वहिनीची आई
दि.4.1.26 रोजी वहिनीची आई (श्रीम. मंगला आकलेकर) वय वर्षे 93, यांचे निधन झाल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या अनेक आठवणींनी मन भरुन आले. साधारण 40-43 वर्षांपुर्वी “ वहिनीची आई”म्हणुन माझा त्यांच्याशी ओळख झाली ती आजतागायत तशीच मनात घर करुन राहिलेली आहे. त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध गेल्या 20-22 वर्षांत आला. काही काही व्यक्तींचे अनन्य साधारण महत्व कधी कमी होऊच शकत नाही. उलट आदर, अभिमान, चिकाटी,जिद्द आणि शिस्त यामुळे ती व्यक्ती अधिकच अनुकरणीय ठरते. प्रेमळ, सगळ्यांना सांभाळुन घेण्याची वृत्ती, मदतीचा हात कायम पुढे तर ज्ञान, अभ्यास आणि कौशल्याचा अनोखा संगम एकाच व्यक्तीत कसा काय असु शकतो हा मला प्रश्न पडणा-या व्यक्तींमध्ये त्या सगळ्यात जेष्ठ आणि श्रेष्ठ होत्या याबद्दल सगळ्यांचेच एकमत असावे.
मी सगळ्यांत
लहान म्हणुन आणि माझी आई गेल्यापासुन त्यांना मी आणि मला त्या जास्तच जवळ वाटायच्या.
त्यांच्याजवळ बसुन गप्पा मारणे कदाचीत मीच करत असे. त्याही अगदी मनापासुन बोलायच्या.
माझ्या आजारपणात त्यांनी दिलेला धीर आणि संकटांत आल्यानंतर कसे त्यातुन बाहेर पडायचे
हे त्यांच्याकडुन मी शिकले असावे. त्यांचे धैर्य, समजावुन सांग़ण्याची पद्धत आणि असामान्य
स्मरणशक्ती बघुन कधी कधी मी चकित व्हायचे. मुलांवरचे प्रेम, माया, सहनशक्ती, माफ करण्याची
शक्ती अमर्याद असावी असे वाटायचे. सगळ्याच व्यक्तिंशी त्यांचे संबंध अगदी जिव्हाळ्याचे
असायचे. विचारपुस केल्या शिवाय त्यांना चैंनच पडत नसे. सगळ्यांत मोठी बहिण म्हणुन भाऊ,
वहिनी,बहिणी, भावोजी सगळेच मान देऊन असत. जावई,सुना,मुले,मुली, नातवंडे अगदी आता (तिसरी
पिढी आहे )“पणजी”झाल्यावर सुद्धा त्यांचे वागणे तसेच होते.
एकदा
असेच त्यांनी मला वहिनीच्या बाबांची कवितेची वही वाचायला दिली कारण माझी वाचनाची, लिहिण्याची
आवड त्यांना माहीत होती. ती वही वाचल्यावर मी एवढे प्रभावि त झाले लगेच मी त्यांना
सांगितले,या वहिचे (कवितासंग्रह) पुस्तक काढल्यास नक्किच सगळ्यांना आवडेल आणि बाबांची
एकप्रकारे ईच्छाही पुर्ण होइल. लगेच त्यांनी त्या सगळ्या कविता स्वत: लिहुन काढल्या
कारण ती वही (मुळ प्रत) हरवायला/गहाळ व्हायला नको म्हणून. नंतर यथावकाश पुस्तक प्रसिद्ध
झाल्यानंतरचा त्यांचा आनंद काय वर्णावा!. किती ते प्रेम,जिव्हाळा आणि जपणूक. तीच गोष्ट
संस्कार आणि शिकवणुकीबाबत. कोणतीही माहीती त्यांना विचारा, लगेच संदर्भासहित समजावुन त्या सांगायच्या.
अनेक जुन्या गोष्टी,पाक-कौशल्य, घरगुती औषधे,गावच्या परंपरा, रितीरिवाज,नातेवाईक,कोकणीबद्दल
आस्था, आयुर्वेदिक उपाय, बागकाम, वनस्पतीची नोंद, त्यांच्या वाढीसाठी काय काय करावे
लागते इ.अशा अनेक गोष्टी त्यांना माहित होत्या.
5-6 वर्षांपुर्वी अत्यंत गंभीर आजारपणातुन त्या जिद्दीने
दोन वेळाबाहेर पडल्या याचे खरे तर सगळ्यांना आश्चर्य व त्यांच्या जिद्दीचे कौतुकही
वाटले. त्यानंतरही त्यांनी त्यांचे रुटिन चालुच
ठेवले होते. सकाळी उठल्यावर व्यायाम,आंघोळ,देवपुजा(ताज्या फुलांचा हार बनविणे),नास्ता
,खाणेपिणे, जेवण,गोळ्या घेणे अगदी वेळच्या वेळी न विसरता. कोणी देईल म्हणुन वाट नाही बघणार. कोणी
पाहुणे येणार असतील तर साडी नेसुन व्यवस्थित बाहेर येणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना
काय हवे नको ते बघणे, कायम हसमुख कधीच त्यांचा चेहरा त्रासदायक किंवा चिंताग्रस्त असा
दिसायचा नाही. मुलगी, जावई, नातवंडे आणि आता नातसुनदेखील कायमच त्यांना जवळचे वाटुन
कधी “मेडिकल आणिबाणी”(घरात 4डॉक्टर्स असल्यामुळे ब-याच गोष्टी त्यांना माहित असायच्या)असेल
तर त्या जेवायला थांबुन,काय झाले? असे आल्यावर विचारुन धीर देण्याचे काम करत. त्या
कधीच कंटाळलेल्या किंवा म्हातारपणामुळे त्रस्त अशा दिसल्या नाहीत.
कधी कधी
काही गोष्टी राहुन जातात त्या अशा. माझ्या मुलिला 3 तारखेला”मुलगा झाला आता परत एकदा
तुम्ही पणजी झालात” म्हणुन सकाळी 4 तारखेला जरी मी फोन केला असता तरी त्यांना खुप आनंद
झाला असता. माझे फोनवरुनच त्यांनी तोंडभरुन कौतुक केले असते आणि बाळाला अनेक अनेक आशिर्वाद”असे
म्हटले असते. आता कोण म्हणणार? त्या जे पाकिट द्यायच्या त्यावर त्या स्वहस्ते मजकुर
लिहायच्या आणि मगच ते पाकिट सगळ्यांना मिळायचे. मी अजुन जपुन ठेवली आहेत त्यांची पाकिटे
आठवण म्हणुन. मला पैशापेक्षा मजकुराचे अप्रुप वाटायचे. त्यांची मुलेही उच्च-शिक्षण घेऊन,परदेशात
जाऊन आईची ईच्छा आणि वारसा पुढे चालवत आहेत. वहिनीला दोन भाऊ (इंजिनीयर) आणि 2 बहीणी
एक डॉक्टर आणि एक वकिल व शाळा संस्थापक होती. आता सगळे सेवानिवृत्त आयुष्य जगुन आराम
कारायच्या वयात आहेत पण आईंसारखेच कायम कार्यरत असतात. भाऊ-भावंडांचेही एकमेकांवर खुप
प्रेम आणि आदर व सौजन्याची वागणुक आहे. असे म्हणतात ना,“जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला”,अशा
या महान व्यक्तीमत्वांस आम्हां सर्वांतर्फे श्रद्धासुमन.
“ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गगती देवो”
Wonderful 😊😊👍 character!! Wish we can follow their examples!!! Our human weakness,is, we decide how others should behave!! No body wants to improve themselves!!!!? We want to train the whole world!! But never ourselves!!!!
ReplyDeleteThank you for your lovely comments! 🙏🏻👍
ReplyDeleteyour name please?