योग्य जाणीव

               ब्रम्हविद्येच्या अभ्यासात “योग्य जाणीव” हा भाग जेव्हा शिकवण्यात आला तेव्हा त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व लक्षात आले. प्रत्यक्ष जीवनात स्वत:चे स्थान ओळखणे म्हणजे “योग्य जाणीव” होय. ज्या गोष्टी आपल्याला समजतात किंवा ज्याची आपल्याला पुर्ण जाणीव आहे अशाच गोष्टी आपल्याला मिळू शकतात. ही योग्य जाणीव प्राप्त करणे/करुन देणे हे प्रथम कर्तव्य आई-वडिल, शिक्षक आणि परिस्थीती वारंवार आपल्याला करून देत असते. योग्य जाणीव मनात दृढ झाल्यावरही ती आचरणांत आणणे कठिण असते. अशी योग्य जाणीव प्राप्त झाली नाही तर मनुष्य आपल्या जन्माचा स्वामी न होता परिस्थितींच्या हातातील एक बाहुले होऊन जातो. यात आपण कोण आहोत,कुठे आहोत आणि आपल्या आजुबाजुला काय घडत आहे याची आपल्याला असणारी समज असते.

          ब-याच वेळा असे होते कि, आपल्यालाच कळत नाही आपण का व कशासाठी आणि कसे जगत असतो. परिस्थिती,कर्तव्य आणि सवयीमुळे आपण आपल्याही नकळत कामे करित असतो. हक्क आणि कर्तव्याच्या मर्यादा आपण आपल्याही नकळत पार पाडित असतो. दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. त्यामागे असलेले त्याग,बलिदान आणि कष्टांची जाणीव कितीजणांना असते. स्वातंत्र्याच्या बदल्यात किती किंमत दिली गेली याचाही विचार होतो का?ज्या दिवशी ही जाणीव प्रत्येक जण ठेवेल त्या दिवशी आपण सर्वजण ख-या अर्थाने स्वतंत्र आणि प्रगल्भ होऊ. स्व-जाणीवेच्या प्रमुख पैलुंमध्ये भावनांची ओळख, क्षमता आणि मर्यादा,मुल्ये आणि ध्येय व वर्तनाचे मुल्यमापन हे समाविष्ट असते. या संदर्भात एक गोष्ट आठवली. एके ठिकाणी बांधकाम चालु असते. तेव्हा तेथील कामगारांना एकच सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो. प्रत्येकाची उत्तरे मात्र वेगवेगळी असतात यावरून आपल्याला प्रत्येकाच्या जाणीवेची कल्पना येईल.

प्रश्न असा होता,” तुम्ही इथे काय करता?

उत्तर क्र.1 :- बांधकाम चालू आहे, मजुरी मिळाली की घरी जाणार,जेवणार,परत उद्या येणार कामावर.

उत्तर क्र.2 :- शाळेचे बांधकाम चालू आहे.उद्या शाळा बांधुन झाली कि,मुले शाळेत येऊन शिकतील त्या पवित्र विद्यादानाच्या कामात माझा हा छोटासा हातभार.

उत्तर क्र.3 :- आज काम आहे,उद्या संपले की, पुन्हा दुस-या कामाच्या शोधात फिरावे लागेल.

     कमी-अधिक प्रमाणात आपण सर्वच जण हा विचार करित असतो. फार कमी लोकांना मजुर क्र. 2 सारखी आपल्या कामाची, आपली स्वत:ची जाणीव असते आणि ते त्याप्रमाणे वागत असतात. ही जाणीव उपजतच असणे,वाढीस लावणे आणि त्याप्रमाणे व्यक्ति घडविणे हे एक महान काम शिक्षक,बालक आणि समाज घडवित असतो आणि पर्यायाने देश घडत जातो. मी जे काम करतो ते योग्य आहे का? त्याचे दुरगामी परिणाम काय होणार आहेत? मी एक सुजाण नागरिक आहे का? माझ्या वागण्यामुळे समोरचा दुखावला जाणार नाही ना?माझ्या आई-वडिलांना,देशाला कमीपणा येणार नाही ना? अशा अनेक प्रश्नातुन व्यक्ती घडत जाते आणि त्यातुन देश घडत जातो. फक्त ही जाणीव असणे आणि नसल्यास करुन देणे हेही एक बहुमूल्य कर्तव्य ठरेल. सातंत्र्याच्या जाणीवेचे पैलुंमध्ये इतिहास आणि त्याग,हक्क आणि जबाबदारी,विचार आणि अभिव्यक्ती आणि आत्मभानाचा समावेश होतो. ही जाणीव कधी आर्थिक, सामाजिक तर कधी मानसिक, भावनिक असू शकते.

        अध्यात्म्यात याबद्दल विशेष भर देण्यांत येतो. “ तुझे आहे तुजपाशी… “ याबद्दल बरेच जण साशंक असतात. तेव्हा असे कोणतरी त्यांना जाणीव करुन देणे अपेक्षित असते. बदल ह्या एका योग्य जाणीवेतुनच होत असतो. बदल घडविणे, बदलाला सामोरे जाणे आणि तशी उर्जा/परिस्थीती निर्माण करणे हे सर्व आपल्याच हातात असते. छोट्यातला छोटा बदल ही एका योग्य जाणीवेचीच पहिली पायरी असते. त्यावरून एकदा चढायला सुरूवात केल्यावर मागुन आपोआप अनेकजण येत राहतात. पुढाकार घेणे आणि बदलाची आवश्यकता पटणे/पटवणे हे महत्वाचे. सामाजिक सुधारणा, क्रांतीकारक आणि देशभक्त यातुनच तयार होत असतात आणि समाजापुढे आदर्ष बनतात. यामध्ये मी स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करु शकतो हे महत्वाचे. मी काय करू शकतो, कसा हातभार लावु शकतो एवढा जरी प्रत्येकाने विचार केल्यास स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला असे म्हणता येईल. बघा, प्रयत्न करा आणि अंमलात आणा.

                                !! स्वातंत्र्यदिनाच्या खूप खुप शुभेच्छा!!  

                   

 




 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव