/मुलगी किंवा वातावरण,सरसों का साग,गाजर का हलवा, आई/सासु बनवुन देणारी किंवा एखादा पुत्तर/पुत्री म्हणुन विनोदी पात्र आपण बघतो. मुळ पंजाबी असलेले एखादेच धर्मेंद्रपाजी असतात. 1960 च्या दशकातला ते आतापर्यंत जवळ जवळ 66-65 वर्षे चित्रपटात अनेकांगी अभिनय निभावणारे धर्मेंद्र ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार होते. साधारण माझे वडिल शोभतिल अशा वयाच्या धर्मेंद्रना मी फार कमी चित्रपटात बघितले पण एक मात्र कोणीतरी म्हटलेले आठवते,”हिंदित जर कोणी जेम्स बॉंड काढला असता तर त्यांना धर्मेंद्रशिवाय पर्याय नसता. साधारण दारासिंगाच्या पठडीतलाच पण प्रेमळ,सदाबहार आणि कुटुंबवत्सल असा हा अभिनेता कायम तंदुरुस्त असायचे याचे राज त्यांनी त्यांच्या मुलाखतीत “लहानपणी केलेल्या कष्टाचे महत्व”आणि“गावच्या मातीची ओढ” हे प्रामाणिकपणे उत्तर दिले होते. “हि-मॅन,”मदनाचा पुतळा किंवा शरिरसौष्ठवाच्या बाबतीत कोणी हात नाही धरु शकणार असा हा ज्येष्ठ कलाकार, तरुणांबरोबर त्यांचे उत्तम जमायचे, सहकलाकारां-बरोबरही संबंध जिव्हाळ्यांचे होते.
स्वप्नसुंदरीच्या
प्रेमात पडुन ते नाते शेवटपर्यंत निभावणे, स्वत:चा संसार,मुले-मुली,चित्रपट आणि कुटूंब
कसे सांभाळले?यात समतोल कसा राखत असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत. याशिवाय त्यांना
त्यांच्या कामाचे “जीवन गौरव”व्यतिरिक्त कोणतेही सन्मान किंवा पारितोषिक न मिळालेला,
(याची खंत न बाळगता शेवटपर्यंत काम करत राहणे) ना कोणतेही इतर माध्यमे जाहिरात, रेडिओ,
टी.व्ही.,राजदुत, सामाजिक माध्यमे यावर ना प्रसिद्धी करुन घेणारे हे साधे,विनम्र आणि
जमिनीवर असलेले व्यक्तिमत्व सगळ्यांसाठीच आदर्ष होते. हे त्यांच्या निधनानंतर अनेकांच्या
बोलण्यातुन आणि लिहिण्यातुन दिसुन आले. “मरावे परी किर्तीरुपी उरावे” म्हणतात ते यातुन
दिसले.1935 ते 2025 हा काळ अनेक ब-या वाईट घडामोडींचा होता. राजकिय,सामाजिक,आर्थिक
आणि नैतिक अशा अनेक पार्श्वभुमीवर अनेक बदल होत गेले. सत्यकाम, फुल और पत्थार,अनुपमा,यादों
की बारात,अनपढ,धरमवीर,काजल, दि बर्नींग ट्रेन,ड्रिम गर्ल अशा अनेक विवीधांगी भुमीकांमधुन
त्याने स्वत:ची प्रतिमा प्रामाणिकपणे रंगवली.
चित्रपटाची
कोणतीही पार्शभुमी नसतानाही केवळ दिलिपकुमारच्या अभिनयाचा आदर्ष बाळगुन “फ्रंटीयर मेल“ने
मुंबईच्या मायानगरीत प्रवेश करणारा हा तरुण नंतर 60-65 वर्षे भुमिकांची दमदार खेळी
खेळत राहिला. याशिवाय निवडणुक लढवुन राजकारणात(2004 ते 2009) प्रवेश केला पण त्यात
त्यांचे मन रमले नाही. मीनाकुमारी,राखी,शर्मिला
टागोर, आशा पारेख, हेलन ते आताच्या रेखा, जया भादुरी, झीनत अमान, हेमामालिनी अशा अनेक
अभिनेत्रीपर्यंत त्यांनी कामे केलेली आहेत. त्यांचे विशेष गाजलेले सिनेमे म्हणजे शोले,
चुपके चुपके,धरमवीर आणि नोकर बिवी का आहेत.
देवानंद,राजकपुर
दिलिपकुमार यांच्यानंतर आणि राजेश खन्ना,अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिंह आधीच्या काळात
चित्रपट गाजविणारे भावनात्मक तसेच मारधाडीचे अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले.
स्वत:बरोबरच मुले-मुली यांनाही त्यांचे अभिनयाचे बाळकडू मिळालेले होते. त्यांना प्रोत्साहन
देणे, सुधारणा करणे आणि चित्रपट निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे
चालणे,बोलणे,वागणे अत्यंत दमदार तसेच रोमान्स अगदी मनापासुन दिसत असे. तेवढीच मारामारी
आणि शिव्या देऊन राग दर्शिवणे हेही एक वेगळेपण जाणवायचे. जनरितीच्या विरोधात जाऊन दुसरे
लग्न, प्रेम निभावण्यास लागणारा संयम आणि लोकांचे वाग्बाण झेलणे, त्याचा कोणताही परिणाम
वैयक्तिक आयुष्यावर न पडु देता काम करत राहणे हेच त्यांचे ध्येय होते. तसेच कौटुंबिक
संबंधही तेवढयाच ताकदीने जपणे हे सोपे काम नाही.
“विजेता फिल्मस” नावाची कंपनी 1983 मध्ये सुरु
करुन त्यांनी बेताब, घायल आणि बरसात अशा चित्रपटांची निर्मीती केली. 1973 आणि 1987
या दोन्ही वर्षात 7 सलग चित्रपट देणारा हा “सुपरस्टार” तेव्हा खुप गाजला होता. इतर
अनेक संस्थांनी त्यांना वेगवेगळ्या स्तरावर गौरविले. परदेशात ,बि.बि.सी.वरही त्यांचे
अनेकवेळा कौतुक केले गेले. 2017 मध्ये“पद्मभुषण” देऊन त्यांना गौरविण्यांत आले. त्यांचा
शेवटचा चित्रपट“इक्किस”होता जो त्यांच्या हयातीत रिलीज होऊ शकला नाही. बंगाली,पंजाबी
आणि एका मराठी चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. अशा या जट,यमला पगला दिवान्याला आम्हा
सगळ्यांकडुन आदरांजली/श्रद्धांजली.
Comments
Post a Comment