2025-26 चा गोषवारा( जुलै-25 ते जुन-26)
2026 च्या सुरुवातीलाच अमेरिकेला गेल्यामुळे मागच्या वर्षीचा गोषवारा काढायचा राहुन गेला. देर आये ....यानुसार आता नवीन सहकार पद्धतीने काढु म्हणुन लिहावयास बसले. आता तसे काही आर्थिक फायदे/तोट्याचे गणित मांडायचे नाही तरी पण गेल्या वर्षभरात काय काय झाले याचा एक ओझरता आढावा घेतला की बरे असे वाटते. कार्यालयीन सवयीचा परिणाम एक असाही. तसे तर योगात,आध्यात्म्यात रोज रात्री झोपतांनाच दिवसभराचा आढावा घेण्यास सांगतात पण आपण ऐकतो कुठे! आता निवृत्तीनंतर काहीतरी कारण लिहावयास हवे ना!
गेल्या जुलैपासुन सुरुवात करुया. आजी होणार म्हणुन बातमी कळली तसे आनंद आणि काळजी दोन्ही बरोबरिनेच होते. आता काय करणार? या मोठ्या प्रश्नाचे उत्तर विमा-उद्योगात सामील व्हायचे ठरविले आणि डोक्याला चालना मिळाली. एक नवीन आव्हानात्मक क्षेत्राची ओळख आणि भाग होता आले याचा आनंद तर झालाच. त्यानिमीत्त्याने नवीन ओळखी, समस्या,उपाय याचेवर चर्चा,परिसंवाद,ट्रेनिंग घेऊन,व्याख्याने ऐकुन पुन्हा एकदा स्पर्धात्मक (संगणकिय) परिक्षेत चांग़ल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळे अजुन अभ्यास करु शकतो याचा आत्मविश्वास आला. याधीही नोकरीत आणि अमेरिकेत एकटी जाऊन आल्यामुळे वाढलेलाच होता. जीवन विमाबरोबरच आरोग्य-विमाही शिकला. त्यात 7-8 जणांना सुरक्षित करता येऊ शकले हेही समाधान लाभले.
जगात किती आणि कसे कथा,व्यथा असु शकतात याचे दर्शन झाले. दुस-याला एक उत्पन्नाचे साधन देऊ शकतो याचेही समाधान वाटले. काहिजण नाराज झाले, कशाला त्रास घेतेस, आराम करायचा, एवढे दिवस नोकरी,घर सांभाळलेस ना! मोठी भांडवली गुंतवणुक झाली म्हणुनही काहीजण नाराज झाले. मान,सन्मान,एक नवीन ओळख निर्माण झाली. एक अत्यंत दुर्लक्षित क्षेत्राचा समावेश करायला माणसे कशी मागे-पुढे विचार करित बसतात याचेही अनेक अनुभव आले. त्यानुसार अनेक व्यक्तिंची विचार-धारा बदलण्याची गरज जाणवली. त्यासाठी एका ठाम बोलणा-या व्यक्तीची गरज आहे या दुर्गुणांवर मात करायची संधी त्यामुळे मला मिळाली. अध्यात्मिक वारिमुळे थोडी ज्ञानात,अनुभवात भर पडली. ऐतिहासिक संदर्भ तपासायला मिळाले. नवीन क्षेत्रात लगेच पदोन्नती आणि जबाबदारीत वाढ झाल्या मुळे थोडी चिंता वाढली त्यातच लेकिचे बाळंतपण आल्यामुळे अजुन भर पडली. घरात पाहुणे, नातेवाईकांच्या येण्या-जाण्यामुळे संबंध वाढले.
जानेवारित अमेरिकेला गेले त्यामुळे तेथील वर्णन मी आधीच केले आहे. तिथे अभिवाचनाचा एक नवीन अनुभव घेतला. एकुण वर्षाचा ल.सा.वी. काढायचा झाल्यास प्रगतीबरोबरच कर्तव्य, जबाबदा-या वाढल्या. मेमध्ये आल्यानंतर पुन्हा नवीन इथले रुटिन सुरु झाले. त्याचबरोबर सलग, माहुर, माथेरान आणि लोणावळा येथे फिरुनही आलो. नातेवाईकांचा सहवास, नवीन ओळखी आणि योगा दिन असे साजरे केले. 60 वर्षे झाल्यानंतर अजुन काय हवे असणार? बाकी नेहमीचे युद्धाचे,महागाइचे ढग तर होतेच, गर्मीने हैराण केले. जुनमध्ये शेवटी शेवटी पाउसाने मन चिंब भिजविले आणि नवीन वर्ष ख-या अर्थाने सुरु झाले.
तुम्हीपण लिहा आणि बघा कसा अनुभव येतो ते! चांगल्या गोष्टी, प्रसंग,अनुभव स्वत:बरोबरच इतरांनाही प्रेरणा देत असतात/घेत असतात. बोलत राहा,एकमेकांशी संपर्कात राहा,मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना सांभाळुनच तर आपण जगत असतो. उतार-वयात तर जास्त गरज असते. अशा वेळी आपणही एक हात पुढे करु शकतो. समोरचा करेल कि नाही ते माहित नसताना हे मह्त्वाचे. पटतंय का? लगेच अंमलात आणा. हो, छंद जोपासताय ना? वेळ कसा जातो ते कळत नाही आणि मनात वाईट/नकारात्मक विचार येत नाहित. वाचन,लिखाण,गाणे म्हणणे/ऐकणे, चित्र काढणे, वाद्य वाजविणे अशा अनेक प्रकारे तुम्ही मन गुंतवुन ठेऊ शकता.
Comments
Post a Comment