नकटे व्हावे परी न धाकटे न व्हावे
मराठीतल्या म्हणी ह्या किती समृद्ध आणि उपयोगी व अनुभवी असतात हे ह्या वाक्यावरून दिसुन येते. वास्तविक मुली नकट्या असल्या कि, त्यांना नाकावरुन गाडी गेली किंवा “मुमू” (मुमताज)चे नाक असे चिडवायचे. तेव्हा कळत नव्हते पण आता समजते. आता नेमके आठवायचे कारण म्हणजे आम्ही शेंडेफळ म्हणुन प्रसिद्धच आहोत. लहान असल्याचे सगळे फायदे घेऊन झाल्यावर आता काय झाले? असे तुम्ही म्हणाल पण काहीतरी सारखे खुपत असते ना ( जिथे गुप्ते असतात) तसे हल्ली आपल्याला ब-याच वेळा डावलले जाते असे माझ्या लक्षात येतेय. रिकामे डोके चालते ना तसे काहीतरी. माझी नोकरी,मुली आणि संसार यामध्ये व्यस्त असल्यामुळे परस्पर काही गोष्टी मोठी लोक ठरवल्यानंतर सांगत आणि मलाही त्यात कधी गैर वाटत नसे. मग आताच का असे वाटेल तुम्हाला?
साधारण
50-60 च्या दरम्यान असलेल्या सगळ्यांचेच हे दु:ख असावे कदाचीत. मोठे भाऊ,बहिणी,सुना,जावई
यांना जेवढा मान मिळतो तेवढा धाकट्यांना मिळतो का विचारा? पुर्वी तर एकत्र कुटूंबात
मोठ्याचा कायमच मान राखला जायचा. बाकीचे मग त्याच्या हाताखाली मदतीला असायचे. कोणतेही
निर्णय घेतांना त्याचे मत महत्वाचे गृहीत धरले जायचे. बाकिच्यांना विचारलेही जायचे
नाही. कमी अधिक प्रमाणात ते बरोबरही आहे. जेव्हा धाकट्यांना याविरुद्ध काही मत नोंदवायचे
असेल तर? तेवढा मनाचा मोठेपणा दिला पाहिजे ना! त्यांनाही काही मत असते,वेगळे विचार
असतात हे समजुन घेतले पाहीजे. त्यामानाने आताची पिढी एकदम हुशार,लगेच मत देऊन मोकळे
होते. मला आठवतय, वडिल,मोठे भाऊ,बहिण,आत्या, काका,मामा मावशी यांचे समोर उभे राहुन
बोलणेसुद्धा जमत नसे. एक प्रकारचा आदर,भिती आणि संकोच वाटायचा. आता तसे होत नाही, बिनधास्त
गळ्यात गळा घालुन मजा मस्ती चाललेली असते. अर्थात संबंध आपण कसे जपतो त्यावर हे अवलंबुन
असते. ते कदाचित मलाच जमले नसेल. मोठेपणाची भिंत आडवी येत असावी का?
एका व्यक्तीने फार पुर्वी माझ्यावर शेरा मारला होता,”तुम्हाला वरवर,किना-याने
चालायची सवय आहे,पाण्यात डुबकी मारुन पोहता येत नाही.”मी कुणात सहसा पटकन मिक्स होत
नाही म्हणुन असेल कदाचित. फार जवळ जाणे जमत नाही म्हणा किंवा अतीशय शंका-कुशंका मनात
कधी येत नाहीत म्हणुन असावे. या लहानपणाच्या संस्कारामुळे कधीच मला माझे मत मांडता
आले नाही आणि कोणी विचारले देखील नाही. प्रेम सगळे करतातच, लहान म्हणुन जास्तच जपतात
हेही तेवढेच खरे. कधीतरी लहानांचेही ऐकावे एवढीच ईच्छा! त्याला/तिला काय कळतंय, अजुन
लहान आहे त्यांच्या बालमनावर परिणाम होईल म्हणुनही कधी काही सांगावेसे वाटत नसेल. हे
लहानपण कधी कधी उलटही होते, नेहमीच मी का करावे? म्हणुनही जबाबदारी झटकणारेही व्यक्ती
असतात. शेवटी ज्याचे त्याचे व्यक्तिमत्व ही जबाबदारी घ्यायची की नाही हे ठरवत असते.
कार्यालयात तर आणखीन मजा असते. कोणा ज्येष्ठ/अनुभवी व्यक्तीला विचारल्यास ते कधीच पुर्णपणे
सांगणार किंवा शिकवणार नाहीत किंवा कोणतेही सहकार्यही करणार नाहीत. याउलट काहिजण स्वत:
पुढे होऊन मदत करायला/शिकवायला तयार असतात. आपण कुठे आहोत नक्की याचा सगळ्यांनी जरूर
विचार करावा असे वाटते.
मोठ्या
लोकांचे मोठेपण असतेच पण काही वेळा त्यांचे निर्णय चुकतात तेव्हा त्यांना दाखवुन दिले
की राग येतो. त्यांची मते मात्र कायम लहानांनी ऐकलीच पाहिजेत असे गृहित धरले जाते.
एखादे वेळेस विरोध झालाच तर मग काही खरे नाही असेही होते ब-याच वेळा. त्यांच्या समस्या,
आजारपण,सुख-दु:ख कधीच त्यांना लहानांबरोबर वाटुन घ्यावेसे का वाटत नाही याचा नेहमी
मला प्रश्न पडतो. शेवटी माणुस आहे,कधी कमी कधी जास्ता हे कुठे ना कुठे असतेच त्यात
एवढे लपवण्यासारखे काहिच नसते. दुस-यांकडुन कळते तेव्हा काय वाटत असेल याची कल्पना
न केलेलीच बरी. तेच लहानांनी केले तर लगेच कान धरायला हे मोठे असतातच.असायलाही पाहीजे
पण समान संधी, भेदभाव होऊ नये किमान मोठेपणाचा अतिरेक होऊ देऊ नये एवढीच अपेक्षा असते.
काही प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोण प्रेत्येकाचा वेगळा असु शकतो. एकवेळ आपण दुस-याचे
ऐकतो पण आपल्याच घरातल्याने सांगितलेले पटत नसते हेही एक कोडेच असते.
इतिहासात
कधी कधी धाकट्या लोकांनीही उत्तम कामगिरी केलेली दिसुन येईल आपल्याला. मला मात्र कायम
असेच वाटते कि, लहानांनीही पुढे येऊन जबाबदारी घ्यावी, कामे वाटुन घ्यावीत. जे जमत
नाही ते शिकुन घ्यावे. कायम लहानच राहण्यात काय मोठेपणा? कधीतरी आपणही मोठे व्हावे
ना! मोठेपणाच्या ओझ्याखाली द्बुन जाणारेही माझ्या पाहण्यांत आलेत. वेळीच या गोष्टी
दोघांनीही मनावर घेतल्या तर कदाचीत नातेसंबंध बिघडणार नाहीत. संपत्तीतही वाटा समान
असल्यामुळे तशी सगळ्यांचीच जबाबदारी असते. आता तर एकटे किंवा दुकटेच मुले/मुली असतात
मग प्रश्नच निर्माण होत नाहित. असा हा प्रवास (लहानपणाचा) गेले 60 वर्षे चालु आहे.
ही एक मनात खंत होती ती लिहुन व्यक्त करता आली हेही नसे थोडके. तुम्हाला काय वाटते?
एकीकडे लहानपणी “मोठे” होण्याची घाई असते तर मोठे झाल्यावर “हे”असे होते. काही चुकले
कि मात्र“आता तु लहान नाहीस” म्हणुनही ऐकुन घ्यावे लागते. माणसांचा स्वभाव हेच याचे
उत्तर असावे कदाचीत!
बाय द वे,
वर्षाचा हा शेवटचा लेख म्हणुन खालील काही ओळी लिहुन आपला तातुरता निरोप घेते. भेटुया
नवीन वर्षात नवीन संधी,आव्हाने आणि आनंद व समाधानासह!
माणसे भेटत गेली, मला आवडली म्हणुन मी जोडत गेले,
वर्षाचा हा शेवटचा आठवडा, तुमची
साथ अशीच नेहमी राहो,
नवीन वर्षात असेच ऋणानुबंध
जपुन नवी सुरूवात करुया!
खुप खुप शुभेच्छासह नवीन
वर्षाचे स्वागत करुया!
Comments
Post a Comment