सौजन्याची ऐषीतैशी

               मध्यंतरी के.बि.सीच्या मंचावर एका लहान मुलाने अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर दिले यावरुन अनेक मते नोंदवली गेली. त्यावरुन सौजन्याचे महत्व लोकांच्या लक्षात आले असेलच. सौजन्याने वागणे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे का? याबाबतीत पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करावयास हरकत नाही. विशेषत: अमेरिकन लोक शिष्ट आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असले तरी सौजन्य अगदी ओतप्रोत भरलेले असते. अगदी अनोळखी माणसालासुध्दा गूड मॉर्नींग म्हटल्याशिवाय पुढे जात नाहीत. थोडीशी मदत केली/त्रास झाला तर लगेच “थॅंक यु” “सॉरी” म्हटल्याशिवाय पुढे जाणारच नाहीत.ज्याला आपण एटिकेटस,मॅनर्स , लॉजीकल वागणे म्हणता येईल. याऊलट काहीजण साधे साधे नियम, माणुसकीसुद्धा दाखवायला तयार नसतात. याला काय म्हणावे सौजन्याची ऐशीतैशी” का?

            सोप्या,छोट्या छोट्या गोष्टींतुन,कृतीतुन, बोलण्यातुन हे दिसुन येते. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे असेही काही दिवसांनी “क्लासेस” काढावे लागतील का असे कधीकधी वाटते. ट्रेनमध्ये, लिफ्टमध्ये घाईघाईत चढतांना त्यांना आधार देणे, ज्येष्ठ नागरीक, स्त्रिया,मुले, आजारी ,अपंग लोकांना मदत करणे, प्राधान्य देणे, मदत करणे किंवा निदान त्यांची नोंद तरी आपण घेतो का? ज्यांच्याकडुन मदत घेतो त्यांचे आभार मानतो का? साधे टॅक्सी,रिक्षा,बसमधुन उतरताना त्यांचे आभार मानता? पैसे देतो की, असे तुम्ही म्हणाल पण व्यवस्थित पोहोचवले, खड्ड्यातुन बाहेर/बाजुने नेऊन कमीत कमी धक्के न लागता आपण आरामात प्रवास करतो ते कुणामुळे? निदान त्यांना नाही म्हटले तरी मनात नक्किच म्हणावे. सामाजिक माध्यमावर तर जो प्रतिसाद किंवा ज्याला ट्रोलींग केली जाते त्याची भाषा कधी कधी वाचायलाही लाज वाटते. सभेमध्ये, राजकीय पक्षाच्या प्रचार सभेत किती जण भाषा सौम्य वापरतात? टिका करतांनासुद्धा कितीजण समोरच्याचा मनाचा विचार करतात? राग आल्यावर कितिजण सौम्य भाषेत व्यक्त करतात?

              नाटक,सिनेमा,एखादी गाण्याची मैफल रंगात आलेली असते आणि कोणाचा तरी मोबाईल वाजतो,कसे वाटते तेव्हा? एवढे भान आपण खरेच बाळगतो का? मध्ये मध्ये बोलणे, एकमेकांची टिंगल करताना आपली भाषा कशी असते? ट्रेनच्या बाकावर पाय लांब करुन,तिरके, समोरच्याला लागतात तरी आपले लक्ष नसते. मुले गोंधळ घालत असतात पण त्यांना आवरणे आपले काम असते हेच काहीजण विसरुन जातात. ऐन दुपातच्या वेळी मुलांना खेळायला पाठवणे, त्यांच्या आवाजामुळे इतरांना त्रास होतो,हे लक्षात घेतले तर कुणी पाठवणारच नाहित ना! मोठ्मोठया आवाजात टि.व्ही.,गाणी लावणे हे कसे चालते? याला काही कायद्याचे नियम आहेत का? तर नाही पण सामाजिक वातावरण सुस्थितीत राहण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपले व्यक्तिमत्व विकास तर घडवितेच त्याचबरोबर समोरच्यालाही आनंददायी वाटते.

            दुस-यासाठी दार उघडणे, स्वच्छता बाळगणे, प्रथम येणा-यास पुढे जावयास लावणे, रांगेचे नियम पाळणे, साधे रोजचे वॉचमन, गृहसेविका, कामगार यांना नुसती ओळख दाखवुन विचारपुस केल्यास नक्किच त्यांना बरे वाटेल. हे संस्कार जर मोठ्यांनी पाळले तर आपोआप लहान मुलेही अनुकरण करतात. घरात/शेजारी कोणी आजारी असल्यास मदत करणे, त्यांना योग्य ती काळजी घ्यावयास लावणे, अपघात, आणीबाणी, दुर्घटनेच्या प्रसंग़ी सजगता दाखवुन तसे निर्णय घेणे, लहान मुलांशी प्रेमानेच बोलणे, त्यांच्या शंका-कुशंकांना उत्तरे देणे, घरात ऐनवेळी काही कमी-जास्त झाल्यास आपण तडजोडीची व्यावस्था करणे,

अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची मदत करुन आपण एकप्रकारे स्वत:लाच मदत करित असतो. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा समोरचापण लक्षात ठेऊन किंवा अगदी अनोळखी व्यक्तीसुद्धा कधी कधी खुप काही करुन जाते. ज्यामुळे आपण कायम त्यांचे आभार मानु शकतो. अशा व्यक्ती सगळ्यांना हव्या असतात मग ते लोकप्रिय होण्यास वेळ लागत नाही. याशिवाय मदत केल्यामुळे स्वत:ला आत्मिक समाधान मिळते ते वेगळेच. साधी जी रोज कामाला येणारी बाई तिच्याशी चांगले हसुन बोलले तिच्या समस्या जाणुन घेतल्या तरी ती लक्षात ठेऊन थोडे जास्तीचे काम करण्यांस का कु करणार नाही.

           काहीजणांना कायम चुकाच दाखवायच्या सवय असते ती जरा मोडुन आपण एखाद वेळेस कौतुकाचे  2 शब्द बोलुन बघावेत त्यांचा चेहरा बघा कसा फुलुन येईल. एवढे कशाला रोज बायकोला तरी आपण हे सौजन्य दाखवितो का बघा. तसेच स्त्रियांनीसुद्धा नव-याचे कधी तरी कौतुक करावयास हरक्त नाही. मुलांनाही नेहमीच ओरडले पाहिजे असे नाही कधी तरी त्यांच्या सारखे होउन त्यांना काय हवे ते विचारा. हाताखाली काम करणारे कर्मचारी/अधिका-यांना कधी तरी कार्यालयीम कामाव्यतिरीक्त गोष्टींबद्दल विचारा. यामुळे होते काय की, आपुलकी वाढेल, कामे जास्त जोमाने केली जातील. शेवटी माणुस कायम सहवास, दोन चांगले शब्द, सहानुभूतीचा भुकेला असतो अगदी आजच्या एआयच्या जमान्यात असला तरी. सजीव असल्याचे, जीवन जगण्याचे हे साधे नियम पाळले तर त्यालाच “जीवन ऐसे नाव”म्हणावे लागेल. आयुष्य म्हणजे तरी काय “दिल्या-घेतल्याचा डाव” अजुन काय? चांगले वागाल तर लोक चांगले वागतील. टाळी एका हाताने वाजत नाही आणि ती वाजविल्याशिवाय मजा येत नाही.




Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव