जागते रहो ( जागे व्हा)
राजकपुरचा “ जागते रहो” सिनेमा एकेकाळी खुप गाजला होता असे म्हणतात. पुर्वी वाचमनदेखिल रात्री एक चक्कर टाकताना “ जागते रहो” असे म्हणत फे-या मारायचा.काळाच्या पुढे लक्ष असणारे काहीजण आधीच काही भाकिते करित असतात. सर्व सामान्य माणसे मात्र या फंदात पडत नाहित कारण रोज जगायचे कसे? हा मोठा प्रश्न त्यांना सतावित असतो. स्वातंत्र्यानंतर आपण भलेही गरिबी हटाओ” अशा घोषणा केल्या पण प्रत्यक्षात तसे काही घडु नये असेच प्रयत्न केले जातात. हा एक म्हणु शकतो आपण गरिबीची “व्याख्या”बदललिय काही ठिकाणी एवढे मात्र नक्की. जसे कि, झोपडपट्टीत राहतो तो गरिब असे पुर्वी समजले जायचे. आता अशी परिस्थिती आहे कि, सगळ्या सुविधा फुकट पुरविल्यामुळे सगळे कमावणारे मात्र एक पैसाहि “कर न भरणारे,”सगळ्या सोयीसुविधा उपभोगणारे पण त्याचा खर्च मात्र कोणतरी दुस-याच्याच खिशातुन होणारे तो “श्रीमंत”अशी नवीन व्याख्या करावी लागेल.फुकटची सवय आधी लावायची मग ती पुर्ण करण्यासाठी सरकारी तिजोरी खाली करायची.
जो मध्यमवर्ग सगळ्या घडामोडित दक्ष असायचा, विरोध
करायचा, आंदोलने करायचा तो वर्गतर आता नष्टच झालाय किंवा होत चाललाय असे वाटायला लागते.
उलट अशा माणसांना हाताशी धरुन राजकारण करणे हे आता सोयीचे होत चालले आहे. दबावाला बळी
न पडता कणखरपणे विरोध दर्शविणारी जागृत माणसे शोधावी लागतील. सामाजिक माध्यम खरे तर
प्रभावी अस्त्र लोकांच्या हातात असतांनाही त्याचा अयोग्य वापर करण्यावरच जास्त भर दिसुन
येतो. जसा कि, अपघात झाल्यावर त्या जखमिंना मदत करायची सोडुन सेल्फी,बाईट आणि अतिरंजन
किंवा नको त्या वेळी त्या माणसांची मुलाखत घेणे असले काहितरि साधले जाते. तरुणाई तर
पुर्णपणे या नवीन तंत्रज्ञानाने भारावुन गेलेली असल्यामुळे त्यांना आजुबाजुचे काही
दिसतच नाही. दिसले तरी त्यातले गांभिर्य/होउ घातलेले परिणाम दिसत नाहीत कि दिसुनही
डोळ्याआड करतात हे त्या देवालाच माहित. सरसकट सगळेच आहेत असे नाही म्हणायचे पण बहुतांश
आढळुन येते.
शासनही
“आयजीच्या जोरावर……जोरात” या थाटात भराभर पैसे वाटण्याचे एक कलमी काम करत असते. पात्रता,
निकष आणि गरज कोण शोधणार? लोक तरी प्रामाणिकपणे”नको” आम्हाला आता, आमची गरज संपली”
असे म्हणतात का? खरेच असे करुन राजकारण साधते का? हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. आता
खरी गरज आहे “जागे होण्याची”,दोन्ही बाजुने. ज्याचा पैसा जातो ते (करदाते) आणि जे फायदे
घेतात या दोघांनीही कारण या दोघांचाच जास्त फायदा घेऊन सगळ्या योजना, खर्च, योजना राबविल्या
जातात. याचे भान असणे आणि गोष्टितल्या बोक्यासारखा फायदा तिसराच घेतोय, कोण ते ओळखुन
त्याला बाजुला केले पाहिजे. नाहितर दोघेही असेच मांजरासारखे उपाशीच राहणार आणि एकमेकांशी
भांडत राहणार. विरोधकच सत्तेवर गेल्यावर कसे वागतात हे आपण बघतच आहोत. झोपी गेलेले
किंवा झोपेचे सोंग घेऊन झोपलेले दोघांनीही जागे होणे ही काळाची गरज आहे. म्हणुन म्हणतात
ना, मिळविणे सोपे पण ते टिकविणे कठिण असते. एवढा नैसर्गिक सौंदर्यासंपन्न,लोकसंख्याबळ,
बुद्धिमान लोकांचा देश पण अजुनही आपण म्हणावे तेवढे प्रगतीशील नाही झालोत.
लहानपणी आम्ही ऐकले होते कि, दुधाचे 2 पैसे
वाढले तरी जनता रस्त्यावर उतरायची आणि आता कितीही भाव वाढवा कोणी काही बोलतच नाही किंवा
जे बोलणारे असतात त्यांचे आवाज दाबले जातात. एक गुलाबी थाप मारली जाते,“सिस्टीमचा दोष
”पण सिस्टीम तयार कोणी केली? तुम्ही आम्हीच ना! जर त्यात दोष असले तर सुधारा,उपाय शोधा,मार्ग
काढा काहीतरी. अगदी बळी गेले तरी मुग गिळुन बसणारेपण कमी नसतात. सोपे मार्ग सगळ्यांनाच
माहित असतात पण अवघड मार्गांवर जायला सहसा कोणि तयार नसतात. जसे हक्कांची जाणीव असते
पण कर्तव्यांची नसते हे असे का याचे उत्तर कोणाकडेच नाही. तसेच दुरदर्षीपणा,होणारे
दुरगामी परिणाम आणि खोलात जाऊन अभ्यासु वृत्तीही आढळत नाही. याउलट नवनवीन तंत्रज्ञान,
शोर्टकटस,आधुनिक व्यवहार यांची मात्र पटकन सवय लावुन घेतली जाते. साधे मोबाइलचेच उदाहरण
घ्यायचे झाले तर हल्ली प्रत्येकाच्या हातात हे साधन दिसते आणि चालवणेपण माहित असते
मात्र व्यावहारिक किंवा औपचारिक शिक्षणाची ओढ असेलच असे नाही. तीच गोष्ट स्वातंत्र्य
मिळाल्यामुळे ब-याच गोष्टी (भौतिक सुविधा, शैक्षणिक मदत, शासकिय प्रोत्साहन) सहज मिळत
गेल्या. मानसिक,शारिरिक,आर्थिक किंवा सामाजिक स्तर उंचावला का त्या प्रमाणात? याचा
विचार होतो का? भेसळ,भ्रष्टाचार,घोटाळे,महागाई अशा अनेक समस्या भेडसावत आहेत, वाढत
आहेत पण यावर काही उपाय, विरोध किंवा स्वत:चे काही मत देण्याचे धाडस कोणीच दाखवत नाहित.
परदेशी वस्तु,मुल्यांचा –हास, शिक्षण आणि पैसा याचे आकर्षण आहे पण तेच आपण इथे का आणु
शकत नाही याचा विचार कोणी करतेय का? लोकशाहीचे फायदे सगळ्यांना पाहिजेत पण काही जबाबदा-या
असतात हे सोयीस्कररित्या विसरले जातात.
त्यासाठिच
लहानपणापासुन हे सर्व संस्कार शाळेतुन किंवा अपारंपारिक शिक्षणातुन शिकविले पाहिजे.
मुलांचा कल लक्षात घेऊन शिक्षण, किंमतीवर नियंत्रण आणि जागरुक जनता जर असेल तर देश,
समाज आणि व्यक्तीचीसुध्दा प्रगती लवकर होऊ शकते. ही जागरुकता सगळ्यांकडुनच आणि सगळ्या
स्तरावर अपेक्षित आहे. एवढेच कशाला, स्वत:ची स्वत:बद्दल तरी जागरुकता आहे का? मुख्य
प्रश्न आहे तो झोपेतुन जागे होण्याचा आणि जागरुकतेने
सर्व व्यवहार केल्यास सर्व काही शक्य होईल हीच आशा-अपेक्षा.
Comments
Post a Comment