मेंदुविरर्हित मानव शक्य आहे ?

 

              नुकतेच “मनात…” अच्युत गोडबोले लिखित पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक अमेरिकेला जाण्यापुर्वी वाचुन,त्याबद्दल लिहुनपण झाले होते. लेख प्रकाशित करायचे राहुन गेला होता. आता जवळपास 5 महिन्यांनी आल्यावर पुन्हा लिखाण सुरु केलंय म्हणुन हा लेखन-प्रपंच. ह्या पुस्तकाचा मथळा (Tagline) “मानसशास्त्र उत्कंठावर्धक रम्य फर” अशी होती. त्यानंतर नेमके आता 15 दिवसांपुर्वीच डॉ. ्श्री. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले त्यानिमित्तही हा वि निवडला गेला. हे पुस्तक वाचुन, त्यावर लिखाण करुन एकप्रकारे त्यांना ही श्रद्धांजली दिली असेही म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाचे लिखाण करतांना संदर्भ आणि विशेष सुचना नाडकर्णी साहेबांनी दिल्या होत्या असे गोडबोलेंनी प्रास्तविकात लिहिलेले आहे. तसेच भारतात मानसशास्त्रज्ञ अगदि हातावर मोजण्याइतके आहेत बघुन आश्चर्यदेखील वाटले. खरे तर भारतात जास्त वाव आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाला!पण एवढी मेहनत,संयम,अभ्यास आणि संवेदनशीलता कुठे मिळणार? असो.

         29 पानांचे प्रास्तविक,मानसशास्त्रासारखा किचकट,गुंतागुंतीचा विषय हे सगळे सोप्या भाषेत समजावुन सांगणे,केस स्टडिज, परदेशी मानसशास्त्रज्ञ (भारतीयांचा अभाव खटकला) यांनी केलेले प्रयोग,संशोधन,निष्कर्ष असा एकुण प्रपंच 600 पानांत बसविण्यासाठी केलेले प्रयत्न खरेच आवाका खुप मोठा होता त्यामुळे मला वाचायला 2 महिने लागले.अमेरिकेला जायच्या आधी संपविले कारण नंतर वेळ मिळणार नव्हता.(आजी झाले म्हणुन अमेरिकेला जायचे होते) त्यासाठी किती संदर्भ,(अवघे 4 भारतीय) डॉक्टरांच्या मुलाखती, मेंदुविकारतज्ञांचे मत, मानवी मनाचे विकासाचे टप्पे आणि वेगवेगळ्या थेरपीज असे हा एक कॅलिडोस्कोप/एनसायक्लोपिडियाच लेखकांनी वाचकांसमोर ठेवला आहे असे मला वाटते. एकुण 17 भागात असलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना,संशोधकांना, ज्यांना या विषयाची आवड असणा-यांसाठी एक वरदानच ठरेल. स्वत: गोडबोले हे एक आय.आय.टी.अभियंता असुन,जगभर प्रवास करणारे, विश्लेषक आणि लेखक आहेत. रोज 15-18 तास अभ्यास करुन, इंग्रजी साहित्य वाचुन मराठित भाषांतर करणे असे अनेक व्याप सांभाळुन हे पुस्तक (87संदर्भग्रंथांचा अभ्यास) सोप्या भाषेत लिहिणे खरेच,हॅटस ऑफ लेखकाला ! मानसिक प्रगती यासाठी केलेली अविरत धडपड असेच म्हणावे लागेल. या पुस्तकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील:-

1)    फ्राईडपासुन ते अल्बर्ट एलिसपर्यंतच्या अनेक मनोविश्लेषक, मनोविकारतज्ञ, अनेक संशोधकांचा परिचय, त्यांची काम करण्याची पद्धत, वापरलेले निकष याबाबत सचित्र आणि विस्तृत माहिती.

2)    मेंदुची रचना, शोध,इतिहासातुन होत गेलेली प्रगती, ईजिप्तपासुन वेगवेगळ्या देशांतल्या तज्ञांनी केलेल्या जडणघडणीची मार्गदर्शक आढावा,वाटचाल आणि वर्णन.(भारत मात्र त्यात नव्हता)

3)    मानसशास्त्रातील अनेक संज्ञा,प्रकार,विभाग आणि वर्तणुकिच्या नोंदी, त्यातुन काढलेले निष्कर्ष.

4)    वापरलेले तंत्रज्ञान आणि मेंदुची/मनाची शास्त्रिय रचना व कार्यपद्धती.

5)    कुणाकुणावर प्रयोग केले-उंदिर,मांजर,माकड्,कुत्रा,चिपाझी,जुळी मुले, माणसे आणि अनेक पाळिव प्राणी…

6)    मानसोपचाराच्या पद्ध्ती:-1988 पर्यंत 230 पद्धती त्यानंतरसुद्धा आलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा आढावा.

7)    अनुषंगिक कथा, स्थानिक मनोव्यवस्था,प्रक्रियांचे होत गेलेले बदल.

8)     मेंदु हे एक गुढ रसायन,रहस्यमय गुहा असुनही त्यात शिरण्याचे, अवलोकन करण्याचे मानविय प्रयत्न थक्क करतात.

9)     मेंदुचे अफाट कार्य, त्याची कार्यक्षमता,आपोआप होत जाणा-या क्रिया-प्रतिक्रिया, व्यक्तिमत्वात होणारे बदल,निर्माण होणा-या समस्या त्यावरचे उपाय आणि अनेकवेळा येणारे अपयश,त्यातुनही निघणारे अनुमान.

10)              प्रेरणांचे उगमस्थान,जनुकिय समानता,गुणधर्म आणि वैयक्तिक पैलु.

        अशा अनेक बाबींचा उलगडा या पुस्तकातुन झाला. एका चिनी कथेचा उल्लेख मुद्दाम येथे करावासा वाटतो ज्यावरुन आपल्याला आपल्याच मनोव्यवस्थेची गंमतीशीर कल्पना येऊ शकेल. टेबलावर ठेवलेली दारुची बाटली लवंडते आणि त्यातील सांडलेली दारु 3 उंदीर पितात आणि मग काय घडते त्याची हि मजेशीर कथा.

उंदिर-1  आत्ताचा आता मी राजाकडे जातो आणि त्याला वठणीवर आणतो.

उंदिर-2  राजा कशाला पाहीजे,मीच या पृथ्वीचा सम्राट आहे.

उंदिर-3  मित्रांनो,तुम्हाला जे पाहिजे ते करा मी जातो मांजरीवर प्रेम करायला.

        माणसांच्या बाबतीतही कमीअधिक प्रमाणात असेच घडत असते! या पुस्तकामुळे अशा अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. विशेष म्हणजे लेखकाने शेवटही विचारपुर्वक केलेला आहे. मानवता,समान संधी,आत्मसम्मान यावर आधारित समाज उभा करायचा असेल तर सगळ्यांनीच प्रयत्न करावयास हवेत. त्यासाठी चळवळी उभाराव्या लागतील,दिशा ठरवाव्या लागतील ,त्यासाठी लागणारा हा छोटासा खारिचा वाटा. खरेच,किती उदात्त हेतुने केलेले हे लिखाण सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरेल. तसेच आजच्या धावपळ,स्पर्धा, तंत्रविज्ञान, एआय. च्या जगात वावरणारे आपण खरेच कृत्रिम मेंदु बनवु शकू का? बनवला तरी त्यात काही मर्यादा असतीलच. ते आव्हान पेलण्यासाठीसुद्धा या निकषांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. हे पुस्तक वाचल्यामुळे समृद्ध व्हायला मदत तर होतेच पण त्याचबरोबर कुतुहूल वाढवण्यांत आणि मानसशास्त्राकडे बघण्याचा,समजुन घेण्याचा दृष्टिकोन मिळतो.

       जॉर्ज बर्नाड शॉ म्हणतात-“आपल्याला काही वेड्या लोकांची नक्किच गरज आहे कारण शहाणे आणि हुशार म्हणवुन घेणारे माणसे कशी जगाची वाट लावतात ते आपण बघतच असतो.” वेडे लोकच (ध्येयप्रेरित) इतिहास,समाज घडवितात आणि मानवाची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करतात. चला तर मग, एका न संपणा-या प्रवासाची सुरुवात करुया आपापल्या परीने. पद्धती, मार्ग, प्रयत्न वेगळे असतील पण अंतिम ध्येय एकच असावे-समाज उन्नती,विकास/ प्रगती, समाधान आणि शांती. एवढे केले तरी लेखकाच्या प्रयत्नांची दखल घेतली असे होईल.हि च आनंद नाडकर्णी सरांच्या आत्म्याला श्रद्धांजलीही ठरेल.



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव