“हरविलेले बालपण”

             नुकताच 14 नोव्हेंबर रोजी” बालदिवस” म्हणुन साजरा करण्यांत आला. त्यानिमीत्त अनेक कार्यक्रम आखुन मुलांच्या विकासास हातभार लावला जातो. माझ्या लहानपणी मोठ्या वर्गाच्या हुशार मुलींना त्यादिवशी “ शिक्षक” म्हणुन शिकवायला मिळत असे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना प्रोत्साहन देण्याचे उपक्रम असत. आता माहित नाही काय करतात. तसेही आताच्या मुलांचे निरागस बालपण कुठे राहिले आहे? सतत आई-वडिल बाहेर, शनिवार-रविवार वाट्याला आले तर आले. तेही बाहेर जाणे,पार्टीज, पिकनिक,जास्तीची कामे यात आई-बाबा दंग तर मुले टि.व्ही.मोबाईल किंवा इतर अनेक ॲक्टिव्हीटिज करित असतील तर त्यात दंग. एकुण काय त्यांचे बालपण यातच हरवुन जाते. हल्ली एक नवीन मोहिम काढावीशी वाटते” बालपण जपा” पुर्वी “शैशव नित्य जपावे”असे म्हटले जायचे.

             किंबहुना “बाल” कुणाला म्हणावे इतपत आपण प्रगती साधलेली आहे. निरागसता दिवसेंदिवस आपण हरवत चाललो आहोत. अनेक बाजुने,अंगाने ज्ञानाचा भांडार आपल्यासमोर खुले झालेले आहे. करोनानंतर घरुन ब-याच गोष्टी जमायला लागल्या. त्यात काही काळाची गरज म्हणुन त्यांनी मुलांच्या हातात  मोबाइले दिला आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी पैसा कमविणे याला पर्याय नाही. विभक्त कुटूंब पद्धतीमुळे “एक बाळ” किंवा नकोच या विचार सरणीमुळे समान विचाराचे मित्र-मैत्रिणी मिळत नाहीत, ना आई-वडिलांना, ना मुलांना. सतत व्हर्चुअल बोलणे, ऐकणे आणि पाहणे सुरू असते. गुगल केले कि सर्व काही मिळते हे चक्र चालुच राहते. याचे होणारे परिणाम हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. शाळेतही वातावरण पुर्वीसारखे राहिलेले नाही. शिक्षक,पालक आणि बालक यांच्यातले एकुणच परस्परसंबंध बदललेले आहेत. अवास्तव फी देऊनही शिक्षण मिळत नाही म्हणुन पालक  नाराज तर मुले अगदीच आगाऊ हुशारीने वागत असल्यामुळे त्यांच्याशी कसे वागावे हे शिक्षकांना उमगत नाही. मुलांना शिकविणे हे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे.

            घरी जास्तच लाड होत असल्यामुळे “नाही” ऐकायची सवयच राहत नाही. एकटेच असल्यामुळे वाटुन खाणे, जबाबदारीने वागणे, लहान किंवा मोठे कोणीच नसल्यामुळे कोणाशी बोलावे हे त्यांना कळत नाही. घरात सांभाळणारी बाई/मुलगी कितपत या गरजा पुर्ण करित असतील हेही सांगता येत नाही. त्यासाठी खरे तर आजी-आजोबा हे आवश्यक असतात पण ती तडजोड करायला दोघे/चौघेही तयार नसतात. नाईलाजाने पाळणाघर किंवा काहितरी पर्यायी व्यवस्था पालकांना करावी लागते. या सगळ्या गोंधळात मुलांचे बालपण कुठे हरवते ते कुणालाच कळत नाही. मुले कधी मोठी होतात तेही कधी कधी कळत नाही. वयानुसार त्यांच्या समस्या, शंका/कुशंका, कुतुहल शमविणारे कोणी मिळत नाही ही व्यथा सगळ्या मुलांचीच असते. अचानक कधीतरी डोळे उघडतात तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. यासाठी मैदानी खेळ, अंग़त-पंगत,योगाभ्यास,शरीरशास्त्राची जाणीव आणि पर्यावरणाचे प्रेम शिकावयास हवे.

            परकिय लोकांचे अनुकरण म्हणुन आपण नाईलाजाने मुलांना लांबच ठेवतो त्यामुळे भावनिक ओलावा किंवा आपुलकी निर्माण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यातच शाळेतले साथीदार चांगले मिळाले तर ठिक नाहीतर त्यांचेही काही समस्या वाटुन घेण्यासाठी प्रयत्न झाल्यास अनेक नवीन समस्या तयार होतात. अशा वेळी पालकांचा संयम, मुलांना वेळ देणे ही प्राथमिकता हवी पण कुणी घ्यायची हेही हल्ली वादाचे कारण होऊ शकते. या वारंवार होणा-या तडजोडीची अपेक्षा बहुतांशवेळा आईकडुन अपेक्षित असते. इगो कधीतरी, कोणाचा तरी दुखविला जातो आणि त्याचेही परिणाम मुलांवर होतात. अशावेळी त्यांच्या मनाचा विचार कोण करणार? काहीजण मुलांसाठी म्हणुन ब्रेक घेणारेपण असतात नाही असे नाही. घरुन काम करण्यामुळेही बरेचसे मुलांवर लक्ष ठेवणे शक्य होते. “जन्म देणे सोपे आहे पण वाढविणे कठिण”असे काहीजण म्हणतात ते यासाठीच. मुले लहान किंवा मोठे असोत पालकांना मुलांची काळजी ही घ्यावीच लागते. अवतीभोवतीचे वातावरणही तेवढेच यासाठी चांग़ले असणे आवश्यक असते. पुर्वीसारखे शेजारी,काका मामा,आत्या-मावशी अशा अनेक नात्यांनाही आपण हरवत चाललोय मग मुलांवर कोणाचे लक्ष असणार? असे “हरविलेले बालपण” आपण सगळीकडे बघत असतो. ते लवकरच नको त्या वयात नको ते बघायला शिकतात. त्यातुन हवा तसा अर्थ काढुन त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात.

             हल्लीची पिढी खुप हुशार, स्मार्ट आणि चपळ (ॲक्टिव्ह) आहे. त्या हुशारीला योग्य ते वळण लावल्यास खुप काही साध्य होऊ शकेल. काहीतरी नवीन शिकणे, शिकविणे आणि स्वत: त्यात मेहनत करण्याची आवड तयार होऊन त्यांच्या हुशारीचे चीज होईल. जमल्यास नातेवाईक,गावी आणि आपले जुने संदर्भ, इतिहास सांगणे, त्याची आवड तयार करणे, वाचन, लिखाणास प्रोत्साहन आणि एखादी कला विकसित करणे हे एक आव्हान म्हणुन स्विकारल्यास काही कठिण नाही. तसे प्रयत्नही होतात नाही असे नाही पण जाणिवपुर्वक व्हावयास हवेत. किती लहान वयात मुले अनेक पराक्रम खेळात, अभ्यासात, संशोधनात काय काय नवीन आपण ऐकतच असतो. तसेच अनेक क्षेत्रांकडे लक्ष वेधल्यास सगळ्यांचेच भले होईल. वेळीच ही आवड ओळखुन तसे प्रयत्न केले गेले पाहिजेत. तसेच माझ्या मते,व्यवहार ज्ञान, नितीमुल्ये, संस्कार आणि अध्यात्म लहान वयातच शिकविल्यास ब-याचशा समस्या उद्भवणारच नाहित.

              दुसरे एक बालपण स्विकारावे लागते ते म्हणजे वयानुसार येणारे. साधारण साठीनंतर “दुसरे बालपण येते”असे म्हटले जाते. याचाही नाही म्हटले तरी स्वत:ला व इतरांना त्रास होत असतोच. इथेही पुर्वीसारखे सोबत कोणी नसल्यामुळे एकटे वाटण्याचा धोका जाणवतो. नवरा-बायको एकमेकांना समजुन घेणारे असले तर हरकत नाही अन्यथा यालाही सामोरे जाणे, तशी तडजोड करणे कठिण वाटते विशेषत: नवरा/बायको आततायीपणे वागत असल्यास. याला कारणे अनेक असतात त्यांचाही विचार व्हावयास हवा. निरागसता ही विचारात, वागण्यात आणि एकुणच व्यक्तिम्त्वात आढळल्यास त्या व्यक्तीची, समाजाची व देशाची प्रगती लवकर होऊ शकेल. एकुण काय तर मनातले निरागसत्व/शैशव जपणे दोन्ही/तिन्ही पिढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते?


                                   

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव